स्वेद : (आयुर्वेद). अर्थात घाम. हा मेद धातूचा मल (टाकाऊ पदार्थ) आहे. स्वेदाची उत्पत्ती ही त्वचेचा मेद बहुल आभ्यंतर भाग व रोमरंध्रे हा त्वचेचा वरचा भाग यांपासून होते. बर्हिगोल भिंगाने त्वचेचे निरीक्षण केले असता रोमकूपाशिवाय इतर अगणित सूक्ष्म छिद्रे दिसतात. ही छिद्रे स्वेदवह स्रोताचे मूळ आहेत. त्यांमधून स्वेद शरीराबाहेर पडतो. अंतस्त्वचेत स्वेद निर्माण करणाऱ्या ग्रंथी असतात. या ग्रंथीभोवती केशिकांचे (सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे) जाळे असते. या ग्रंथी केशिकेतील रक्तातून जल व काही मलभूत घन द्रव्यांचे सतत निऱ्हरण करीत असतात. हे जल व त्यात विलीन असलेली मलद्रव्ये म्हणजेच स्वेद होय.

स्वेद स्वेदवह ग्रंथीतून स्वेदवह स्रोतसात येतो व त्यातील बाह्य-त्वचेवरील छिद्रांतून बाहेर पडतो. ही स्वेदनिर्मितीची व निऱ्हरणाचीप्राकृत क्रिया आहे. जर यामध्ये विकृती निर्माण झाली, तर स्वेद न येणेकिंवा अतिप्रमाणात येणे यांमुळे मलस्थान दूषित होते व त्वचा विकार निर्माण होतात.

स्वेदाचे मुख्य कार्य त्वचेचा ओलावा कायम ठेवणे, त्वचा मृदू ठेवणे आणि शरीराचा ताप नियंत्रित ठेवणे हे होय. जर स्वेदाचे प्रमाण कमी झाले तर त्वचा रुक्ष बनते व त्वचेचे स्पर्शज्ञान कमी होते. अशा वेळी स्वेदन नावाची प्रक्रिया आयुर्वेद ग्रंथामध्ये सांगितली आहे. स्वेदाचे प्रमाण अधिक झाल्यास उद्रवर्तन करून (उटणे वापरून) स्नान केले जाते.

स्वेदवह स्रोत दूषित होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत : अतिभोजन, स्निग्ध पदार्थांचे अतिसेवन, अतिव्यायाम, शीतोष्ण पदार्थांचे एकाचवेळी सेवन यांमुळे तसेच क्रोध, भय आदी भावनिक उद्रेकांमध्ये देखील स्वेदवह स्रोत दूषित होतो.

स्वेदन : स्वेदवह स्रोत दूषित झाल्यास तसेच काही पंचकर्माचेपूर्वकर्म म्हणून देखील स्नेहन (अभ्यंग) व नंतर स्वेदन केले जाते.

प्रकार : स्वेदनाचे प्रमुख दोन प्रकार पडतात : (१) अग्नी स्वेदन : प्रत्यक्ष अग्नीचा वापर. (२) अनग्नि स्वेदन : अग्नीचा वापर नाही जसे व्यायाम, उबदार पांघरून, क्रोध, भीती इत्यादी.

अग्नी स्वेदनाचे पुढील चार प्रकार पडतात : (१) ताप स्वेद : वस्त्रकिंवा लोखंड तापवून नंतर शेक देणे. (२) उपनाह : वाताघ्न द्रवपदार्थ, ताक इत्यादींनी वाताहल द्रव्य शिजवून अवयवांवर बांधणे. (३) ऊष्म स्वेद : (वाफारा ). मांसरस, दूध, वातहर चूर्णाचा काढा करून तयार होणाऱ्या वाफेने शेक देणे. (४) द्रव स्वेद : द्रव्याचा काढा वापरून त्याने परिषेक करणे.

फायदे : स्वेदनाने त्वचा मृदू व नितळ होते. शरीरातील मल भागाचे निऱ्हरण होते. भूक वाढते. जखडलेले सांधे मोकळे होतात. शरीरवेदना दूर होतात. शरीराला मृदू बनविणाऱ्या क्रियांमध्ये स्वेदन श्रेष्ठ होय. तसेच खोकला, सर्दी, उचकी, दम लागणे व वातव्याधी यांमध्ये देखील स्वेदन उपयोगी आहे.

सामान्यपणे शरीराला कोणत्याही प्रकारचे कष्ट पडले की, त्वचेद्वारे स्वेद (घाम) येतोच. हल्ली वातानुकूलक (ए. सी.), बैठे खेळ, बैठे व्यवसाय व व्यायामाचा अभाव यांमुळे घाम मुळीच येत नाही. मेदाचे विलयन होत नाही व त्यामुळे मोठमोठ्या आजारांचे मूळ तेथेच निर्माणहोते. त्यामुळे स्वेदन (घाम आणणे) हा महत्त्वाचा उपक्रम ठरतो.

पहा : घर्म ग्रंथि स्रोतसे.

गव्हाणे, गजानन