स्वीडन : किंग्डम ऑफ स्वीडन. पश्चिम यूरोपातील क्षेत्रफळाने फ्रान्स व स्पेननंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश. स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पाचा सु. दोनतृतीयांश भाग या देशाने व्यापला आहे. अक्षवृत्तीय विस्तार ५५° २०’ ते ६९° ४’ उ. अक्षांश व रेखावृत्तीय विस्तार १०° ५८’ ते २४° १०’ पू. रेखांश. क्षेत्रफळ ४,५०,२९५ चौ. किमी. लोक-संख्या ९५,७३,४६६ (२०१३). स्वीडनच्या पश्चिमेस व वायव्येस नॉर्वे, पूर्वेस बॉथनियाचे आखात व फिनलंड, आग्नेयीस बाल्टिक समुद्र, नैर्ऋत्येस स्कॅगरॅक व कॅटेगॅट हे उत्तर समुद्राचे फाटे आहेत. कॅटेगॅट व बाल्टिकसमुद्र यांना जोडणाऱ्या ५.६ किमी. रुंदीच्या उरसुंद (द साउन्ड) या सामुद्रधुनीमुळे डेन्मार्क व स्वीडन हे दोन देश एकमेकांपासून अलग झाले आहेत. देशाच्या आग्नेयीस बाल्टिक समुद्रात असलेली गॉटलंड (३,००४ चौ. किमी.) व अलांद (१,३५० चौ. किमी.) ही स्वीडनची सर्वांत मोठीबेटे आहेत. देशाचा उत्तर-दक्षिण विस्तार सु. १,६०० किमी. व पूर्व–पश्चिम विस्तार सु. ५०० किमी. आहे. देशाचे १५% भौगोलिक क्षेत्र आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेस असून उन्हाळ्यात या प्रदेशात चोवीस तास दिनमान असते. स्टॉकहोम (लोकसंख्या ८,८१,२३५-२०१२) ही देशाची राजधानी आहे.
भूवर्णन : स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पाचा पश्चिम भाग नॉर्वेने तर पूर्व भाग स्वीडनने व्यापला असून या दोन देशांची सरहद्द डोंगराळ वपर्वतीय आहे. या पर्वतीय प्रदेशापासून दक्षिणेकडील बाल्टिक समुद्र व आग्नेयीकडील बॉथनियाच्या आखाताकडे जमिनीचा ढाळ आहे. स्वीडनच्या भूदृश्यात बरीच विविधता दिसते. वायव्येस वृक्षहीन पर्वतीय प्रदेश तर दक्षिणेस मैदानी प्रदेश आहे. स्वीडनचा पूर्व किनारा दंतुर असून तेथे लहानमोठ्या खाड्या आणि किनाऱ्याजवळ अनेक लहानमोठी खडबडीत बेटेही आहेत. दक्षिण किनाऱ्यावर वालुकामय पुळणी तर पश्चिम आणि उत्तर भागातील किनाऱ्यावर काही ठिकाणी कडे पहावयास मिळतात. लगतच्या सागरी भागात छोट्या-छोट्या बेटांचे समूह असून त्यांतील बरीचशी वनाच्छादित आहेत परंतु गॉटलंड हे सुपीक बेट आहे.
स्वीडनचे प्रमुख चार प्राकृतिक विभाग पडतात : (१) वायव्येकडील पर्वतीय प्रदेश, (२) इनर नॉर्थलँड किंवा नॉर्डलँड, (३) स्वीडिश सखल-भूमी आणि (४) दक्षिण स्वीडिश उच्चभूमी.
वायव्येकडीलपर्वतीयप्रदेश : यास नॉर्वेजियन लोक चलेन पर्वतअसे म्हणतात. या हिमाच्छादित श्रेणीमध्ये अधिक उंचीवरील उतारांवरून वाहणाऱ्या लहानलहान शेकडो हिमनद्या आढळतात. मौंट केब्न किंवा केब्नकाइस (उंची २,१२३ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर या पर्वत- श्रेणीत आहे. मौंट सारेक (२,०८९ मी.) हे या विभागातील दुसरे प्रमुख शिखर असून याच भागात सारेक राष्ट्रीय उद्यान आहे. या पर्वतश्रेणीचीअगदी उत्तरेकडील ४८८ मी. उंचीवरील भूमी वृक्षहीन आहे. अतिथंड हवामानामुळे येथे वनस्पतींची वाढ होऊ शकत नाही. उबदार व कमी उंचीच्या उतारांवर काही प्रमाणात बर्च वृक्षांची वाढ होते.
इनरनॉर्थलँडकिंवानॉर्डलँड : या विभागाने देशाचे विस्तृत क्षेत्र व्यापले आहे. नॉर्डलँड प्रदेश डोंगराळ, गोलाकार टेकड्यांचा, घनदाट जंगलांचा, दलदलीचा व विरळ लोकवस्तीचा आहे. मुख्यतः पाइन व स्प्रूस वृक्षांची मोठी अरण्ये येथे आहेत. या प्रदेशात अनेक सरोवरे व नद्यांची विस्तृत खोरी आढळतात. नद्यांनी अरुंद व खोल दऱ्या निर्माण केल्या असून त्यांपैकी काही नद्यांच्या मार्गात लांब आकाराची सरोवरे निर्माण झाली आहेत. अनेक वेगवान नद्या आग्नेयीस वहात असून त्यांवर मोठ्या प्रमाणात जलविद्युत्निर्मिती प्रकल्प आहेत. बॉथनिया आखाताच्या किनारी प्रदेशात नद्यांची खोरी रुंद झाली आहेत. येथील किनारी प्रदेशात व नद्यांच्या रुंद खोऱ्यांत लोकसंख्येची घनता अधिक आहे. नॉर्डलँड या स्वीडनच्या निरुपयोगी ठरलेल्या भागात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून लाकूड कापण्याच्या गिरण्या, लोहमार्ग आणि धबधब्यांच्या उपयोगाने विद्युत्-निर्मिती यांचा विकास झाला असून या भागाचे आर्थिक महत्त्व स्पष्टझाले आहे. नॉर्डलँडच्या दक्षिणेकडील भाग स्वीलँड या नावाने ओळखला जातो. इनर नॉर्थलँडच्या दक्षिण भागात डाल नदीच्या दक्षिणेस असलेल्या बेर्यस्लागन ह्या डोंगराळ प्रदेशात विपुल खनिज साठे आहेत. नॉर्डलँडच्या अतिउत्तरेकडील लॅपलँड या भागात प्रामुख्याने लॅप जमातीचे लोकराहत असून ते रेनडियरचे कळप पाळतात.
स्वीडिशसखलभूमी : हा दक्षिणेकडील प्राकृतिक विभाग मैदानी व सुपीक आहे. या प्रदेशात देशातील सर्वाधिक लोक राहतात. सरोवरे, वनाच्छादित कटक, अधूनमधून आढळणाऱ्या छोट्या टेकड्या ही या प्रदेशातील भूवैशिष्ट्ये आहेत. येथील सु. ४०% जमीन लागवडीखाली आहे. देशातील सर्वांत मोठी व्हेनर्न व व्हेटर्न ही सरोवरे याच सखल भूमीतआहेत. त्यांपैकी व्हेनर्न हे यूरोपातील सर्वांत मोठ्या सरोवरांपैकी एकआहे. दक्षिणेकडील मैदानी प्रदेशात काही ठिकाणी स्वीडनमधील सर्वांत सुपीक भाग आहेत. अगदी दक्षिण भागात असलेल्या स्कोनचा बहुतांश भाग शेती व बीच वृक्षांच्या वनांखाली आहे. स्वीडनमधील हा भाग समृद्ध कृषिक्षेत्राचा व सर्वांत दाट लोकवस्तीचा आहे.
दक्षिणस्वीडिशउच्चभूमीकिंवागॉटलँडपठार : हा प्राकृतिक विभाग खडकाळ असून सस.पासून ३६६ मी.पर्यंत या प्रदेशाची उंची वाढत जाते. निकृष्ट मृदा आणि वनाच्छादित प्रदेश यांमुळे येथे लोकवस्ती विरळ आहे. याचा दक्षिणेकडील भाग सपाट असून त्यात लहानलहान सरोवरे व दलदली आढळतात.
स्वीडनमध्ये हिमनद्यांच्या काऱ्यातून निर्माण झालेल्या मृदेचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या काळातील पुरागत ग्रॅनाइट व नीस तलशिलांपासून तयार झालेल्या मृदा निकृष्ट प्रतीच्या आहेत. प्रदूषित अम्लवर्षणामुळे मृदांचे अम्लीकरण झाले आहे. दक्षिण स्वीडनमध्ये चुनखडीयुक्त नवीन गाळाच्या संचयनापासून तयार झालेली चिकणमाती आढळते. ही तपकिरी रंगाचीमृदा असून विशेष सुपीक आहे. मध्य स्वीडनच्या बहुतांश प्रदेशात हिमानी कल्पानंतरच्या काळात जी भूउत्थान क्रिया घडून आली, तीत समुद्र-तलांवरील चिकणमाती भूपृष्ठावर येऊन त्यापासून सुपीक मृदा निर्माणझाली. नैर्ऋत्य स्वीडनमधील आर्द्र प्रदेशात आणि अगदी उत्तरेकडीलथंड प्रदेशात चिबड आणि पीट मृदा आढळतात.
नद्यावसरोवरे : स्वीडनमध्ये नद्या पुष्कळ असल्या तरी त्याफारशा मोठ्या नाहीत मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांना विशेष महत्त्व आहे. मुख्य नद्या वेगवान, खळखळाट करून वाहणाऱ्या असून जल-विद्युत्निर्मिती, लाकडी ओंडक्यांची वाहतूक आणि पर्यटन यांसाठी त्यांना फार महत्त्व आहे या नद्यांनी जाळीदार नदीप्रणाली निर्माण केली आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या नद्या पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेशात उगम पावतात. त्या प्रामुख्याने आग्नेयवाहिनी असून त्यांच्या मार्गात अनेक प्रपात व द्रुतवाह आहेत. या नद्या बॉथनियाच्या आखातास किंवा बाल्टिक समुद्राला मिळतात. यांपैकी क्लार ही सर्वांत लांब नदी (लांबी ७२० किमी.) नॉर्वेमध्ये उगम पावून स्वीडनमध्ये उत्तरेकडून व्हेनर्न सरोवराला मिळते. या सरोवराच्या दक्षिण टोकाशी बाहेर पडून पुढे उत्तर समुद्राला जाऊन मिळते. तिच्या अगदी दक्षिण भागातील पात्रात प्रसिद्ध ट्रॉलहेटन धबधबा आहे. मूआनीओ व टॉर्न नद्यांनी स्वीडन-फिनलंड यांमध्ये सरहद्द निर्माण केली आहे. दक्षिण-मध्य स्वीडनमधून वाहणारी डाल (लांबी ४०२ किमी.) ही प्रमुख नदी आहे. याशिवाय आँगरमन, लूलीओ, ऊमी याइतर प्रमुख नद्या आहेत.
देशात सु. ९६,००० सरोवरे असून त्यांनी एकूण भूक्षेत्राच्यासु. ८.३% क्षेत्र व्यापले आहे. त्यांपैकी व्हेनर्न (क्षेत्रफळ ५,५४५ चौ. किमी.), व्हेटर्न (१,८९८ चौ. किमी.), मेलारन (१,१४० चौ. किमी.), येल्मरन (८७९ चौ. किमी.) ही देशातील प्रमुख सरोवरे असून ती सर्व जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. पर्वतीय प्रदेशातीलअनेक सरोवरे लांबट व अरुंद असून त्यांना फिंगर लेक असे संबोधले जाते. त्यांतून मोठ्या प्रमाणावर लाकडाच्या ओंडक्यांची वाहतूक केली जाते. सिल्यान हे अतिशय सुंदर सरोवर असून पर्यटनाच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध आहे. यत हा देशातील प्रसिद्ध कालवा असून त्याच्या साहाय्यानेपूर्व किनाऱ्यावरील स्टॉकहोम हे राजधानीचे शहर नैर्ऋत्य किनाऱ्यावरील यतेबॉर्य या शहराशी जोडले आहे. त्याशिवाय व्हेटर्न सरोवराच्या दक्षिण टोकाशी असलेले यन्चंपिंग शहर आणि मध्यवर्ती सखल भूमीतील अनेक शहरे या कालव्याने एकमेकांना जोडली आहेत. व्हेनर्न आणि व्हेटर्न ही दोन सरोवरेही या कालवाप्रणालीचे भाग आहेत. त्याशिवाय येल्मरन, स्ट्रॉमशॉल्म व ट्रॉलहेटन हे देशातील इतर महत्त्वाचे कालवे आहेत.
हवामान : देशाचा दक्षिणोत्तर विस्तार आणि उत्तरेकडील अधिक उंचीचा प्रदेश यांमुळे उत्तर आणि दक्षिण भागातील हवामानात बरीचतफावत आढळते. आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेस मे महिन्याच्या अखेरीपासून ते मध्य जुलै या कालावधीत चोवीस तास दिनमान असते. दक्षिण भागात असलेल्या स्टॉकहोम येथेही या कालावधीत जेमतेम काही तास अर्धअंधुक प्रकाशयुक्त रात्र तर डिसेंबरच्या मध्यात साडेपाच तास दिनमान असते. हिवाळ्यात उत्तरेकडील लॅपलँड प्रदेशात वीस तास अंधार आणि चार तास संधिप्रकाश असतो. समशीतोष्ण कटिबंधाच्या उत्तर भागात आणि शीत कटिबंधात स्थान असूनही अटलांटिक महासागरातील गल्फ या उबदार सागरी प्रवाहावरून वाहत येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे स्वीडनचे हवामान काहीसे उबदार झाले आहे. या वाऱ्यांमुळेच दक्षिण स्वीडनमधील उन्हाळे आल्हाददायक व हिवाळे सौम्य राहतात. याउलट उत्तर स्वीडनमध्ये आल्हाददायक उन्हाळे परंतु हिवाळे थंड राहतात. हे वारे चलेन पर्वताला अडले जात असल्यामुळे त्यांचा उत्तर स्वीडनच्या हवामानावर तुलनेनेकमी परिणाम होतो. पूर्वेकडील खंडांतर्गत जास्त वायुभाराचाही येथील हवामानावर परिणाम होत असून, त्यामुळे उन्हाळ्यात वातावरण सूर्यप्रकाशित व हवा उष्ण राहते तर हिवाळे थंड असतात. उत्तरेकडील अंतर्गत भागात वर्षातील सु. आठ महिने मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते. त्यामुळे तापमान – ३०° ते – ४०° से. पर्यंत खाली जाते. बॉथनिया आखाताच्या उत्तर टोकाशी असलेल्या हापरांद येथे जानेवारीतील सरासरी तापमान – १२° से. असते. नोव्हेंबर ते मे या कालावधीत बॉथनियाचे आखात हिमाच्छादित असते. दक्षिणेकडील भागात हिमवृष्टी अनियमित स्वरूपात होते आणि जानेवारीतील तापमान – ५° से. ते ०° से. असते. दक्षिणेकडील किनारी भागातील पाणी क्वचितच गोठते.
वनस्पतीवप्राणी : देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्र वनांखाली आहे. स्वीडनच्या विस्तृत क्षेत्रात फर, पाइन,बर्च, स्प्रूस इ. सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे वनस्पतिजीवन बदलत जाते. अगदी उत्तर भागात व सर्वाधिक उंचीच्या प्रदेशात अल्पाइन वने आहेत. येथे अल्पाइन हीथ प्रकारची झुडुपे, विशिष्ट प्रकारचे लहान बर्च व विलो वृक्ष पहावयास मिळतात. उंच पर्वतीयप्रदेशात ४८७ -८८४ मी. उंचीपर्यंतच्या वृक्षरेषेपर्यंत सूचिपर्णी बर्च वृक्षांची अरण्ये आढळतात. दक्षिण स्वीडनमध्ये पानझडी व सूचिपर्णी अशी मिश्र वने आहेत. अगदी दक्षिण भागात पानझडी वने असून त्यांत बीच, ओक, ॲश, एल्म, लिंडेन, मॅपल व इतर वृक्ष आढळतात. दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असून ती जमीन लागवडीखाली आणली आहे. सरोवरांच्या सभोवती आणि समुद्रकिनाऱ्याच्या भागात दाट वनश्री आढळते. चुनखडीयुक्त भूस्तररचना आणि सौम्य हवामान यांमुळे गॉटलंड व अलांद बेटांवरील वनस्पतिजीवन वेगळ्या प्रकारचे आढळते.
स्वीडनमधील अरण्य प्रकारांनुसार प्राणिजीवनात भिन्नता आढळते. सांबर, एल्क, मृग, रेनडियर, अस्वल, कोल्हा, लांडगा, रानमांजर, लेमिंग, मार्टिन, वीझल, बिजू , साळिंदर, खार, चिचुंद्री इ. प्राणी येथे आढळतात. येथून लांडगा हा प्राणी नामशेष होत आहे. सरीसृप आणि बेडकांचीसंख्या तुलनेने कमी आहे. सरोवरे, नद्या व किनारी जलाशयांत विपुल प्रमाणात मासे आहेत.
इतिहास : सर्वांत शेवटी हिमाच्छादन संपुष्टात आलेल्या प्रदेशांपैकीस्वीडनचा प्रदेश आहे. हिमानी कल्पाच्या अखेरीस सु. १४,००० वर्षांपूर्वी येथील हिमाच्छादन कमी होऊ लागले. त्यानंतर यूरोपच्या मुख्य भूमीवरून शिकारी लोकांचे स्वीडनच्या दक्षिण भागात स्थलांतर होऊ लागले. हिमाच्छादित प्रदेशाची मऱ्यादा जसजशी उत्तरेकडे सरकू लागली तसतशी शिकार व मासेमारी करणाऱ्या लोकांनी उत्तरेकडे वस्ती करण्यास सुरुवात केली. इ. स. पू. सु. ९००० पासून स्वीडनच्या अगदी दक्षिण भागात मानवी वस्ती असल्याचे पुरावे मिळतात. इ. स. पू. सु. ६००० पासून येथील लोक विशिष्ट प्रकारच्या हत्यारांनी शिकार व मासेमारी करत. इ. स. पू. सु. २५०० पासून या प्रदेशात शेती व पशुपालन व्यवसाय केला जात होता. ब्राँझयुगात (इ. स. पू. १५००-१०००) या लोकांचे डॅन्यूब नदीच्या खोऱ्यातील लोकांशी व्यापारी संबंध होते. नवाश्मयुगापासून येथीलहवामान तुलनेने सौम्य होत गेले. इ. स. पू. ४०० ते इ. स. पू. १ येथे लोहाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर केला जात असे. इ. स. पू. सु. ५० पासून येथील लोकांचा रोमनांशी व्यापार सुरू झाला. फर आणि तृणमणी यांच्या बदल्यात ते काचेच्या व ब्राँझच्या वस्तू आणि चांदीची नाणीघेत असत. स्वेड (स्वीडिश) लोकांबद्दलची माहिती पहिल्यांदा रोमन लोकांनी लिहून ठेवली. रोमन इतिहासकार टॅसिटस याने इ. स. ९८ मध्ये लिहिलेल्या जर्मनिया या ग्रंथात स्वीअर (स्वीडिश) या स्कँडिनेव्हियन लोकांबद्दल लिहून ठेवले आहे. स्वीअर लोकांबद्दलचा हाच पहिलालिखित पुरावा आहे. त्यानुसार स्वीडन म्हणजे स्वीअर लोकांची भूमी.
इ. स. सु. ८०० पासून या प्रदेशातील व्हायकिंग टोळ्यांनी अवघ्या यूरोप खंडात दहशत निर्माण केली होती. त्यांपैकी नॉर्वेजियन व डॅनिश व्हायकिंग पश्चिमेस गेले, तर स्वीडिश व्हायकिंग टोळीने बाल्टिक समुद्रातून पूर्वेकडे रशियात काळा व कॅस्पियन या समुद्रांपर्यंत संचार केला. तेथे त्यांनी रूरिक राजघराण्याची स्थापना केली. या घराण्याने रशियावर बराच काळ राज्य केले. तेथून त्यांनी कॉन्स्टँटिनोपलवर हल्ले केले. रोमन बादशाहा-कडून अपार खंडणी वसूल केली. तसेच त्यांनी गुलाम आणि फर यांच्या बदल्यात सोने, चांदी व चैनीच्या वस्तू असा व्यापार केला. व्हायकिंगांचे हे वर्चस्व इ. स. १०५० पर्यंत राहिले. कालांतराने ह्या टोळीतील लोक रशियन व तुर्की समाजात मिसळून गेले. स्वीडनच्या पूर्वेकडील प्रदेशाचा व्यापार जर्मन व्यापाऱ्यांच्या हाती गेला. ह्या जर्मन व्यापाऱ्यांनी गॉटलंड बेटावरील व्हिझ्बी येथे आपली वसाहत स्थापन केली होती.
ॲन्सगार या फ्रँक मिशनऱ्याने इ. स. ८२९ मध्ये स्वीडनमध्येख्रिस्ती धर्म आणला परंतु येथील लोकांनी ख्रिस्तीकरणास तीव्र विरोध केला. त्यातून ख्रिश्चन आणि परंपरागत धार्मिक विचारांच्या लोकांमध्ये संघर्ष सुरू झाला. अकराव्या शतकात पहिला ओलाफ या राजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुलभ झाला. ओलाफ हाच स्वीडनचा पहिला ख्रिश्चन राजा बनला. इ. स. ११६४ मध्ये स्वीडनने स्वतंत्र आर्चबिशपचे स्थान मिळविले. ख्रिस्ती आचार्य मंडळाने स्वीडनमध्ये शाळांची स्थापना केली, कलेला प्रोत्साहन दिले आणि स्वीडनचा लिखित कायदा अंमलात आणला. अकराव्या शतकात स्वीडन, डेन्मार्क व नॉर्वे ही स्वतंत्र राज्ये होती. बाराव्या आणि तेराव्या शतकांत स्वीडनचे राज्यकर्ते आणि उमराव यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू होता. १२४९ मध्येस्वीडनने फिनलंडचा बराचसा प्रदेश जिंकून घेतला. १३१९ मध्ये अल्पवयीन राजा सातवा मांगनूस याच्या नेतृत्त्वाखाली नॉर्वे व स्वीडनएकत्र आले परंतु डेन्मार्कचा राजा चौथा वॉल्देमार याने स्वीडनच्या दक्षिण भागातील स्कोन प्रदेशाचा पुन्हा ताबा मिळविला. १३८८ मध्ये जर्मनांच्या स्वीडनमधील वाढत्या प्रभावाला विरोध करण्यासाठी येथील उमरावांनी डेन्मार्क आणि नॉर्वेच्या मार्गारेट राणीला मदतीचा हात दिला. १३८९ मध्ये स्कँडिनेव्हियन देशांनी जर्मनांचा पराभव केला. १३९७ मध्ये झालेल्या कलमार तहानुसार राणी मार्गारेटच्या नेतृत्त्वाखाली डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडन या देशांचा एक संघ अस्तित्वात आला. या तहातील तरतुदीनुसार या सर्व देशांचे परराष्ट्रीय धोरण समान राहणार होते परंतु राष्ट्रीय परिषदा स्वतंत्र राहणार होत्या. तसेच त्या त्या देशांचे अस्तित्वात असणारे कायदे तसेच चालू ठेवण्याची परवानगी होती. काही अल्प कालावधी वगळता हा संघ पुढे १०० वर्षांपेक्षा अधिक काळ टिकला. हॅन्सिॲटिक (जर्मन) व्यापारी जेव्हा स्वीडनमध्ये व्यापार करीत होते, तेव्हा स्टॉकहोममध्ये जर्मन लोकसंख्या मोठी होती. आग्नेय किनाऱ्यावरील कलमार आणि गॉटलंड प्रदेशावर जर्मन स्थलांतरितांचा ताबा होता. जर्मन व्यापाऱ्यांनी स्वीडनमधील खनिज संसाधनांचा विकास केला आणि स्वीडनचा बहुतांश व्यापार आपल्या ताब्यात घेतला. १३५० मध्ये दुसरा मांगनूस एरिकसन राजाने संपूर्ण देशासाठी नवीन कायदा संहती अंमलात आणली.
पंधराव्या शतकाच्या अखेरीस आणि सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस स्वीडिश आणि डॅनिश राज्यकर्त्यांमध्ये तेथील तीनही राजसत्तांवर स्वतःचे प्रभुत्व मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धा चालू होती. १५२३ मध्ये पहिला गस्टाव्हस व्हासा हा स्वतंत्र स्वीडनचा सत्ताधीश बनला. आपल्या कार-कीर्दीत त्याने स्वीडनचे सैन्य व आरमार उभारले, प्रशासनाची उत्कृष्ट घडी घालून दिली, शेती सुधारली, आयात-निऱ्यात व्यापाराला व उद्योगांना उत्तेजन दिले, स्वीडनमधील हॅन्सिॲटिकांची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली, रोमन कॅथलिक चर्चचे राजकीय व वित्तीय प्रभुत्व कमी केले आणि ल्यूथरप्रणीत प्रॉटेस्टंट पंथाचा स्वीकार करून स्वीडनला नवा राष्ट्रीय धर्मही दिला. निर्भय योद्धा, कुशल सेनापती, दूरदृष्टीचा शासनकर्ता, सच्चा राष्ट्रभक्त व लोकसेवक म्हणून गस्टाव्हस व्हासाला यूरोपच्या पुरुषश्रेष्ठांत मानाचे स्थान मिळाले. त्याच्याच अथक प्रयत्नाने अर्वाचीन स्वीडिश राष्ट्र निर्माण झाले.
स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होताच स्वीडनने विस्ताराचे धोरण स्वीकारून बाल्टिक समुद्राच्या परिसरातील मुलूख ताब्यात घेण्यासाठी तसेच उत्तर समुद्रातून अटलांटिक महासागरावर आपल्या व्यापारी नौदलाचा मुक्त संचार व्हावा म्हणून रशिया व डेन्मार्कशी अनेक युद्धे केली. त्यामुळे गस्टाव्हस व्हासानंतरचा सु. दोनशे वर्षांचा स्वीडनचा इतिहास रोमहर्षक प्रसंगांनी भरलेला आहे. ⇨ गस्टाव्हस आडॉल्फस (कार. १६११-३२) वयाच्या सोळाव्या वर्षी गादीवर आला, तेव्हा स्वीडनचे रशिया, पोलंडव डेन्मार्कशी युद्ध चालू होते. त्याने सर्व शत्रूंस जेरीस आणून बाल्टिकच्या परिसरातील बराच मुलूख मिळविला. याचवेळी कॅथलिक-प्रॉटेस्टंट पंथीयांच्या संघर्षातून जर्मनीत तीस वर्षीय युद्ध (१६१८-४८) पेटलेहोते. हॅप्सबर्गवंशीय पवित्र रोमन सम्राटाने कॅथलिकांची बाजू घेतली. गस्टाव्हसने साहजिकच प्रॉटेस्टंटांचा पक्ष घेतला. अवघ्या तेरा हजार सैन्यानिशी जर्मनीत उतरून ब्रिटेनफील्डच्या लढाईत (१६३१) त्याने सम्राटाच्या सैन्याचा धुव्वा उडविला. यानंतर अनेक ठिकाणी विजय संपादन करीत त्याने जवळजवळ सर्व जर्मनीवर ताबा मिळविला. पण ६ नोव्हेंबर १६३२ रोजी ल्यूट्सनच्या लढाईत तो मारला गेला. तरीही त्याच्या सैन्याने विजयश्री खेचून आणली. गस्टाव्हसच्या पराक्रमाने या युद्धात प्रॉटेस्टंटांची सरशी झाली. गस्टाव्हस स्वीडनचा श्रेष्ठतम राष्ट्रपुरुष ठरला. महत्त्वाच्या प्रश्नांत लोकप्रतिनिधींचा सल्ला तो घेत असल्याने, त्याच्या धोरणास नेहमी जनतेचा पाठिंबा असे.
गस्टाव्हसनंतर त्याची अल्पवयीन मुलगी क्रिस्तीन गादीवर आली. मंत्रिपरिषदेच्या सल्ल्याने पंतप्रधान आक्सल युक्सेनशेर्नॉच्या नेतृत्त्वा-खाली तिने राज्याची धुरा सांभाळली. मंत्रिपरिषदेने जर्मनीविरुद्धचे युद्धचालू ठेवण्याचा निर्णय घेतला. गस्टाव्हसची धोरणे तशीच पुढे चालू ठेवण्यात आली. वेस्टफेलियाच्या तहानुसार (१६४८) युद्धविराम होऊन स्वीडनने पवित्र रोमन साम्राज्याचा बाल्टिक व उत्तर समुद्रकिनाऱ्यावरील पॉमरेनिया व इतर काही प्रदेश पदरात पाडून घेतला. डेन्मार्कशी झालेल्या अल्पकालीन युद्धात (१६४३-४५) स्वीडनने बाल्टिक प्रदेशातील आपली ताकद दाखवून दिली. राणी क्रिस्तीनच्या १६४४-५४ यांदरम्यानच्या कारकीर्दीत राजघराण्याची संपत्ती उमरावांकडे हस्तांतरित करण्यात येऊ लागली. तिने विवाह करण्यास नकार दिला. राज्यत्याग करून उर्वरित आयुष्य तिने रोममध्ये घालविले. क्रिस्तीनच्या राज्यत्यागानंतर स्वीडनची गादी गस्टाव्हस आडॉल्फसचा भाचा दहावा चार्ल्स गस्टाव्हस याला मिळून पॅलॅटिनेट वंशाची राजवट सुरू झाली. डेन्मार्कशी युद्ध ही चार्ल्सच्या कारकीर्दीतील महत्त्वाची घटना. चार्ल्स पोलंडच्या स्वारीवर असताना डेन्मार्कने एकाएकी स्वीडनविरुद्ध युद्ध पुकारले, तेव्हा चार्ल्स अति-वेगाने ससैन्य परतला. थंडीमुळे गोठलेल्या समुद्राच्या पृष्ठभागावरून सर्व सैन्यानिशी कोपनहेगनच्या वेशीवर पोहोचला. स्वप्नातही अशा अचाट साहसाची कल्पना नसल्याने डेन्मार्कचे सैन्य गाफील होते. त्यांचा सहज धुव्वा उडवून चार्ल्सने स्कोन वगैरे स्वीडिश भूमीवरील डॅनिश अंमला-खालील प्रांत परत मिळविला. खऱ्या अर्थाने स्वीडनचे विस्तारवादीउद्दिष्ट सफल झाले परंतु राजाचा अचानक मृत्यू झाला.
दहाव्या चार्ल्सचा मुलगा अकरावा चार्ल्स लहानपणीच (वयाच्याचौथ्या वर्षी) गादीवर आला. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीसउमरावांची सत्ता खूपच वाढली. शेतकरी, कामकरी करांच्या ओझ्याखाली दबून गेले परंतु सज्ञान होताच चार्ल्सने त्यांच्या उद्धारासाठी योजनाआखून सरदारांची मिरासदारी संपुष्टात आणली. त्याने स्वीडनचे आरमार नव्याने उभारले व लष्करातही अनेक सुधारणा केल्या. अकराव्याचार्ल्सचा मुलगा बारावा चार्ल्स वयाच्या पंधराव्या वर्षी गादीवर आला. त्याच्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत (१६९७-१७१८) सतत चाललेल्या युद्धामुळे स्वीडन उद्ध्वस्त झाला. स्वीडनचे वैभव आणि वाढलेलेसामर्थ्य आपल्याला धोकादायक असल्याचे जाणून पोलंडचा राजा दुसरा ऑगस्टस याच्या नेतृत्वाखाली डेन्मार्क, पोलंड, सॅक्सनी व रशिया यांनी एकत्र येऊन स्वीडनविरुद्ध युद्ध पुकारले. वीस वर्षे चाललेल्या ग्रेट नॉर्दर्न वॉर (१७००-२१) या युद्धात चार्ल्सचे अलौकिक लष्करी गुण प्रकर्षाने दिसून आले. पण त्यातच स्वीडनची एक कर्तबगार पिढी कामी येऊन साम्राज्याची मोडतोड झाली. युद्ध सुरू होताच लहानग्या चार्ल्सने अचाट पराक्रम गाजवून डेन्मार्कचा पराभव केला. त्यानंतर लगेच रशियाकडेवळून नार्वाच्या लढाईत आपल्यापेक्षा पाचपट असलेल्या रशियन सैन्याचा धुव्वा उडविला. त्यानंतर चार्ल्स पोलंडकडे वळला (१७०२-०६). पोलंडचा पराभव करून वॉर्सा काबीज केल्याने पोलंडला तह करणे भाग पाडले. चार्ल्सने १७०७ मध्ये रशियावरील चढाईला सुरुवात केली. सुरु-वातीच्या यशानंतर मात्र वस्त्रांच्या दुर्भिक्षतेने व रशियातील कडाक्याच्या थंडीने स्वीडिश सैन्याचे अतोनात हाल झाले. शेवटी १७०९ मध्ये पल्टॉव्हच्या घनघोर लढाईत स्वीडिश सैन्य गारद झाले. चार्ल्स तुर्कस्तानात पळाला. तेथे रशियाविरुद्ध तुर्कस्तानची मदत मिळविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर तो स्वदेशी परतला. यावेळी डेन्मार्क व पोलंडने इंग्लंड व प्रशियाच्या मदतीने स्वीडनवर स्वारी केली. या संकटांनी न डगमगता चार्ल्स नव्या सैन्यानिशी युद्ध आघाडीवर दाखल झाला (१७१४). पण नॉर्वेतील फ्रेड्रिक्स्टा येथील किल्ल्याच्या वेढ्यात तो मारला गेला (१७१८). त्यामुळे स्वीडनला तह करणे भाग पडले. परिणामतः स्वीडनचे साम्राज्य व बाल्टिकवरील वर्चस्व संपुष्टात आले. चार्ल्सच्या कारकीर्दीत स्वीडनवर अपरंपार संकटे कोसळली, तरी खंदा लढवय्याम्हणून बाराव्या चार्ल्सला स्वीडनच्या राष्ट्रपुरुषांत मानाचे स्थान आहे.
बाराव्या चार्ल्सनंतर राजकीयदृष्ट्या स्वीडनची पीछेहाट झाली, पण साहित्य, विज्ञान, कलादि क्षेत्रांत पुष्कळ प्रगती झाल्याने सांस्कृतिकदृष्ट्या हा काळ उत्कर्षाचा गेला. राजसत्ता दुर्बल झाल्याने उमरावांचे प्रस्थवाढले. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर पहिल्या नेपोलियन बोनापार्टच्या आक्रमक व संहारक राजकारणात स्वीडनचा टिकाव लागणे कठीण झाल्याने व तशातच राजा तेराव्या चार्ल्सला संतती नसल्याने वारसाच्या निवडीवरून बरेच वादंग माजले. शेवटी नेपोलियनला खुश करण्यासाठी त्याचा सेनापती बेरनादॉत यास स्वीडनचे युवराजपद बहाल करण्यात आले. भावी राजा म्हणून स्वीडनमध्ये आल्यानंतर (१८१०) त्याने चौदावा चार्ल्स जॉन हे नावधारण केले. स्वीडनमध्ये दाखल होताच बेरनादॉतने नेपोलियनविरुद्धइंग्लंड, प्रशिया व रशियाचा पक्ष घेतला. याचे फलित म्हणून व्हिएन्ना परिषदेत नॉर्वे स्वीडनला जोडला गेला.
बाराव्या चार्ल्सच्या निधनानंतर स्वीडनमध्ये लोकशाहीचे युग सुरू झाले होते. राजकीय सत्ता संसदेकडे (रिक्सडॅग) गेली. या काळातसुरुवातीला उमरावांचे महत्त्व वाढले. फ्रेंचानुकूल हॅट पक्ष आणि रशिया-नुकूल कॅप पक्ष यांच्यातील संघर्षाने राजकारण बरेच गढुळले. पण चौदावा चार्ल्स याच्या सत्ताकाळात ही स्थिती पालटली (१८१९). त्याने नॉर्वेला अंतर्गत स्वायत्तता देऊन तडजोड केली व आपल्या सव्वीस वर्षांच्या कारकीर्दीत शांततेचे धोरण स्वीकारून स्वीडनला सुस्थिती प्राप्त करून दिली. त्याच्या वारसांनीही संसदीय लोकशाहीचा व मऱ्यादित राजसत्तेचा पुरस्कार करून विधायक काऱ्याने स्वीडनला वैभवाच्या व प्रतिष्ठेच्या मार्गावर आणले. त्यामुळे १८१४ नंतर स्वीडनने कोणत्याही युद्धात भाग घेतलेला नाही. पहिल्या महायुद्धकाळात पाचवा गस्टाव्हस स्वीडनच्या गादीवर होता. ‘पितृभूमीसाठी जनतेच्या बाजूने’ हे त्याचे ब्रीदवाक्य होते. मोठ्या कौशल्याने त्याने स्वीडनलाच नव्हे तर सर्वच स्कँडिनेव्हियाला युद्धाच्या संकटातून वाचविले. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभी जर्मनीशी व्यापार चालू ठेवल्याने स्वीडनचे धोरण हिटलरला अनुकूल असल्याचा समज पसरला, पण स्वीडनने नाझी तत्त्वांचा कधीच पुरस्कार केला नाही. योग्य वेळ येताच जर्मनीशी असलेला व्यापार बंद केला. निरनिराळ्या देशांतील असंख्य निर्वासितांना स्वीडनमध्ये आश्रय मिळाला. तटस्थ राहूनही स्वीडनने लोकशाही राष्ट्रांना अनेक प्रकारे मदत केली.
युद्धोत्तरकाळात स्वीडनने आंतरराष्ट्रीय सहकाऱ्याचे आपले धोरण पुढे चालविले. संयुक्त राष्ट्रसंघाचे सभासदत्व स्वीकारून स्वीडनने ह्या जागतिक संघटनेत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. १९५३ मध्ये नॉर्डिक काउन्सिल स्थापन झाले. त्याचे सभासदत्व स्वीडनने स्वीकारले. मार्शल योजनेचा पुरस्कार करून स्कँडिनेव्हियन देशांच्या युद्धोत्तर पुनर्निर्माण काऱ्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. युद्धकाळापासून स्वीडनच्या शासनाची सूत्रे सोशल डेमॉक्रॅटिक ह्या मजूर पक्षाकडे राहिल्याने व त्यांनी विधायक राष्ट्रवादी, शांततेचे व अलिप्ततेचे धोरण स्वीकारल्याने स्वीडनने नॉर्वे, फिनलंडप्रमाणे नाटो संघटनेचे सभासदत्व स्वीकारले नाही, पण रशियाला अनुकूल धोरणही ठेवले नाही. १९५३-६१ पर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाचे सर-चिटणीस पद डाग हामारशल्ड या स्वीडिश मुत्सद्याने भूषविले. आजही अनेक यूरोपीय आर्थिक व सांस्कृतिक संघटनांचे सभासदत्व स्वीकारून स्वीडनने आंतरराष्ट्रीय सहकाऱ्याचा आदर्श जगापुढे ठेवला आहे पण राष्ट्राच्या आर्थिक विकासाकडे व आधुनिक अणुयुगास अत्यावश्यक अशा राष्ट्र संरक्षण व्यवस्थेकडे मुळीच दुर्लक्ष केलेले नाही.
राजकीयस्थिती : स्वीडनमध्ये सांविधानिक राजेशाही राज्यपद्धती आहे. स्वीडनचे संविधान १८०९ पासून अंमलात असून १९७५ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. हे पुढील चार मूलभूत कायद्यांवर आधारित आहे : (१) संविधान शासनाचे साधन, (२) उत्तराधिकाराचा (वारसाचा) कायदा, (३) वृत्तपत्र कायद्याचे स्वातंत्र्य आणि (४) संसदीय( रिक्सडॅग) कायदा. सर्व कायद्यांमध्ये दुरुस्ती शक्य असते. लोकप्रिय सार्वभौमत्व, प्रातिनिधिक लोकशाही व सांसदिकता ही या संविधानातील प्रमुख तत्त्वे आहेत.
राजा हा देशाचा प्रमुख असतो परंतु राजकीय सत्ता त्याच्या हाती नसते. किंवा शासकीय कामकाजात त्याचा सहभाग नसतो. राजाची जबाबदारी शिष्टाचारापुरतीच मऱ्यादित असते. लिंगभेद न करता प्रथम जन्माला आलेले मूल उत्तराधिकारी म्हणून गादीवर येते. पक्षाच्या नेत्यांशी विचारविनिमय करून आणि संसदेची मान्यता घेऊन संसदेचे सभापती पंतप्रधान पदा-साठीच्या व्यक्तीचे नामनिर्देशन करतात. पंतप्रधान मंत्रिमंडळातील इतर सदस्यांची नेमणूक करतात. सर्व शासकीय निर्णयांना मंत्रिमंडळ जबाबदार असते. मंत्र्यांची संख्या कमी असते. प्रशासनातील तपशील व विधि-विधानाचे काऱ्यान्वयन यांसंबंधीचे ज्ञान मंत्र्यांना असणे अपेक्षित नसते. हे काम केंद्रीय प्रशासकीय अभिकरण (एजन्सी) करीत असते. या अभि-करणामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक मंत्रिमंडळाकडून केली जाते. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन ज्या ज्या उपाययोजना करीत असते, त्यावेळी उपाययोजनांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी संबंधित खात्याचा मंत्री सामान्यपणे एखाद्या आयोगाची नेमणूक करतो. त्या आयोगामध्ये विरोधी पक्षातील राजकीय व्यक्ती, कामगारांचे प्रतिनिधी, शास्त्रज्ञ व सनदी सेवक यांचा समावेश असतो. या आयोगाने तयार केलेला छापील अहवाल वेगवेगळ्या विभागांकडे व संघटनांकडे समीक्षणासाठी पाठविला जातो. त्यानंतर विधानमंडळात निर्णयासाठी हा विषय ठेवला जातो.
देशात एकसदनी संसद असून त्यातील ३४९ सदस्य चार वर्षांसाठी सार्वत्रिक मतदानाने निवडून दिले जातात. संसद सदस्यांच्या निवडीसाठी प्रमाणशीर मतदान पद्धतीचा वापर केला जातो. देशाची विभागणी २९ मतदारसंघांत केली असून त्यांमधून एकूण ३१० सदस्य निवडून दिले जातात. उर्वरित ३९ सदस्य देशातील वेगवेगळ्या ज्या पक्षांना किमान ४% मते मिळाली आहेत, त्यांच्यातून प्रमाणशीर मतदान पद्धतीने निवडले जातात. सप्टेंबर २०१० मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वीडिश सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टीचे सर्वाधिक ११२ सदस्य ३०.७% मते घेऊन निवडून आले. स्पष्ट बहुमत नसल्याने या पक्षाने इतर पक्षांशी युतीकरून शासन स्थापन केले. त्याशिवाय न्यू मॉडरेट, ग्रीन पार्टी, लिबरल पार्टी, सेंटर पार्टी, स्वीडन डेमॉक्रॅटस्, ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी, लेफ्टपार्टी हे राजकीय पक्ष येथे आहेत.
संरक्षणवन्यायव्यवस्था : देशाच्या भूसेनेत १०,२००, नौसेनेत ७,९०० तर हवाई दलात ५,९०० सैनिक होते (२००७). स्वीडनमध्ये दोन प्रकारची समांतर न्यायालये आहेत. त्यांपैकी सामान्य न्यायालयामध्ये फौजदारी व दिवाणी खटले, तर सामान्य प्रशासकीय न्यायालयात सार्व-जनिक प्रशासनविषयक खटले चालविले जातात. सामान्य न्यायालयात जिल्हा न्यायालये, अपील न्यायालये व सर्वोच्च न्यायालय असे तीन स्तर असतात. याशिवाय विशिष्ट प्रकारचे खटले चालविण्यासाठी काही विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत.
चौधरी, वसंत
आर्थिकस्थिती : देशाची निऱ्यातीला प्राधान्य देणारी बहुआयामी अर्थव्यवस्था आहे. उत्तम प्रकारचे लाकूड, लोखंड, पोलाद, कागद यांच्या जगभर निऱ्यातीबरोबरच मोटारी, दळणवळणाची साधने, औषधे, यंत्रसामग्री, रासायनिक वस्तू , घरगुती वापरासाठीच्या वस्तू व साधने यांची निऱ्यात हे स्वीडनच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. येथील पारंपरिक शेती- व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यात आलेले असून निम्म्याहून जास्त लोक या व्यवसायाशी निगडित आहेत. येथील खुली अर्थव्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची असून वाढीव करांच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी उपक्रम राबवण्यावर भर दिला जातो. देशातील जवळपास ९०% साधनसामग्री खाजगी व्यक्ती वा कंपन्यांच्या मालकीची असून५% राज्याच्या (शासनाच्या) तर उर्वरित ५% उत्पादक व ग्राहकसहकारी संस्थांच्या मालकीची आहे. इतर यूरोपीय देशांप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात स्वीडनचा सक्रीय सहभाग नसल्याने तेथील अर्थव्यवस्थेला त्याची झळ पोहोचलेली नाही. त्यामुळे लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे. विविध करांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळविणारा व कल्याणकारी उपक्रम राबवणाऱ्या प्रमुख देशांत स्वीडनची गणना केली जाते. २०१२ मध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४४.२% उत्पन्न केवळ करांच्या माध्यमातून गोळा करण्यात आले. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न( जीडीपी) वाढीचा दर जवळपास ८% (२०१२) असून सेवा तसेच औद्योगिक क्षेत्राचा त्यात सिंहाचा वाटा आहे.
एकोणिसाव्या शतकात स्वीडनची वाटचाल पारंपरिक अशा शेती व्यवसायाकडून औद्योगिक व शहरी अर्थव्यवस्थेच्या दिशेने झाल्याचे दिसते. आर्थिक पुनर्रचना, आधुनिक अर्थव्यवस्थेचा स्वीकार, बँका व खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर दिलेले उत्तेजन यांमुळे शतकाच्या उत्तरार्धात मोठी प्रगती साधली गेली. जागतिक महामंदीच्या संकटातून पूर्णपणे बाहेर पडणारा जागतिक पातळीवरील स्वीडन हा प्रथम क्रमांकाचा देश मानला जातो. देशाची १९७०-९० या काळात आर्थिक प्रगती काहीशी मंदावली. १९९० च्या मध्यापासून अर्थव्यवस्थेने पुन्हा बाळसे धरले. १९९४ मध्ये देशाच्या अंदाजपत्रकीय तुटीचे प्रमाण स्थूल उत्पन्नाच्या १५ टक्क्यांहून जास्त झाले. त्या परिस्थितीत सरकारने अनावश्यक खर्चात कपात करून आर्थिक सुधारणा राबवल्या व माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आर्थिक पेचप्रसंगातून उभारी घेतली.
आजमितीला (२०१३) स्वीडनची अर्थव्यवस्था जगातील श्रीमंत व तांत्रिक दृष्ट्या प्रगत देशांमध्ये गणली जाते. जागतिक स्तरावरील व्यवसायवृद्धीमुळे तेथील व्होल्वो, एच् ॲण्ड एम्, आयकीया कंपन्यांचा अमेरिकेतील बॉस्टन शहरापासून चीनच्या बीजिंग शहरापर्यंत सर्वत्रप्रसार दिसून येतो. अलिप्तवाद व उद्योगजगताची प्रदीर्घ पार्श्वभूमी यांसारख्या घटकांमुळे येथील अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी आहे. भांडवल-शाहीप्रणित उच्च तंत्रज्ञान व कल्याणकारी योजनांमुळे तेथील अर्थव्यवस्था आर्थिक व राजकीय विश्लेषकांना आदर्शवत वाटते. स्पर्धात्मक वातावरण, नाविन्यता, उच्च राहणीमान, आरोग्य व स्वच्छता अशांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या देशास वरचे मानांकन दिले जाते. दरडोई स्थूल उत्पन्नाचा (जीडीपी) विचार करता जगातील पहिल्या पंधरा देशांमध्ये स्वीडनचा समावेश होतो.
चौधरी, जयवंत
देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी सु. २% कृषी क्षेत्रातून, २६% औद्योगिक क्षेत्रातून आणि ७२% उत्पन्न सेवा क्षेत्रातून मिळत होते (२०११). येथील दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण सर्वाधिक आहे. व्यवसाय व शासन यांमध्ये जगातील सर्वांत कमी भ्रष्टाचार असणाऱ्या देशांमध्ये स्वीडनचा चौथा क्रमांक आहे (२०११). २००९ मध्ये स्वीडनने ४.५ महापद्म डॉलर इतकी भरीव आंतरराष्ट्रीय मदत दिली असून हेप्रमाण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.१२% आहे. जगातील विकसित देशांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक असून त्यामुळे हा जगातील सर्वांत उदार देश ठरला आहे.
कृषी : विसाव्या शतकाच्या मध्यापासून कृषी, अरण्योद्योग व मत्स्य-व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण घटले. देशाच्या भौगोलिक क्षेत्रा-पैकी ६ टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्र लागवडीखाली आहे. एकूण कृषिक्षेत्र ३२,१६,८३९ हे. असून त्यापैकी सु. ८४% क्षेत्र प्रत्यक्ष पीक लाग-वडीखाली आणि १६% नैसर्गिक कुरणांखाली होते (२००५). बहुतांश कृषियोग्य क्षेत्र दक्षिण स्वीडनमध्ये आहे. दक्षिण भागातील स्कोन प्रदेशातील जमीन सुपीक असून तेथील हवामानही शेतीच्या दृष्टीने अनुकूल आहे. याशिवाय मध्य स्वीडनमधील सरोवरांभोवती कृषिक्षेत्र आढळते. उत्तर स्वीडनचा बहुतांश भाग अती थंड हवामानाचा व नापीक जमिनीचा आहे. इनर नॉर्थलँडमध्ये एक टक्क्यांपेक्षाही कमी क्षेत्र शेतीखाली आहे. दक्षिण भागात गहू, बार्ली, ओट, साखर बीट, तेलबिया, बटाटे आणि भाजीपाला ही पिके, तर उत्तर भागात गवत आणि बटाटे यांचे उत्पादन घेतले जाते. मृद्संधारणाचा उपाय म्हणून दोन पिकांदरम्यान गवताचे उत्पादन घेतलेजाते. स्वीडनने आपल्या एकूण कृषिक्षेत्रापैकी २,२२,२६८ हे. क्षेत्रसेंद्रिय पिकांच्या लागवडीसाठी राखून ठेवले आहे (२००५). हेप्रमाण जगामध्ये सर्वाधिक आहे. कृषी सहकारी चळवळीचे बहुतेकसर्व शेतकरी सदस्य आहेत. कृषी सहकारी संस्था सभासद शेतकऱ्यांचा माल गोळा करतात, त्यांवर प्रक्रिया करून त्यांची विक्रीही करतात.त्यामुळे सभासद शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. देशातील एकूण कामकरी लोकांपैकी ३% लोक कृषिव्यवसायात गुंतले आहेत. दर हेक्टरी सर्वाधिक कृषी उत्पादन असलेल्या देशांमध्ये स्वीडनचा समावेश होतो. पऱ्यावरणीय समस्यांमुळे देशात रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे प्रयत्न केले जातात.
शेतीपेक्षाही येथील पशुपालन व्यवसाय मोठा आहे. देशाच्या सर्व भागात दुग्धोत्पादनासाठी गायी पाळल्या जातात. देशाच्या अगदी दक्षिण भागात वराहपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय केंद्रित झाला आहे.
स्वीडिश अर्थव्यवस्थेत मत्स्योद्योगाला तुलनेने कमी महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार स्वीडनने उत्तर समुद्रातील आपले मासेमारीचे परंपरागत काही क्षेत्र गमावले आहे. सभोवतालच्या सागरी प्रदेशात कॉड, हेरिंग, पाईक, मॅकरेल, सॅमन, कोळंबी, लॉब्स्टर या जातीचे मासे पकडले जातात. यतेबॉर्य हे देशातील अग्रेसर मासेमारी बंदर व माशांची बाजारपेठ आहे. २००९ मध्ये एकूण २,१२,००० टन मासे पकडण्यात आले.
जंगलसंपत्ती : अरण्ये हे देशातील विशेष महत्त्वाचे संसाधन आहे. देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ५५.२% क्षेत्र अरण्यांखाली होते (२००८). देशाच्या एकूण निऱ्यातीच्या सु. एकदशांश निऱ्यात लाकूड वलाकूड उत्पादनांची असते. देशातील सु. ५६% वने खाजगी, २५% भागीदारी कंपन्यांच्या मालकीची आणि १९% सार्वजनिक मालकीची आहेत. वनांमध्ये ४२% वने स्प्रूस, ३९% पाइन तर १६% रूंदपर्णी वृक्षांची आहेत. देशाच्या उत्तर व उत्तरमध्य भागात लाकूडतोडीची प्रमुख क्षेत्रे आहेत. लाकूड चिरकाम, कागदाचा लगदा व कागदनिर्मिती हे अरण्यांवर आधारित प्रमुख उद्योग आहेत. याशिवाय लाकडापासून विविध वस्तूंची निर्मिती केली जाते. लगदा व कागदनिर्मिती उद्योग मूलतः बॉथनियाच्या आखाताला मिळणाऱ्या नद्यांच्या मुखाशी तसेच व्हेनर्न सरोवराच्या परिसरात विकसित झाले होते. आधुनिक उद्योग मात्र स्वीडनच्या दक्षिण किनाऱ्यावर विकसित झाले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून वृक्षतोड व नवीन वृक्ष लागवड यांच्यात समतोल राखण्याचे धोरण कटाक्षानेपाळले जाते. २०१० मध्ये लाकडी ओंडक्यांचे एकूण उत्पादन ७,००२ द. ल. घ. मी. झाले.
खनिजवऊर्जासंसाधने : देशात खनिज संसाधने विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. विशेषतः लोहखनिजाचे समृद्ध साठे आहेत. जागतिक उत्पादनाच्या २% लोहखनिज उत्पादन या देशातून होते. यूरोपातील सर्वाधिक लोहखनिजांची निऱ्यात करणारा हा देश आहे. लॅपलँडमधील कीरूना येथे चांगल्या प्रतीच्या लोहखनिजाचे मोठे साठे असून एकोणि-साव्या शतकाच्या अखेरीस येथील लोहखनिजाच्या निऱ्यातीस सुरुवात झाली. स्वीडनमधील लोह-पोलाद उद्योगालाही येथील लोहखनिजपुरविले जाते. नॉर्डलँडमधील शेलेफ्ट प्रदेशातून सोने, तांबे, चांदी, शिसे, जस्त यांच्या धातुखनिजांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मध्य स्वीडनमधील तांबे, चांदी व लोहखनिजाचे साठे बऱ्याच अंशी रिक्तझाले आहेत.
स्वीडनमध्ये जीवाश्म इंधनाचा तुटवडा असल्याने त्याची आयातकरावी लागते. एकूण आयातीच्या १४.३% आयात खनिज तेल व खनिज तेल उत्पादनांची होती (२०११). १९७० मध्ये एकूण ऊर्जा निर्मिती-पैकी सु. ७७% ऊर्जानिर्मिती खनिज तेलापासून झाली होती. हेच प्रमाण २००७ मध्ये सु.३१ टक्क्यांपर्यंत कमी झाले. २०२० पर्यंत जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व पूर्णपणे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे. २००८ मध्ये नवनवीन ऊर्जास्त्रोतांपासून ४४.४% ऊर्जा मिळविली गेली. देशात जलविद्युत्निर्माण क्षमता सर्वाधिक आहे. एकूण ऊर्जानिर्मितीमध्ये ४६.३% प्रमाण जलविद्युत् शक्तीचे, ३८.३% अणुऊर्जेचे, १३% परंपरागत औष्णिक ऊर्जेचे आणि २.४% पवनऊर्जेचे होते (२०१०). देशात दहा अणुऊर्जा-निर्मिती संच काऱ्यान्वित होते (२०१०).
उद्योग : देशाची अर्थव्यवस्था अभियांत्रिकी आणि सेवा उद्योगांवर आधारित आहे. उद्योग प्रामुख्याने निऱ्यातीशी निगडित आहेत. बहुतांश स्वीडिश उद्योग खाजगी मालकीचे असून ऊर्जा, खाणकाम व सार्वजनिक वाहतूक हे उद्योग शासनाच्या अखत्यारित आहेत. विस्तृत अरण्ये, समृद्ध लोहखनिज साठे यांसारख्या संसाधनांच्या उपलब्धतेमुळे पूर्वीचा गरीब कृषिप्रधान देश आज पुढारलेला औद्योगिक देश बनला आहे. शासन, मालक गट आणि कामगार संघटना यांच्यातील उत्तम सहकार्य हे स्वीडनच्या आर्थिक विकासाला पूरक ठरलेले महत्त्वाचे घटक आहेत. कामगारविषयक सकारात्मक धोरणामुळे बेरोजगारीचा प्रश्नही सोडविला गेला आहे. शासनाचे औद्योगिक आणि करविषयक धोरणही अप्रत्यक्ष रीत्या आर्थिक विकासाला अनुकूल ठरले आहे. आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने शासनाने संशोधन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासास व वापरास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मोठी गुंतवणूक केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्वीडिश वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांचे निऱ्यातमूल्य कमी राखण्यासाठी शासनाचे प्रयत्न असतात.
किनारी प्रदेश, मध्य स्वीडन आणि स्कोन प्रदेशाच्या पश्चिम भागात निर्मितिउद्योग विखुरलेले आहेत. देशात उत्तम प्रतीच्या पोलादाची निर्मिती केली जाते. त्याचा अभियांत्रिकी उद्योगांत तसेच गोलक धारवा, घरगुती वस्तू, परिशुद्ध साधने यांच्या निर्मितीसाठी उपयोग केला जातो. स्वीडनच्या औद्योगिक उत्पादनातील तसेच त्याच्या निऱ्यातीमधील जवळजवळ निम्मा हिस्सा अभियांत्रिकीय उत्पादनांचा असतो. लोह-पोलाद उद्योग प्रामुख्याने मध्य स्वीडनमधील बेर्यस्लागन प्रदेशात विकसित झाले आहेत. विसाव्या शतकात किनारी प्रदेशातील अस्टरसंड व लूलीओ येथे लोह-पोलादउद्योग स्थापन करण्यात आले. शासनाच्या मालकीची स्वीडिश स्टील कंपनी ही लोह-पोलाद उद्योगातील अग्रेसर कंपनी आहे. कृषियंत्रे, विमाने, मोटारगाड्या, जहाजे ही अभियांत्रिकी उद्योगातील प्रमुख उत्पादने आहेत. मोटारी व विमाननिर्मिती उद्योगांचे प्रमुख प्रकल्प दक्षिणमध्य भागात आहेत. लिनकोयपिंग हे विमाननिर्मितीचे तर ट्रॉलहेटन हे विमानाची एंजिने वडिझेल मोटारनिर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. यतेबॉर्य येथील व्होल्वोतर ट्रॉलहेटन येथील साब-स्कॅनिया हे मोटार उद्योगाचे प्रमुख प्रकल्पआहेत. स्वीडनमधील मोटारगाड्यांची निऱ्यात मुख्यतः संयुक्त संस्थानांकडे केली जाते. सडरतेल्य येथे अवजड वाहननिर्मिती उद्योग, स्टॉकहोम येथे संदेशवहन उपकरणे, पश्चिम किनाऱ्यावरील स्टेनंगसंड येथे औषधनिर्मिती उद्योग, दक्षिण स्वीडनमधील अरण्यमय प्रदेशात धातू व प्लॅस्टिक प्रक्रियेचे लघुउद्योग तर स्टॉकहोम व व्हेस्तरोस येथे विद्युत् व इलेक्ट्रॉनिकी वस्तू- निर्मिती उद्योग केंद्रित झाले आहेत. याशिवाय विद्युत्निर्मिती उपकरणे, संदेशवहन उपकरणे व दूरध्वनी संचांची निर्मिती करून त्यांची मोठ्या प्रमाणावर निऱ्यात केली जाते. रसायन उद्योगांसाठी कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. या उद्योगातून स्फोटक द्रव्ये, औषधे, प्लॅस्टिक, सुरक्षा आगकाडी इ. उत्पादने घेतली जातात. १८४४ मध्ये स्वीडनमध्ये सुरक्षा आगकाडीचा शोध लागला. आजही हा देश अशा विशिष्ट प्रकारच्या सुरक्षा आगकाडीच्या निर्मितीत जगातील अग्रेसर देशांपैकी एक आहे. औषधनिर्माण व जैवतंत्रज्ञान उद्योगांचा वेगाने विस्तार होत आहे. बांधकाम क्षेत्र व खाद्यप्रक्रिया उद्योगही महत्त्वाचे आहेत. कमी किंमतीतील आयात मालामुळे वस्त्रोद्योग व बूटनिर्मिती उद्योग ढासळले आहेत. सेवा उद्योगांत देशातील एकूण कामकरी लोकांपैकी ७५% लोक गुंतले असून देशाच्या एकूण आर्थिक उत्पादन मूल्याच्या सु. दोन तृतीयांश उत्पन्न या क्षेत्रातून मिळते. शिक्षण, आरोग्यसेवा, माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान, वैज्ञानिक संशोधन व विकास हे प्रमुख सेवा उद्योग आहेत.
व्यापार : स्वीडनचा व्यापार अनुकूल संतुलनाचा आहे. मोटारी, लोह व पोलाद, संदेशवहन उपकरणे, कागदाचा लगदा, कागद, कागदी उत्पादने, औषधी पदार्थ, यंत्रे, वाहतुकीची साधनसामुग्री इत्यादींची निऱ्यात तर खनिज तेल व खनिज तेल उत्पादने, विद्युत् यंत्रे व उपकरणे, इलेक्ट्रॉनिकी साहित्य, संदेशवहन उपकरणे, रसायने, चहा, कॉफी, कापड, फळे, मासे यांची आयात केली जाते. स्वीडनने पक्क्या मालाची निऱ्यात वाढविली आहे. डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, नेदर्लंड्स, नॉर्वे, ग्रेट ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांशी स्वीडनचा आयात-निऱ्यात व्यापार चालतो.
वित्तव्यवस्था : क्रोना हे स्वीडनचे अधिकृत चलन आहे. १९९१ मध्ये स्वीडनने आपले चलन यूरोपियन करन्सी युनिटला (इसीयू) जोडलेलेआहे. सेंट्रल बँक ही मध्यवर्ती व चलन निर्गमित करणारी बँक आहे.देशात ११८ बँका असून त्यांत २३३ स्वीडिश व्यापारी बँका, ३३परदेशी बँका, ५३ बचत बँका आणि २ सहकारी बँका होत्या (२००८). स्कँडिनेव्हियन प्रायव्हेट बँक, बँक ऑफ कॉमर्स आणि नॉर्थ बँक या तीन प्रमुख बँका आहेत. स्टॉकहोम येथे रोखे बाजार आहे.
वाहतूकवसंदेशवहन : स्वीडनमध्ये रस्ते, लोहमार्ग व हवाई वाहतूक सेवांचा चांगला विकास झाला आहे. विसाव्या शतकात रस्त्यांचे दाट जाळे निर्माण झाले आहे. स्टॉकहोम, यतेबॉर्य व माल्म यांदरम्यान महामार्ग असून स्टॉकहोम हे उत्तरेकडील किनारी प्रदेशाशी जोडले आहे. बहुतेक कुटुंबांत किमान एकतरी मोटारगाडी असते. स्थानिक सार्वजनिक बससेवा चांगल्या प्रकारे विकसित झाल्या आहेत. रस्ते अपघातामधील मृत्यूचे प्रमाण दर एक लाख लोकसंख्येला फक्त ५.१ असून औद्योगिक देशांमधील सर्वांत कमी अपघातांचे प्रमाण असलेल्या देशांमध्ये स्वीडनचा समावेश होतो. देशातील रस्त्यांची एकूण लांबी २,१५,५९७ किमी. होती (२००९). देशात १८५० च्या दशकात लोहमार्गांच्या बांधणीस सुरुवात झाली. जगातील दरडोई सर्वाधिक लोहमार्ग लांबी असणाऱ्या देशांपैकी स्वीडनहा एक देश बनला परंतु रस्ते वाहतुकीच्या स्पर्धेमुळे १९५० च्या दशकापासून अनेक दुय्यम लोहमार्ग बंद करण्यात आले. उत्तम प्रतीची सेवा देणाऱ्या फेरी वाहतुकीने स्वीडिश लोहमार्ग डेन्मार्क व जर्मनीशी जोडले आहेत. अरसन लिंक या पूल व बोगदा मार्गाने स्वीडनच्या दक्षिण टोकाशी असलेले माल्म शहर डेन्मार्कमधील कोपनहेगनशी जोडले आहे. या मार्गावरून रस्ते आणि लोहमार्ग काढलेले आहेत. लोहमार्गांची एकूण लांबी ११,०२२ किमी. होती (२००८). स्टॉकहोम येथे मेट्रो तर, स्टॉकहोम, यतेबॉर्य व यन्चंपिंग येथे ट्रामगाडी सुविधा आहेत.
विदेशी व्यापाराच्या दृष्टीने यतेबॉर्य व स्टॉकहोम ही महत्त्वाची बंदरे आहेत. यांपैकी यतेबॉर्य हे सर्वाधिक गजबजलेले तर हेलसिंगबॉर्य, माल्म, ट्रेलबॉर, लूलीओ ही इतर महत्त्वाची बंदरे आहेत. नॉर्डलँडच्या किनाऱ्यावरील अरण्योद्योगांची स्वतःची बंदरे आहेत. त्यांची हिवाळ्यातील वाहतूक बर्फफोड जहाजसेवेच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. इतर देशांतील व्यापारी जहाजे कमी दराने सेवा उपलब्ध करून देत असल्यामुळे स्वीडिश व्यापारी जहाजांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक अंतर्गत जलमार्ग बांधण्यात आले. त्यांपैकी यत कालवा विशेष प्रसिद्ध आहे.
स्वीडन, डेन्मार्क व नॉर्वे यांची मालकी असलेल्या स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स सिस्टिम (एस्एएस्) या हवाई सेवा देणाऱ्या कंपनीचे वर्चस्व येथे आहे. स्वीडन हा या कंपनीचा सर्वाधिक भागधारक आहे. स्टॉकहोम, यतेबॉर्य व माल्म येथे प्रमुख विमानतळ आहेत.
स्वीडनमध्ये नियमित आकाशवाणी प्रक्षेपण १९२५ मध्ये तर दूर-चित्रवाणी प्रसारण १९५६ मध्ये सुरू झाले. येथील बहुतांश लोक भ्रमणध्वनी वापरतात, देशात दूरध्वनीधारक ५३,२३,०००, (२००८)व वैयक्तिक संगणकधारक ८ द. ल. होते (२००६). महाजालकाचा वापर करणाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ८७.८% असूनही टक्केवारी जगात आइसलँडनंतर (९०.६%) दुसऱ्या क्रमांकावरआहे (२००८).
लोकवसमाजजीवन : स्वीडनमधील बहुतांश लोक प्राचीन जर्मानिक जमातीचे वंशज आहेत. इ. स. पू. ८००० – ५००० या कालावधीत या जमातीच्या लोकांनी स्कँडिनेव्हियन प्रदेशात वसतीकेली. त्यामुळे स्वीडिश लोकांची डेन व नॉर्वेजियन लोकांशी जवळीक आढळते. फिनिश लोकांचे वंशज हा अल्पसंख्यांकांमधील सर्वांत मोठा वांशिक गट आहे. ते प्रामुख्याने देशाच्या उत्तर आणि पूर्व किनारी प्रदेशात राहतात. सॅमी किंवा लॅप हा दुसरा मोठा वांशिक गट असून ते देशाच्याउत्तर भागात राहतात. हा प्रदेश सॅमी किंवा लॅपलँड या नावाने ओळखला जातो. हजारो वर्षांपासून सॅमी लोक शिकार, मासेमारी आणि रेनडियरचे कळप पाळून आपला उदरनिर्वाह करीत आलेले आहेत. बहुतांश सॅमीलोक आज कायम वस्ती करून रहात असले, तरी काही सॅमी लोक अजूनही ऋतुनुसार स्थलांतर करीत असतात. कलाकाम, हस्तव्यवसाय व वस्त्रनिर्माण हे त्यांचे व्यवसाय आहेत [→ लॅप लॅपलँड]. परदेशातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून स्वीडनमध्ये वस्ती केलेल्या लोकांची संख्याही येथे मोठी आहे. १९६० च्या दशकात कामधंद्याच्या शोधार्थ डेन्मार्क, फिनलंड, ग्रीस, नॉर्वे, टर्की व यूगोस्लाव्हियामधून अनेकलोकांनी स्वीडनमध्ये स्थलांतर केले. त्याचप्रमाणे १९८० च्या दशकाच्या अखेरीपासून बाल्कन प्रदेशातून तसेच राजकीय अस्थिरता असलेल्याइराण, इराक, लेबानन व सोमालियामधून बऱ्याच लोकांचे स्वीडनकडेस्थलांतर झाले.
वेगवेगळ्या शतकांमध्ये स्थलांतर करून आलेल्या विविध लोक-समूहांचा परिणाम स्वीडिश संस्कृतीवर झालेला असला, तरी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत स्वीडनमधील लोकसंख्येत सांस्कृतिक, धार्मिकव भाषिक रचनेत एकजिनसीपणा होता. ईशान्य भागातील फिनिश भाषिक आणि सॅमी (लॅप) लोकांचा अपवाद वगळता बहुतेक सर्व लोक वांशिकदृष्ट्या स्वीडिश होते परंतु युद्धोत्तरकालात विविध वांशिक गटातील सु. एक दशलक्ष अन्यदेशीय लोक स्वीडनमध्ये आले. अशा लोकांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण सु. १२% आहे.
इंग्लिश मिशनऱ्यांनी इ. स. दहाव्या शतकात स्वीडनमध्ये ख्रिश्चनधर्माचा प्रसार केला. देशातील सु. ९८% लोक ख्रिश्चन धर्मीय आहेत. इव्हँजेलिकल, ल्यूथरन चर्चचा प्रभाव सर्वाधिक आहे. स्थलांतर करून आलेल्या लोकांमुळे रोमन कॅथलिक, ग्रीक ऑर्थोडॉक्स यांची सदस्य-संख्या हळूहळू वाढत आहे. १९९५ च्या कायद्यानुसार २००० पासूनचर्च आणि शासन यांच्यात फारकत करण्यात आली. पूर्वीच्या यूगोस्ला-व्हियातून आलेल्या तुर्क व मुस्लिम लोकांमुळे इस्लाम तसेच काही ज्यू धर्मीय लोक येथे आहेत.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात तरुण व शिकलेल्या लोकांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागांतून शहरांकडे स्थलांतर केले. त्यामुळे अनेक समाजाच्या ग्रामीण वस्त्या निर्जनबनण्याचे धोके निर्माण झाले. यावर उपाय म्हणून शासनाने उत्तर व ईशान्य स्वीडनमध्ये उद्योग उभारणाऱ्या प्रवर्तकांना अर्थसाहाय्य देण्यास सुरुवात केली. तसेच स्टॉकहोममधील शासकीय संस्थांचे स्थलांतर करण्याचे धोरण अवलंबिले.
क्षेत्रफळाचा विचार करता स्वीडनची लोकसंख्या कमी असून मध्यव दक्षिण भागात नागरीकरण अधिक झालेले आहे. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स २०.२२ व्यक्ती इतकी कमी आहे (२०१३). नागरी लोक-संख्येचे प्रमाण ८५% होते (२०१०). दर हजारी जन्मप्रमाण १०.३३, मृत्युमान ११.२२, (२०१३), विवाहाचे प्रमाण ५.४ आणि घटस्फोटाचे प्रमाण २.३ होते. विवाहाशिवाय जन्मणाऱ्या मुलांचे प्रमाण सु. ५५% असून असे जन्मप्रमाण सर्वाधिक असणाऱ्या यूरोपातील देशांमध्ये स्वीडनचा समावेश होतो. या मुलांना कायद्याचे संरक्षण असते. मूल १६ वर्षांचे होईपर्यंत त्यांना करमुक्त शिशुभत्ता मिळतो. पहिल्या विवाहाचे सरासरी वय पुरुषांमध्ये ३५.१ वर्षे तर स्त्रियांमध्ये ३२.५ वर्षे होतेे (२००८). सरासरी आयुर्मान पुरुषांचे ७८.९५ वर्षे तर स्त्रियांचे ८३.७५ वर्षे होते (२०१३). याच वर्षी वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर ०.१८% होता. दर हजारी बालमृत्युमान २.७ असून जगातील सर्वांत कमी बाल-मृत्युमान असणाऱ्या देशांत स्वीडनचा समावेश होतो (२०१३). मे २००९ मध्ये स्वीडनने समलिंगी विवाहास कायदेशीर मान्यता दिली आहे. देशात स्त्री-पुरुष समानता आहे. एकूण कामकरी लोकांमध्ये जवळजवळ निम्म्या स्त्रिया असून संसदेत सु. ४५% महिला सदस्य असतात. स्वीडनमधील ही बाब लक्षणीय आहे.
आरोग्य : स्वीडनमध्ये कराचे प्रमाण अधिक असले तरी त्या बदल्यात शासनाकडून नागरिकांना सार्वजनिक व समाजकल्याणविषयक सर्व सेवा–सुविधा खात्रीलायक व चांगल्याप्रकारे पुरविल्या जातात. त्याअंतर्गत किमान राहणीमानाची हमी, संकटकालीन मदत, व्यक्तींच्या आयुष्यभरासाठी उत्पन्नाचे पुनर्विवरण, भिन्न उत्पन्न गटांतील तफावत कमी करणे इ. बाबी यांमध्ये समाविष्ट आहेत.
राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत सर्वांचा समावेश असतो. देशात आरोग्यविषयक परिस्थिती चांगली आहे. सर्वांना त्याविषयक सुविधा मिळतात. प्रत्येक समूहात प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे आहेत. मुलाच्या जन्मानंतर पालकांना बारा महिन्यांपर्यंत पगारी रजा मिळते. सोयीनुसार ती रजा दोघांत विभागून घेता येते. मूल आठ वर्षांचे होईपर्यंत दोघेही पालककमी वेतन घेऊन आणि तीन चतुर्थांश वेळ काम करून रजेची सवलत विभागून घेऊ शकतात. वयाच्या पासष्टाव्या वर्षापासून प्रत्येकास निवृत्ती-वेतन मिळते. देशात २९,१०० डॉक्टर, ४,१०० दंतवैद्य, ७१,४०० परिचारिका, व रुग्णालयातील खाटांची संख्या २५,८९९ होती. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी ९.४% उत्पन्न आरोग्यावर खर्च केले जाते (२०१३).
शिक्षण : स्वीडनमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण मोफत आहे. बहुतांश तांत्रिक व इतर विशेष महाविद्यालये आणि विद्यापीठे शासनामार्फत चालविली जातात. ७ ते १६ वयोगटातील सर्वांना ९ वर्षांचे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे. सात वर्षांपेक्षा कमी वयोगटातीलमुलांना खाजगी किंवा संघटनांनी चालविलेल्या बालोद्यान शाळांत दाखल केले जाते. बालोद्यानांना शासन आर्थिक साहाय्य देते. प्राथमिकशिक्षणाच्या प्रत्येकी तीन-तीन वर्षांच्या ज्युनिअर (एक ते तीन), इन्टरमीडिअट (चार ते सहा) व सिनिअर (सात ते नऊ) अशा तीन (श्रेण्या) असतात. माध्यमिक विद्यालये तीन प्रकारची आहेत. त्यांपैकी तीन वर्षांच्या उच्च माध्यमिक विद्यालयांत (अप्पर सेकंडरी स्कूल) विद्यापीठीय शिक्षणाच्या दृष्टीने तयारी करून घेतली जाते. दोन वर्षांच्या कंटिन्यूएशन स्कूलमध्ये सामाजिक, आर्थिक, तांत्रिक विषयांचे शिक्षण दिले जाते. एक ते तीन वर्षांच्या व्यवसाय शिक्षण विद्यालयांत बांधकाम, हॉटेल व उपहार- गृह कामगारांसंबंधीचे शिक्षण दिले जाते. असे शिक्षण देणारी विद्यालये दिवसा व संध्याकाळीही चालविली जातात. स्वीडिश नॅशनल एजन्सीकडे उच्च शिक्षणाचे प्रशासन असते. विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवण्यासाठी अध्ययन भत्ता दिला जातो. विद्यापीठीय पातळीवर शिक्षणासाठी परतफेड योग्य कर्ज दिले जाते. देशात ६४ उच्च शिक्षण संस्था असून त्यांमध्ये विद्यापीठे, विद्यापीठीय महाविद्यालये व स्वतंत्र महाविद्यालयांचा समावेश होतो. स्वीडनमध्ये तेरा प्रमुख विद्यापीठे आहेत. त्यांपैकी अप्साला विद्यापीठ (स्था. १४७७) सर्वांत जुने आहे. त्याशिवाय लन्ड (१६६६), स्टॉकहोम (१८७७), यतेबॉर्य (१८९१), यूमओ (१९६५) ही प्रसिद्ध विद्यापीठे आहेत. १९७७ मध्ये शैक्षणिक एकीकरण पद्धतीनुसार या सर्व विद्यापीठांचे एकीकरण करण्यात आले. त्यापूर्वी विद्यापीठांचे आणि इतर उच्च शिक्षण-संस्थांचे प्रशासन स्वतंत्र चालत असे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६.६% उत्पन्न शिक्षणावर खर्च केले जाते. प्रौढ साक्षरतेचे प्रमाण ९९%आहे. देशातील ४,६३० प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांत ८६,००६ शिक्षक व ८,८६,४८७ विद्यार्थी, १०१५ एकात्मीकृत उच्च माध्यमिक विद्यालयांत ३७,५३५ शिक्षक व ३,८५,७१२ विद्यार्थी होते (२०११).
भाषावसाहित्य : देशाची स्वीडिश ही राष्ट्रभाषा असून ती बहुसंख्य लोकांची मातृभाषाही आहे. फिनिश व लॅप (सॅमी) या अल्पसंख्य लोकांनी आपल्या भाषांचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्यांच्या भाषा उरल-अल्ताइक भाषा गटातील आहेत. स्वीडिश ही जर्मानिक भाषासमूहातील उत्तर जर्मानिक (स्कँडिनेव्हियन) या उपशाखेतील भाषा असून तिचे डॅनिश, नॉर्वे व आइसलँडिक भाषांशी साधर्म्य आहे. त्यामुळे स्वीडन, डेन्मार्क व नॉर्वेमधील लोक भाषेच्या माध्यमातून एकमेकांना समजून घेऊ शकतात. लिखित आणि बोली स्वीडिश भाषा देशभर एकसारखी असून काही प्रादेशिक बोलिभाषाही प्रचलित आहेत. मूलतः फिनिश असलेले स्वेड्स लोक आपली पहिली भाषा म्हणून फिनिश भाषा बोलतात परंतु त्यांच्या मुलांना आपल्या शालेय शिक्षणाच्या सुरुवातीच्या वर्गातच स्वीडिश भाषा शिकावी लागते. सॅमी लोक फिनिश भाषेशी निगडित भाषा बोलतात. सर्व शाळांमध्ये दुसरी भाषा म्हणून इंग्रजी शिकावी लागते. देशभर ही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.
एरिक क्रोनिकल (सु. १३३०) हे सर्वांत जुन्या स्वीडिश साहित्यापैकी एक असून त्यामध्ये स्वीडिश ड्यूक एरिक मांगनूसबद्दलच्या कथावर्णन केल्या आहेत. स्वीडिश विद्वान युलाअस मांगनूस (१४९०-१५५७) याच्या १५५५ मध्ये लॅटिन भाषेत प्रकाशित झालेल्या ‘हिस्टरी ऑफ द नॉर्दर्न पीपल्स’ (इं. शी.) लेखनाला जगातील वाङ्मयप्रेमींनीमोठी दाद दिली. अप्साला विद्यापीठातील वैद्यकशास्त्राचा प्राध्यापक युलाअस (ओलॉफ) रूडबेक (१६३०-१७०२) याने Altand eller Manheim (लॅटिन भाषांतर, अटलांटिका) या ऐतिहासिक ग्रंथाचेचार खंड लिहिले. त्यात त्याने स्वीडन हे मानवी संस्कृतीचे मूळस्थान असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. अठराव्याशतकाच्या सुरुवातीच्या काळात एरिक यूहान स्टॅग्नेलिअस याने शरीर आणि आत्मा यांदरम्यान असणाऱ्या इच्छांविषयीचे हुबेहुब वर्णन करणाऱ्या रम्याद्भुत कविता लिहिल्या. अठराव्या शतकाच्या मध्यात कार्लयोनास लव्ह आल्मक्व्हिस्ट याने प्रेम आणि विवाहविषयक वास्तववादी कादंबऱ्या व लघुकथा लिहिल्या. आउगुस्ट स्ट्रिनबॅर्य (१८४९-१९१२) हा नाटककार व कादंबरीकार म्हणून विशेष प्रभावशाली लेखकठरला. त्याचे ‘मिस ज्युली’ (इं. शी. १८८९) हे नाटक विशेष उल्लेखनीय आहे. नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरलेली कादंबरीकर्ती सेल्मा लागरलव्ह (१९०९), कवी व्हेर्नर फोन हेइडेन स्टाम (१९१६) व एरिक कार्लफेल्ट (१९३१), कवी, कादंबरीकार व नाटककार पाअर फेबिअन लागरक्विस्ट (१९५१), नाटककार व कवयित्री नेली झाक्स (१९६६), कथा व कादंबरीकार एइव्हिंड जॉन्सन (१९४८), कवी, कथाकार व निबंधकार हॅरी मार्टिन्सन (१९७४) हे स्वीडिश साहित्यिक आहेत. याशिवाय पी. सी. जर्सिल व ॲस्ट्रिड लिंडग्रेन हे उल्लेखनीय स्वीडिश साहित्यिक होते.
कला-क्रीडा : स्वीडनमधील लोककलेची परंपरा साधारण तेराव्या शतकापासून आढळते. जेनी लिंड (१८२०-८७) ही प्रसिद्ध संगीतक (ऑपेरा) व जलसा गायिका होती. अठराव्या शतकातील संगीतकारजे. एच्. रोमन याला स्वीडिश संगीताचे जनक म्हणून ओळखले जाते.परंतु रम्याद्भुत संगीतकार फ्रान्स बेरवॉल्ट याला एकोणिसाव्या शत-कातील स्वच्छंदतावादी स्वीडिश संगीताचा तसेच सिंफनी संगीताचाजनक म्हणून ओळखले जाते. १९२० च्या दशकात मंडे ग्रुपसह इतर संगीतकारांना स्वच्छंदतावादविरोधी संगीतकार हिल्डिंग रोझनबेर्क याने स्फूर्ती दिली. त्यानंतर अनेक संगीतकारांनी स्वीडिश लोकसंगीत विकसित केले. विविध स्वीडिश संगीतक संगीतकारांपैकी जेनी लिंड, येसीब्यारलिंग, बिरगिट निल्सन यांना जगभर प्रसिद्धी मिळाली.
स्टॉकहोम येथील स्वीडिश रॉयल बॅलेची दिग्दर्शिका बिरगिट कलबेर्गहिला आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळाली. नाट्य व चित्रपट दिग्दर्शक म्हणून इंगमार बर्गमन याचे कार्य मोठे आहे. आधुनिक स्वीडिश कलेला एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कार्ल लार्सन, अँडर्स झॉर्न व ब्रूनो लिल्जेफॉर्स या रंगचित्रकारांकडून स्फूर्ती मिळाली. कार्ल मिल्स याच्या १९२० च्या दशकातील स्मारकांच्या स्वरूपातील शिल्पांना विदेशातही प्रसिद्धी मिळाली. येथील सांस्कृतिक संस्थांना शासनाच्या निधीमधूनअर्थसाहाय्य दिले जाते. देशात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये आहेत.प्रत्येक नगरपालिकेचे सार्वजनिक ग्रंथालय असते. रॉयल लायब्ररी (स्टॉकहोम) तसेच यतेबॉर्य, लन्ड व अप्साला या विद्यापीठांतीलग्रंथालये संशोधनासाठी महत्त्वाची आहेत. रॉयल लायब्ररीमध्ये पूर्वीच्या काळातील स्वीडिश हस्तलिखिते आहेत. देशात सु. ३०० वस्तु-संग्रहालये व अनेक स्थानिक वारसास्थळे आहेत. सुमारे २० वस्तुसंग्रहालये राज्याच्या अखत्यारित असून त्यांपैकी काही राष्ट्रीय वस्तुसंग्रहालये स्टॉकहोम येथे आहेत. याशिवाय येथील स्कानसेन हे शंभर वर्षे जुने वखुले ऐतिहासिक संग्रहालय जगप्रसिद्ध आहे. यामध्ये ऐतिहासिक खेड्यांचे पुनर्निर्माण केले असून त्यात जुनी स्वीडिश घरे दिसतात. स्टॉकहोमयेथील नॅशनल म्यूझीयम हे देशातील सर्वांत महत्त्वाचे संग्रहालय असून त्यात शिल्पकला व रंगचित्रांचा संग्रह आहे. वेगवेगळ्या संस्थांची अनेक रंगमंदिरे येथे आहेत. त्यांपैकी स्टॉकहोममधील रॉयल ऑपेरा व रॉयल ड्रॅमॅटिक थिएटर ही रंगमंदिरे प्रसिद्ध आहेत. शासनाकडून कला, साहित्य, चित्रपट, ध्वनिमुद्रण आणि सार्वजनिक इमारतींच्या कलाकामास मदतकेली जाते.
देशात १७३९ मध्ये ‘रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ची स्थापना झाली. या संस्थेमार्फत जगभर विज्ञानविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच ही संस्था भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञानव वैद्यक, साहित्य आणि शांतता या विषयांतील नोबेल पारितोषिकाच्या मानकऱ्यांची निवड करते. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल यांच्या नावाने हे नोबेल पारितोषिक दिले जाते. १९६९ पासून स्वीडनच्या रिक्स बँकेने अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली. [→ नोबेल पारितोषिके].
स्वीडिश टूरिंग क्लबमार्फत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस गिऱ्या- रोहणसाठीच्या सुविधा विकसित करण्यात आल्या. हिवाळी खेळांसाठी स्वीडन प्रसिद्ध असून विशेषतः स्कीईंग व बर्फावरील हॉकी हे खेळ अधिक लोकप्रिय आहेत. दरवर्षी मार्चमध्ये मध्य स्वीडनमधील दलर्ना परगण्यात क्षेत्रपार स्कीईंग शर्यती होतात. त्यात हजारो स्वीडिश भाग घेतात. या शर्यतीचे अंतर ८९ किमी. असते. त्याशिवाय सॉकर, शारीरिक कसरतीचे खेळ (जिम्नॅस्टिक ), घसरखेळ (स्केटिंग ), शिकार व मत्स्यपारध हेही इतर लोकप्रिय खेळ आहेत.
स्वीडनमध्ये १७६६ पासून प्रसिद्धी माध्यमांना स्वातंत्र्य आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या स्वातंत्र्यासंबंधीचा सध्याचा ‘प्रेस ॲक्ट’ १९४९ पासून अस्तित्वात आहे. छापील मजकुराचे प्रकाशन व वितरण यांवरील शासनाचे अभ्यवेक्षण तसेच इतर गंभीर बंधने निषिद्ध मानली जातात. प्रत्येक नागरिकाला राज्य किंवा नगरपरिषदांसंंबंधीची कागदपत्रे बाळगण्याचा हक्क आहे. असे तत्त्व यात अभिप्रेत आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापासून वृत्तपत्रांची संख्या कमी झाली असली, तरी त्यांच्या खपाचे प्रमाण फारमोठे आहे. विशिष्ट राजकीय पक्षांची ध्येयधोरणे मांडणारी काही दैनिक वृत्तपत्रे आहेत. रेडिओ व दूरदर्शनवरील कार्यक्रमांचा दर्जा आणि निःपक्षपातीपणा राखण्यासाठी शासनाने प्रसारण आयोग नेमला आहे.
स्वीडिश लोकांच्या आहारात मासे, मांस, बटाटा यांचे प्रमाण अधिक असते. ‘स्मॉरगसबॉर्ड’ ही विशेष मेजवानी थाळी म्हणून प्रसिद्ध आहे.बफे पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या जेवणात गरम व थंड असे दोन्हीप्रकारचे खाद्यपदार्थ असतात. कॉफीपान मोठ्या प्रमाणावर केले जातअसून प्रत्येक जेवणाच्या वेळीही ती घेतली जाते. बीअर, रंगविरहित ॲक्वाव्हिट मद्य, व्होडका, वाइन व इतर अल्कोहोलयुक्त मद्य इ. प्राशन करणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे.
पऱ्यावरणाच्या बाबतीत विशेष जागरूकता असणारा हा देश राष्ट्रीय उद्याने विकसित करणारा पहिला यूरोपीय देश मानला जातो. येथे पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना १९१० मध्ये करण्यात आली. पऱ्यावरणविषयक नवी संहिता १९९९ मध्ये स्वीकारण्यात आली. पऱ्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आयोजित केली जाणारी ‘ग्रीन पार्टी’ तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. वैश्विक पऱ्यावरणीय प्रश्नांसंदर्भात गांभीऱ्याने विचार करणाऱ्या देशांत स्वीडन अग्रेसर आहे.
महत्त्वाचीस्थळे : स्टॉकहोम, यतेबॉर्य (लोकसंख्या ५,०७,३३०-२००९), माल्म (२,९३,९०९), अप्साला (१,९४,७५१),लिनकोयपिंग (१,४४,६९०), व्हेस्टरोस (१,३५,९३६), ऑरब्रू (१,३४,००६), नॉरकॉपिंग (१,२९,२५४), हेलसिंगबॉर्य (१,२८,३५९), यॉनकॉपिंग (१,२६,३३१) ही प्रमुख शहरे आहेत. स्टॉकहोम हे स्वीडनच्या राजधानीचे तसेच देशातील सर्वांत मोठे शहरव प्रमुख सागरी बंदर आहे. सांस्कृतिक, औद्योगिक, व्यापारी व वित्तीय दृष्ट्या त्याला विशेष महत्त्व आहे. उत्तरेकडील व्हेनिस म्हणून ते ओळखले जाते. यत नदीच्या मुखाशी वसलेले यतेबॉर्य हे देशातील दुसऱ्याक्रमांकाचे मोठे शहर आहे. ते एक प्रमुख सागरी बंदर असून औद्योगिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहे. माल्म हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सागरी बंदर व औद्योगिक नगर म्हणून ते महत्त्वाचे आहे. अप्साला हे औद्योगिक, शैक्षणिक व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे नगर आहे. यूनेस्कोने घोषित केलेली १४ जागतिक वारसास्थळे स्वीडनमध्ये आहेत.
चौधरी, वसंत
“