स्विफ्ट, जॉनाथन : (३० नोव्हेंबर १६६७-१९ ऑक्टोबर १७४५). इंग्रज साहित्यिक प्रभावी उपरोधकार म्हणून ख्यातकीर्त. जन्म आयर्लंडमधील डब्लिन शहरी. त्याचे आईवडील जन्माने इंग्रज होते.डब्लिन ये थी ल ‘ट्रि नि टीकॉलेजा ‘तून पदवीधर झाल्यानंतर( १६८६) स्विफ्ट इंग्लंडला आला (१६८९ ). तेथे आल्यानंतर त्या काळातील प्रसिद्ध मुत्सद्दी आणि त्याच्या आईचे दूरचे नातलग सर विल्यम टेंपल यांच्याकडे, लंडन-जवळील मूर पार्क येथे तो राहू लागला. १६८९-९९ पर्यंत तो सर टेंपल यांचा स चि व म्हणून काम करीत होता. १६९९ मध्ये सर टेंपल यांचे निधन होईपर्यंत स्विफ्टचे वास्तव्य मुख्यतः मूर पार्क येथेच राहिले. तेथे असताना तो दोन वेळा आयर्लंडला भेट देऊन आला. १६९५ मध्ये ‘अँग्लिकन चर्च ऑफ आयर्लंड’ मध्ये धर्मगुरूची (प्रीस्ट) दीक्षा घेतली. त्याच वर्षी बेलफास्ट-जवळील केलरूट येथे ‘व्हिकार’ (एक धार्मिक पद) म्हणून त्याची नेमणूक झाली.
मूर पार्क येथील वास्तव्यात सर टेंपल यांचे समृद्ध ग्रंथालय स्विफ्टला लाभल्याने त्याला आपला बौद्धिक विकास करून घेता आला. मूरपार्क येथे असतानाच त्याची एस्टर जॉन्सन ह्या मुलीबरोबर मैत्री झाली. सर टेंपल ह्यांच्या गृहव्यवस्थापिकेची (हाउस कीपर) ती मुलगी. स्विफ्टच्या आणि तिच्या वयात बरेच अंतर होते. तरीही त्यांची मैत्री आयुष्यभर टिकली. स्विफ्टने तिला स्टेला हे नाव दिलेले होते. स्विफ्ट आणि स्टेला यांच्यातले संबंध नेमके कसे होते, त्यांनी गुप्तपणे विवाह केला होता का, ह्याबद्दल वेगवेगळे तर्क केले जातात तथापि त्यांची गाढ मैत्री होती, एवढीच गोष्ट स्पष्ट दिसते. स्विफ्टने स्टेलाला लिहिलेली पत्रे जर्नल टू स्टेला या नावाने त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाली.
चर्चच्या कामांच्या संदर्भात १७०१-१० ह्या कालखंडात स्विफ्टने इंग्लंडला अनेक वेळा भेट दिली. तेथे सरकारातील अनेक उच्चपदस्थांची मैत्री त्याला लाभली. प्रभावी लेखक म्हणून त्याची प्रसिद्धी झालेली होती. १७१० मध्ये ग्रेट ब्रिटनच्या नव्या टोरी सरकारचा तो समर्थक झालाआणि त्या सरकारच्या धोरणांचा पुरस्कार करणारी अनेक पुस्तपत्रे, तसेच लेख त्याने लिहिले. ब्रिटिश प्रशासनाचा तो पडद्यामागचा एक प्रभावीप्रवक्ता बनला. राणी ॲनी हिने स्विफ्टच्या राजकीय काऱ्याची दखल घेऊन डब्लिनमधील ‘सेंट पीटर्स कॅथीड्रल ‘चा डीन म्हणून त्याची नेमणूक केली. स्विफ्टला स्वतःला मात्र इंग्लंडमधील चर्चमध्ये स्थान हवे होते. १७१४ मध्ये राणी ॲनी मरण पावली आणि पहिला जॉर्ज गादीवर आला. त्याच वर्षी व्हिग पक्षाला सत्ता प्राप्त झाली. ह्या परिवर्तनामुळे स्विफ्ट आणित्याचे मित्र ह्यांचा राजकीय प्रभाव संपुष्टात आला. त्यानंतर तो आयर्लंडला परतला आणि ‘सेंट पीटर्स कॅथीड्रल’ मध्ये डीनच्या कामात तिसांहून अधिक वर्षे गुंतून राहिला. हा काळ अनेक दृष्टींनी नैराश्याचा होता. इंग्लंडमध्ये त्याने केलेल्या राजकीय धडपडीतून फार काही निष्पन्न झाले नाही, याची बोचरी जाणीव त्याला होती. इंग्लंडमधल्या अलेक्झांडर पोप, जॉग गे यांच्यासारख्या मित्रांच्या सहवासाला तो मुकला होता तथापि आयरिश जनतेवर ब्रिटिश सत्तेकडून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम तो करीत राहिला.
हळूहळू स्विफ्टची प्रकृती ढासळत होती. त्याची मानसिक स्थितीही ठीक राहीनाशी झाली. डब्लिन शहरी तो निधन पावला. आपल्यामागे त्यानेठेवलेला पैसा मानसिक रुग्णांसाठी इस्पितळ बांधण्याच्या कामी खर्च व्हावा, अशी इच्छा त्याने प्रकट केली होती.
स्विफ्टने कविता, उपरोधिका, पुस्तपत्रेे असे बरेच लेखन केले. १६९१-९४ ह्या काळात त्याने अनेक कविता-विशेषतः काही उद्देशिका- -लिहिल्या तथापि त्याच्या प्रतिभेचे खरे सामर्थ्य तो काव्यलेखनाकडून गद्य उपरोधिकांकडे वळला तेव्हा प्रकट झाले. त्याच्या महत्त्वपूर्ण साहित्यकृतीं- पैकी ए टेल ऑफ द टब हिचे बरेचसे लेखन मूर पार्क येथे झाले (१६९६-९९). ही उपरोधिका १७०४ मध्ये प्रसिद्ध झाली.
ए टेल ऑफ द टब या उपरोधिकेचे तीन भाग आहेत : पहिला भाग म्हणजे ‘ए टेल ऑफ द टब’ ही कथा. ती धर्माच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात माजलेल्या प्रचंड भ्रष्टाचारावर उपरोधप्रचुर टीका आहे. वीरविडंबक( मॉक-हिरॉइक) शैलीने लिहिलेल्या ‘बॅटल ऑफ द बुक्स’ या दुसऱ्या भागात स्विफ्टने प्राचीन विरुद्ध आधुनिक साहित्य या दीर्घकाळ चाललेल्या वादात प्राचीन साहित्याची बाजू घेतली आहे. ‘डिस्कोर्स कन्सर्निंग द मेकॅनिकल ऑपरेशन ऑफ द स्पिरिट’ या तिसऱ्या भागात धार्मिक उपासनापद्धती आणि त्याच्या काळातील काही अत्युत्साही धार्मिकांच्या धार्मिक शिकवणीचा कठोर उपहास केला आहे. ‘ए टेल…’ मात्र ह्या तीनही भागांत सर्वांत प्रभावी आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण उपरोधप्रचुर शैलीमुळे ती विलक्षण प्रभावी झालेली आहे. संस्कृती आणि साहित्य ह्या क्षेत्रांतील पढिकपणा तसेच रोमन कॅथलिक आणि अन्य विरोधक ह्यांची विवेकाधिष्ठित अँग्लिकन चर्चवर होणारी टीका स्विफ्टला अस्वस्थ करीत होती. ह्या परिस्थितीला विवेक आणि व्यवहारज्ञान ह्या माणसाच्या सर्वोच्च मनःशक्तींनाच धक्का पोहोचविणारे अविवेकीपण हे एकच कारण आहे, असे त्याला वाटत होते.
गलिव्हर्स ट्रॅव्हल्स ही स्विफ्टची जगद्विख्यात साहित्यकृती ट्रॅव्हल्स इंटू सेव्हरल रिमोट नेशन्स ऑफ द वर्ल्ड ह्या नावाने ती प्रसिद्ध झाली होती (१७२६). गलिव्हर्स ट्रॅव्हल्स ही एक उपरोधिका आहे. लहान मुले एक विनोदी पुस्तक म्हणून तिच्याकडे पाहतात तर प्रौढांना ती एक गंभीर, अस्वस्थ करणारी साहित्यकृती वाटते. गलिव्हर हा जहाजावर डॉक्टर म्हणून काम करणारा माणूस. त्याने केलेल्या चार जलपर्यटनांचा वृत्तान्त ह्या उपरोधिकेत आहे.
पहिल्या जलपर्यटनात गलिव्हर अत्यंत ठेंगू माणसांच्या-लिलिप्यू-टिअन्स-अनोख्या भूमीत पोहोचतो. ह्या माणसांची उंची फक्त सहा इंच असते. त्यांच्यासमोर गलिव्हर एखाद्या पर्वतासारखा भासतो. ही माणसे उर्मट असतात. त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात गलिव्हर त्यांच्या राज्यावर नाविक आक्रमण करणाऱ्या शेजारच्या राज्यातील समुद्रातशिरून त्यांची जहाजे ताब्यात घेतो. ह्या त्याच्या कृतीमुळे हे ठेंगू लोक संतुष्ट होतात पण नंतर त्यांची मर्जी फिरते आणि गलिव्हर त्यांच्याभूमीतून पळतो.
ह्या बेटावरचे लोक खुजे आहेतच तिथल्या वस्तूही एक इंच ते एक फुट इतक्याच मऱ्यादित उंचीच्या आहेत. असल्या लोकांवर आणि भूमीवर राज्य करणाऱ्या सम्राटाचे पोकळ वैभव, तिथल्या रहिवाशांमधली भांडणे, वैर, शेजारच्या राज्यातील लोकांच्या लढाया हे सर्व उपहासास्पद वाटते. यातून इंग्लंडमधील राजकीय पक्ष, तिथले धार्मिक वादविवाद ह्यांचा उपहास स्विफ्टने केलेला आहे.
दुसऱ्या जलप्रवासाच्या वेळी तो अपघाताने एका समुद्रकिनाऱ्यावर एकटाच अडकून पडतो. तेथले रहिवासी गलिव्हरच्या उंचीच्या बारा पट उंच असतात. हा अगदीच छोटा माणूस पाहून त्यांना गंमतवाटते पण तिथला सम्राट गलिव्हरला आणि त्याच्या सारख्या छोट्या माणसांना ‘अपायकारक कृमी’ म्हणतो. एक गरुड त्याला उचलतो आणि समुद्रात टाकतो. तेथून तो मायदेशी जाण्याचा प्रयत्न करतो. अखेरीस तेथे तो पोहोचतो.
तिसऱ्या जलप्रवासात तो लापुता या एका तरंगत्या बेटावर येतो. इथले रहिवासी फार उच्च विचारांचे असतात. तेथे तो ‘अकॅडमी ऑफ लागॅडो ‘ला भेट देतो. ह्या अकॅडमीच्या वर्णनातून स्विफ्ट इंग्लंडच्याङ्क रॉयल सोसायटी ‘ची थट्टा करतो. तिथे वैज्ञानिक काकडीतून सूर्यप्रकाश काढण्यासारखे विचित्र प्रयोग करीत असतात. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्या अव्यवहारी उद्योगांची तो खिल्ली उडवतो.
चौथ्या जलप्रवासात गलिव्हर ज्या ठिकाणी जाऊन पोहोचतो, तिथले रहिवासी म्हणजे गंभीर, विवेकी आणि सद्गुणी घोडे होत पण तिथे आणखीही काही रहिवासी आहेत. ते ‘याहू’ या नावाने ओळखले जातात. हे घोडे त्यांचा उपयोग श्रमाची कामे करून घेण्यासाठी करतात. हे याहू अतिशय नाठाळ, वाईट स्वभावाचे असतात. त्यांच्याकडे पाहणेही उबगवाणे असते. त्यांना आपण अजिबात ओळखत नाही, असे दाखवण्याचा गलिव्हर प्रयत्न करतो पण अखेरीस ही माणसे आहेत, हे त्यास मान्य करावेच लागते. घोड्यांचा सहवास गलिव्हरला आवडत असतो पण काही झाले तरी तो एक याहूच असतो. तो जरा प्रागतिक असतो एवढेच. त्यामुळे घोडे त्याचा अव्हेर करतात. त्यामुळे गलिव्हर इंग्लंडला परततोपरंतु इंग्लंडला आल्यावर तिथे त्याला आपल्या माणसांच्या समाजात राहणे सहन होत नाही.
गलिव्हर्स ट्रॅव्हल्समध्ये गलिव्हरला जे समाज दिसतात, त्यांच्या चित्रणांतून माणसांच्याच चुका, त्यांचा मूर्खपणा, त्यांचा दुबळेपणा स्विफ्ट उपरोधप्रचुर शैलीमध्ये सांगत असतो. मानवांपेक्षा त्याला घोडे बरेवाटतात. स्विफ्ट हा मानवद्वेष्टा होता, असेही म्हटले जाते.
सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये विवेकवादाचा प्रभाव होता. विवेकवादी नैतिक जाणीव, व्यवहारी वृत्ती आणि भावनाशीलतेवरील अविश्वास हे निकष लावून स्विफ्टने मानवी वर्तनाकडे पाहिले. त्याचा विनोद, धारदार उपरोध, त्याची वैविध्यपूर्ण गद्यशैली त्याच्यातल्या वाङ्मयीन कलावंताचे सामर्थ्य प्रकट करते.
संदर्भ : 1. Bulitt, John M. Jonathan Swift and the Anatomy of Satire : A Study of Satiric Techniques, 1953.
2. Davis, Herbert, The Prose Works of Jonathan Swift, 14 Vols., 1939–1968.
3. Ehrenpreis, Irvin, Swift The Man, His Works, and the Age, 2 Vols., 1962–67.
4. Murry, John Middleton, Jonathan Swift : A Critical Biography, 1954.
5. Quintana, Ricardo, The Mind and Art of Jonathan Swift. 1936.
कुलकर्णी, अ. र.
“