स्वालबार : आर्क्टिक महासागरातील नॉर्वेच्या आधिपत्याखालील द्वीपसमूह. क्षेत्रफळ ६२,७०० चौ. किमी. लोकसंख्या २,६४२ (२०१२ अंदाज ). हा द्वीपसमूह नॉर्वेतील ट्रॉम्सोच्या उत्तरेस सु. ९३० किमी.वर असून याचा विस्तार ७४° उ. ते ८१° उ. अक्षांश व १०° पू. ते ३५° पू. रेखांश यांदरम्यान आहे. या द्वीपसमूहात स्पिट्स्बर्गेन (प. स्पिट्स्बर्गेन ), नॉरआउस्टलान्न बेट , एज बेट, रेंट्स बेट, प्रिन्स कार्ल्स बेट, ब्यर्नया बेट, होपन बेट, काँग्ज कार्ल्स बेट (विचे बेट ), क्व्हिटाया आइसलँड (गिलाज बेट) ही प्रमुख नऊ बेटे असून स्पिट्स्बर्गेन हे सर्वांत मोठे बेट आहे. याचे क्षेत्रफळ ३९,०४४ चौ. किमी. आहे. स्पिट्स्बर्गेन बेटावरील लाँग्यीरब्यूअन हे येथील प्रमुख प्रशासकीय ठिकाण आहे.
या द्वीपसमूहातील बेटे डोंगराळ असून या बेटांचा सु. ६०% भाग बर्फ व हिमनद्यांनी व्यापला आहे. स्पिट्स्बर्गेन व नॉरआउस्टलान्न बेटांच्या पश्चिम व उत्तर किनारी भागात अनेक फ्योर्ड किनारे आहेत. यामध्ये स्पिट्स्बर्गेन बेटाचा फ्योर्ड किनारा मोठा आहे. या द्वीपसमूहातील स्पिट्स्बर्गेन हे प्रमुख बेट ग्रीनलंड व फ्रान्झ जोझेफलँड यांदरम्यान आहे. या बेटावरील न्यूटन हे १,७१७ मी. उंचीचे शिखर या द्वीपसमूहातील सर्वोच्च शिखर आहे. स्पिट्स्बर्गेन बेटाच्या भोवतालचा समुद्र उथळ आहे. स्पिट्स्बर्गेन बेटाच्या प. किनारी भागाजवळून अटलांटिक गरम पाण्याच्या प्रवाहाचा फाटा वाहतो. त्यामुळे या भागात तापमान उबदार असते. परिणामी या भागात जहाजे वर्षात कमाल कालावधीपर्यंत येतात.
या द्वीपसमूहातील हवामान आर्क्टिक प्रकारचे आहे. येथील तापमान उन्हाळ्यात सरासरी १५° से., तर हिवाळ्यात -४०° से. पर्यंत असते. येथे ध्रुवीय विलो, ठेंगणे बर्च इ. वृक्ष, अनेक प्रकारचे शेवाळ, अळंबी आढळतात. या परिसरात व्हेल, वॉलरस व सील मासे आहेत. ध्रुवीय अस्वल, रेनडियर, कस्तुरी बैल, कोल्हा इ. प्राणी आहेत. रेनडियर व कस्तुरी बैल हे संरक्षित प्राणी आहेत.
या द्वीपसमूहाचा शोध नॉर्स लोकांनी ११९४ मध्ये लावला व यास स्वालबार असे नाव दिले. स्वालबार म्हणजे थंड किनारा (कोल्ड कोस्ट) होय. येथील ब्यर्नया, नॉव्हायाझीमल्या व स्पिट्स्बर्गेन या बेटांचा शोध डच समन्वेषक व्हिलेम बॅ रेंट्स व याकोब हेम्स्केर्क यांनी १५९४-९६ मध्ये लावला. सतराव्या शतकात व्हेल मासेमारीसाठी डच, ब्रिटिश, नॉर्वेजियन, रशियन यांमध्ये तंटे झाले व अठराव्या शतकात व्हेल मासे-मारीचे महत्त्व कमी होताच हे तंटे थांबले. विसाव्या शतकात येथील कोळसा खाणींमुळे त्यांच्या मालकीसाठी पुन्हा तंटे निर्माण झाले. ९ फेब्रुवारी १९२० च्या करारान्वये स्वालबार द्वीपसमूहावर नॉर्वेचा अधिकार मान्य झाला व १९२५ मध्ये अधिकृतपणे स्वालबार द्वीपसमूह नॉर्वेत समाविष्ट झाला. येथील कोळसा खाणींतील उत्खननाचे हक्क नऊ देशांना मिळाले होते. नॉर्वे व रशिया हे देश येथून मोठ्या प्रमाणात कोळसा मिळवतात. दुसऱ्या महायुद्धात येथील कोळसा खाणींची हानी झाली होती. नॉर्वेने १९७७ मध्ये या द्वीपसमूहाच्या भोवतीच्या ३७० किमी. परिसराची मत्स्यक्षेत्र संरक्षित प्रदेश म्हणून एकतर्फी घोषणा केली. परिणामी रशिया व नॉर्वे यांमध्ये मासेमारीवरून वाद उद्भवला. सप्टेंबर २०१० मध्ये स्वालबार व नॉव्हायाझीमल्या द्वीपसमूहातील सागरी सीमेबाबत रशिया व नॉर्वे यांमध्ये करार झाला. येथील कारभार नॉर्वेतर्फे एक राज्यपाल (गव्हर्नर) पाहतो. याचे मुख्यालय स्पिट्स्बर्गेन बेटावरील लाँग्यीरब्यूअन येथे आहे.
खाणकाम उद्योग हा येथील प्रमुख उद्योग आहे. कोळसा खाणींतून नॉर्वेजियन व रशियन कंपन्या कोळसा काढतात. नॉर्वेजियन कंपनी स्टोअर नॉस्र्के स्पिट्स्बर्गेन कोल या कंपनीमार्फत (एस् . एन् . एस् . के.) २००९ मध्ये सु. २.६ द. ल. टन कोळसा काढण्यात आला होता. सेव्हर्नाया येथील कोळसा खाण प्रमुख असून येथून २००१ पासून कोळसा काढण्यात येतो. तसेच लुंकेफ्जेल येथे नवीन कोळसा खाणीस २०११ मध्ये एस्.एन्.एस्.के. कंपनीस परवानगी मिळाली असून २०१२ पासून येथून कोळसा काढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ग्रूव्हे -७ ही नॉर्वेजियन कंपनीही कोळसा खाणी उत्खननात अग्रगण्य आहे. स्पिट्स्बर्गेन बेटावरील बॅ रेंट्सबर्ग येथे रशियाची कोळसा खाण होती (२०१२). येथून या कंपनीने २००६ मध्ये ८८,१४० टन कोळसा काढून रशियाला पाठविला. येथे नॉर्वेजियन कंपनीमार्फत खनिज तेल संशोधनासाठी प्रयत्न झाले मात्र व्यापारी दृष्ट्या याचे अनुमान प्राप्त झाले नाही. जानेवारी २०११ मध्ये येथे सोन्याचा शोध लागला आहे. येथे फॉस्फेट, ॲस्बेस्टस, लोखंड इ. खनिजेही आहेत. लाँग्यीरब्यूअनजवळ १९७५ मध्ये विमानतळ सुरू करण्यात आलेला आहे. स्वालबारपोस्टन हे येथील प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे. सध्या स्वालबार द्वीपसमूहात पर्यटनास महत्त्व प्राप्त झाले असून २०११ मध्ये ८४,७४४ पर्यटकांनी स्वालबारला भेट दिली होती. ध्रुवीय समन्वेषणात स्वालबार द्वीपसमूहाचा तळ म्हणून उपयोग केला जातो. ब्रिटिश कॅप्टन सी. जे. फिप्स याने १७७३ मध्ये येथून पहिले ध्रुवीय समन्वेषण केले. तसेच नील्स नॉर्डेन्स्कोल्ड, एल्. ए. अँड्रे, रोआल आमुनसेन, रिचर्ड बर्ड, सर जॉर्ज एच्. विल्किन्झ यांनी ध्रुवीय प्रदेशाच्या समन्वेषणावेळी या द्वीपसमूहाचा तळ म्हणून उपयोग केला होता.
पहा : नॉर्वे.
गाडे, ना. स.