स्पेन्सर, एडमंड : (? १५५२–१३ जानेवारी १५९९). विख्यात इंग्रज कवी. त्याचा जन्म लंडन येथील एका सामान्य शिंपी कुटुंबात झाला. त्याचे शालेय शिक्षण मर्चंट टेलर्स ग्रामर स्कूल-मध्ये झाले. मुख्याध्यापक रिचर्ड म्यूलकास्टर यांच्या साहाय्या ने त्याने लॅटिन, ग्रीक व हिब्रू या भाषा आत्मसात केल्या. केंब्रिज विद्या-पीठातून त्याने बी.ए. (१५७३) व एम्.ए. (१५७६) या पदव्या संपादन केल्या. रॉचेस्टरच्या बिशपचा सचिव म्हणून त्याने नोकरी केली. त्याने विद्यार्थिदशेत इटालियन, ग्रीक, फ्रेंच व लॅटिन साहित्यातील अभिजात साहित्यकृती वाचल्या. त्याने लॅटिनमध्येही काही काव्यलेखन केले. गॅब्रीएल हार्व्हे, ⇨ सर फिलिप सिडनी, ⇨ सर वॉल्टर रॅली, रॉबर्ट सिडनी ह्यांसारख्या नामवंत लेखक मंडळींशी त्याचे स्नेहपूर्ण संबंध होते. द शेपर्ड्स कॅलेंडर (१५७९) हा काव्यसंग्रह त्याने सर फिलिप सिडनी याला अर्पण केला. यात वर्षाच्या प्रत्येक महिन्यासाठी एक, अशी बारा लघुगोपगीते आहेत. या काव्यावर थिऑक्रिटस व्हर्जिल, मॅरो या कवींचा प्रभाव असून प्रबोधनकाळातील ही पहिली उल्लेखनीय काव्यनिर्मिती मानली जाते.
आयर्लंडच्या लॉर्ड ग्रेचा सचिव म्हणून त्याची नियुक्ती झाली (१५८०). त्यानंतर त्याने काही नोकऱ्या केल्या. त्याला काही जमीन व किलकोलमनचा किल्ला मिळाला. त्याने आठ वर्षे या किल्ल्यात वास्तव्य केले.
या काळात अनुभवलेल्या घटनांवर पुढे त्याने व्ह्यू ऑफ द प्रेझेंट स्टेट ऑफ आयर्लंड हा ग्रंथ १५९५-९६ दरम्यान लिहिला मात्र तो १६३३ मध्ये प्रकाशित झाला. आयर्लंडमधील धकाधकीच्या काळातही स्पेन्सरने वाङ्मयाची आपली आवड कायम ठेवून महत्त्वाकांक्षी अशा दि फेअरी क्विन (६ खंड) या काव्याची रचना सुरू ठेवली. या महाकाव्याचे पहिले तीन खंड प्रसिद्ध झाले (१५८९), तेव्हा एक ज्येष्ठ कवी म्हणून त्याला मोठी मान्यता प्राप्त झाली. मॅचॅबिॲस चाईल्ड या युवतीशी त्याने विवाह केला.
तत्पूर्वी १५८९ मध्ये स्पेन्सर लंडनला परतला, तेव्हा इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने त्याला सन्मानित केले.
डॅफनाइडा (१५९१) ही विलापिका व कंप्लेंट्स (१५९१) हा वेगवेगळ्या काळांत लिहिलेल्या कवितांचा संग्रह स्पेन्सरने प्रसिद्ध केला. कंप्लेंट्स मधील ‘दि टिअर्स ऑफ द म्यूझेसङ्ख ही कविता विद्याभ्यासाच्या र्हासाविषयी तक्रार नोंदविते, तर ‘मदर ह्यूबर्ड्स टेलङ्ख ह्या त्याच्या कवितेला उपरोधाची जी विलक्षण धार आहे, ती त्याच्या इतर कवितेत अभावानेच आढळते.
ॲमोरट्टी (१५९५) या त्याच्या काव्यसंग्रहात प्रणयाराधनाच्या विविध छटा व घटना यांच्यावर उत्कृष्ट सुनीते आहेत. तसेच एपिथेल्मिअन ही उद्देशिका त्याच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसरी पत्नी एलिझाबेथ बॉयल हिच्याशी झालेला विवाहप्रसंग चित्रित करण्यासाठी त्याने लिहिली. १५९६ मध्ये दि फेअरी क्विन या काव्याचे पुढील तीन खंड आणि ‘फोर हिम्स् ङ्ख, ‘प्रॉथॅलमिअन’ आणि ‘ॲस्ट्रोफेल’ या त्याच्या कविता प्रसिद्ध झाल्या.
दि फेअरी क्विन या काव्यात स्पेन्सर एकीकडे माणसामाणसांतील निरनिराळ्या हितसंबंधांतून निर्माण होणारा संघर्ष विशद करतो, तर दुसरीकडे मानवी वर्तणूक नियंत्रित करणारी शाश्वत तत्त्वे अभिव्यक्त करतो. या काव्यामध्ये त्याने प्रॉटेस्टंट व प्यूरिटन या पंथाचे दोषनिरसन करण्याचा प्रयत्न केला असून इंग्लंड आणि राणी एलिझाबेथ यांचे उदात्तीकरण केले आहे. त्याच्या काव्याचा ठळक विशेष म्हणजे केवळ शब्दांच्या द्वारे निर्माण होणारे अद्भुत संगीत. त्याच्या कवितेतील नादमाधुर्य लक्षणीय आहे. दि फेअरी क्विन मध्ये दिलेले त्याच्या कवितेचे नैतिक प्रयोजन त्याच्या कवितेला केवळ सर्वसामान्य सौंदर्यवादी कविता न ठेवता एका गंभीर काव्याचा दर्जा प्राप्त करून देते. या कवितेत त्याने वापरलेल्या सुप्रसिद्ध ‘स्पेन्सरियन स्टँझा ङ्खची भुरळ पुढे ⇨ बायरन्, ⇨ शेली आणि ⇨ कीट्स या थोर इंग्रजी कवींना पडली. ⇨ चॉसरनंतर उदयास येणाऱ्या इंग्रजीतील एका थोर कवीची छंद व शब्दकळेवरील विलक्षण पकड त्याच्या काव्यातून दृग्गोचर होते. स्पेन्सर हा तत्कालीन कवींमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण रोमन महाकवी ⇨ व्हर्जिल याने ⇨ ईनिड हे महाकाव्य लिहून लॅटिन साहित्यात जी विलक्षण कामगिरी केली, तद्वतच स्पेन्सरने दि फेअरी क्विन या काव्याद्वारे इंग्रजी वाङ्मयात केली. आधुनिक साहित्यिक वर्तुळात वाङ्मयप्रबोधनाचा एक जनक म्हणून तो ख्यातकीर्त आहे. सिडनी, बेन जॉन्सन, डॅनियल आणि इतर समीक्षकांनी त्याच्या भाषेच्या कृत्रिमतेवर हल्ला चढविला असला, तरी मिल्टन, चार्ल्स लँब यांनी त्याच्या काव्यगुणांची प्रशंसा केली आहे. स्पेन्सरने आधी दि फेअरी क्विन या काव्यासाठी बारा भागांची योजना केली होती तथापि त्याच्या हयातीत त्याचे फक्त सहा भाग पूर्ण झाले.
आयर्लंडमधील बंडखोरांनी त्याचा किलकोलमन किल्ला भस्मसात केला (१५९८). त्याचे अतीव दु:ख होऊन तो लंडनला परतला आणि त्यातच त्याचे काही महिन्यांनी लंडन येथे निधन झाले. अखेरच्या दिवसांत त्याला राणी पहिली एलिझाबेथ हिने सन्मान वेतन सुरू केले होते. त्याचा काव्यगुरू चॉसर याच्या थडग्याजवळ वेस्टमिन्स्टर ॲबीमध्ये त्याचे दफन करण्यात आले.
संदर्भ : Elliott, John, Ed. The Prince of Poets, १९६८.
सावंत, सुनील
“