स्टोरी, डेव्हिड : (१३ जुलै १९३३). इंग्रज कादंबरीकार आणि नाटककार. जन्म वेकफील्ड येथे. त्याचे वडील खाणकामगार होते. वेकफील्ड येथे क्वीन एलिझाबेथ ग्रामर स्कूलमध्ये डेव्हिडने शिक्षण घेतले. त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी त्याने ‘ लीड्स रग्बी लीग क्लब ’ बरोबर पंधरा वर्षांचा करार केला आणि तो व्यावसायिक रग्बी फुटबॉल खेळाडू बनला. त्याला चित्रकलेचीही आवड होती त्यामुळे लंडनची ख्यातनाम ‘ स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्ट ’ ही शिष्यवृत्ती त्याला मिळताच रग्बी फुटबॉल आणि चित्रकला ह्यांपैकी कोणत्या क्षेत्राची निवड करावी हा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. त्याने चित्रकलेची निवड केली तथापि त्याची कीर्ती अधिष्ठित आहे, ती त्याच्या कादंबर्‍यांवर आणि नाटकांवर.

१९६० मध्ये धिस स्पोर्टिंग लाइफ ही त्याची कादंबरी प्रसिद्ध झाली. एक व्यावसायिक रग्बी फुटबॉल खेळाडू आणि एक विधवा स्त्री ह्यांच्यातील संबंध हा या कादंबरीचा विषय. ह्या कादंबरीला ‘मॅक्मिलन पुरस्कार’ मिळाला. १९६६ मध्ये स्टोरीने ह्याच कादंबरीवर आधारित चित्रपटकथा तयार केली. त्याच्या अन्य कादंबर्‍यांत फ्लाइट इंटू कॅमडेन (१९६०), रॅडक्लिफ (१९६३), पासमोअर (१९७२), सेव्हिल (१९७६), अ प्रॉडिगल चाइल्ड (१९८२), प्रेझेंट टाइम्स (१९८४), अ सिरियस मॅन (१९९८), ॲज इट हॅपन्ड (२००२), थिन-आइस स्केटर (२००४) अशा काही कादंबर्‍यांचा समावेश होतो. स्टोरीच्या कादं- बर्‍यांचे विषय काहीसे वेगळे आहेत. उदा., फ्लाइ …मध्ये घरचा विरोध पत्करून आपल्या विवाहित प्रियकराकडे राहावयास जाणार्‍या एका स्वतंत्र वृत्तीच्या स्त्रीची कहाणी सांगितली आहे. रॅडक्लिफमध्ये समलिंगी संबंध असलेल्या दोन व्यक्तींनी परस्परांवर सत्ता गाजविण्यासाठी चालविलेल्या लढ्याचे चित्रण आहे. सेव्हिल ही त्याची आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. त्यात एका खाणकामगाराचा मुलगा आपल्या ग्रामजीवना-पासून कसा दूर जातो, हे दाखविलेले आहे. ह्या कादंबरीला ‘बुकर पारितोषिक’ मिळाले (१९७६).

स्टोरी याने नाट्यलेखनही केलेले आहे. त्याची काही नाटके त्याच्या कादंबर्‍यांच्या आधारानेच निर्माण झालेली आहेत. उदा., द काँट्रॅक्टर हे त्याचे नाटक रॅडक्लिफ या कादंबरीतून आकाराला आलेले आहे. द रेस्टोरेशन ऑफ आर्नल्ड मिडल्टन ( लेखन १९५९ प्रयोग १९६६) हे त्याचे पहिले नाटक. एक शिक्षक वेड लागण्याच्या अवस्थेपर्यंत कसा येतो, हे या नाटकात दाखविले आहे. इन सेलिब्रेशन (१९६९) मध्ये एका खाणकामगाराच्या घरात होणारे एक कौटुंबिक मनोमीलन दाखविले आहे. या खाणकामगाराला आपली सुशिक्षित मुले करीत असलेल्या कामापेक्षा आपण करीत असलेले खाणकाम अधिक महत्त्वाचे वाटते. होम (१९७०) हे नाटक मनोरुग्णालयातल्या दोन स्त्रिया आणि दोन पुरुष यांच्या संभाषणातून घडते. द चेंजिंग रूम (१९७१) मध्ये रग्बी फुटबॉल खेळाडूंच्या कपडे बदलण्याच्या खोलीत सामन्याच्या आधी आणि नंतर होणारे संभाषण सादर करण्यात आलेले आहे. त्या खोलीतले लाकडी बाक, कपडे अडकविण्याच्या खुंट्या इ. वस्तूही रंगमंचावरील नाट्यात भर घालतात. लाइफ क्लास (१९७४) हे त्याचे नाटक एका अयशस्वी कलाशिक्षकाच्या जीवनावर आधारलेले आहे. मदर्स डे (१९७६), सिस्टर्स (१९७८), अर्ली डेज (१९८०) आणि द मार्च ऑन रशिया (१९८९) ही त्याची अन्य काही नाटके.

समाजाच्या कनिष्ठ वर्गातून आलेल्या लेखकाला त्या वर्गाच्या जीवनाशी निगडित असे जे अनुभव आले, ते अनुभव साध्या पण प्रभावी शैलीतून प्रकट करण्यात तो यशस्वी झाला.

कुलकर्णी, अ. र.