स्टेप्टो, पॅट्रिक ख्रिस्तोफर : (९ जून १९१३ — २१मार्च १९८८). ब्रिटिश प्रसूतितज्ञ व स्त्रीरोगतज्ञ. त्यांनी ब्रिटिश वैद्यकीय संशोधक रॉबर्ट एडवर्ड्स यांच्याबरोबर परीक्षानलिकेमध्ये ( टेस्ट-ट्यूब-मध्ये ) मानवी अंड आणि शुक्राणू यांचा संयोग ( फलन ) घडवून व भ्रूणाचे गर्भाशयात स्थलांतर करून जीवनिर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग केला. या तंत्राचा वापर केल्यामुळे जगातील पहिली टेस्ट-ट्यूब बेबी ( परीक्षा- नलिका बालक ) लुईस ब्राउन हिचा जन्म २५ जुलै १९७८ रोजी झाला. या संशोधनाकरिता रॉबर्ट एडवर्ड्स यांनाच २०१० सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिके मरणोत्तर प्रदान केली जात नसल्यामुळे वरील संशोधनाच्या पुरस्कारासाठी स्टेप्टो यांचे नाव विचारात घेतले गेले नाही.
स्टेप्टो यांचा जन्म ऑक्सफर्ड ( इंग्लंड ) येथे झाला. त्यांनी लंडन येथील सेंट जॉर्ज मेडिकल विद्यापीठात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले (१९३९). त्यानंतर ते रॉयल नेव्ही व्हॉलंटीअर रिझर्व्हमध्ये शस्त्रक्रियाविशारद म्हणून कार्यरत होते. दुसर्या महायुद्धात त्यांचे जहाज बुडाल्याने शत्रूच्या तावडीत सापडून ते इटली देशाचे युद्धकैदी झाले (१९४१—४३). तेथून सुटका झाल्यानंतर त्यांनी लंडन, डब्लिन आणि मँचेस्टर या ठिकाणी वैद्यकाचे पुढील शिक्षण घेतले. ते ओल्डहॅम रुग्णालयात ज्येष्ठ प्रसूतितज्ञ व स्त्रीरोगतज्ञ होते (१९५१—७८).
ओल्डहॅम येथील मानवी प्रजोत्पादन केंद्रात स्टेप्टो यांनी वंध्यीकरण आणि वंध्यत्व ( जनन-अक्षमता ) यांवर संशोधन केले. १९६७ मध्ये त्यांनी लॅपरोस्कोपी इन गायनॅकॉलॉजी हे पुस्तक प्रसिद्ध केले. लॅपरोस्कोप ही प्रकाशतंतूंनी तयार केलेली अरुंद नलिका असते. स्टेप्टो यांनी वंध्यत्व विकारातील कमी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांकरिता लॅपरोस्कोपी या तंत्राचा यशस्वी वापर केला. स्त्रियांमधील वंध्यत्वाचे एक कारण गर्भाशयाला जोडलेल्या अंडवाहिनी ( फॅलोपियन ) नलिकांमध्ये अवरोध निर्माण होणे हे असू शकते. त्यामुळे अंड या नलिकेत प्रवेश करू शकत नाही व त्याचे शुक्राणूशी फलन होत नाही. अशा परिस्थितीत शरीरबाह्य फलन घडवून तयार झालेला भ्रूण प्राथमिक अवस्थेत असताना परत गर्भाशयात ठेवण्याची कल्पना स्टेप्टो यांनी प्रथम मांडली. एडवर्ड्स यांनी शरीरबाह्य फलन घडवून आणण्याच्या संशोधनात स्टेप्टो यांना मदत केली. स्टेप्टो आणि एडवर्ड्स यांनी लिहिलेल्या ए मॅटर ऑफ लाइफ : द स्टोरी ऑफ ए मेडिकल ब्रेकथ्रू (१९८०) या पुस्तकात शरीरबाह्य फलनाशी संबंधित त्यांच्या शोधांचा तपशील दिलेला आहे.
स्टेप्टो यांचे कँटरबरी ( केंट ) येथे निधन झाले.
पहा : वंध्यत्व.
एरंडे, कांचन
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..