स्टॉक्टन ऑन टीझ : इंग्लंडमधील एकीय प्राधिकरण व शहर. लोकसंख्या १,९१,६१० (२०११ अंदाज ). स्टॉक्टन ऑन टीझहे शहर टीझसाइड महानगराचा एक भाग आहे. हे शहर उत्तर समुद्राला मिळणार्‍या टीझ नदीमुखाशी डाव्या काठावर वसले असून रस्ते व लोहमार्गाने इतर शहरांशी जोडलेले आहे. याच्या जवळच डरहॅम रिज व्हॅली एअरपोर्ट आहे.

प्रारंभी डरहॅमच्या बिशपचे निवासस्थान व किल्ला यांभोवती बाजारपेठेचे शहर म्हणून याचा विकास होत गेला. डरहॅमच्या बिशपकडून यास १३१० मध्ये सनद मिळाली. तद्नंतर एक छोटे बंदर म्हणून याचा वापर होऊ लागला व येथून लोकरीची निर्यात व दारूची आयात होऊ लागली. हे स्कॉट लोकांच्या अखत्यारित १६४४ — ४६ पर्यंत होते. यादवी युद्धात याचे मोठे नुकसान झाले होते. १७६९ मध्ये टीझ नदीवर दळणवळणासाठी उपयुक्त पूल बांधण्यात आला. १८२५ मध्ये डरहॅम कोळसा क्षेत्राशी लोहमार्गाने जोडण्यात आल्यानंतर या शहराचे बंदर म्हणून महत्त्व वाढले. जॉर्ज स्टिव्हेन्सन याने स्टॉक्टन व डार्लिंग्टन या बंदरांना जोडणार्‍या ३२ किमी. लांबीच्या लोहमार्ग वाहतुकीची २७ सप्टेंबर १८२५ रोजी सुरुवात केली. एंजिनाच्या साह्याने प्रवासी व माल या दोन्ही बाबींची वाहतूक करणारी जगातील ही पहिलीच ‘सार्वजनिक’ रेल्वे व्यवस्था होती. तसेच १८२७ मध्ये येथील जॉन वॉकर या रसायन-शास्त्रज्ञाने रासायनिक द्रव्याच्या घर्षणाने पेटणार्‍या आगकाडीचा शोध लावला. त्यामुळे हे शहर विशेष प्रसिद्धीस आले.

एक लहानसे बाजारपेठ व लघु उद्योगांचे ठिकाण असलेले हे शहर अठराव्या शतकाच्या अखेरीस एक अवजड उद्योगांचे केंद्र बनले. येथे जहाजबांधणी, लोह-पोलाद, रसायने इ. उद्योग चालतात. १९८० पासून येथील सेवा उद्योगांत वाढ झालेली आहे. येथे सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत.

येथील पॅरिश चर्च, प्रवासी रेल्वे स्थानकाचे व प्रवासी रेल्वे तिकिटांचे पहिले कार्यालय, रॉप्नेर पार्क, प्रिस्टन पार्क, आर्च थिएटर अँड आर्ट सेंटर, द जोर्जियन थिएटर, स्टॉक्टन मध्यवर्ती ग्रंथालय इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.