स्टाइनबेक, जॉन अर्न्स्ट : (२७ फेब्रुवारी १९०२ — २० डिसेंबर १९६८). अमेरिकन कादंबरीकार. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सालीनास येथे जन्मला. १९२०—२६ च्या दरम्यान कॅलि-फोर्नियातील स्टॅन्फर्ड विद्यापीठात तो शिकला पण हे शिक्षण सलगपणे झाले नाही कारण प्रयोगशाळेतील सहायक, शेतमजूर अशा प्रकारची कामे करून तो शिकत होता. त्या विद्यापीठातही त्याला ज्यांत रस वाटेल अशाच विषयांचा अभ्यास त्याने केला. तो पदवी मात्र मिळवू शकला नाही. आपल्या विद्यार्थिदशेत त्याने जी श्रमाची कामे केली, ती करताना त्याला आलेले अनेक प्रकारचे अनुभव त्याला त्याच्या साहित्यनिर्मितीत उपयोगी पडले. कप ऑफ गोल्ड (१९२९) ह्या कादंबरीने त्याने आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ केला. त्यानंतर द पाश्चर्स ऑफ हेव्हन ( १९३२, कथासंग्रह ), टु ए गॉड अन्नोन ( १९३३, कादंबरी ) ही त्याची पुस्तके प्रसिद्ध झाली. ह्यांपैकी पहिली कादंबरी हेन्री मॉर्गन ह्या चाच्याच्या जीवनावर होती, तर दुसरीत माणसाचे विश्वाशी असलेले गूढ नाते, सुफलतेशी संबंधित असलेला धर्म पाळणार्या एका पेगन शेतकर्याचे जीवन आणि त्याच्या भावातिरेकी श्रद्धा ह्यांचे चित्रण प्रकट केलेले आहे. दुष्काळात हा शेतकरी आपल्या पूजास्थानी जाऊन आत्महत्या करतो. त्याच्या द पाश्चर्स … मधील कथा ग्रामीण जीवन जगणार्या एका छोट्याशा लोकसमूहाशी निगडित आहेत. स्टाइनबेकला लेखक म्हणून लोकप्रियता प्राप्त झाली, ती मात्र टॉर्टिला फ्लॅट (१९३५) ह्या कादं-बरीमुळे. मेक्सिकन अमेरिकनांविषयीची ही कादंबरी म्हणजे एक विनोदी साहसकथा आहे. इन ड्यूबिअस बॅट्ल (१९३६) ह्या शेतमजुरांच्या संपावर लिहिलेल्या कादंबरीचा सूर मात्र गंभीर आहे. ठिकठिकाणी हिंडून काम मिळविणार्या दोन मजुरांच्या विलक्षण आणि गुंतागुंतीच्या नात्याची शोकात्म कथा ऑफ माइस अँड मेन (१९३७) ह्या कादंबरीत त्याने मांडलेली आहे. ह्याच वर्षी नाटक आणि चित्रपट ह्या रूपांतही ती सादर झाली.
पुलिट्झर पुरस्कार मिळालेली द ग्रेप्स ऑफ रॉथ (१९३९) ही कादंबरी म्हणजे ओक्लाहामा डस्ट बोलमधून मोठ्या आशेने कॅलि-फोर्नियात आलेल्या गरीब, भटक्या शेतमजुरांच्या भ्रमनिरासाची आणि यातनांची कहाणी होय. ह्या मजुरांच्या दु:खांबद्दल स्टाइनबेकने सॅन फ्रॅन्सिस्को क्रॉनिकल मध्ये लेखनमालाही लिहिली होती. ह्या कादंबरीच्या माध्यमातून सामाजिक अन्यायाविरुद्ध निषेधाचा तीव्र सूर तर त्याने उमटविलाच शिवाय कितीही आपत्ती कोसळल्या, तरी माणसांची जगण्याची जी चिवट जिद्द असते, तिचे प्रत्ययकारी दर्शनही घडवले. लेखनविषयाचे सूक्ष्म संदर्भ देणारी निसर्गवादी शैली आणि प्रतीकात्मकता ह्यांचा संयोग ह्या कादंबरीतून प्रत्ययास येतो तथापि तीत अधूनमधून येणारी भावविवशता आणि अतिनाट्यात्मकता हे ह्या कादंबरीतले काही दोष म्हणून सांगण्यात येतात.
दुसर्या महायुद्धाच्या काळात स्टाइनबेकने युद्धपत्रकारी केली. ती करताना आलेल्या अनुभवांच्या आधारे बाँब्ज अवे : द स्टोरी ऑफ ए बाँबर टीम (१९४२) हे लेखन त्याने केले. ए रशियन जर्नल (१९४८) आणि वन्स देअर वॉज ए वॉर (१९५८) हे त्याचे लेखनही युद्ध-काळातलेच. द मून इज डाउन (१९४२) ही त्याची कादंबरी नाझींनी नॉर्वे व्यापल्यानंतर नॉर्वेजियनांनी त्यांचा केलेला प्रतिकार चित्रित करते.
युद्धोत्तर काळात स्टाइनबेकने लिहिलेल्या कॅनरी रो (१९४५), द पर्ल (१९४७) आणि द वेवर्ड बस (१९४७) ह्या कादंबर्यांतून आधुनिक संस्कृतीच्या तळाशी असलेला लोभ आणि भौतिक सुखलोलुपता ह्यांवर टीका केलेली आहे तथापि द ग्रेप्स ऑफ रॉथ नंतर स्टाइनबेकच्या ठळकपणे नजरेत भरणार्याकादंबर्या म्हणजे बर्निंग ब्राइट (१९५०), ईस्ट ऑफ ईडन (१९५२) आणि द विंटर ऑफ अवर डिसकंटेंट (१९६१) ह्या होत. बर्निंग ब्राइट मध्ये सर्व मानवांचे बंधुत्व हा विचार त्याने मांडला आहे. ईस्ट ऑफ ईडन ही कादंबरी अंशत: आत्मचरित्रात्मक असून, चांगले वा वाईट ह्यांतील काय निवडायचे हे ठरविण्याच्या माणसाच्या शक्तीवर तीत भर दिलेला आहे.
द विंटर ऑफ अवर डिसकंटेंट ह्या कादंबरीतही नैतिकतेचाच विषय त्याने हाताळला आहे. फर्गॉटन व्हिलेज (१९४१) आणि व्हिव्हा झपाटा (१९५२) हे त्याने चित्रपटांसाठी केलेले पटकथालेखन होय.
स्टाइनबेकचे साहित्य अमेरिकेत, तसेच यूरोपमध्येही लोकप्रिय आहे. त्याच्या लेखनामागे असलेली सामाजिक जाणीव, करुणा आणि त्याच्या निवेदनशैलीची गुणवत्ता ह्या लोकप्रियतेमागे आहे. अमेरिकन जीवनमूल्ये त्याने स्वीकारलेली होती आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय धोरणांना त्याने वेळोवेळी पाठिंबा दिला होता. व्हिएटनामविरुद्ध अमेरिकेने पुकारलेल्या युद्धालाही त्याने पाठिंबा दिला. त्यामुळे अनेक उदारमतवादी बुद्धिमंतांचा आदर त्याला गमवावा लागला. १९६२ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.
न्यूयॉर्क सिटीत तो निधन पावला.
संदर्भ : 1. French, Warren, John Steinbeck, १९६१.
2. Liska, Peter, The Wide World of John Steinbeck, १९५८.
3. Moore, H. T. The Novels of John Steinbeck : A First Critical Study, १९३९, २nd Ed., १९६८.
4. Tedleck, E. W. Wicker, Cecil V. Eds. Steinbeck and His Critics, १९५७.
कुलकर्णी, अ. र.
“