स्पायरोकीटॅलीझ : सूक्ष्मजंतूंच्या सिझोमायसीटीझ ह्या वर्गातील दहा गणांपैकी हा एक गण असून यातील जातींच्या कोशिका लांबट व त्रिमितीय सर्पिलाकार (फिरकीसारख्या) असतात. या सूक्ष्म-जंतूंमधील लवचिकता व संकोचशीलता हे त्यांचे गुणवैशिष्ट्य मानतात. यांचे एककोशिकीय, केंद्रक नसलेले तंतू शाखाहीन असतात. त्यांची संख्यावाढ आडव्या विभाजनाने होते. चल असूनही हे कशाभिकाहीन (कोशिकेबाहेरील जीवद्रव्याचा लांबट केसासारखा धागा नसलेले) असतात. बर्‍याच वेळा त्यांच्या सर्पिलाकार सरपटत फिरण्याने त्यांना गती मिळते. त्यांची संरचना इतरांपेक्षा गुंतागुंतीची असून अनेक जातींमध्ये कशाभिकांसारखी तंतुके आढळतात. कोशिकांचा आकार लांबीमध्ये ५०० म्यूमी.पर्यंत (१ म्यूमी. = १०-६ मी.), परंतु रुंदीमध्ये मात्र तो इतरांएवढाच असतो. काही सूक्ष्मजंतू जीवोपजीवी असून त्यांच्या संक्रामणामुळे मानवास उपदंश, पुनरावर्ती (उलटणारा) ज्वर, संक्रामक कावीळ इ. रोग होतात. हे सूक्ष्मजंतू बहुतांशी पाणथळ जागेत अथवा दूषित पाण्यात राहात असून काही वेळा गोगलगायीसारख्या मृदुकाय (शिंपयुक्त) प्राण्यांच्या पचनमार्गातही ते आढळतात. या गणात दोन कुले असून प्रत्येक कुलात तीन प्रजाती आहेत.

स्पायरोकीटेसी कुल : या कुलातील सूक्ष्मजंतू सर्पिलाकार असून त्यांची लांबी ३० — ५०० म्यूमी. व व्यास ०.४ — ३ म्यूमी. असतो. या कुलात स्पायरोकीटा, क्रिस्टिस्पायरासॅप्रोस्पायरा या तीन प्रजाती आहेत. स्पायरोकीटा  प्रजातीतील सूक्ष्मजंतू गोड्या किंवा खार्‍या पाण्यात आढळ-तात. हे सूक्ष्मजंतू सानिल (हवेच्या सान्निध्यात जगणारे) असून २६° से. तापमान व पीएच मूल्य ६ — ९ असताना त्यांची वाढ चांगली होते. क्रिस्टिस्पायरा प्रजातीतील सूक्ष्मजंतू मृदुकाय प्राण्यांवर जीवोपजीवी असतात. सॅप्रोस्पायरा  सूक्ष्मजंतू मुख्यतः खार-वटलेल्या जागेत मुक्तपणे आढळतात. या तीनही प्रजाती व त्यांतील जाती महत्त्वाच्या नाहीत.

ट्रेपोनेमॅटेसी कुल : या कुलातील सूक्ष्मजंतू लांबीमध्ये २० म्यूमी.पेक्षा व व्यासामध्ये ०.५ म्यूमी.पेक्षा लहान असतात. ते पाण्यात व वाहितमलात मुक्तपणे आढळतात. यातील बोरीलिया, ट्रेपोनेमालेप्टोस्पायरा या तीन प्रजाती महत्त्वाच्या असून त्यात रोगजनक अथवा जीवोपजीवी जाती आढळतात. काहींची वाढ कृत्रिम संवर्धकावर केलेली आढळते. यांमध्ये सानिल व अननिल (हवेच्या अभावी जगणारे) जाती असून काही सूक्ष्मजंतू ॲनिलीन अभिरंजन क्रियेने रंगविले जात नाहीत त्यांच्याकरिता गीम्सा अभिरंजन क्रिया करावी लागते.

(अ) बोरीलिया : हे सूक्ष्मजंतू अनियमित सर्पिलाकार असतात. बो. रिकरेन्टिस ही जाती यूरोपातील पुनरावर्ती ज्वरास कारणीभूत असून बो. ड्युटोनाय ही जाती मध्य व दक्षिण आफ्रिकेतील या रोगास कारणीभूत होते.

(आ) ट्रेपोनेमा : हे सूक्ष्मजंतू कोनयुक्त सर्पिलाकार असतात. ट्रे. पॅलिडम हे मानवाच्या उपदंश अथवा गरमी रोगास कारणीभूत आहेत.

(इ) लेप्टोस्पायरा : हे सूक्ष्मजंतू अतिलहान असून घट्ट वेढे असलेल्या फिरकीसारखे असतात. ले. इक्टेरोहीमोर्‍हेजी ही जाती मानवाच्या व्हाइल अथवा संक्रामक कावीळ रोगास कारणीभूत आहे.

पहा : उपदंश सूक्ष्मजंतुविज्ञान सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण सूक्ष्मजीवविज्ञान.

संदर्भ : 1. Frobisher, Martin Fundamentals of Microbiology, Tokyo, 1961.

            2. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, Tokyo, 1961.

            3. Staince, R. Y. Doudoroff, M. Adelberg, E. A. General Microbiology, 2nd Edition, 1963.

 

कुलकर्णी, नी. बा.