स्क्रोफ्यूलॅरिएसी : ( नीरब्राह्मी कुल ). ह्या वनस्पति-कुलाचा समावेश फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग ] द्विदलिकित वर्गातील पर्सोनेलीझ या गणात केला जातो. ह्या गणात सु. १२ कुलांचा (⇨ बिग्नोनिएसी, ⇨ ॲकँथेसी, ⇨ व्हर्बिनेसी, ⇨ लॅबिएटी इ. ) समावेश असून तो सोलॅनेलीझ गणापासून अवतरला असावा. स्क्रोफ्यूलॅरिएसी हे कुल ह्या दोन्ही गणांना जोडणारा दुवा असल्याचे समजतात. ह्या कुलात सु. २०० प्रजाती व २,६०० जाती ( विलिसच्या मते ३,००० ) असून त्या सर्व ⇨ ओषधी, वेली, क्वचित क्षुपे व फारच क्वचित वृक्ष आहेत. ह्या वनस्पती जगात सर्वत्र ( विशेषत: समशीतोष्ण कटिबंधात ) आढळतात. त्यांच्या शरीरावर साधे किंवा प्रपिंडीय ( द्रव पदार्थ स्रवणार्या ग्रंथी असलेले ) केस असतात. पाने समोरासमोर, एकाआड एक किंवा मंडलित व बहुधा साधी काहींचे देठ संवेदी असते. फुले बहुधा एक-समात्र, द्विलिंगी, पंचभागी, अवकिंज संवर्त दीर्घस्थायी पुष्पमुकुटाच्या पाकळ्या जुळलेल्या व दोन्ही द्वयोष्ठक असतात. केसरदले ४-५, दीर्घद्वयी मधुरसस्रावी बिंब वलयाकृती किंजदले २ किंजपुट ऊर्ध्वस्थ, दोन कप्प्यांचा व बीजकविन्यास अक्षवर्ती असतो. बीजके अनेक असून फळ (बोंड) क्वचित मांसल व बीज सपुष्क असते. ⇨ रसिली, ⇨ अँजिलोनिया, ⇨ टोरेनिया एशियाटिका या वनस्पती शोभेकरिता, तर ⇨ हरिणखुरी, ⇨ डिजिटॅलिस पुर्पुरिया व ⇨ कुटकी या वनस्पती औषधांकरिता उपयुक्त असतात. हार्वेया व हायोबँक या दोन प्रजाती जीवोपजीवी असून स्ट्रिगा ( टारफुला ) अर्धजीवोपजीवी आहे ज्वारी व उसाच्या मुळांवर वाढून ती रोगकारक होते. काही प्रजातींतील वनस्पती दलदलीत वाढतात ( उदा., ⇨ नीरब्राह्मी, अंबुली ). काहींत विषम पर्णत्व आढळते.
परांडेकर, शं. आ.