स्कारलात्ती, आलेक्सांद्रो : (२ मे १६६०—२२ ऑक्टोबर १७२५). इटालियन ऑपेरा संगीतरचनाकार आणि अभिजात स्वरमेलाच्या विकासातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. संपूर्ण नाव प्येअत्रो आलेक्सांद्रो गॅस्पेअर स्कारलात्ती. सिसिलीतील पालेर्मो येथे त्याचा जन्म झाला. त्याच्या बालपणाविषयीची माहिती ज्ञात नाही तथापि वयाच्या १२ व्या वर्षी त्याला रोमला पाठविण्यात आले. तेथे बेर्नांर्दो पास्क्विनी यांच्याशी त्याचा परिचय झाला. त्यांचा प्रभाव त्याच्यावर पडला. त्याच्या ११५ ऑपेरांपैकी त्याने Gli equivoci nel sembiante (१६७९) हा धार्मिक बंधुत्वासाठी लिहिलेला ऑपेरा स्वीडनची राणी ख्रिस्तीनाच्या दरबारी त्यास आश्रय मिळण्यास उपयुक्त ठरला. तिच्यासाठी त्याने L ʼ honesta negli amori (१६८०) हा ऑपेरा लिहिला. १६८३ पर्यंत तो दरबारी सेवेत होता. त्याच्या या का र्या मु ळे त्याला राजादेश प्राप्त झाला आणि नेपल्सच्या ‘ मास्टेरो दि काप्पेल्ला ’ या पदावर त्याची नियुक्ती झाली (१६८४). त्याने सु. ४० ऑपेरा व अन्य मनोरंजनात्मक संगीतरचना १७०२ पर्यंतच्या सेवाकार्यात केल्या. Gli equivoci in amore (१६९०) ही या काळातील त्याची एक उल्लेखनीय रचना.
पुढे १७०२ मध्ये स्कारलात्ती फ्लॉरेन्सला गेला. तेथे तिसरा प्रिन्स फेर्दिनांदो द मेदीची याच्या रंगभूमीसाठी त्याने चार ऑपेरा लिहिले. १७०७ मध्ये रोममध्ये ‘ मास्टेरो दि काप्पेल्ला ’ म्हणून त्याची पुन्हा नियुक्ती झाली. तसेच आर्केडियन ॲकॅडेमीवरही त्याची निवड झाली. Il trionfo della liberta आणि Il Mitridate Eupatore हे दोन ऑपेरा त्याने व्हेनिस कार्निव्हलमध्ये सादर केले. १७०९ मध्ये तो नेपल्सला पूर्वपदावर परतला. त्याने अनेक संगीतरचना, धार्मिक रचना व ऑपेरा लिहिले La principessa fedele (१७१०), Scipione nelle Spagne (१७१४), Il Tigrane (१७१५) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय ऑपेरा-रचना. त्यात त्याने त्रिशंगी स्वरमाला प्रारूप विकसित केले आणि वृंदवादनात तंतुवाद्यांचा उपयोग केला. १७१६ मध्ये त्याने अकरावा पोप क्लीमेंट याच्यावर धार्मिक रचना केली असून, त्याचवर्षी त्याने Il trionfo dell’ onore हा आपला ऑपेरा बुफा ( विनोदी पण प्रहसनाचे रूप नसलेले संगीतक) पूर्ण केला ( नेपल्स येथे सादर, १७१८). १७१८ ते २१ च्या दरम्यान त्याने आणखी काही ऑपेरा व धार्मिक रचना लिहिल्या. १७२३ मध्ये तो नेपल्सला परतला व त्याने निवृत्ती घेतली.
स्कारलात्ती प्राबंधिक विकास आणि रंजक स्वरमेल यांकरिता प्रख्यात असून त्याचा त्याने चपखल वापर आपल्या ऑपेरांत केला. त्याचा प्रभाव नंतरच्या संगीतरचनाकारांवर पडला. विशेषतः विख्यात ऑस्ट्रियन संगीतरचनाकार ⇨ व्होल्फगांग आमाडेउस मोट्सार्ट व जर्मन संगीत-रचनाकार ⇨ रॉबर्ट शूमान यांच्यावर त्याच्या संगीतरचनाशैलीचा प्रभाव आढळतो. स्कारलात्ती यास ‘नीॲपलिटन’ (नेपल्समध्ये सतराव्या शतकाचा उत्तरार्ध ते अठरावे शतक या दरम्यान जोमात असलेला संगीतकारांचा संप्रदाय) या संप्रदायाचा संस्थापक मानले जाते. त्याचे संगीतातील विशेष संवादी स्वर, नादमाधुर्य लक्षणीय आहे.
स्कारलात्तीने आंतोनिया आंझोलीनी या युवतीशी विवाह केला (१६७८). त्यांना दहा अपत्ये झाली. त्यांपैकी डोमिनिको स्कारलात्ती (१६८५ –१७५७) हा त्याचा मुलगा इटालियन संगीतरचनाकार म्हणून विशेष ख्याती पावला. आपल्या वडिलांकडूनच त्याने संगीताचे शिक्षण घेतले होते. त्याने विकसित केलेले कळफलकाचे ( की बोर्ड ) तंत्र हे इटालियन संगीतास लाभलेले त्याचे महत्त्वपूर्ण योगदान होय.
स्कारलात्ती याने ‘ इटालियन ओव्हरचर ’ हा तीन संगीतप्रकारांतला (ॲलिग्रो-ॲडागिओ-ॲलिग्रो ) संकलित रचनाबंध प्रस्थापित केला. त्याने काही संगीतरचना तसेच चेंबर संगीतही केले. सु. ६०० चेंबर कांटेटाज्ची रचना त्याने केली असून मुख्यतः ऑपेरा-ऑर्केस्ट्रा विकसित करण्यात त्याचा मोठा वाटा आहे. सुषिर ( विंड ) वाद्यगटातील वाद्ये वाजविण्यात त्याचे कौशल्य अपूर्व आहे. ट्रंपेट् फ्ल्यूट् , ⇨ ओबो, बॉसम इ. संगीतवाद्यांचा वापर करून त्याने ऑर्केस्ट्रा अधिक प्रभावी केला.
नेपल्स येथे त्याचे निधन झाले.
पोळ, मनीषा
“