स्कॅलप : मॉलस्का ( मृदुकाय प्राण्यांच्या ) संघाच्या बायव्हाल्व्हिया ( शिंपाधारी ) वर्गातील व पेक्टिनिडी कुलातील विशेषतः पेक्टेन प्रजाती-तील द्विपुट कवच असणारा सागरी प्राणी. या कुलात सु. ५० प्रजाती व उपप्रजाती असून त्यांत ४०० पेक्षा अधिक जाती आहेत. त्याला फॅन शेल किंवा कोंब शेल ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यांचा प्रसार जगात सर्वत्र असून ते समुद्रात बर्याच खोलीपर्यंत ( सु. १९८ मी.) आढळतात.
स्कॅलपाच्या शिंपा पंख्याच्या आकाराच्या असून त्या लांबीने २.५—१५ सेंमी.पर्यंत असतात. बिजागिरीच्या दोन्ही बाजूंवर पंख असतात. दोन शकले बंधाने बिजागिरीपाशी एकत्र जोडलेली असतात. तेथे दोन पंखांसारखे प्रवर्धक निघतात, त्यांना कान म्हणतात. शकले गुळगुळीत किंवा कलाकुसर असलेली असून रंगांत विविधता आढळते. शिंपांची उघडझाप अभिवर्तनी ( अवयव आतमध्ये अथवा दुसर्या भागाकडे ओढणार्या ) स्नायूंमुळे होते. पोहताना शिंपांची उघडझाप फार जलद होते व त्यांच्यामधून पाणी जोराने बाहेर फेकले जाते. शिंपांच्या आत मऊ प्रावार असते. प्रावाराच्या ( शिंपाच्या लगेच खाली असणार्या त्वचेच्या बाहेरील मऊ घडीच्या ) कडेवर आखूड संस्पर्शकांची एक मालिका असून चमकदार रंगीत डोळ्यांची ओळ ( पंक्ती ) संस्पर्शकांच्या तळाशी असते. संस्पर्शकांच्या साहाय्याने स्पर्शज्ञान होते. पाण्यात झालेले बदल कळतातव भक्ष्य पकडले जाते. संस्पर्शकांचे जाळे तयार होऊन त्यातून अन्नयुक्त पाणी प्रावार गुहेत नेले जाते.
स्कॅलप इतर शिंपाधारी प्राण्यांप्रमाणे पाण्यातील सूक्ष्म प्राणी व वनस्पती यांवर उपजिविका करतो. स्कॅलप द्विलिंगी प्राणी आहे. प्रजननात अंडी व शुक्राणू पाण्यात सोडले जातात आणि तेथेच त्यांचे फलन घडून येते. नंतर त्याचे पोहणार्या डिंभात रूपांतर होते. वाढीच्या पुढील अवस्थांत डिंभ पाण्याच्या तळाशी स्थिरावतो. जगाच्या अनेक भागांत आदिमानव स्कॅलपाचा अन्न म्हणून व त्याच्या शिंपांचा भांड्यांसाठी उपयोग करीत होता. इतर मृदुकाय प्राण्यांपेक्षा स्कॅलपाला खाद्याव्यतिरिक्त कला, वास्तुकला, वाङ्मय व धर्म या क्षेत्रांमध्ये बरेच महत्त्वाचे स्थान आहे. मध्ययुगीन काळात पिलग्रिम्स स्कॅलपाची (पेक्टिन जॅकोबियस) शिंपा धार्मिक चिन्ह ( सेंट जेम्सचा बॅज ) मानली जात असे. आज सुद्धा स्कॅलपाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर अन्न म्हणून केला जातो. मुख्यतः त्याच्या अभिवर्तनी स्नायूंचा वापर अन्न म्हणून केला जातो. स्कॅलपाची शेती प्रामुख्याने जॉर्जेस नदीच्या उत्तर-पूर्व किनार्याकडील भाग, मॅसॅचूसेट्सचा किनारा व फंडीचा किनारा ( नवीन ब्रुन्सविक-नोवा स्कॉटिया ) येथील मोठ्या प्रमाणात वितरण असलेल्या क्षेत्रात केली जाते. समुद्री स्कॅलप, जायंट किंवा डीप-सी ( प्लॅसोपेक्टीन मेगॅलॅनिकस ) ही जाती न्यू इंग्लंड व पूर्व कॅनडा भागातून प्राप्त केली जाते. बे ( किनारी ) स्कॅलप (इक्विपेक्टीन इरॅडियन्स ) ही जाती देखील या भागातून मिळविली जाते. ब्रिटिश बेटांत इ. ओपेरक्यूलॅरिस ही जाती सामान्यपणे मासेमारी व्यव-सायात खाद्यासाठी पकडली जाते. तारामीन हा स्कॅलपाचा मोठा शत्रू असून तो त्यांचा नाश करतो.
पहा : मॉलस्का बायव्हाल्व्हिया.
जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..