सैनिकीसम संघटना, भारतीय : (पॅरामिलिटरी फोर्सेस्). देशाच्या नियमित सेनेसारखी संघटना, साधनसामग्री, प्रशिक्षण आणि ध्येय असूनही त्यांच्यापासून वेगळ्याच प्रकारचे अस्तित्व असलेला कुठलाही गट किंवा संघटनेला सैनिकीसम संघटना अथवा अर्धसैनिक दल म्हणतात. भारतीय सैनिकीसम संघटना भारताच्या सुरक्षेसाठी, भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे सैन्य आहे. आंतरराष्ट्रीय चकमक कायद्यानुसार (इंटरनॅशनल लॉ ऑफ कॉन्फ्लिक्ट) कुठल्याही राष्ट्राला पोलिसी कार्यप्रणाली असणाऱ्या संघटनांना, इतर राष्ट्रांना याची माहिती दिल्यानंतरच आपल्या सेनेशी संलग्न करण्याची मुभा आहे. परिस्थित्यनुरूप त्या त्या देशांमधील मिलिशिया व गरिला, साहाय्यक सैन्य, बॉर्डर गार्डस्, जेंडरमेरिज्, स्पेशल ॲक्टिव्हिटी डिव्हिजन आणि यूथ कॅडेट ऑर्गनाय-झेशनचाही समावेश यामध्ये करता येतो. मात्र २०१२ मध्ये भारतासह ६२ देशांनी हस्ताक्षरित केलेल्या आंतरराष्ट्रीय करारानुसार कोणत्याही देशामध्ये भाडोत्री सैनिक (मर्सनरीज्) किंवा खाजगी सेना (प्रायव्हेट मिलिटरी सिक्युरिटी कंपनी) यांच्या उभारणीसाठी मनाई करण्यात आली आहे.
भारतीय प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी आणि सेनेला सीमेवर मदत करण्यासाठी, अनेक पोलिसी व समसदृश संघटना मदत करत असत. त्यांना सैनिकीसम संघटना हे नाव दिले जात असे. भारताचा भव्य विस्तार पाहता देशाची रक्षा करणाऱ्या सेनादलांच्या व्यतिरिक्त सीमा व अंतर्गत सुरक्षा आणि कायदा व व्यवस्था पालनासाठी इतर सुरक्षादलांच्या देशांतर्गत तैनातीची जरूरी आवर्जून भासत असे. याची पूर्तता पस्तीस लाखांवर मनुष्यबळ असलेल्या भारतीय सैनिकीसम संघटना करायची. २०११ आधी सेंट्रल पोलिस ऑर्गनायझेशन्स्ची (सी. पी. ओ.) गणना सैनिकीसम संघटनेचा प्राथमिक स्तर आणि सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस्ची (सी. पी. एफ्.) गणना सैनिकीसम संघटनेचा द्वितीय स्तर या प्रकारे केली जात असे. इतर पोलिसदलांच्या तुलनेत ही संघटना शिस्तबद्ध आणि कुठल्याही प्रकारच्या हिंसेशी सामना देऊ शकणारी आहे. सीमेवरील टेहळणी (बॉर्डर पेट्रोलिंग), दंग्यांचे नियोजन (रायॉट कंट्रोल), दहशतवादविरोधी कारवाया (अँटि टेररिस्ट ऑपरेशन्स्), सामुद्रिक टेहळणी (सी पोलिसिंग) तसेच विमानतळ, औद्योगिक प्रतिष्ठाने, महत्त्वाच्या इमारती आणि व्यक्तींची सुरक्षा यांची जबाबदारी या संघटनेने सहज रीत्या पेलली. इतकेच नव्हे, तर भारतीय सेना तैनात असलेल्या श्रीलंका, बॉझ्निया (यूगोस्लाव्हिया), कॉसॉव्हॉ, लायबीरिया इ. चकमकींच्या क्षेत्रांमध्ये कायदा व सुरक्षा स्थापन करण्याची जबाबदारीही तिने समर्थपणे पार पाडली.
कुठलीही निश्चित व्याख्या उपलब्ध नसल्यामुळे स्वातंत्र्यांनंतर सर्वच केंद्रीय वा राज्य सशस्त्रदलांचा समावेश सैनिकीसम संघटनांमध्ये होत असे. मात्र मार्च २०११ मध्ये सरकारने केलेल्या निश्चित व्याख्येनुसार या दलांना सैनिकीसम संघटनांमधून वगळण्यात आले आहे. या व्याख्येनुसार भारतीय सेनेला एकजुटीने सक्रिय मदत करणाऱ्या आणि सैनिकी अधिकाऱ्यांचे नेतृत्व असलेल्या (अ) ५०,००० सैनिकी संख्या असलेले सैनिकी नेतृत्वाखालील, गृह मंत्रालयाधीन आसाम रायफल्स (ब) १०,००० सैनिकी संख्या असलेले सैनिकी नेतृत्वाखालील, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) संलग्न विशेष सीमा दल आणि (क) २९ आरमारी तळांवर ६,२०० नौसैनिकी संख्या असलेले नौदलाच्या नेतृत्वाखालील भारतीय तटरक्षक दल यांनाच भारतीय सैनिकीसम संघटनांचा दर्जा बहाल केला आहे. वरील तीन संघटनांखेरीज इतर संघटनांना शासनातर्फे वेळ पडल्यास सैनिकीसम संघटनेचा दर्जा दिला जाऊ शकतो.
२०११ पूर्व सैनिकीसम संघटना :(१) इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस : (आय्. टी. बी. पी.). याची स्थापना १९६२ मध्ये चिनी आक्रमणानंतर करण्यात आली. चीनशी संलग्न २,११२ किमी. लांब सीमेच्या टेहळणीकरिता (मॉनिटोरिंग बाय ॲक्टिव्ह पेट्रोलिंग) तसेच तस्करी आणि घुसखोरीला आळा घालण्यासाठी यांची तैनाती उत्तरी सीमेवर करण्यात आली आहे. सांप्रत यांची संख्या ९,००० वर आहे. हर्ट्सगोव्हीना, बॉझ्निया, कॉसॉव्हॉ, सिएरा लिओन, हैती, पश्चिमी सहारा, अफगाणिस्तान आणि सूदानमध्येही ही संघटना कार्यरत होती.
(२) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल : (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स). १९६९ मध्ये न्यायाधीश बी. मुखर्जींच्या शिफारशीनुसार केंद्रीय शासनाच्या औद्योगिक प्रतिष्ठानांच्या संरक्षणासाठी याची उभारणी करण्यात आली. १९८३ मध्ये ह्यांना सशस्त्र पोलिसांचा दर्जा देण्यात आला. सांप्रत १,५०,००० संख्याबळ असलेली ही संघटना ३०० हून जास्त विमानतळ आणि उद्योगांना संरक्षण प्रदान करत आहे.
(३) केंद्रीय राखीव पोलिस दल : १९३९ मध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील पोलिसांना कायदा व सुरक्षेच्या अंमलबजावणीत मदत करण्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली. ही संघटना राज्य पोलिसांच्या मदतीला सदैव तैनात असते. सांप्रत हिला नक्षलविरोधी अभियानात तैनाती मिळाली आहे. मार्च १९८६ मध्ये उभी करण्यात आलेली अठ्ठ्याऐंशीवी महिला बटालियन ही जगातील पहिली संपूर्ण महिला अर्धसैनिक दल बटालियन आहे. सांप्रत यांची संख्या सहा लाखांची आहे.
(४) प्रादेशिक सेना : (टेरिटोरियल आर्मी). याची स्थापना १९४८ मध्ये झाली. यामध्ये तैनाती स्वयंसेवक असतात. देशसेवेची भावना जागृत असणारे नागरिक तसेच देशरक्षणासाठी सेनेची मदत करण्याची इच्छा असणारे १८ ते ३५ वर्षांचे तरुण यात भरती होऊ शकतात. प्रत्येक इन्फन्ट्री रेजिमेंटच्या एक किंवा दोन बटालियन्स् असतात. शांतता काळात प्रत्येक युनिटमध्ये एक कंपनी (१२० जवान) कार्यरत असते. बाकी नागरिकी सैनिक आपापल्या कार्यात व्यस्त असतात. जरूर पडल्यास किंवा आणीबाणी लागू झाल्यास त्यांना सैनिकी सेवा प्रदान करण्यासाठी पाचरण केले जाते (एंबॉडिमेंट ऑफ ट्रूप्स).
(५) सशस्त्र सीमा दल : (एस्. एस्. बी.). चीनच्या आक्रमणानंतर १९६३ मध्ये नेफा (अरुणाचल प्रदेश), उत्तर आसाम व उत्तर बंगालमधील लोकांमधून ही संघटना उभी करण्यात आली. हिचे नाव आधी स्पेशल सर्व्हिस ब्युरो असे होते. नंतर हिची व्याप्ती सीमेवरील दहा राज्यांमध्ये वाढवण्यात आली. सांप्रत ही संघटना गृहमंत्रालयाखाली सीमा सुरक्षेचे काम करते. यांच्या दहा युनिटस् (१२,००० सैनिक) भारत-नेपाळ सीमा, भारत-बांगला देश सीमा, भारत-चीन सीमा आणि भारत-म्यानमार सीमा या सीमांवर तैनात आहेत. या दलास मदत करण्यासाठी व विशेषतः घुसखोरीला आळा घालण्यासाठी १९६५ मध्ये सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.
नवीन अध्यादेशानुसार भारतीय सैनिकीसम संघटना : (१) आसाम रायफल्स : (ए. आर्.). हिची उत्पत्ती १८३५ मध्ये इंग्रजांनी उभ्या केलेल्या ३,००० संख्येच्या कचार लेव्ही नावाच्या संघटनेपासून झाली आहे. त्यावेळेपासून ही रेजिमेंट भारतामधील अनेक युद्धांमध्ये सहभागी झाली. १९१७ मध्ये यांना सांप्रत नामाभिधान मिळाले. ब्रिटिश आधिपत्याखाली आसाम रायफल्सने पहिल्या महायुद्धात यूरोप आणि मध्यपूर्व देशांमध्ये, तसेच द्वितीय महायुद्धात ब्रह्मदेशात लढाया केल्या. स्वातंत्र्यांनंतर रेजिमेंटचा मोठा विस्तार करण्यात आला. सांप्रत यांच्या ४६ बटालियन्स् आहेत. हिचे मुख्यालय शिलाँग (मेघालय) येथे आहे. ही संघटना गृह मंत्रालयाच्या अधीन आहे. शांतता काळात भारतीय सेनेच्या आधिपत्याखाली आंतरिक सुरक्षेसाठी तैनाती, काउंटर इन्सर्जेन्सी अभियान, सीमा सुरक्षा अभियान, सीमा क्षेत्रात जनशिक्षा अभियान, दूरसंचार सेवा (प्रोव्हिजन ऑफ कम्यूनिकेशन) व वैद्यकीय मदत प्राकृतिक आणीबाणीच्या वेळी (कलॅमिटीकल इमर्जेन्सी) राज्य प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनात मदत करणे, त्याचप्रमाणे लढाईदरम्यान रणभूमीलगतच्या भूभागाचे संरक्षण (सिक्युरिटी ऑफ रिअर एरियाज्) ही यांची प्रमुख जबाबदारी असते. १७ जानेवारी ते १२ फेब्रुवारी १९५१ मध्ये कॅप्टन रानेंग्लाओ कथिंग, एम्. सी., एम्. बी. ई., व्हीआर्. सी.च्या नेतृत्वात नेफाला तिबेटियन-चिनी वर्चस्वातून सोडवून भारतात विलीन करणारी पाचव्या आसाम रायफल्सचीच दोन कंपनी युनिटस् होती. आसाम रायफल्सला आजतागायत तीन मिलिटरी क्रॉस व पाच अशोकचक्रांसहित ६५९ वीरता पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. हिचा प्रमुख सेनेचा लेफ्टनंट जनरल हुद्याचा अधिकारी असतो.
(२) विशेष सीमा दल : (स्पेशल फ्रंटियर फोर्स). चीनशी पुन्हा युद्ध झाले, तर त्यांच्या अंतर्गत भागात जाऊन (बिहाइन्ड एनिमी लाइन्स) प्रछन्न कारवाया (कोव्हर्ट ऑपरेशन्स) करण्यासाठी १४ नोव्हेंबर १९६२ ला उभ्या करण्यात आलेल्या या संघटनेचे मुख्यालय चक्राता (उत्तराखंड) येथे आहे. या संघटनेच्या जवानांची संख्या केवळ १,८०० होती. नंतर त्यांचे हस्तांतरण रिसर्च अँड ॲनालिसीस विंग खाली करण्यात आले. या संघटनेमध्ये तिबेटियन्स, लडाखी, बॉन आणि सिक्किमी तरुणांचा भरणा आहे. इंग्रजांच्या काळात तिबेटियन लोकांची हेरगिरी, खबरे व प्रछन्न कार्यकर्ते म्हणून भरती केली जात असे. स्वातंत्र्यांनंतर भारताच्या उत्तर सीमेवरील भूभाग आणि रहिवाशांकडे संपूर्णतः दुर्लक्ष झाले. १९५९ च्या तिबेटियन बंडाच्या दरम्यान या तरुणांनी चौदाव्या दलाई लामांना भारतात सुखरूप आणले होते. विशेष सीमा दलाच्या मुख्य जबाबदाऱ्यांमध्ये काउंटर टेररिझम, स्पेशल ग्रुप ऑपरेशन्स, इन्टेलिजन्स गॅदरिंग, क्लोझ प्रोटेक्शन, काँबॅट एयर पेट्रोल्स आणि विदेशी सैनिकांचे प्रशिक्षण या बाबी समाविष्ट आहेत. भारतीय वायुसेना सरसावा विमानतळावरील हिमालयीन ड्रॅगन युनिट यांना विमान पुरवते. १९७१ चे भारत-पाक युद्ध, १९८४ चे ऑपरेशन ब्ल्यू स्टार, १९८७ चे ऑपरेशन कॅक्टस्, श्रीलंकेमधील ऑपरेशन पवन, १९८५-९२ दरम्यान पंजाबमधील ऑपरेशन रक्षक आणि १९९९ चे कारगिल युद्ध यांमध्ये यांचा सहभाग प्रशंसनीय होता. ह्याची गणना सैनिकीसम संघटनांच्या एलीट कमांडोज-मध्ये केली जाते. यांना आतापर्यंत एक अशोकचक्र व चार महावीर-चक्रांसहित ३१२ वीरता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यांचा प्रमुख सेनेचा मेजर जनरल हुद्याचा अधिकारी असतो.
पहा : राष्ट्रीय छात्रसेना सागरी तटरक्षक दल सीमा सुरक्षा दल होमगार्ड.
पटवर्धन, अभय