सैनिकी शिक्षण व प्रशिक्षण : (मिलिटरी एज्युकेशन अँड ट्रेनिंग). सैनिकी व्यवसाय क्षमतेने करता यावा ह्यासाठी सैनिकी संघटनांतर्गत अधिकारी आणि इतर सैनिकांना देण्यात येणारे युद्धशास्त्रविषयक शिक्षण व प्रशिक्षण. यात युद्धशास्त्रविषयक मंत्र, तंत्र व यंत्र ज्ञान, नीतिनियम, व्यवहारज्ञान, बौद्धिक व शारीरिक शिक्षण, लष्करी व्यवस्थापन, साधनसामग्री इत्यादींचा अंतर्भाव होतो. लष्करात प्रविष्ट झाल्यानंतर सैनिकाला युद्धकार्यक्षम बनविण्यासाठी सैनिकी व्यवसायाला पोषक असे तांत्रिक व इतर जुजबी शिक्षण दिले जाते. प्रत्येक युद्धमान प्रगत राष्ट्राच्या सैनिकी संघटनेत सैनिकी शिक्षण व प्रशिक्षण यांची काळजीपूर्वक तरतूद केलेली असून ती काटेकोरपणे अंमलात आणली जाते.

सर्वसाधारणपणे सामान्य सैनिक आणि लष्करी अधिकारी यांच्या सैनिकी शिक्षण व प्रशिक्षण यांत लष्करी दर्जानुसार विभाजन केलेले असते कारण सामान्य सैनिक व अधिकारी ह्यांच्या बौद्धिक पातळीत आणि त्यांच्यावर सोपविल्या जाणाऱ्या युद्धविषयक व इतर जबाबदाऱ्यांमध्ये मूलत:च कर्तव्यपरत्वे फरक असतो. त्यांना प्राथमिक शिक्षण एकत्रित देणे अव्यवहार्य व गैरसोयीचे असते. ह्याशिवाय त्यांच्या शिक्षणाचे विषय व शिक्षणपद्धती भिन्न असून त्यांच्यासाठी अधिपतिश्रेणीनुसार स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था करणे अधिक सोयीचे असते. अर्थात व्यवसायावश्यक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, प्रत्यक्ष युद्धात कराव्या लागणाऱ्या सामुदायिक हालचाली, युद्धकृतींचे शिक्षण व त्याचा अभ्यास आणि सरावासाठी सैनिक व अधिकारी ह्यांच्या एकत्रित संचलनाच्या शैक्षणिक तालमी (रंगीत तालमी) करवून घेण्याची अन्य व्यवस्था केलेली असते किंबहुना तो त्यांच्या व्यवसायातील दैनंदिन वा नैमित्तिक कार्यक्रमाचाच एक भाग असतो. सैन्यांत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामरिक, व्यूहात्मक, शस्त्रवापर आणि व्यावसायिक व तांत्रिक असे भाग असून त्यांचे प्राथमिक, उच्च व नैमित्तिक श्रेणींत विभाजन केलेले असते.

सामान्य व्यक्तीने सैनिकी पेशा स्वीकारल्यावर ज्या विभागासाठी त्याची भरती होते, त्या विभागाच्या पलटण प्रशिक्षण केंद्रात (रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर) त्याला प्राथमिक शिक्षण व प्रशिक्षण देण्यात येते. काही विभागांच्या मधल्या व वरच्या पदांच्या शिक्षणासाठीच्या शाला-प्रशाला ह्या पलटणीच्या शिक्षण केंद्रांनाच जोडलेल्या आहेत. तेथे त्यांचे प्रशिक्षण व नैमित्तिक शिक्षण होते. अधिकाऱ्यांचे शिक्षण, त्यांची उमेदवार (कॅडेट) म्हणून निवड झाल्यावर प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अकादमीत सुरू होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या विभागाच्या प्रणालीची ओळख आणि व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण इ. पलटण प्रशिक्षण केंद्रांना जोडलेल्या शाला-प्रशालेत दिले जाते आणि प्रशिक्षण व नैमित्तिक शिक्षण विभागाच्या महाविद्यालयात होते.

प्राथमिक सैनिकी शिक्षणात सैनिकांस व सैनिकी संघांना युद्धातील कर्तव्ये क्षमतेने पार पाडता यावीत, ह्यासाठी मार्गदर्शनाबरोबरच पद्धतशीर शिक्षण देण्यात येते. सैनिकांमध्ये शिस्त, नेतृत्व, मनोधैर्य, उपक्रमशीलता, सहकार्य, काटकपणा, शस्त्रास्त्रे चालविण्याचे कौशल्य, स्वसंरक्षणक्षमता, स्वच्छता व आरोग्य पालनाची जाणीव इ. गुणांची उत्पत्ती, जोपासना व संवर्धन होण्यासाठी आवश्यक अशा शिक्षणाची सोय असते. उच्च श्रेणीय शिक्षणात सांघिक सहकार्य, युद्धकुशल हालचाली, शस्त्रास्त्रांचा सांघिक वापर, डावपेच वगैरे तांत्रिकी शिक्षणाचा अंतर्भाव असतो. अधिकाऱ्यांच्या शिक्षणात अधिपती (कमांडर) व नेतृत्व करण्याचे शिक्षण, व्यूह, डावपेच, शासनव्यवस्था, दळणवळण, पुरवठाव्यवस्था, सांघिक व संघसामूहिक हालचालींचे नेतृत्व व कार्यक्षम सहकार्य इ. शिक्षणाची व्यवस्था असते. नैमित्तिक शिक्षणात नवीन प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे शिक्षण आणि युद्धासाठी खास प्रकारचे आवश्यक शिक्षण वगैरे तात्कालिक परिस्थितीजन्य शिक्षणाचा अंतर्भाव आवश्यकतेनुसार व प्रसंगानुरूप केलेला असतो. अधिकाऱ्यांचे उच्च व नैमित्तिक शिक्षण, त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊन त्यांची अधिकाराच्या जागेवर नेमणूक झाल्यानंतर वेळोवेळी त्यासाठी अस्तित्वात असलेल्या खास प्रकारच्या शिक्षणशाळांत व महाविद्यालयांत होत असते.

 

मानवी संस्कृतीच्या क्रमविकासात कालमानानुसार युद्धपद्धतीत फरक आढळतो. प्राचीन काळी युद्धाचे तंत्र, युद्ध सामग्री, युद्धक्षेत्र, दळणवळणाची साधने यांचे स्वरूप वेगळे होते. कालमानानुसार त्यात फरक पडला. त्यावेळी सामान्य नागरिकालाही कामधंदा सोडून प्रसंगोपात्त युद्धात सह-भागी व्हावे लागे. युद्धकर्म हे राजा, राजपुत्र, सरदार, सरंजामदार, दरकदार आणि राजाचे सेनापती अशा क्षात्र व्यवसाय करणाऱ्या लोकांपुरतेच मर्यादित होते. त्यामुळे युद्धात वापरण्यात येणारी तत्कालीन शस्त्रास्त्रे, घोडा, हत्ती यांसारखी वाहने व यांचा कौशल्यपूर्ण वापर करण्याची कला आणि प्रतिस्पर्ध्यांवर युद्धात करावयाचे डावपेच, व्यूहरचना यांच्या शिक्षणाची व्यवस्था इ. गोष्टी व्यक्ती व विशिष्ट समाज गट यांपुरत्याच मऱ्यादित असत. इतर सामान्य जनांचा युद्धाशी फारसा संबंध नसे. भारतावर ब्रिटिशांनी सु. दीडशे वर्षे राज्य केले. त्यांनी पाश्चात्त्य पद्धतीवर सैनिकी संघटना तयार करून सैनिक व लष्करी अधिकारी यांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची सोय लष्करी अकादमी, लष्करी विद्यालये-महाविद्यालये यांद्वारे केली. तीच व्यवस्था स्वातंत्र्यांनंतर भारताने स्वीकारली.

 

परिणामतः प्राचीन युद्धात वापरण्यात येणारी व्यक्तिनिष्ठ साधने व शस्त्रे पुरेनाशी झाली. साधनांच्या स्पर्धेतून एकापेक्षा एक सरस अशी नवी शस्त्रास्त्रे शोधली गेली. शस्त्रास्त्रांच्या संख्येत व त्यांचे वजन आणि माऱ्यांचा पल्ला ह्यांच्यातही वाढ झाली. शस्त्रास्त्रांच्या कार्यक्षम वाढीबरोबरच युद्धक्षेत्रातसुद्धा त्या प्रमाणात वाढ होत गेली.त्याचा व्याप जगभर इतका पसरला आहे की, युद्धक्षेत्र हे केवळ भूमीपुरतेच मर्यादित न राहता समुद्र आणि आता आकाशसुद्धा त्याला पुरेनासे झाले आहे. आता ते आघाडीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशभरात व दळणवळण, पुरवठामार्ग यांत कुठेही होऊ शकते. त्यामुळेच प्राचीन युद्धात सर्रास वापरात असलेली हत्ती, घोडे, उंट ही वाहनसाधने नामशेष होऊन त्यांऐवजी आधुनिक काळात युद्धासाठी खास बनावटीच्या चिलखती गाड्या, वेगवान मोटारी, रणगाडे, चिलखती युद्धनौका, पाणबुड्या, विमाने, हेलिकॉप्टर अशी वाहने कौशल्याने चालविता, वापरता यावीत यासाठीचे खास शिक्षण सैनिकास असणे आवश्यक ठरले. परोक्ष वा अपरोक्ष संबंध येत असल्याने युद्ध हा इतर सर्वसामान्य नागरी व्यवसायाहून भिन्न असा एक वैशिष्ट्यपूर्ण व स्वतंत्र राष्ट्रीय पातळीवरचा खास व्यवसायच झाला आहे.

 

चौदाव्या शतकात यूरोपमध्ये बंदुकीच्या दारूचा उपयोग शस्त्रास्त्रांसाठी सुरू झाला आणि लांब अंतरावरून मारा करणाऱ्या पिस्तुले, बंदुका, तोफा या शस्त्रांचा वापर होऊ लागला. त्यामुळे प्राचीन व मध्ययुगीन युद्धांचे व्यक्तिनिष्ठ स्वरूप पालटून त्याला सांघिक व सामुदायिक स्वरूप प्राप्त झाले. या क्रांतिकारक बदलामुळे युद्धाचे स्वरूप, क्षेत्र, साधनसामग्री, तंत्रे, युद्धपद्धती आदींत आमूलाग्र बदल झाला. या शस्त्रास्त्रांचा उपयोग करून शत्रूवर अविरत मारा करणारी यंत्रणा, विशेषतः फ्लिंट लॉक व मॅच लॉक या बंदुकांचे प्रकार व नंतर मशिनगन यांच्या वापरामुळे सैन्याची रचना व व्यूहरचना, हल्ल्याचे तंत्र यांमध्ये लक्षणीय बदल होऊन प्लॅटून, कंपनी, बटालियन व पूरक रेजिमेंट असे आपातत: बदल झाले आणि तीच रचना पद्धती आजमितीस अवशिष्ट आहे. यापुढे क्षेपणास्त्र, प्रतिरोधी क्षेपणास्त्र, अवकाशातून यांत्रिकी संदेशवहन, हवाई संनिरीक्षण इत्यादींचे शिक्षण व प्रशिक्षण स्वसंरक्षणासाठी आवश्यक आहे. असा बदल प्राथमिक व नैमित्तिक शिक्षणातही झाला आहे.

 

भारताची सैनिकी संघटना भूसेना, नौसेना व वायुसेना ह्या मूलभूत तीन सैन्यदलांत विभागलेली असून प्रत्येक दलातील सैनिकी शिक्षण व प्रशिक्षण व्यवस्था त्या त्या दलाच्या प्रमुख कार्यालयाच्या प्रत्यक्ष हुकमतीखाली स्वतंत्रपणे केली आहे. आंतरदलीय शिक्षणसंस्था व संशोधन कार्यांलये मात्र संरक्षण मंत्रालयाच्या प्रत्यक्ष अखत्यारित असतात. प्रत्येक दलाच्या प्रमुख कार्यांलयात त्यासाठी स्वतंत्र शाखा आहेत. सैनिकी शिक्षणाचे धोरण, आखणी, संशोधन, नियमन, समन्वय, विकास व वस्थापनाची जबाबदारी ह्या खात्याचीच असते. आंतरदलीय शिक्षणसंस्थेची स्थापना प्रामुख्याने तीनही दलांतील सैनिक व अधिकाऱ्यांना एकत्र द्यावयाच्या शिक्षणासाठी केलेली असून तीनही दलांतील अत्यावश्यक सहकार-समन्वय साधण्यासाठी ह्या आंतरदलीय शिक्षणसंस्थांचा फार महत्त्वाचा उपयोग होतो.

 राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, नवी दिल्ली हे ग्रेट ब्रिटनमधील इंपिरिअल डिफेन्स कॉलेज ह्या साम्राज्यांतर्गत सैन्यातील उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना युद्धतंत्राचे एकत्रित उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या धर्तीवर स्थापन केले आहे (१९६०). त्यात तीनही दलांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्यूहात्मक, शास्त्रीय, राजकीय, औद्योगिक आदी दृष्टिकोनातून संरक्षणविषयक ज्ञान व शिक्षण दिले जाते. तेथे राष्ट्रीय संरक्षणविषयक अद्ययावत विचारांची देवघेव वरिष्ठ पातळीवरून केली जाते. साधारणत: ब्रिगेडियर आणि त्याहून वरिष्ठ दर्जाच्या सैनिकी व संबंधित मुलकी अधिकाऱ्यांना ह्या संस्थेच्या अभ्यासक्रमासाठी निवडण्यात येते.

 

संरक्षण सैनिकी प्रशासिक महाविद्यालय (डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज), वेलिंग्टन (तमिळनाडू) ही तीनही सैन्यदलांना शांततेच्या व युद्धकाळात कराव्या लागणाऱ्या प्रशासकीय कामाचे खास व अद्ययावत शिक्षण देणारी आंतरदलीय संस्था आहे. ह्या संस्थेच्या अभ्यासक्रमासाठी तीनही सैन्यदलांतील कॅप्टन/मेजर या हुद्यावरच्या अधिकाऱ्याची चाचणी परीक्षा घेऊन निवड करण्यात येते. चाचणी परीक्षेत वरिष्ठ क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रेट ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया ह्यांसारख्या प्रगत देशांच्या तत्सम अभ्यासक्रमांच्या शिक्षणसंस्थांत पाठविण्यात येते.

 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे ही सैनिकी प्रशिक्षण देणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था असून येथे उमेदवारांना तीनही सैन्यदलांचे प्राथमिक शिक्षण देण्याची सोय आहे. या शिक्षणसंस्थेत तीनही दलांतील अधिकाऱ्यांना सुरुवातीस एकत्र शिक्षण दिले जाते. येथे सैन्याधिकाऱ्यांच्या चारित्र्यांचे संस्करण करून त्यांच्या नेतृत्व, आधिपत्य, सहकारवृत्ती, उपक्रमशीलता, निष्ठा इ. गुणांबरोबर शारीरिक संवर्धनाकडेसुद्धा लक्ष देण्यात येते. ह्या संस्थेत सुदृढता, काटकपणा, आरोग्य आणि स्वच्छता यांची जोपासना करत त्यांना युद्धशास्त्राचे प्राथमिक ज्ञान व शिक्षण देण्यात येते. येथील अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून त्यातून यशस्वी रीत्या उत्तीर्ण झाल्यावर त्यांची तीनपैकी एका इष्टदलात नेमणूक होऊन त्या त्या दलाच्या पुढील विशिष्ट शिक्षणासाठी त्या त्या उमेदवारांची रवानगी केली जाते.[  ⟶  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला].


 राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनी, डेहराडून ही भारतातील सैनिकी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी शिक्षणसंस्था आहे. सैनिकी अधिकाऱ्यांच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची सुरुवात पहिल्यांदा याच प्रबोधिनीत करण्यात आली. या संस्थेनजीक नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज आहे.[  ⟶  राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनी, डेहराडून].

 

नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून ह्या ब्रिटिश अमदानीपासून अस्तित्वात असलेल्या शिक्षणसंस्थेप्रमाणेच शालेय शिक्षणाबरोबरच सैनिकीचे प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सैनिकी शाळा विविध राज्यांद्वारे सुरू करण्यात आल्या. त्यांपैकी कपुरथळा, कर्नाल (पंजाब), चितोडगढ (राजस्थान), जामनगर (गुजरात), सातारा (महाराष्ट्र), कोरुकांडा (आंध्र प्रदेश), त्रिवेंद्रम (केरळ), कोडईकानल (तमिळनाडू), भुवनेश्वर (ओडिशा), पुरुलिया (पश्चिम बंगाल), रेवा (मध्य प्रदेश), तिलैया (बिहार) वगैरे प्रसिद्ध असून सैनिकी शिक्षणाच्या पूरकसंस्था म्हणून त्या कार्यरत आहेत.[  ⟶  सैनिकी शाळा].

 

ब्रिटिश अमदानीत सैन्यातील इतर दर्जाच्या सैनिकांच्या मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यातील पात्र विद्यार्थ्यांची अधिकाराच्या जागांसाठी होतकरू उमेदवार म्हणून तयारी करून घेण्यासाठी स्थापण्यात आलेल्या किंग जॉर्जेस स्कूल्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या चाईल (पंजाब), अजमेर (राजस्थान), बेळगाव, बंगलोर (कर्नाटक) आणि धोलपूर (राजस्थान) ह्या शाळांचे मिलिटरी स्कूल्समध्ये नामांतर करून त्यांचे अस्तित्व कायम ठेवण्यात आले आहे. आर्म्ड फोर्सेस् मेडिकल कॉलेज हे सैनिकी वैद्यकदलात अधिकारी डॉक्टरी हुद्यावर भरती होणाऱ्या होतकरू उमेदवारांना मुख्यत्वे वैद्यकीय पदवीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण देणारे व सैन्यातील तीनही दलांतील शांततेच्या काळात जरूर असलेल्या इतर सैनिकी वैद्यक क्षेत्रातील कार्यासाठी निरनिराळे अभ्यासक्रम राबविणारे महाविद्यालय होय. अधिकाऱ्यांप्रमाणेच वैद्यकदलातील इतर दर्जाच्या सैनिकां-साठी त्यांच्या कार्याचे अभ्यासक्रमही ह्या महाविद्यालयात त्यांच्यासाठी योजलेले असतात.

 

भूसैनिकी प्रशिक्षण संस्था : भूसैनिकी अधिकाऱ्यांना व होतकरू उमेदवारांना भूसैनिकी शिक्षण देणारी इंडियन मिलिटरी अकॅडेमी (डेहराडून) ही संस्था आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून उत्तीर्ण झाल्यावर भूसैन्यातील अधिकाराच्या जागांसाठी निवडलेले उमेदवार, तसेच सैन्याधिकाऱ्यांच्या जागांसाठी स्वतंत्रपणे निवडलेले उमेदवार ह्यांना सर्वसाधारण भूसैनिकी शिक्षण देऊन भूसैन्यातील विशेष शाखीय दलामध्ये त्यांची नियुक्ती होण्यापूर्वीचे शिक्षण देणारी भूसैन्यसंघटनांतर्गत कार्य ही सैनिकी प्रशिक्षण संस्था करते. आर्मी कॅडेट कॉलेज (पुणे) ही भूसैन्यातील निवडक इतर दर्जाच्या सैनिकांना शालेय व इतर बौद्धिक शिक्षण देऊन इंडियन मिलिटरी अकॅडेमी ह्या भूसैनिकी अधिकारी निर्माण करणाऱ्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी तयारी करवून घेणारी शिक्षणसंस्था होय. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (चेन्नई) या संस्थेत अल्पमुदतीच्या अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना तसेच तांत्रिक पदविधारकांना प्रवेश मिळतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर त्यांना अल्पमुदतीचे अधिकारपद दिले जाते. ऑफिसर्स टे्रनिंग अकॅडेमी (गया) येथे तांत्रिक शाखेतील अधिकारपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो. येथील अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर सैन्याच्या तांत्रिक महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्यानंतरच उमेदवारांना अधिकारपद दिले जाते. सामान्य सैनिकांना भरती केल्यावर प्राथमिक सैनिकी व व्यावसायिक शिक्षणासाठी पलटण प्रशिक्षण केंद्रात आणि शाळेत शिक्षण घ्यावे लागते. अशी पायदळाची २४, इतर काही दलांची २-२, ३-३ अशी एकंदर ४२ केंद्रे आहेत. तेथे शिक्षण पूर्ण झाल्यावर सैन्यदलात नेमणूक होते.

 

अहमदनगरला चिलखती दलाचे केंद्र व शाळा आहे. लढाईच्या वेळेस चिलखती दलाबरोबर तोफखाना व पायदळ असावे लागते. त्यामुळे सैनिकांचे आणि अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण एकत्रितपणे योग्य शाळा व महाविद्यालयात दिले जाते. आर्मी वॉर कॉलेज (महू) हे इन्फन्ट्री स्कूलचे नंतरचे रूपांतर होय. येथे सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना मूलभूत युद्धतंत्राचे व पायदळातील हत्यारांचे शिक्षण दिले जाते. पायदळ शाळेच्या शाखा बेळगाव व बिनागुरी येथे आहेत. आर्मी एअर डिफेन्स कॉलेज (देवळाली) हे प्रथम गोपालपूरला होते पण आता देवळालीला आहे. येथे सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना हवाई हल्ल्यापासून बचाव व संरक्षण करण्याचे शिक्षण मिळते. आर्मी सप्लाय सेंटर अँड कॉलेज (बरेली) येथे भूदलाच्या पुरवठादलाचे केंद्र, शाळा आणि महाविद्यालय आहे. काउन्टर इन्सर्जेन्सी अँड जंगल वॉरफेअर स्कूल (वैरंगटे, मिझोराम) ही शाळा मिझो बंडाळीच्या वेळेस तेथे जाणाऱ्या सर्व सैन्यास नैमित्तिक शिक्षण देण्यासाठी स्थापन झाली. येथे आता सर्व दलांतील निवडक व्यक्तींना वरील शिक्षण दिले जाते. कॉलेज ऑफ मटेरियल मॅनेजमेन्ट (जबलपूर) हे सैन्यास लागणारा दारूगोळा, कपडे, सैन्यसामग्री इ. वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या खात्यातील लोकांना शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी एन्जिनिअरिंग (दापोडी) येथे सैन्यदलाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची सोय आहे. मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल एन्जिनिअरिंग(हैदराबाद) हे विद्युत् आणि यांत्रिक अभियांत्रिकी या दलाच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण देणारे महाविद्यालय आहे. सामान्य सैनिकांना शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या दलाचे केंद्रसुद्धा यास जोडलेले आहे. हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (गुलमर्ग) हे अधिकाऱ्यांना व सैनिकांना उंच पर्वतश्रेणींत व बर्फाच्छादित भागात राहून करावयाच्या लढाईचे प्रशिक्षण देते. इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ (सिमला) ही प्रशासनाला आणीबाणीच्या काळात आवश्यक ते शिक्षण व स्थानिक जनतेशी वर्तनाचे नीतिनियम यांचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. निम्न व कनिष्ठ दर्जाच्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना मूलभूत युद्धतंत्राचे व पायदळातील हत्यारांच्या वापराचे शिक्षण पूर्वी महू येथे दिले जाई, ते आता इन्फन्ट्री स्कूल बिनामुरी (बेळगाव) या ठिकाणी दिले जाते. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग (पुणे) येथे अधिकाऱ्यांना तसेच निम्न व मध्यम दर्जाच्या सैनिकांना शारीरिक शिक्षण दिले जाते. सैन्यातील अधिकाऱ्यांना शत्रूची पाहणी करणे, शत्रूची हत्यारे व हालचालींवरून माहिती मिळवणे, नकाशांचा उपयोग, हवाई छायाचित्रण करून बंकर्सची स्थाने ठरवणे यांसाठीचे शिक्षण व प्रशिक्षण मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड सेंटर (पुणे) येथे दिले जाते. इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंटिग्रेशन येथे निम्न श्रेणीतल्या अधिकाऱ्यांना धर्म, भाषा, देश यांबद्दलची माहिती देऊन कसे आचरण ठेवावे याचे शिक्षण दिले जाते. ज्यूनियर लीडर अकॅडेमी (बरेली) येथे सर्व दलांतील मध्यम दर्जाचे अधिकारी यांचे प्रशिक्षण होते. आर्मी मेडिकल कोअर (लखनौ) येथे सैन्याच्या वैद्यकीय दलाचे केंद्र व प्रशिक्षण शाळा आहेत. रिमाउंट अँड व्हेटरनरी कोअर सेंटर अँड कॉलेज येथे पशुविभागाचे (खेचरे आणि कुत्रे) केंद्र व प्रशिक्षण महाविद्यालय आहे. सिम्यूलेटर डेव्हलपमेंट डिव्हिजन (हैदराबाद) येथे सादृशित्रवर (सिम्यूलेटर) लढाई कशी होईल याबद्दल तयारी करून, कल्पकतेने काय उपाययोजना करावयास पाहिजे, यावर सल्लामसलत करण्याचे महाविद्यालय आहे. ते मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल एन्जिनिअरिंगशी संलग्न आहे. स्कूल ऑफ आर्टिलरी (देवळाली) येथे तोफखान्याच्या विभागांचे, सैनिकांचे व अधिकाऱ्यांचे प्राथमिक, व्यावसायिक तसेच तांत्रिक शिक्षण दिले जाते. स्पेशल फोर्सेस् ट्रेनिंग स्कूल येथे निवडक सैनिकांचे व अधिकाऱ्यांचे (पॅराकमांडो) प्राथमिक शिक्षण दिले जाते. सैन्यात आज्ञा आणि माहिती (इंटेलिजन्स) जलद व गुप्त रीतीने पोहोचविण्यासाठी बिनतारी दूरसंदेशवहन तसेच दूरदर्शन इ. साधनांचा उपयोग होतो. त्यासाठी अधिकाऱ्यांना आणि निम्न व मध्यम दर्जाच्या सैनिकांना मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्यूनिकेशन एन्जिनिअरिंग (महू) येथे त्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

 

पाटणकर, गो. वि. जोशी, मु. ना.