सैनिकी वैद्यकीय सेवा : (मिलिटरी मेडिकल सर्व्हिसेस्). लष्करात सैनिकांना सर्वतोपरी वैद्यकीय सेवा देणारी कार्यप्रणाली. प्राचीन काळातील सैनिकी वैद्यकीय सेवांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कौटिलीय अर्थशास्त्राप्रमाणे लढाई दरम्यान औषधी बाळगणाऱ्या स्त्रिया व शस्त्रक्रियेची अवजारे घेऊन वैद्य मंडळी लढवय्यांच्या मागे उभी राहत. सुश्रुतसंहिते प्रमाणे लढाईत राजाच्या डेऱ्याजवळ औषधी सामग्रीसह हजर असणारे वैद्यराज जखमी सैनिकांची सुश्रुषाही करत असत. विषप्रयोगापासून राजाचे रक्षण करणे, ही त्यांची प्रमुख जबाबदारी असायची पण या सेवांबद्दल विस्तृत माहिती उपलब्ध नाही. मोगल काळात मात्र वैद्यांची महत्ता मोठ्या प्रमाणावर वाढली. छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब, हैदराबादचे निजाम आणि विजापूरचे आदिलशाह यांच्या वैद्यांच्या कथा प्रसिद्धच आहेत. पहिल्या माधवराव पेशव्यांच्या निधनकाळी त्यांना वाचवण्याची शर्थ करणाऱ्या वैद्यांच्या ज्ञानाची कसोटीच लागली होती. उदगीरच्या लढाईच्या वेळी (३ फेब्रुवारी १७६०) पेशव्यांच्या सैन्यातील जखमींना वाहून नेणाऱ्या पथकांच्या हालचालीचे वर्णन आहे. टिपू विरुद्धच्या युद्धात पेशव्यांच्या सैन्याबरोबर वैद्य किंवा हकीम असल्याचे उल्लेख आढळतात.

ईस्ट इंडिया कंपनीच्या अगदी सुरुवातीच्या काळात भारतीय सैनिकांसाठी कुठलीही वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती मात्र हिंदुस्थानातील सैनिकी वैद्यकीय सेवा तसेच सैनिकी वैद्यकीय प्रशिक्षण (मिलिटरी मेडिकल ट्रेनिंग) यांची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातच झाली, असे म्हणायला हरकत नाही. प्रेसिडेन्सी आर्मीला वैद्यकीय मदत देण्यासाठी १ जानेवारी १७६४ रोजी बेंगाल प्रेसिडेन्सी मेडिकल सर्व्हिस, १७६७ मध्ये मद्रास प्रेसिडेन्सी मेडिकल सर्व्हिस आणि १७७९ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी मेडिकल सर्व्हिस यांची स्थापना झाली. त्यानंतर मार्च १८९६ मध्ये या तीनही प्रेसिडेन्सी मेडिकल सर्व्हिसेस्च्या विलयानंतर इंडियन मेडिकल सर्व्हिसची (आय्. एम्. एस्.) उभारणी करण्यात आली. प्रामुख्याने यांमधील अधिकारी वर्गच सैनिकांच्या वैद्यकीय गरजांची परिपूर्ती करत असे पण तांत्रिक प्रशिक्षित वरकड मदतनीसांऐवजी (टेक्निकली ट्रेन्ड अँसिलरी पर्सोनेल) जुजबी वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेले जवान (सेमी ट्रेन्ड नर्सिंग सिपॉयज्) त्यांच्या मदतीला असत. एकप्रकारे ही विस्कळीत सैनिकी वैद्यकसेवा संघटना (लूझ मेडिकल ऑर्गनायझेशन) होती.

ईस्ट इंडिया कंपनीद्वारे प्रथमच त्यांच्या प्रेसिडेन्सी आर्मीमधील सैनिकांसाठी वैद्यकीय सेवादलाची (प्रेसिडेन्सी आर्मी मेडिकल सर्व्हिसेस्) उभारणी १६१२ मध्ये करण्यात आली. इंग्रजी अधिकाऱ्यांसाठी इंग्रजी डॉक्टर असत. भारतीय सैनिकांसाठी मात्र स्थानीय हकीम व वैद्यांची नेमणूक मासिक वेतनावर होत असे. १७४५ पासून भारतीय सैनिकांसाठी ब्रिटिश डॉक्टरांनी प्रशिक्षित केलेले भारतीय सहायक वैद्यकीय सेवेसाठी नियुक्त केले जात असत. प्रेसिडेन्सी आर्मीच्या वैद्यकीय मदतीसाठी इंडियन मेडिकल डिपार्टमेंटची (आय्. एम्. डी.) स्थापना १७७० मध्ये करण्यात आली. ब्रिटिश आधिपत्याखालील भारतीय रेजिमेंट्समध्ये आय्. एम्. डी. मधील इंग्रजांनी प्रशिक्षित केलेले कंपाउंडर्स आणि ड्रेसर्स कार्यरत असत. १८६८ मध्ये त्याचे नामांतर हॉस्पिटल असिस्टंट (एच्. ए.) असे झाले. १९०० मध्ये त्यांना व्हाइसरॉय कमिशनसाठी (व्ही. सी. ओ.) सांप्रत ज्यूनियर कमिशन्ड ऑफिसर (जे. सी. ओ.) पात्रता प्रदान करण्यात आली आणि १९१० मध्ये त्यांना सब असिस्टंट सर्जनचा (किंग्ज कमिशन ऑफिसर -के. सी. ओ.) हुद्दा प्रदान करण्यात आला. सुरजकुमार गुरुदेव चक्रवर्ती हे बंगाल मेडिकल सर्व्हिसेस्मध्ये पहिले भारतीय असिस्टंट सर्जन म्हणून दाखल झाले.

ब्रिटिश आर्मीच्या आरोग्यरक्षण खबरदारीसाठी (सेफगार्ड द मेडिकल इंटरेस्टस्) ब्रिटिश शासनाने एक कमिशन नियुक्त केले (१८५९). त्यांच्या शिफारशींनुसार, सर्जन जनरल जॉन वुडॉलच्या आधिपत्याखाली, एप्रिल १८८६ मध्ये या तीनही मेडिकल सर्व्हिसेस्चे विलीनीकरण करून आय्. एम्. एस्.ची स्थापना झाली. आय्. एम्. एस्.च्या अधिकाऱ्यांना जरी प्रामुख्याने ब्रिटिश भारतीय सेनेच्या देखभालीची जबाब-दारी देण्यात आली होती, तरी त्यांना नागरिकी देखभालीची कामेही दिली जात असत. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक विवक्षित काळ सेनेत कार्यरत राहिल्यानंतर नागरिकी क्षेत्रात परत पाठविले जात असे. त्यामुळे शासनाकडे आणीबाणीत सेनादलांसाठी आवश्यक असणाऱ्या आरक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांची (रिझर्व्ह मेडिकल ऑफिसर्स) संख्या वाढू लागली. पहिल्या महायुद्धानंतर हिंदुस्थानात ६८१ वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. त्यांपैकी १५० किंग्ज कमिशनधारक भारतीय होते. तत्पूर्वी १९१३ मध्ये यांच्या प्रमुखाच्या हुद्याचे नामांतर डायरेक्टर जनरल, आय्. एम्. एस्. असे करण्यात आले. या काळात आय्. एम्. एस्.चा कल व सेवेचा आवाका सैनिकी क्षेत्रापेक्षा नागरिकी क्षेत्राकडे जास्त होता. ही संघटना भारताबरोबरच तत्कालीन ब्रह्मदेशालाही वैद्यकीय सेवा प्रदान करत असे. या कामी आय्. एम्. एस्.ला आय्. एम्. डी्. आणि इंडियन हॉस्पिटल कोअर (आय्. एच्. सी.) ची मुबलक मदत मिळत असे.

ब्रिटिश रेजिमेंटल हॉस्पिटल्सऐवजी ब्रिटिश स्टेशन हॉस्पिटल्सची उभारणी ज्या वेळी झाली, त्या वेळी ब्रिटिश रेजिमेंटल हॉस्पिटल्सच्या अतिरिक्त कर्मचारी वा निवृत्त भारतीय चाकरमान्यांमधूनच आर्मी हॉस्पिटल नेटिव्ह कोअरची स्थापना करण्यात आली (१८८१). १९१८ पर्यंत भारतीय सैनिकांसाठी रेजिमेंटल मेडिकल रूमखेरीज दुसरी कुठलीही वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती. स्टेशन हॉस्पिटल्स उभारण्याची परवानगी ऑक्टोबर १९१८ मध्ये देण्यात आली. आर्मी हॉस्पिटल कोअरमधून वॉर्ड बॉईज आणि आर्मी बेअरर कोअरमधून स्ट्रेचर बेअरर्स घेण्यात आले. जून १९२० मध्ये शासनाने प्रेसिडेन्सी आर्मी बरखास्त करून दहा आर्मी डिव्हिजन्सची उभारणी केल्यावर आर्मी हॉस्पिटल नेटिव्ह कोअरचे विसर्जन (खारीज) करून दहा आर्मी हॉस्पिटल कोअर (ए. एच्. सी.) कंपनीची उभारणी झाली. इंडियन हॉस्पिटल कोअरची स्थापना आर्मी हॉस्पिटल कोअर, आर्मी बेअरर कोअर यांचा विलय आणि स्टेशन हॉस्पिटल्सच्या माणसांमधून करण्यात आली. पेशावर, लाहोर, क्वेट्टा, रावळपिंडी, महू, पुणे, मीरत, लखनौ, सिकंदराबाद आणि रंगून येथे यांची तैनाती झाली. १९२९-३२ दरम्यान भारतात पाच कमांड हेडक्वार्टर्स उभे झाले. त्यामुळे दहा ए. एच्. सी. कंपन्यांना पाचमध्ये परिवर्तीत करण्यात आले. हॉस्पिटल्समधील कंपाउंडर्स, ड्रेसर्स, वॉर्ड बॉईज, कुलीज, नापीत, पाणके व भिस्ती, झाडूवाले आणि स्वयंपाकी या सर्वांना हॉस्पिटल अटेंडंट्सचा दर्जा बहाल करण्यात आला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९३९ दरम्यान संरक्षण दलांतर्फे केवळ त्यांच्यासाठी वेगळी वैद्यकीय प्रणाली उभी करण्यासाठी शासनावर दबाव येऊ लागला. झपाट्याने विकसित होऊ लागलेल्या ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील भारतीय सैन्यासाठी ३ एप्रिल १९४३ रोजी रॉयल आर्मी मेडिकल कोअरच्या (आर्. ए. एम्. सी.) धर्तीवर इंडियन मेडिकल सर्व्हिसेस् अँड मेडिकल डिपार्टमेंट आणि इंडियन हॉस्पिटल अँड नर्सिंग कोअरचा विलय करून इंडियन आर्मी मेडिकल कोअरची (आय्. ए. एम्. सी.) स्थापना झाली. १९४३ मध्ये इंडियन आर्मी डेंटल कोअर (आय्. ए. डी. सी.) आणि इंडियन मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस्ची (आय्. एम्. एन्. एस्.) सुद्धा उभारणी झाली. २६ जानेवारी १९५० ला इंडियन आर्मी मेडिकल कोअरचे रूपांतर आर्मी मेडिकल कोअर (ए. एम्. सी.) मध्ये करण्यात आले. तदनुसार वरील इतर दोन संघटनांमधील प्रारंभीचा इंडियन हा शब्दही काढण्यात आला. स्वातंत्र्यांनंतर ए. एम्. सी.ने स्पृहणीय प्रगती केली आहे. त्यामधील कर्मचाऱ्यांना आता लढाऊ सैनिकांचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. १९४९ मध्ये भूसेना, नौसेना आणि वायुसेना यांच्या वैद्यकीय सेवांच्या समन्वयासाठी डायरेक्टर जनरल आर्म्ड फोर्सेस् मेडिकल सर्व्हिसेस्ची नियुक्ती करण्यात आली.

आर्मी मेडिकल कोअर हे भूसेना, नौसेना व वायुसेना या संरक्षण दलांच्या तीनही शाखांना वैद्यकीय मदत देतात. ए. एम्. सी.चा ध्वज आडव्या काळसर लाल, काळ्या आणि सोनेरी पट्ट्यांचा (डल चेरी, ब्लॅक अँड गोल्डन स्ट्राइप्स) बनला असून त्याच्यामध्ये ए. एम्. सी.चे चिन्ह (लोगो) असते. भूसेनेच्या प्रत्येक घटकांमध्ये (यूनिट) सैनिकी वैद्यकीय सेवेचा एक वैद्यकीय अधिकारी (रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर–आर्. एम्. ओ.) आणि सहा–आठ जवान रेजिमेंटल एड पोस्ट (आर्. ए. पी.) मध्ये तैनात असतात. यूनिटच्या जवानांच्या साहाय्याने ते सर्वांच्या आरोग्याची देखभाल करतात. लढाई सुरू व्हायच्या आधी प्रत्येक ब्रिगेड-मध्ये ॲडव्हान्स फिल्ड हॉस्पिटल (ए. डी. एच्.), डिव्हिजनमध्ये फिल्ड हॉस्पिटल आणि कोअरमध्ये बेस हॉस्पिटलची उभारणी केली जाते. यांचे प्रमुख अनुक्रमे कर्नल, ब्रिगेडियर आणि मेजर जनरल हुद्याचे अधिकारी असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जनरल हॉस्पिटल्सही असतात. नौसेनेच्या प्रत्येक तळावर (नेव्हल बेस) फिल्ड हॉस्पिटल आणि लढाऊ जहाजांवर प्रत्येकी एक ॲडव्हान्स फिल्ड हॉस्पिटल असतात. वायुसेनेच्या प्रत्येक विमानतळावर आर्. ए. पी. असते. ए. एम्. सी.चे प्रशिक्षण केंद्र लखनौ (उत्तर प्रदेश) येथे, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे (महाराष्ट्र) येथे आणि आर्मी नर्सिंग कॉलेजेस, पुणे, लुधियाना (पंजाब), गौहाती (आसाम) आणि लखनौ येथे आहेत. डिसेंबर १९४१ मध्ये पुणे येथे स्थापन झालेल्या इंडियन हॉस्पिटल कोअरच्या व्हाइसरॉय कमिशन्ड ऑफिसर्स आणि नॉन कमिशन्ड ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमधून सुरुवातीस १९४८ मध्ये आर्मी मेडिकल ट्रेनिंग सेंटर आणि नंतर १९६२ मध्ये आर्म्ड फोर्सेस् मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली. ए. एम्. सी.चे प्रशिक्षण केंद्र लखनौला १९५७ मध्ये उभे करण्यात आले. येथे ए. एम्. सी.मधील जवानांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. याशिवाय ॲडव्हान्स कार्डियो व्हॅस्क्यूलर ट्रिटमेंट आणि किडनी ट्रान्सप्लान्टेशनसाठी अनुक्रमे देशभरातील विख्यात वीस आणि पाच हॉस्पिटल्स् ए. एम्. सी.शी संलग्न करण्यात आली आहेत.

सैनिकी वैद्यकीय सेवेचे ध्येय सैनिकांची प्रतिकारशक्ती वाढविणे हे आहे. तदनुसार सैनिकांमधील रोगरक्षणाची क्षमता वाढविण्याची काळजी त्यांना घ्यावी लागते. संरक्षण दलांमधील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची तसेच लढाई दरम्यान जवानांच्या आकस्मिक वैद्यकीयमदतीची (इमर्जंसी मेडिकल मॅनेजमेंट ऑफ कॅज्युअल्टी) जबाबदारी ए. एम्. सी.च्या अधिकाऱ्यांची असते. ए. एम्. सी.च्या जवानांना लढाईचे प्राथमिक प्रशिक्षण (बेसिक काँबॅट ट्रेनिंग) घ्यावे लागते तर अधिकाऱ्यांना प्राथमिक गटनेता प्रशिक्षण (बेसिक लीडरशीप कोर्स), प्राथमिक संरक्षण आरोग्यविषयक प्रशिक्षण (बेसिक ओरिएंटेशन टू आर्मी हेल्थ) आणि संरक्षण विज्ञान प्रशिक्षण (आर्मी डॉक्ट्रिन ट्रेनिंग) घ्यावे लागते. लढाईमध्ये जखमी सैनिकांची देखभाल ‘ट्रायाज्’ पद्धतीने केली जाते. या पद्धतीला चेन ऑफ इव्हॅक्यूएशनही म्हणतात. लढाई दरम्यान जखमी झालेला जवान स्वतःजवळील फिल्ड ड्रेसिंगद्वारे स्वतः उपचार (सेल्फ ट्रिटमेंट) करतो. त्यानंतर आवश्यकतेनुसार त्याला रेजिमेंटल एड पोस्टमध्ये आणून वैद्यकीय मदत दिली जाते. जवान तेथेही बरा झाला नाही, तर त्याला आधी ॲडव्हान्स फिल्ड हॉस्पिटल नंतर फिल्ड हॉस्पिटल व तदनंतर विमानाद्वारे बेस हॉस्पिटलमध्ये आणून वैद्यकीय मदत दिली जाते. प्रत्येक ठिकाणी ज्याला जास्त गरज आहे, त्यालाच आधी वैद्यकीय मदत दिली जाते. ‘नीडी गेटस् द मेडिकल एड फर्स्ट’ या तत्त्वानुसार ‘ट्रायाज्’ पद्धत काम करते.

सैनिकी वैद्यकीय सेवा सांप्रत अतिशय उच्च दर्जाची सेवाप्रणाली आहे. त्यांच्याकडे देशातील अग्रगण्य हॉस्पिटल्स आहेत. अपंग सैनिकां-साठी पुणे येथे कृत्रिम अंग केंद्र गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. सेनादलात सांप्रत सातवी, साठवी आणि ऐंशीवी पॅराशुट फिल्ड अँब्युलन्स यूनिट्स हवाई कारवायांसाठी तयार आहे. भारतीय सेनेबरोबरच ए. एम्. सी.ने सुद्धा स्वातंत्र्यांनंतरच्या सर्व मोहिमांत व लढायांमध्ये सक्रिय भाग घेतला आहे. यांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष लढाईचा हिस्सा बनून अथवा हॉस्पिटल्सच्या माध्यमांद्वारे सेनादलांना वैद्यकीय मदत दिली आहे. मेसोपोटेमियाच्या लढाईमध्ये डोग्रा पलटणीच्या विभागाचा कॅप्टन जॉन सिंटन या वैद्यकीय अधिकाऱ्याला व्हिक्टोरिया क्रॉसनी सन्मानित करण्यात आले होते. आजतागायत ए. एम्. सी.ला १७ महावीर चक्रे, २९ वीर चक्रे आणि ३५७ इतर युद्ध पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. संरक्षण दलांमधील सैनिकांसाठी सैनिकी वैद्यकीय सेवा प्रदान करणारे देवदूतच असतात कारण तेच जखमींचे जीवरक्षक असतात.

पटवर्धन, अभय