स्वविच्छेदन : पुष्कळदा स्वसंरक्षण, भक्ष्य पकडणे इ. वेगवेगळ्या कारणांकरिता प्राण्याला आपल्या शरीराचा काही भाग अथवा एखादे अंग टाकून द्यावे लागते किंवा तोडून टाकावे लागते. स्वेच्छेने घडूनयेणाऱ्या या विच्छेदनाच्या क्रियेला स्वविच्छेदन म्हणतात. पाली, सरडे, विशिष्ट कृमी, कोळी, सॅलॅमँडर इ. प्राण्यांत स्वविच्छेदन आढळते. बऱ्याचदा असा विच्छेदित भाग पुन्हा निर्माण होतो.
स्वविच्छेदन प्रामुख्याने चार वेगवेगळ्या कारणांकरिता होत असल्याचे दिसून येते : (१) सतत गरज निर्माण झाल्यामुळे होणारे स्वविच्छेदन (२) आकस्मिक गरज उत्पन्न झाल्यास होणारे किंवा यथार्थ स्वविच्छेदन (३) अत्यंत बिकट परिस्थितीत केवळ एक उपाय म्हणून होणारे स्वविच्छेदन आणि (४) काही क्रियांच्या बाबतीत आवश्यकता म्हणून होणारे स्वविच्छेदन.
(१) पहिल्या प्रकारचे स्वविच्छेदन हायड्रा आणि समुद्री अर्चिन या प्राण्यांत आढळते. हायड्राच्या देहभित्तीत दंशकोशिका नावाच्या विशेष प्रकारच्या कोशिका असतात. शत्रूचा किंवा अन्य अपायकारक वस्तूंचा हायड्राला स्पर्श होताच तो स्वसंरक्षणार्थ दंशकोशिका शत्रूच्या रोखाने फेकतो. भक्ष्य पकडण्याकरिताही दंशकोशिकांचा उपयोग होतो. स्वसंरक्षण आणि भक्ष्य पकडणे या कायमच्या गरजा असल्यामुळे दंशकोशिका वरचेवर फेकाव्या लागतात व त्यांच्या जागी त्या पुनःपुन्हा नवीन निर्माण कराव्या लागतात. समुद्री अर्चिनाच्या शरीरावर चिमट्यासारखे काटे असतात, त्यांना संदंशिका म्हणतात. शत्रूचा स्पर्श होताच या संदंशिका शत्रूच्या शरीराची घट्ट पकड घेऊन त्याला जखमा करतात. पकड घेतल्यावर समुद्री अर्चिनाच्या शरीरापासून त्या तुटतात.[⟶ समुद्री अर्चिन हायड्रा ].
(२) यथार्थ स्वविच्छेदन पुष्कळ प्राण्यांत आढळते. आकस्मिक रीत्या शत्रूच्या हाती सापडल्यास खेकडे, झिंगे इ. प्राणी आपला एखाद दुसरा पाय चटकन तोडून टाकून आपली सुटका करून घेतात. तुटलेल्या पायांच्या जागी नवीन पाय निर्माण होतात. तारामीन व भंगुरतारा हे प्राणी देखील शत्रूने पकडलेला बाहू तोडून टाकून त्याच्या तावडीतून सुटतात. पृष्ठवंशी ( पाठीचा कणा असलेल्या ) प्राण्यांमध्ये आढळणारे स्वविच्छेदनाचे असामान्य उदाहरण पालीच्या शेपटीचे आहे. संरक्षणासाठी पाल, सरडा वगैरे प्राणी आपले शेपूट चटकन तोडून टाकून आपली सुटका करून घेतात.
लैंगिक क्रियेशी निगडित असलेला स्वविच्छेदनाचा एक विशेष प्रकार काही ऑटोपोडांच्या ( मॉलस्का ) नरांत आढळतो. या प्राण्यांच्या बाहूंपैकी एकाचे विशेष रूपांतर होऊन तो शुक्राणूंचे पुंजके( शुक्रपुटी किंवा शुक्राणुधर ) नेऊ शकतो, या बाहूला निषेचनांग म्हणतात. नर मैथुनाच्या वेळी निषेचनांग मादीच्या प्रावार गुहेत खुपसतो आणि स्वविच्छेदनाने शरीरापासून तोडून टाकतो.
(३) विषम परिस्थितीत हायड्रा व प्लॅनेरिया यांसारखे प्राणी स्वविच्छेदनाचा अवलंब करतात. पाण्याचे तापमान बरेच जास्त झाले किंवा त्याचा खारेपणा बराच वाढला, तर हायड्राचे संस्पर्शके तुटून वेगळी होतात किंवा शरीराचे तुकडे पडतात. प्लॅनेरियाच्या कित्येक जातींत संकट ओढवल्यावर स्वविच्छेदनाने शरीराचे तुकडे पडतात. हायड्राच्या किंवा प्लॅनेरियाच्या या तुकड्यांच्या अंगी पुनर्जननाची असामान्य शक्ती असते.
(४) स्पंज, प्लॅनेरिया, ॲनेलिडा इ. समूहातील प्राण्यांमध्ये जनन किंवा बिघाड झालेल्या भागाची दुरुस्ती अथवा नूतनीकरण या कारणांकरिता स्वविच्छेदन झालेले आढळते. विशेषतः विखंडनाने होणारे जनन कीटोगॅस्टरासारख्या ॲनेलिडामध्ये फार चांगल्या प्रकारे दिसून येते. सायलिसामध्ये मुकुलनाने नवीन जीव उत्पन्न होऊन त्यांची माळ तयार होते व अखेरीस विच्छेदनाने प्रत्येक जीव अलग होतो.
पालीची शेपटी भंजन प्रतलांच्या ठिकाणी अलग होते. ही प्रतले शेपटीच्या लांबीभर नियमित अंतरावर असतात. ती दोन मणयांच्या दरम्यान किंवा प्रत्येक मणयाच्या मध्यावर असतात. शेपटी तुटणे पालीच्या दृष्टीने हानिकारक असते. कारण त्यामुळे तिच्या शेपटीतील चरबी व प्रथिन ( ऊर्जा ) कमी होते. त्याच्यामुळेच नवीन शेपटी परत वाढत असते. या काळात पाल शत्रूचे भक्ष्य होण्याची जोखीम मोठी असते. असे असले, तरी शेपूट तोडून टाकण्याची कृती ही सदर प्राणिजाती टिकून राहण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरलेले व्यूहतंत्र आहे. कारण संरक्षणाचे हे व्यूहतंत्र पालीच्या सर्व कुलांमध्ये व्यापकपणे पसरलेले आढळते. स्किंक व गेक्को यांसारख्या काही पाली शेपटीऐवजी त्वचा तोडून टाकतात. शत्रूने पकडलेला त्वचेचा भाग पाल तोडून टाकते परंतु शेपटी प्रत्यक्ष पकडली जाण्याआधी गळून पडते. त्वचा-विमोचनाच्या वा मुक्त करण्याच्या या आविष्काराला भंगुर वा भंजनशील त्वचा ( त्वचा भंजन ) म्हणतात. प्लेथोडोंटिड सॅलॅमँडर प्राण्यांत त्यांच्या शेपट्या, अंगुली व अवयवांचे भाग यांचे स्वविच्छेदन होते.
गद्रे, वा. रा.
“