स्वप्नवासवदत्त : संस्कृत नाटककार म भास कृत सहा अंकी नाटक. या नाटकाचे संविधानक थोडक्यात असे : मृगया, ललित कला आणि पत्नी वासवदत्ता हिच्यावरील गाढ प्रेम यांतच गुंतून पडल्यामुळे वत्स देशाचा राजा उदयन याच्याकडून राज्यकारभार आणि राज्याचे संरक्षण यांच्याकडे दुर्लक्ष होत राहते. परिणामतः आरुणी हा त्याचा शत्रू वत्स देशावर स्वारी करून त्या देशाची राजधानी कौशांबी जिंकून घेतो. त्यामुळे वत्स देश आणि मगध यांच्या सीमेवरील लावाणक या गावी येऊन राहण्याची वेळ उदयनावर येते. उदयनाचा स्वामिनिष्ठ आणि बुद्धिमान अमात्य यौगंधरायण हा या आपत्तीतून मार्ग काढण्याच्या विचारात असतो. काही ज्योतिष्यांनी असे भविष्य वर्तविलेले असते, की मगध देशाचा राजा दर्शक याची धाकटी बहीण पद्मावती हिच्याशी उदयनाचा विवाह झाल्यास उदयनाला पुन्हा सुस्थिती येईल. ह्या भविष्यकथनाचा विचार करून, त्याचप्रमाणे दर्शकासारख्या पराक्रमी राजाशी नातेसंबंध निर्माण झाल्यास आरुणीविरुद्ध लढण्यासाठी त्याची मदतही उदयनाला हमखास मिळेल हा अंदाज बांधून, उदयन आणि पद्मावती यांचा विवाह घडवून आणण्या-साठी यौगंधरायण प्रयत्न करू लागतो. यात दोन अडचणी असतात : वासवदत्तेवरील उत्कट प्रेमामुळे उदयन पद्मावतीशी विवाह करावयास तयार होणे शक्य नसते. त्याचप्रमाणे दर्शक आपली बहीण उदयनास सवतीवर द्यायला तयार झाला नसता. ह्या अडचणींवर मात करण्यासाठी यौगंधरायण एक व्यूह रचतो. त्यासाठी तो वासवदत्तेची मदत घेतो. व्यूह असा : उदयन शिकारीला गेला की, लावाणक येथील राजवाड्याला आग लावून द्यायची आणि तेथील अंतःपुरात वासवदत्ता जळून गेली आणि वासवदत्तेला वाचवण्याच्या प्रयत्नात यौगंधरायणालाही आगीने मृत्यू आला असे उठवायचे. त्याप्रमाणे तो हे घडवून आणतो. नंतर वासवदत्ता आवंतिका हे नाव धारण करून मगध देशातील एका आश्रमात राहते. या आश्रमात दर्शकाची वृद्ध आई राहत असते. तिला भेटण्यासाठी पद्मावती अधूनमधून तिथे येत असते. अशाच एका प्रसंगी ‘ ही आवंतिका माझी बहीण असून तिचा पती देशांतरी गेला आहे. तरी आपण तिचा काही काळ सांभाळ करावा ’, अशी विनंती यौगंधरायणाने एका ब्राह्मण संन्याशाच्या वेशात पद्मावतीला केलेली असते.
वासवदत्ता आगीत जळून गेली हे कळल्यानंतर राजा उदयन अत्यंत दुःखी होतो तथापि रुमण्वान नावाचा त्याचा अमात्य त्याची समजूत घालतो आणि पद्मावतीला मागणी घालण्यासाठी त्याच्या मनाची तयारी करतो. पद्मावतीनेही उदयन राजाला मनाने वरलेले असते. आश्रमात आवंतिका या नावाने राहणार्या वासवदत्तेशी तिची मैत्री झालेली असते पण आवंतिका हीच वासवदत्ता हे तिला माहीत नसते. त्याचप्रमाणे वासवदत्तेलाही यौगंधरायणाच्या संपूर्ण व्यूहाची कल्पना नसते. उदयन-पद्मावती ह्यांचा विवाह हे आपल्या व्यूहाचे अंतिम उद्दिष्ट आहे, हे त्याने–वासवदत्तेला सांगितलेले नसते. त्याच्या व्यूहात वासवदत्तेची भूमिका त्याने अगदी सीमित ठेवलेली असते. त्यामुळे यथावकाश उदयनाचा पद्मावतीशी विवाह झाल्यावर तिच्या मनाला यातना होतात. उदयनालाही वासवदत्तेची सतत आठवण येत असते. तशातच एकाएकी आजारी पडलेल्या पद्मावतीला भेटण्यासाठी वासवदत्ता गेली असताना योगायोगाने पद्मावतीच्या शय्येवर पद्मावती नसून राजा उदयन निजला आहे, हे तिच्या लक्षात येत नाही. ती थोडा वेळ तिथे बसून त्याच शय्येवर लवंडते. निजलेल्या राजा उदयनाला स्वप्नात वासवदत्ता दिसत असते. तो तिच्याशी बोलत असताना त्या शय्येवर पद्मावती नाही, तर राजा उदयन आहे, हे वासवदत्तेला कळते. मग स्वप्नात राजा जे बोलत असतो, त्याला ती उत्तर देत राहते आणि थोड्या वेळाने निघून जाते. अर्धवट निद्रेत असलेला राजा संभ्रमात पडतो. आपण पाहिले ते स्वप्न की सत्य, हे त्याला कळत नाही. तेवढ्यात वार्ता येते, की उदयनाचा अमात्य मोठ्या सैन्यासह आरुणीचा नाश करावयास निघाला असून दर्शकाची सेनाही रुमण्वानाच्या मदतीस जात आहे. त्यामुळे उदयनलाही उत्साह येऊन तो युद्धात सहभागी होतो आणि आरुणीचा वध करून आपले राज्य परत मिळवतो.
राज्य परत मिळवल्यावर उदयन कौशांबीमधल्या आपल्या सूर्यामुख प्रासादात राहावयास येतो. तेथे त्याला भेटण्यासाठी वासवदत्तेच्या माहेरची मंडळी येतात. वासवदत्ता निधन पावली या समजुतीने त्यांनी येताना वासवदत्ता आणि उदयन यांची एकत्र काढलेली चित्रे सोबत आणलेली असतात. त्या चित्रांतली वासवदत्ता पाहून पद्मावती आश्चर्यचकित होते. आपल्याबरोबर असणारी आवंतिका हुबेहूब वासवदत्तेसारखी दिसते, हे तिच्या लक्षात येते. हे कळताच उदयन आवंतिकेला बोलावून घेतो. त्याच वेळी ब्राह्मण संन्याशाच्या वेशातील यौगंधरायणही तेथे पोचतो. त्यानंतर सर्व उलगडा होतो.
गुणाढ्याच्या ⇨ बड्डकहा ( बृहत्कथा ) ह्या पैशाची भाषेतील कथाग्रंथात स्वप्नवासवदत्त ह्या नाटकाच्या कथानकाचा आधार सापडतो, असे डॉ. ए. बी. कीथ यांचे मत आहे तथापि भासाचा काळ इ. स. पू. पाचवे किंवा चौथे शतक आहे, असे मानणार्या अभ्यासकांना हे मत मान्य होणार नाही. मात्र, भासाच्या काळी प्रचलित असलेल्या लोककथांमधील एखाद्या कथेवरून भासाने ह्या नाटकाचे कथानक घेतले असणे शक्य आहे. सोमदेवाने आपल्या ⇨ कथासरित्सागर ह्या ग्रंथात गुणाढ्याच्या उपर्युक्त ग्रंथातील कथा संक्षेपाने घेतल्या आहेत. कथासरित्सागरात वासवदत्ता आणि उदयन यांची कथा आलेली आहे. कदाचित भास आणि सोमदेव यांनी एकच लोककथा पाहिली असण्याचा संभव आहे तथापि भासाने आपल्या साहित्यकृतीसाठी तिच्यात योग्य ते बदल करून घेतलेले दिसतात. जे अतिरंजित आणि अवास्तव ते त्याने टाळले आहे. उदा., सोमदेवाच्या कथेनुसार उदयनाला पृथ्वीचे राज्य मिळवून द्यावे, अशी यौगंधरायण व सेनापती रुमण्वान यांची इच्छा होती पण ती अवास्तव असल्यामुळे भासाने केवळ वत्स देशाच्या राज्यापुरतीच यौगंधरायणाची व्यूहरचना सीमित ठेवली. ह्या नाटकातला संघर्ष मुख्यतः मानसिक पातळीवरचा आहे. आपले राज्य परत मिळवण्यासाठी राजा उदयन एक तडजोड म्हणून पद्मावतीशी लग्नकरतो पण वासवदत्तेवाचून त्याचे मन सतत दु:खी राहते. आपल्या पतीच्या प्रेमात आता दुसरी स्त्री वाटेकरी होणार, ही भावना वासवदत्तेलाही व्यथित करणारी असते. पद्मावतीला हवा तसा पती मिळाला, तरी त्याचे उत्कट प्रेम आपल्यावर नाही हे सत्य तिला बोचत असते. ह्या तिन्ही व्यक्तींच्या मनांचे सूक्ष्म चित्रण भासाने केलेले आहे. स्थल-कालैक्याच्या दृष्टीनेही ही नाट्यकृती चांगली आहे. संपूर्ण कथानक दोन-तीन ठिकाणीच घडते. तसेच कथानकातील एकूण घटनांना लागणारा काळही फार नाही. ह्या नाटकात विप्रलंभ शृंगार हा मुख्य रस आहे. ह्या नाटकाच्या अखेरीअखेरीस येणारा स्वप्नदृश्यांचा संदर्भ भासाने अप्रतिमपणे उभा केला आहे.
संदर्भ : 1. Pusalkar, A. D. Bhasa – A Study, Delhi, 1940, Second Rev. Ed., 1968.
२. आपटे, हरि नारायण, भास कवीची नाटके, पुणे, १९१७ आवृ. दुसरी, १९६४.
कुलकर्णी, अ. र.
“