स्वगत : स्वगत हा शब्द ‘ सॉलिलॉक्वी ’ ( सोलोलॉकी ) ह्या लॅटिन शब्दाचा प्रतिशब्द आहे. लॅटिनमधला हा शब्द solus म्हणजे ‘ एकटा ’ आणि loqui म्हणजे ‘ बोलणे ’, अशा दोन शब्दांपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ, ‘ स्वतःशी बोलणे ’ असा होतो. नाट्यकथेचा ओघ चालू ठेवण्यासाठी असे बोलणे अतिशय उपयुक्त ठरते कारण स्वगतांमुळे रंगभूमीवरील पात्रांच्या अंतरंगात काय चालले आहे हे प्रेक्षकांना समजते त्यांचे भावविश्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. स्वगते साधारणतः दीर्घ स्वरूपाची असतात आणि ती फक्त प्रेक्षकांना ऐकू येतात रंगमंचावरच्या पात्रांना ती ऐकू येत नाहीत. अनेकदा एकच पात्र रंगभूमीवर असते आणि आपले मनोगत स्वगताच्या रूपाने प्रकट करीत असते. उदा., ⇨ विल्यम शेक्सपिअरच्या हॅम्लेट ह्या नाटकातले ‘जगावे की मरावे …. ’ ( टू बी ऑर नॉट टू बी ) हे सुप्रसिद्ध स्वगत. संस्कृतातील ⇨ भाण ह्या एकांकी नाट्यरचनेत धूर्त किंवा विट हे पात्र आपले काही अनुभव आकाश-भाषितेच्या योगाने स्वगत प्रकट करताना दिसते. मराठीतील उदाहरण द्यावयाचे झाले, तर ⇨ कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ह्यांच्या स्वयंवर ह्या नाटकातले ‘खडा मारायचा झाला तर …. ’ ह्या स्वगताचा निर्देश करता येईल. स्वगते नाट्यप्रयोगाच्या परिणामकारकतेत महत्त्वपूर्ण भर घालतात. उदा., ⇨ राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला, भावबंधन आणि राजसंन्यासमधील स्वगते ⇨ विजय तेंडुलकरां च्या शांतता ! कोर्ट चालू आहे ह्या नाटकाच्या अखेरीस असलेले लीला बेणारेचे स्वगत. खलनायकाच्या मनात चाललेले कुटिल विचार स्वगतांमुळे प्रेक्षकांना कळतात. दीर्घ स्वगते कथानिवेदनासाठी, तसेच प्रेक्षकांशी थेट संवाद साधून आपले मनोगत साधण्यासाठीही वापरली जातात. उदा., वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकाच्या पहिल्या अंकाच्या आरंभी नाट्यनायक गणपतराव बेलवलकर यांनी प्रेक्षकांना उद्देशून केलेले निवेदन.
वास्तववादी नाटकांनी स्वगते त्याज्य मानली. उदा., ⇨ प्र. के. अत्रे, ⇨ मो. ग. रांगणेकर ह्यांची नाटके तथापि स्वगतांचा हेतू साध्य करतील असे संवाद त्यांच्या नाटकांत आहेत. काही नाटककारांनी स्वगते जाणीवपूर्वक वापरलेली आहेत. उदा., ⇨ वसंत कानेटकर (वेड्याचं घर उन्हांत मत्स्यगंधा) विजय तेंडुलकर (मधल्या भिंती). ⇨ पु. भा. भावे यांच्या स्वामिनी या आधुनिक नाटकात काशीचे स्वगत स्वागतार्ह ठरले.
संदर्भ : १. देसाई, वसंत शांताराम, मराठी नट, नाटक आणि नाटककार, पुणे, १९५६.
२. बनहट्टी, श्री. ना. मराठी नाट्यकला आणि नाट्यवाङ्मय, पुणे, १९५९.
महांबरे, गंगाधर
“