स्यूपेरव्ह्येल, झ्यूल : ( १६ जानेवारी १८८४ —१७ मे १९६० ). फ्रेंच कवी, नाटककार, कथाकार आणि कादंबरीकार. जन्म दक्षिण यूरग्वाय, माँटेव्हिडिओ येथे. फ्रान्स आणि यूरग्वाय या दोन्ही देशांचे नागरिकत्व त्याला मिळालेले होते. फ्रेंच भाषेत त्याने लेखन केले. फ्रान्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर तो दक्षिण अमेरिकेत आला. तेथे त्याने विवाह केला. पुढे फ्रान्समध्ये परत आल्यानंतर पहिल्या महा-युद्धानंतरच्या काळात त्याला एक कथाकार आणि कवी म्हण्न ख्याती प्राप्त झाली होती. त्याचे हे लेखन अतिवास्तववादी वळणाचे आहे पण त्यातील प्रतिमासृष्टी दक्षिण अमेरिकन अनुभवविश्वातील असून त्यावर स्पॅनिश वाङ्मयीन परंपरा आणि लेखनतंत्रे यांचाही परिणाम जाणवतो. ‘ मॅन ऑफ द पंपा ’ (१९२३, इं. शी. ) व ‘ द मॅन हू स्टोल चिल्ड्रन ’ (१९२६, इं. शी. ) या त्याच्या कादंबर्यांतल्या केंद्रवर्ती व्यक्तिरेखा दक्षिण अमेरिकन आहेत. पुढे तो नाट्यलेखनाकडे वळला. ‘ ब्यूटी इन द फॉ रेस्ट ’ ( प्रयोग, १९३१, इं. शी.) हे त्याचे पहिले नाटक. त्यात परीकथांचे वातावरण आहे. ब्यूटी आणि ब्लूबिअर्ड यांचे प्रेम असते तथापि ब्लूबिअर्डच्या काही निकृष्ट प्रेरणांमुळे त्यांच्या प्रेमाला धक्का पोहोचण्याची शक्यता असते. हे घडू नये म्हणून त्यांना गाढ निद्रेचे संरक्षण मिळते तथापि विसाव्या शतकात ते जागे होतात. परीकथेतल्या व्यक्ती यांत्रिक संस्कृतीच्या वातावरणात तगू शकत नसल्यामुळे ब्यूटी ब्लूबिअर्डसह चिरंतन निद्रेत जाणे पसंत करते. या नाटकानंतर ॲडम (१९३०) हेच नाटक काही फेरफार, सुधारणा करून ‘ द फर्स्ट फॅमिली ’ (१९३४, इं. शी. ) या नावाने प्रसिद्ध करण्यात आले. हे एक प्रहसन आहे. बोलिव्हार (१९३६), रॉबिन्सन ( प्रयोग, १९४८) ही त्याची अन्य काही नाटके.
स्यूपेरव्ह्येलची नाटके म्हणजे काव्यात्म प्रकल्पने ( फँटसीज ) आहेत. ‘ द मॅन हू स्टोल चिल्ड्रन ’ ह्या त्याच्या कादंबरीवरून त्याने केलेले नाटक ही त्याची सर्वोत्कृष्ट नाट्यकृती मानली जाते. स्वतःला अपत्य नसलेला एक कर्नल कोणालाही नको असलेली मुले पळवून त्यांना आश्रय देत असतो पण अशा एका पळवून आणलेल्या मुलीच्या प्रेमात तो पडतो. ती मुलगी मात्र एका तरुण मुलाबरोबर पळून जाते. आपल्याकडून चूक झाल्याच्या अपराधी भावनेतून कर्नलला आत्महत्या करावीशी वाटते पण एका मुलाला जन्म दिल्यानंतर प्रियकराने नाकारलेली ती मुलगी जेव्हा पुन्हा त्या कर्नलच्या आश्रयाला येते, तेव्हा आपला वयस्कपणा कर्नल उमद्या वृत्तीने स्वीकारतो. स्यूपेरव्ह्येलने शेक्सपिअरच्या काही नाटकांची भाषांतरेही केलेली आहेत.
प्रेमाला वंचित झालेली एकाकी माणसे, विश्वव्यापी अशा मानवी बंधुत्वाची ओढ आणि दक्षिण अमेरिकेतील त्याचे बालपण हे स्यूपेर-व्ह्येलच्या लेखनातून येणारे विषय होत.
पॅरिस येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.
“