स्मट्स, जनरल यान क्रिश्चन : (२४ मे १८७०—११ सप्टेंबर १९५०). दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचा मुत्सद्दी, सेनाधिकारी व पंतप्रधान. त्याचा जन्म केप कॉलनी येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन त्याने व्हिक्टोरिया महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. विद्यार्थिदशेत त्याची सीबेला मार्गारिता क्रीग  या युवतीशी ओळख झाली व त्याची परिणती त्यांच्या विवाहात झाली. १८९१ मध्ये तो शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला गेला आणि केंब्रिज विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली (१८९५). त्याच वर्षी तो केपटाउनला परत आला व तेथे स्थायिक झाला. त्यानंतर त्याने वकिलीचा व्यवसाय व वृत्तपत्रकारिता तसेच राजकारण यांत स्वतःला गुंतवून घेतले. स्मट्सची ट्रान्सव्हाल येथे सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली (१८९९). बोअर युद्धा त त्याने ब्रिटिशांतर्फे प्रिटोरिया काबीज केले, तेव्हा तो प्रसिद्धीस आला.३१ मे १९०२ रोजी झालेल्या फेरीनिकिंगच्या शांतता तहात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. १९०४ मध्ये लूई बोटासोबत मिळून त्याने ‘ हेट व्होल्क ’ ( जनता ) या पक्षाची स्थापना केली आणि युनियन ऑफ साउथ आफ्रिका या स्वयंशासनासाठी काम करण्याचे ठरविले. त्यानंतर तो युनियन ऑफ साउथ आफ्रिकेच्या ट्रान्सव्हाल या वसाहतीत शिक्षणमंत्री होता (१९०७). त्याने लूई बोटाच्या सहकार्याने दक्षिण आफ्रिकेतील चार ब्रिटिश वसाहतींचे एक राष्ट्र व्हावे, यासाठी चळवळ सुरू केली. त्यातून युनियन ऑफ साउथ आफ्रिका हे राष्ट्र उदयाला आले (१९१०) व त्याचा लूई बोटा पंतप्रधान झाला. लूई बोटाच्या मंत्रिमंडळात स्मट्सला संरक्षणमंत्री हे पद देण्यात आले (१९१२).

पहिल्या महायुद्धाच्या काळात स्मट्सने पूर्व आफ्रिकेचे सेनापतिपद स्वीकारले. मार्च १९१७ मध्ये तो इंपिरिअल कॉन्फरन्ससाठी लंडन येथे गेला. तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड लॉइड-जॉर्ज याने त्याच्या यशस्वी नेतृत्वगुणामुळे त्याला वायुसेनेचे मंत्रिपद दिले. त्याने ‘ रॉयल एअर फोर्स ’ ची स्थापना केली. ऑगस्ट १९१९ मध्ये लूई बोटाच्या मृत्यूनंतर तो दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान झाला. १९२४ मध्ये स्मट्सच्या पक्षाचा जेम्स हर्टसॉक याच्या पक्षाने पराभव केला. पुढे हर्टसॉक याच्याच मंत्रिमंडळात तो उपपंतप्रधान झाला (१९३३—३९). सप्टेंबर १९३९ मध्ये परत त्याची पंतप्रधानपदी निवड झाली. १९४१ मध्ये त्याला ब्रिटिश शासनाने आपल्या लष्कराचे फील्डमार्शल केले व उत्तर आफ्रिकेतील आघाडीवर पाठविले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात स्मट्स हा सर विन्स्टन चर्चिल याचा जवळचा सहकारी व सल्लागार होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेत त्याचा मोलाचा वाटा होता. राष्ट्रसंघाची उद्देशिका त्यानेच लिहिली. १९४८ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. त्यामुळे नैराश्यात त्याने आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. एक बुद्धिमान राजनीतिज्ञ व असामान्य लष्करी नेता म्हणून त्याची ख्याती असली, तरी त्याच्या वंशभेदाच्या धोरणांमुळे तो निग्रो व भारतीय वंशाच्या लोकांत अप्रिय झाला.

हृदयविकाराच्या आजाराने स्मट्सचे इरेन ( प्रिटोरिया ) येथे निधन झाले.

टिपणीस, य. रा.