स्फॅलेराइट : हे खनिज झिंक सल्फाइड या संयुगाचा कमी तापमानाचा प्रकार व बहुरूप आहे. ब्लेंड वा झिंकब्लेंड, फॉल्स ( आभासी ) गॅलेना, लेड मार्कॅसाइट, मॉक ( प्रतिरूप ) लेड, मॉक ओअर ( धातुक कच्च्या रूपातील धातू ), स्यूडो ( छद्म ) गॅलेना, ब्लॅक जॅक आणि स्टील जॅक ही याची पर्यायी नावे आहेत. या खनिजापासून जवळजवळ २०% जस्त तयार करण्यात येते.
स्फॅलेराइटाचे स्फटिक घनीय प्रणालीचे असून त्यांत सामान्यपणे चतुष्फलक, द्वादशफलक व घनप्रतल असतात, तथापि स्फटिक पुष्कळदा जटिल ( गुंतागुंतीचे ) बहुधा वाईट आकाराचे, गोलसर समूहाच्या रूपात आढळत असून त्यात यमलन झालेले आढळते [⟶ स्फटिकविज्ञान ]. ⇨ पाटन: (011) उत्कृष्ट असते पण अनेक ठिकाणी असणार्या सूक्ष्मकणांमुळे पाटन दिसत नाही. कठिनता ३.५ — ४ वि.गु. ३.९ — ४.१ चमक अधातवीय ते रेझिनासारखी, उपधातवीय, शिवाय हिर्या-सारखीही असते. शुद्ध स्फॅलेराइटाचा रंग पांढरा, तर जवळजवळ शुद्ध असलेल्या या खनिजाचा रंग हिरवा असून विशेषत: लोखंडाच्या अशुद्धीमुळे याला पिवळा, उदी ते काळा रंग येतो. लाल रंगाच्या स्फॅलेराइटाला खाणकामगार रूबी जॅक म्हणतात. लोखंडाच्या वाढत्या प्रमाणामुळे खनिजाचा रंग अधिक गडद होत जातो आणि विशिष्ट गुरुत्वही वाढते. कधीकधी गंधकामुळेही रंग गडद होऊ शकतो. कस पांढरा ते पिवळा व उदी आणि ब्लॅक जॅकचा लालसर उदी पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. स्फॅलेराइट उत्तापविद्युतीय असून कधी-कधी जंबुपार प्रारणामुळे व क्ष-किरणामुळे यात दीप्ती निर्माण होऊ शकते [⟶ खनिजविज्ञान ]. रा. सं. ZnS.
स्फॅलेराइटात बहुधा लोह असते व ते ३६ टक्क्यांपर्यंत असू शकते. शिवाय कॅडमियम व मँगॅनीजही यात अल्प प्रमाणात असतात. शुद्ध स्फॅलेराइट अगलनीय असून लोणारी कोळशावर हे तापविल्यास सल्फरडाय-ऑक्साइड वायूचा वास येतो व त्यावर झिंक ऑक्साइडाचा लेप तयार होतो. चमक व पाटन या गुणधर्मांवरून हे ओळखता येते. उच्च तापमानाला यापासून षट्कोणी स्फटिक प्रणाली असलेले ⇨ व्ह्यूर्टसाइट तयार होते.
स्वच्छ करता येण्याजोग्या भरड ते सूक्ष्म कणांच्या पुंजांच्या रूपात स्फॅलेराइट सामान्यपणे जगभर आढळते. हे अतिशय सामान्य खनिज असून आढळ व उत्पत्ती या बाबतींत ते ⇨ गॅलेना या खनिजासारखे ( शिशाच्या धातुकासारखे ) आहे आणि म्हणून त्याला आभासी वा छद्म गॅलेना म्हणतात. विस्तृतपणे आढळणारे हे खनिज मुख्यतः चुनखडकांतील व अग्निज खडकांतील जलतापीय शिरा, संसर्गी रूपांतरणाचे पट्टे आणि उच्च तापमानाला प्रतिष्ठापित झालेले निक्षेप यांच्यामध्ये धातुकाच्या रूपात आढळते. मुख्यतः गॅलेना, तसेच पायराइट, मार्कॅ साइट, कॅल्कोपायराइट, स्मिथसोनाइट, कॅल्साइट व डोलोमाइट ही खनिजे स्फॅलेराइटाबरोबर आढळतात. चेकोस्लोव्हाकिया, रुमानिया, पोलंड, इंग्लंड, स्वित्झर्लंड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मेक्सिको, अमेरिका, जर्मनी, रशिया, काँगो, रॉकी पर्वत इ. प्रदेशांत स्फॅलेराइट आढळते.
भारतात जस्त सामान्यपणे स्फॅलेराइटाच्या रूपात आढळते व ते गॅलेनाशी निगडित असलेले दिसते. काश्मीरमधील रिआसी जिल्ह्या-मधील ⇨ पर्मोकार्बॉनिफेरसकालीन चुनखडकांमध्ये याच्या मसूराकार शिरा व अशुद्ध धातुरेखा आढळतात, तसेच उधमपूर जिल्ह्यातील दराबी क्षेत्रातील चुनखडकांतही याचे लहान निक्षेप आहेत. राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील झावर येथील शिसे व जस्त यांच्या खाणी प्रसिद्ध आहेत. शिवाय अलमोडा, टेहरी-गढवाल आणि सिक्कीममधील भोतांग येथेही स्फॅलेराइटाचे लहान साठे आहेत.
जस्ताचे हे सर्वांत महत्त्वाचे धातुक असून याचे निक्षेप हे कॅडमियम, इंडियम, गॅलियम व जर्मेनियम या धातूंचे सर्वांत महत्त्वाचे स्रोत ठरले आहेत. स्फॅलेराइटातील लोहाचे प्रमाण हे त्याच्या निर्मितीच्या वेळी असणार्या तापमानाचे निदर्शक असते. त्यामुळे या खनिजाचा भूवैज्ञानिक तापमापक म्हणूनही उपयोग होऊ शकतो.
स्फॅलेराइट हे गॅलेनासारखे भासत असल्याने फसवे या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून त्याचे नाव आले आहे.
पहा : जस्त.
ठाकूर, अ. ना.
“