स्पिनेल : हे स्पिनेल गटातील एक खनिज आहे. याचे स्फटिक घनीय प्रणालीचे असून याचे षडष्टफलकीय स्फटिक ( बहुधा अष्ट-फलकीय यमलन होऊन बनलेले अष्टफलकीय जुळे स्फटिक) व द्वादशफलकीय स्फटिकही असतात [⟶ स्फटिकविज्ञान ]. कठिनता ८ वि.गु. ३.५ — ४.१ चमक काचेसारखी रंग पांढरा, तांबडा, जांभळट तांबडा, फिका जांभळा, निळा, हिरवट-पिवळा, उदी, काळा कस पांढरा, बहुधा दुधी काचेप्रमाणे पारभासी हे नितळ व पारदर्शकही असते [⟶ खनिजविज्ञान ]. रा. सं. MgA12O4. यातील मॅग्नेशियमाच्या जागी लोह, जस्त व काही प्रमाणात मँगॅनीज, तर ॲल्युमिनियमाच्या जागी फेरिक लोह व क्रोमियम येऊ शकतात. प्लीओनेट ( लोह स्पिनेल ) गडद हिरवे ते काळे असते, तर पिकोटाइट ( क्रोम स्पिनेल ) पिवळसर ते हिरवट उदी असते. स्पिनेल अगलनीय असून कठिनता, अष्टफलकीय स्फटिक व काचेसारखी चमक या गुणधर्मांमुळे हे वेगळे ओळखता येते. लोह स्पिनेल अचुंबकीय असून त्याचा कस पांढरा असल्याने ते मॅग्नेटाइटाहून वेगळे ओळखता येते.
स्पिनेल हे सामान्य रूपांतरित खनिज स्फटिकी चुनखडक, पट्टिताश्म व सर्पेंटाइन यांत जडवलेल्या कणांच्या पुंजांच्या रूपांत आणि अनेक गडद रंगी व सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या अल्पसिकत अग्निज खडकांत गौण खनिज म्हणून आढळते. ते संपर्क रूपांतरणाने तयार होते आणि फ्लोगोपाइट, पायरोटाइट, काँड्राइट व ग्रॅफाइट या खनिजांबरोबर आढळते. रासायनिक व भौतिक गुणधर्मांमुळे ते झीज होण्याला विरोध करते. यामुळे त्याचे गोटे वाळूमध्ये आढळतात. उदा., तांबडे स्पिनेल ( रुबी ). हर्सीनाइट ( लोह स्पिनेल ) हा याचा प्रकार कुरुविंदाबरोबर काही ⇨ एमरींमध्ये आढळतो. तसेच अँडॅलुसाइट, सिलिमनाइट व गार्नेट यांच्या बरोबरही स्पिनेल आढळते. स्पिनेल श्रीलंका, थायलंड, उत्तर म्यानमार व मादागास्कर येथील वाळूत कुरुविंदाबरोबर आढळते. ते स्वीडन, अमेरिका इ. ठिकाणीही आढळते. पारदर्शक व रंगीत साधे स्पिनेल रत्न म्हणून वापरतात. गुलाबी-तांबडा प्रकार बॅलास रुबी व अधिक गडद तांबडा प्रकार स्पिनेल रुबी ही रत्ने म्हणून वापरतात. काही निळे प्रकारही उपरत्न म्हणून वापरतात. याचा रुबीसेल्ली हा नारिंगी-तांबडा प्रकार म्यानमारमध्ये खर्या माणकाबरोबर आढळतो व तो रत्न म्हणून वापरतात. श्रीलंकेतील सुप्रसिद्ध रत्नयुक्त वाळूत स्पिनेल व इतर रत्नसदृश आणि आलंकारिक खडे आढळतात. गडद निळे-हिरवे गानाइट, काळे गॅलॅक्साइट, रक्ताप्रमाणे तांबडे व निळे मॅग्नेशियम स्पिनेल हे स्पिनेलाचे इतर प्रकार आहेत. ॲल्युमिनियम स्पिनेल हे लोह व क्रोमियम स्पिनेलांपेक्षा अधिक कठीण आणि पारदर्शक असून त्याची घनता मात्र कमी असते. अर्थात स्पिनेलांतील मूलद्रव्ये परस्परांच्या जागी येऊ शकतात. त्यामुळे त्याचे बहुतेक नमुने हे मिश्रण स्वरूपाचे असतात.
स्पिनेल कृत्रिम रीतीने बनवितात. त्यासाठी व्हेर्न्य प्रक्रियेची भट्टी आणि ॲल्युमिना (A12O3) व मॅग्नेशिया (MgO) हा मुख्य कच्चा माल वापरतात. कृत्रिम स्पिनेलाचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत. कृत्रिम स्पिनेलाची घनता थोडी अधिक असून त्याचा प्रणमनांक (वक्रीभवनांक ) अधिक उच्च असतो. क्ष-किरणांनी सक्रियित ( अधिक क्रियाशील ) केल्यास कृत्रिम स्पिनेल अधिक तीव्र अनुस्फुरक होते. नैसर्गिक स्पिनेलात असे अनुस्फुरण होत नाही किंवा अगदी थोेडेच होते. कृत्रिम स्पिनेले विविध रंगी नैसर्गिक रत्नांसारखे सुंदर असून त्यांचे अनेक प्रकार कृत्रिम रत्ने व उपरत्ने म्हणून वापरतात तर पुष्कळ प्रकार लोहचुंबकीय द्रव्ये आणि उच्चतापसह पदार्थ म्हणूनही वापरतात. टोकदार स्फटिकांमुळे लॅटिनमधील काटा व लघुत्वदर्शक प्रत्यय यांच्यावरून स्पिनेल हे नाव आले आहे.
पहा : रत्ने.
ठाकूर, अ. ना.
“