स्नेल, जॉर्ज डेव्हिस : (१९ डिसेंबर १९०३—६ जून १९९६). अमेरिकन प्रतिरक्षा-आनुवंशिकीविज्ञ ( इम्युनोजेनेटिसिस्ट ).त्यांना झां दॉसे व बारुज बेनासेराफ यांच्यासमवेत १९८० मध्ये मानवी वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले. ऊतक ( समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह ) अनुरूपतेच्या ( हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी ) संशोधनासाठी त्यांना हे पारितोषिक देण्यात आले. ऊतक-अनुरूपता म्हणजे दात्याचे आनुवंशिक घटक ( गुणसूत्रांची रचना ) व रुग्णांचे आनुवंशिक घटक हे एकमेकांस अनुरूप असतील, तर प्रतिरोपण करताना दात्याच्या शरीरातील ऊतक नंतरच्या आश्रिताचे ( रुग्णाचे ) शरीर स्वीकार करते.

स्नेल यांचा जन्म ब्रॅडफर्ड, मॅसॅचूसेट्स येथे झाला. त्यांनी डार्टमथ महाविद्यालयातून पदवी (१९२६) आणि हार्व्हर्ड विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी (१९३०) संपादन केली. नंतर त्यांनी आनुवंशिकीविज्ञ हेरमान जोसेफ म्यूलर यांच्यासमवेत काम केले (१९३१—३३). १९३५ मध्ये त्यांनी बार हार्बर ( मेन ) येथील जॅक्सन प्रयोगशाळेत संशोधक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तेथेच ते वरिष्ठ शास्त्रज्ञ होते (१९५७—६९).

स्नेल यांनी बार हार्बर येथे उंदरांच्या आनुवंशिकीचे संशोधन सुरू केले आणि प्रतिरोपणाच्या आनुवंशिकीवर आपले संशोधन केंद्रित केले.ब्रिटिश आनुवंशिकीविज्ञ पीटर गोरर यांच्यासमवेत त्यांनी उंदरांमधील जनुकांचा ( जीन ) एक गट शोधून काढला. त्या गटाला त्यांनी एच-२ जनुकमिश्र असे म्हटले. स्नेल यांनी ऊतकरोपण स्वीकारले जाते किंवा नाही हे दर्शविणारी संज्ञा निर्माण केली. एच ’चा अर्थ हिस्टोकॉम्पॅटि-बिलिटी ( ऊतक-अनुरूपता ) असलेले जनुक, जे कोशिकांच्या पृष्ठभागावरील प्रथिनांना प्रेरित करतात, हे जनुक शरीराला स्वतःच्या कोशिका व बाह्य ( परक्या ) कोशिकांमधील फरक ओळखण्यात मदत करतात उदा., रोपण केलेल्या कोशिका किंवा संक्रमित सूक्ष्मजीव. या संशोधनाच्या परिणाम-स्वरूप सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांत सापडणारे मुख्य ऊतक अनुरूपता-मिश्र व आनुवंशिकी-मिश्र शोधण्यास मदत झाली, जे एच-२ जनुकमिश्रा ’च्या समदृश आहेत. या जनुकांच्या ओळख संशोधनामुळे ऊतक आणि अवयव यांचे यशस्वी प्रतिरोपण करता येणे शक्य झाले.

स्नेल यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी हा महत्त्वाचा ग्रंथ आहे (१९७६).

स्नेल यांचे बार हार्बर येथे निधन झाले.

पाटील, चंद्रकांत प.