स्टॅन्ली, वेंडेल मेरेडिथ : (१६ ऑगस्ट १९०४ — १५ जून १९७१). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी प्रथमच व्हायरस शुद्ध स्फटिक रूपात मिळविले आणि ते प्रथिन स्फटिकांचे बनले असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी व्हायरसांची रेणवीय संरचना सिद्ध करून दाखविली. १९४६ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक स्टॅन्ली व ⇨ जॉन हॉवर्ड नॉर्थ्रप यांना एकत्रितपणे अर्धे आणि ⇨ जेम्स बॅचलर सम्नर यांना अर्धे असे विभागून मिळाले. हे पारितोषिक शुद्ध रूपातील व्हायरस व एंझाइम [⟶ एंझाइमे ] निर्मिती केल्याबद्दल स्टॅन्ली व नॉर्थ्रप यांना आणि एंझाइम स्फटिकीकरणाच्या शोधाबद्दल सम्नर यांना देण्यात आले.
स्टॅन्ली यांचा जन्म रिजव्हिल ( इंडियाना ) येथे झाला. त्यांनी अर्लम महाविद्यालयाची बी.एस्सी. (१९२६), इलिनॉय विद्यापीठाची एम्.एस्. (१९२७) आणि पीएच्.डी. (१९२९) या पदव्या संपादन केल्या. सन १९३२—४८ या कालावधीत त्यांनी रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च ( आताचे नाव रॉकफेलर युनिव्हर्सिटी ) येथे संशोधन केले. त्यांनी १९३५ मध्ये तंबाखूवरील केवडा रोगाच्या व्हायरसाचे ( टोबॅको मोझॅइक व्हायरस, टीएमव्ही ) स्फटिक तयार केले. हे व्हायरस प्रथिन आणि न्यूक्लिइक अम्ल यांचे एकत्रित रेणू असून ते दंडाकार असतात. ट्रिप्सिन, ⇨ पेप्सीन या एंझाइमांचा व्हायरसावर होणारा परिणाम, निरनिराळ्या हायड्रोजन आयन संहतींना व्हायरसाच्या निष्क्रियतेची त्वरा आणि सु. १०० पेक्षा अधिक रासायनिक विक्रिया-कारकांचा व्हायरसाच्या संक्रामणावर होणारा परिणाम यांवर स्टॅन्ली यांनी संशोधन केले. अनेक व्हायरसांच्या काटेकोर ( परिशुद्ध ) रेणवीय संरचना आणि प्रसारणाच्या तर्हा निश्चित करण्यासाठी स्टॅन्ली यांनी क्ष-किरण विवर्तन पद्धतीचा वापर केला.
स्टॅन्ली बर्कली येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया या विद्यापीठात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि व्हायरस संशोधन प्रयोगशाळेचे संचालक होते (१९४८—७१). तेथे त्यांनी इन्फ्ल्यूएंझा व्हायरसावर अध्ययन केले आणि त्यावरील प्रतिबंधक लस विकसित केली.
स्टॅन्ली यांची १९४१ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेवर निवड झाली. त्यांना प्रेसिडेन्शियल सर्टिफिकेट ऑफ मेरिट, फ्रँक्लिन पदक (१९४८), अमेरिकन कॅन्सर सोसायटीचा पुरस्कार (१९५९) अशा प्रकारचे अनेक मानसन्मान मिळाले.
स्टॅन्ली यांचे सालामँका ( स्पेन ) येथे निधन झाले.
साळुंके, प्रिती म.