सोमना : (तेरावे-चौदावे शतक). श्रेष्ठ तेलुगू कवी. उत्तर हरिवंशाचा कर्ता म्हणून तो विशेष प्रसिद्ध. त्याच्या जीवनाविषयी आणि काळाविषयी फारशी माहिती मिळत नाही. ‘नाचन’ ह्या त्याच्या उपनामाविषयीही विविध मतभेद आहेत. त्याच्या जीवनकाळाविषयी बरीच मतमतांतरे असली, तरी सामान्यतः इ. स. १२८५-१३७६ या दरम्यान तो हयात असावा. ह्या विषयी स्थूलमानाने संदर्भ आढळतात. उत्तर हरिवंशाचा लेखनकाळही सु. १३३०-३६ असा दर्शविला जातो. विजयानगरच्या राजदरबारात तो राजकवी होता, अशीही माहिती मिळते. विजयानगरच्या बुक्क देवरायाने १३७६ मध्ये त्याला त्याच्या वाङ्मयीन कार्याच्या गौरवार्थ एक गाव दान केले होते, असे एका ताम्रपटावरून दिसून येते.

सोमनाने ⇨ तिक्कन्नपासून स्फूर्ती घेऊन आपली काव्यरचना केली. स्वतःला तिक्कन्नचा शिष्य म्हणवून घेण्यात त्याला धन्यता वाटत होती. आपले उत्तर हरिवंश हे तिक्कन्नच्या महाभारत कथेचेच पुढचे विस्तारित रूप असल्याचे त्याने म्हटले आहे. तिक्कन्नप्रमाणेच सोमनानेही आपला उत्तर हरिवंश हा काव्यग्रंथ हरिहरनाथाला अर्पण केला. सोमनाने एकूण पाच ग्रंथ लिहिले, असे मानले जाते : उत्तर हरिवंश, वसंत विलासमु, हरिविलास, आदिपुराण आणि हरविलास तथापि ह्यांपैकी उत्तर हरिवंश व वसंत विलासमु ह्या ग्रंथांविषयी माहिती मिळते. उर्वरित ग्रंथांविषयी फारशी माहिती मिळत नाही. उत्तर हरिवंश हा काव्यग्रंथ उपलब्ध आहे. संस्कृत हरिवंशाचे ते स्वैर भाषांतर आहे. उत्तर हरिवंशाचे सहा सर्ग असून प्रत्येक सर्ग एकेका कथेला वाहिलेला आहे. ह्या कथांत श्रीकृष्णाने केलेला नरकासुरवध, कृष्णाने ब्राह्मणाच्या मृत मुलाला दिलेला पुनर्जन्म, कृष्णाने कैलास पर्वतावर शंकराला दिलेली भेट आणि शंकराने त्याला दिलेला वर, कृष्णाने केलेला पौंड्रक वासुदेवाचा वध, शाल्व देशाचा राजा ब्रह्मदत्त ह्याचे पुत्र हंस आणि दिभक ह्यांची कथा आणि उषा व अनिरुद्ध यांचा विवाह ह्यांचा समावेश आहे. उत्तर हरिवंशामध्ये प्रबंध काव्यतंत्राच्या आद्य खुणा आढळतात, तर नंतरचे वसंत विलासमु हे प्रबंधरचनेचे परिपूर्ण उदाहरण आहे.

सोमनावर जरी तिक्कन्नचा प्रभाव असला, तरी त्याने स्वतःची स्वतंत्र काव्यशैली निर्माण केली होती. दैनंदिन व्यवहारातील साध्या शब्दांतून उदात्त भावनांचाही सहजाविष्कार त्याने घडविला. साध्या सर्वसामान्य कल्पनांना उच्च, उदात्त विचारांचा साज चढविण्यात त्याचे बौद्धिक कसब दिसून येते. कथांमधील नाट्यमय प्रसंग तो अत्यंत प्रभावीपणे उभे करतो. त्याच्या समर्थ कवित्वाचा आणि व्यासंगाचा सन्मान करण्यासाठी त्याला ‘सर्वज्ञ’ ह्या नावानेही संबोधिले जात असे.

कुलकर्णी, अ. र.