सोडालाइट : हे फेल्स्पॅथॉइड गटातील खनिज असून याचे स्फटिक घनीय वा सममापीय असतात [⟶ स्फटिकविज्ञान]. ⇨ पाटन : (011) स्पष्ट कठि. ५-५·६ वि. गु. २·१५-२.२० चमक काचेसारखी स्फटिक पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी रंग बहुधा निळा कधीकधी पांढरा, करडा, हिरवट निळा वा गुलाबी [ ⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. 3NaAISiO4.NaCI म्हणजे हे क्लोरीनयुक्त सोडियम ॲल्युमिनो-सिलिकेट आहे. हे हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळते व या विद्रावाच्या बाष्पीभवनानंतर मागे जिलेटिनी सिलिका रहाते. रंगावरून हे ओळखता येते.
सोडालाइटातील क्लोरिनाच्या जागी हायड्रॉक्सिल गट (OH) येऊन बनलेले हायड्रॉक्सी सोडालाइट, सल्फाइड व पाणी यांनी युक्त नोसेलाइट आणि सल्फाइडयुक्त व सोडियमाच्या जागी अंशत: कॅल्शियम येऊन बनलेले हॉयेनाइट हे सोडालाइट गटातील प्रकार आहेत. नोसेलाइट (नोसीयन) करडा, उदी वा निळा आणि गोलसर कणांची समाविष्टे असलेला प्रकार ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या द्रव्यांतील सामान्य घटक असतो. हॉयेनाइट (हॉयेन) हा पांढरा, करडा, निळा वा हिरवा प्रकार आहे. सोडालाइटाचा लॅझुराइट हा निळा प्रकार लॅपिस लॅझुली या खडकातील मुख्य घटक असतो. सल्फाइडाच्या जादा प्रतिष्ठापनामुळे याचा रंग गडद होतो. सोडालाइटाचा अनुस्फुरक (स्वयंप्रकाशी) गुलाबी प्रकार उन्हात उघडा पडल्यास त्याचा रंग विटून जाऊन तो पांढरा होतो. मात्र जंबुपार प्रकाशामुळे तो परत गुलाबी होतो.
सोडालाइट व्यापकपणे परंतु विरळा आढळणारे खनिज संपुंजित व जडवलेल्या कणांच्या रूपात आढळते. सिलिकेचे प्रमाण कमी असणाऱ्या नेफेलीनसायेनाइट, ट्रॅकाइट, फोनोलाइट यांसारख्या अल्कलाइन ज्वालामुखी व पातालिक खडकांत सोडालाइट हे खनिज नेफेलीन, ल्यूसाइट, कँक्रिनाइट इ. फेल्स्पॅथॉइड खनिजांबरोबर आढळते. सोडालाइट ब्रिटिश कोलंबिया, आँटॅरिओ, क्वीबेक येथे आढळते. इटलीतील व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीच्या लाव्ह्यात सोडालाइटाचे रंगहीन, पारदर्शक स्फटिक आढळतात. याचा निळा संपुंजित प्रकार अमेरिकेत आढळतो. कधीकधी मौल्यवान खडा म्हणून सोडालाइट वापरतात. याच्यात सोडियम असल्यामुळे याचे सोडालाइट हे नाव पडले आहे.
पहा : फेल्स्पॅथॉइड गट लॅझुराइट.
ठाकूर, अ. ना.