सैतान : (सेटन). सामान्यत: दुष्ट प्रवृत्तीचे, शक्तीचे एक अतिमानुष रूप म्हणजे सैतान, असे मानले गेले आहे. हिब्रू भाषेतील ज्या धातूवरून सैतान हा शब्द आला आहे, त्याचा अर्थ ‘ विरोध करणे ‘, ‘ कट करणे ‘ असा आहे. बायबलच्या ‘ जुन्या करारा ‘त सैतान ज्यांना विरोध करतो अशा तीन प्रकारच्या जिवांचा निर्देश आहे: (१) माणसे, (२) दैवी प्रवृत्तीचे देवदूत आणि (३) कोणी एखादा विशिष्ट प्रतिपक्षी. बायबलच्या ‘ नव्या करारा’त त्याला ‘ प्राचीन सर्प ‘ म्हटले आहे. बायबलमधल्या सृष्ट्युत्पत्तीच्या वर्णनात येणाज्या आदम आणि ईव्ह ह्यांच्या कथेचा संदर्भ सैतानाचे ‘ प्राचीन सर्प ‘ असे वर्णन करण्यामागे आहे. युफ्रेटीस आणि टायग्रिस ह्या नद्यांच्या दुआबात असलेल्या ईडन-नंदनवनात आदम हा आद्य पुरुष आणि ईव्ह ही आद्य स्त्री आणि आदमची सहकारी होती. तेथे सैतानही सर्परूपाने उपस्थित होता. त्याने ईश्वरी आदेश मोडून ह्या नंदनवनात असलेल्या आणि पाणपुज्याचे ज्ञान देणाऱ्या वृक्षाचे फळ खाण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे ईव्हने त्या फळाचा अर्धा भाग स्वत: खाल्ला आणि अर्धा भाग आदमला दिला. पण असे केल्यामुळे ईश्वरी आदेशाचा भंग होऊन मानवाच्या पापमय जीवनास आरंभ झाला.
ज्यू आणि ख्रिस्ती प्रभाव असलेल्या काही मिथ्यकथांत देव आणि सैतान ह्यांच्यातला विरोध दाखवलेला आहे. पाण्यात बुडी मारून मातीचा एक कण आणायला देव सैतानाला सांगतो. सैतान तो आणतो. हा मातीचा कण विस्तारून त्यातून जग तयार होते तथापि दिशा, डोंगरदऱ्या इ. निर्माण करून एकंदर भूमीची व्यवस्था कशी लावायची ह्याचे ज्ञान देवाला नसते. सैतानाला ते असते. देव युक्तीने ते मिळवतो आणि भूमीची व्यवस्था लावतो, अशी एक मिथ्यकथा आहे.
बुक ऑफ जॉबमध्ये सैतान हा परमेश्वराच्या दरबारात असतो आणि परमेश्वराच्या अनुज्ञेने जॉबची परीक्षा घेतो, असे दाखविलेले आहे. पवित्र धार्मिक ग्रंथांबाहेरील हिब्रू साहित्यात मात्र सैतानाचे दुष्टतेशी असलेले तादात्म्य अधिक तीव्र होत असल्याचे दिसते. येथे सैतान हा केवळ देवाचा विरोधकच नव्हे, तर भ्रष्ट देवदूतांचा नेता म्हणूनही समोर येतो. ज्यू धर्माच्या उत्तरकालीन अवस्थेत इतिहासविषयक एक दृष्टिकोण मांडला गेला. त्यानुसार इतिहासात दोन युगे असतात. सध्याच्या युगात सैतानाची सत्ता चालते आहे. ह्या युगाच्या अखेरीस ती संपेल आणि मग ईश्वराचे युग सुरू होईल. आणखी एक विचार म्हणजे ईश्वराचे राज्य आणि सैतानाचे राज्य ह्यांच्यातला विरोध वैश्विक स्वरूपाचा आहे. माणूस हा पापाने प्रभावित झालेला आहे तथापि अखेरीस ईश्वरी योजनेनुसार हा प्रभाव नाहीसा होईल, अशी धारणा प्रकट केलेली दिसते.
बायबलच्या ‘ नव्या करारा ‘तून सैतानाची जी वैशिष्ट्ये प्रकट झाली आहेत, ती थोडक्यात अशी : (१) सैतान हे दुष्टतेचे मूर्तिमंत रूप होय. (२) तो माणसांवर हल्ला करतो किंवा त्यांना झपाटून टाकतो. (३) तो माणसांना मोहात पाडून पाप करण्यास प्रवृत्त करतो. माणसांचा नाश करणे किंवा ईश्वराविरुध्दच्या लढाईत त्यांना सामील करून घेणे, हा असे करण्यामागचा त्याचा हेतू असतो. तथापि तो पाप्यांवर आरोप ठेवून त्यांना शिक्षा करतो, असेही एक वैशिष्ट्य ‘ नव्या करारा ‘त प्रकट झालेले आहे. (४) दुष्ट शक्ती, भ्रष्ट देवदूत, राक्षस ह्यांचे तो नेतृत्व करतो. (५) त्याने दुष्ट पिशाचांच्या बऱ्याच अवगुणांचे सात्मीकरण केले आहे. (६) देवाचे राज्य येईपर्यंत तो जगावर राज्य करील. त्याचे राज्य नष्ट होणे आणि देवाचे राज्य येणे ह्या घटनांच्या दरम्यान तो सतत ख्रिस्ताशी लढण्यात गुंतला असेल. मोह आणि मृत्यू यांच्याशी सैतानाची एकरूपता असल्याचे मानले आहे.
सैतानाचे नाव कुराणात शैतान असे येते. ज्यू आणि ख्रिस्ती धर्मातील सैतानाची काही वैशिष्ट्ये कुराणातील शैतानातही आहेत. उदा., माणसांना कुमार्गाला नेणे. इस्लाम धर्मात सैतानाला रइब्लिस असेही नाव आहे. आदमच्या समोर झुकायला त्याने नकार दिल्यामुळे त्याला इब्लिस म्हटले गेले.
ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माशी निगडित असलेल्या लोकविद्यांत सैतान महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. ज्यूंच्या पिशाचविद्येत आणि लोकविद्येत सैतानाचे साहचर्य काळोख, पाताळ, लैंगिक वा रतीमोह, बकरा, सिंह, बेडूक अशा विषयांशी जोडलेले दिसते. सृष्टी निर्माण झाल्यानंतर सहाव्या दिवशी सैतानाची निर्मिती झाली. ज्यू लोकांच्या बायबलला (जुना करार) पूरक असलेल्या टॅलमुड ह्या देवदूतांचा नेता मायकेल हा त्याचा प्रतिस्पर्धी होता. सैतान कोणताही आकार धारण करू शकतो, असे मानले जात होते तसेच सैतानाने ख्रिस्ती संतांना त्रास दिल्याचे निर्देश ख्रिस्ती संतचरित्रात आढळतात.
ख्रिस्ती धर्माच्या आरंभीच्या काळात असे मानले जात होते, की ख्रिस्ताच्या मरणामुळे मानवजातीची सैतानापासून सुटका झाली त्यामुळे सैतान आणि दुष्टता ह्यांवरील अंतिम विजय, ही कल्पना ख्रिस्ती धर्मात आहेच. ज्यू आणि पारसी धर्मांतही ती आहे.
सर्प हे सैतानाचे सर्वांत प्रसिध्द असे प्रतीक होय. निरनिराळ्या स्थळी सर्परूप सैतानाचे निर्देश आलेले आहेत. पण एका ज्यू संहितेत (ॲपोकॅलिप्स ऑफ मोझेस) मात्र ईव्हला मोहात पाडणारा सर्प हा सैतान नसून सैतानाने वापरलेले एक साधन होते असे म्हटलेले आहे. येथे सैतान हा एक तेजस्वी देवदूत म्हणून येतो आणि सर्पाला मोहात पाडून त्याच्या करवी ईव्हला मोहात पाडून तिला ज्ञानदात्या वृक्षाचे फळ खाण्यास व आदमलाही त्याचा काही भाग देण्यास प्रवृत्त करतो. आदम आणि ईव्ह ह्यांच्याबद्दल त्याच्या मनात असूया निर्माण झालेली असते, हे ह्याचे कारण. नंतरच्या काळातील सैतान आणि सर्प ह्या अनन्यता एकमेकांत मिसळून गेलेली दिसते किंवा त्यांचे एकमेकांशी निकटचे साहचर्य असल्याचे दर्शविले जाते. कुराणात सैतानाच्या संदर्भात सर्पाचा उल्लेख केलेला नाही पण कदाचित अरबी भाषेत शैतान ह्या शब्दाचा अर्थ सर्प असा असावा. एके काळी सैतान आणि माणसांच्या क्षुद्र वासना ह्या एकरूप मानल्या जात होत्या तथापि सैतान आणि सर्प ह्यांच्या साहचर्याचा अर्थ निरनिराळ्या प्रकारे कसा लावला गेला आहे हेही पाहण्यासारखे आहे. एक अर्थ असा, की सर्प हा लबाडी, कपटीपणा ह्या अवगुणांचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून त्याचे सैतानाशी साहचर्य असल्याचे मानले गेले आहे. मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोणांतून त्याचे साहचर्य विकास पावणाज्या लैंगिकतेशी आहे. जगद्विख्यात जर्मन महाकवी ⇨ गटे ह्याच्या ⇨ फाउस्ट ह्या नाट्यकाव्यात फाउस्ट आणि सैतान यांच्यात झालेला एक करार दाखविलेला आहे. विश्वाच्या अस्तित्वशययतेचे आद्य कारण आणि त्यामागील अंतिम हेतू जाणून घेण्याची इच्छा फाउस्टला असते. ती पूर्ण करण्याच्या धडपडीत तो सैतानाचे (ह्या नाट्यकाव्यात मेफिस्टॉफलीझ) साहाय्य घेतो. कराराच्या अटीप्रमाणे फाउस्ट आपला आत्मा सैतानापाशी गहाण ठेवतो आणि त्याचा गुलाम होतो. हे घडण्याआधी परमेश्वर आणि सैतान ह्यांच्यात परमेश्वराच्या दरबारात संभाषण होते. मुक्तीसाठी माणसाची चाललेली धडपड सैतानाला निरर्थक वाटते, तर जोपर्यंत माणसाची सदसद्बुध्दी जागी आहे, तोपर्यंत मुक्तीची द्वारे त्याला मोकळी आहेत, अशी परमेश्वराची भूमिका असते. सैतानाची भूमिका पूर्णपणे नकारात्मक असते.
सैतान हा सामान्यत: दुष्ट प्रवृत्तींचे प्रतीक समजला जात असला, तरी काही सकारात्मक संकल्पनाही त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. काही गूढवादी ज्ञानप्राप्तीसाठी सैतानाची पूजा करतात असे निर्देश आहेत. सुफी पंथाच्या परंपरेत सैतान हा कट्टर एकेश्वरवादी असल्याचे मानण्याकडे कधी कधी कल दिसतो. ईश्वराशिवाय कोणापुढेही तो नतमस्तक होत नाही. हिंदू धर्मात सैतानाची कल्पना नाही पण बौध्द धर्मात मार ह्या नावाने ती आहे. बुध्द ध्यानस्थ असताना त्याच्या मनात सत् आणि असत् प्रवृत्तींचा झगडा सुरू झाला. हे माराने बुध्दाच्या मनात चालू केलेले युध्द होते. त्यात सत्प्रवृत्तीचा विजय झाला. बौध्द चित्रकलेत चित्रित केला जाणारा हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.
कुलकर्णी, अ. र.