सेस्टोडा : प्लॅटिहेल्मिंथिस ( पृथुकृमी) संघातील अंतःपरजीवी प्राण्यांचा वर्ग. सेस्टोडा हे नाव सेस्टस या लॅटिन किंवा केस्टोस या ग्रीक शब्दापासून तयार झाले आहे. त्याचा अर्थ फितीसारखे शरीर असा आहे. या वर्गातील प्राणी फीतकृमी ( पट्टकृमी) या नावाने ओळखले जातात. या वर्गात सु. ३४०० जातींचा समावेश होतो. या वर्गाचे नाव पूर्वी सेस्टॉयडिया असे होते.

सेस्टोडा वर्गातील प्राण्याची वैशिष्ट्ये : (१) या वर्गातील सर्व प्राणी अंतःपरजीवी असून ते सर्वसामान्यपणे टेप वर्म या नावाने ओळखले जातात. (२) या प्राण्याचे शरीर लांब फितीसारखे असून ते लहान खंडांचे बनलेले असते. त्याची लांबी एक मिमी. पासून १०–१२ मी. पर्यंत असते. शरीरात ४ ते ४००० पर्यंत खंड असतात. (३) शरीराचे विभाजन पट्टकृमिशीर्ष, मान व खंडयुक्त शरीर अशा तीन भागांत करतात. (४) पट्टकृमिशीर्ष या भागावर चूषक व अंकुश असतात. त्यांचा उपयोग पोषकाच्या ऊतकांना (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचा समूह) चिकटण्याकरिता होतो. (५) शरीरावर जाड टेग्युमेंटचे आवरण असते. शरीरातील अवयवांच्या मधील जागेत मेसेंकाईमा किंवा पॅरेंकाईम ही ऊतके असतात. (६) पचन तंत्राचा अभाव असतो. (७) मानेतील फीत खंडित नसते, परंतु मानेतील फितीपासून नवीन खंड निर्माण होतात. खंडयुक्त भागास शंकू म्हणतात. शंकूतील शेवटचा खंड हा सर्वांत जुना व मानेच्या मागील बाजूचा प्रथम खंड हा सर्वांत अलीकडचा असतो. (८) उत्सर्जन तंत्रात नलिकाची एक जोडी, त्यास शाखा ( फाटे) व शाखांच्या टोकास ज्वाला कोशिका असतात. (९) तंत्रिका तंत्रात गुच्छिकायुक्त तंत्रिका वलय व तंत्रिका रज्जूच्या तीन जोड्या असतात. ज्ञानेंद्रिये नसतात. (१०) या वर्गातील प्राणी उभयलिंगी असून शंकूतील प्रत्येक खंडात उभयलिंगी जनन तंत्र असते. सर्वसाधारणपणे अंडी स्वयंफलनाने फलित होतात. त्यापासून डिंभ तयार होतो. (११) या प्राण्यांचे जीवनचक्र गुंतागुंतीचे असते, त्यात एक किंवा दोन अपृष्ठवंशी अगर पृष्ठवंशी पोषक असतात.

वर्गीकरण : या प्राण्यांची विभागणी सेस्टोडेरिया (मोनोझोआ) व युसेस्टोडा ( मिरोझोआ) या उपवर्गांत केली जाते.

सेस्टोडेरिया : या उपवर्गातील प्राणी पानाच्या आकाराचे असून ते मत्स्याच्या वा पृष्ठवंशी प्राण्याच्या देहकोशात किंवा आंत्रात अंतःपरजीवी म्हणून राहतात. या प्राण्याच्या शरीरात पट्टकृमिशीर्ष व खंडयुक्त शरीर नसते (प्राण्याच्या शरीराचे विभाजन होत नाही). या प्राण्यामध्ये एकाच प्रकारचे जनन अवयव असतात. त्याच्या डिंभास लायकोफोअर म्हणतात. त्यास १० अंकुश असतात. या उपवर्गात तीन गणांचा समावेश होतो.

अँफिलिनिडिया : या गणातील प्राण्यांना चूषक नसतात. शुंड ( सोंड) बाहेरील बाजूस येणारी असते. शुंड व ललाटीय ग्रंथी अग्रीय भागात असतात. नर व मादी यांची जननछिद्रे शरीराच्या पश्‍च भागात असतात. गर्भाशय वलयाकृती असते. बहुतेक प्राणी मत्स्याच्या शरीरात अंतःपरजीवी म्हणून राहतात. उदा., अँफिलिना.

गायरोकॉटिलिडिया : या गणातील प्राण्यांना अग्रीय भागात बाहेरील बाजूस येणारे शुंड व कपाच्या आकाराचे चूषक असते. शरीराच्या पश्‍च भागात गुच्छाकृती अवयव असतात. त्यांचा उपयोग पोषकाच्या ऊतकांना चिकटून राहण्यासाठी होतो. गर्भाशय सरळ असून ते जननछिद्रात उघडते. नर व मादी यांची जननछिद्रे शरीराच्या वरच्या अर्ध्या भागात असतात. हे प्राणी कायमीरॉइड मत्स्याच्या शरीरात अंतःपरजीवी म्हणून राहतात. उदा., गायरोकॉटिल.

बायपोरोफायलिडिया : या गणातील प्राण्यांच्या अग्रीय भागात शुंड असते. नर व मादी जननछिद्रे अलिंदामध्ये उघडतात. गर्भाशय पिशवीसारखे असते. हे प्राणी शार्क माशाच्या आंत्रात ( आतड्यात) अंतःपरजीवी म्हणून राहतात. उदा., बायपोरोफायलीयस.

युसेस्टोडा : या उपवर्गातील प्राणी अंतःपरजीवी असून ते मत्स्याच्या शरीरात राहतात. या प्राण्याचे शरीर लांब फितीसारखे असते. शरीराचे विभाजन पट्टकृमिशीर्ष, मान व खंडयुक्त शरीर अशा भागांत होते. पट्टकृमिशीर्षावर पोषकास चिकटून राहण्यासाठी चूषक असतात. जनन अवयवाचे एकापेक्षा अधिक संच असतात. डिंभास सहा अंकुश असतात. या उपवर्गात संशोधकांनी अनेक गण निर्माण केले आहेत. त्यातील महत्त्वाच्या गणांचा समावेश येथे केला आहे.


टेट्राफायलिडिया : या गणातील प्राणी इलॅस्मोब्रँक मत्स्याच्या आंत्रात राहतात. पट्टकृमिशीर्षावर ऊतकास घट्ट चिकटण्यासाठी चार बोथ्रिडीया ( चूषक बिंब) असतात. काही वेळा त्यावर अंकुश असतात. वृषण हे अंडाशयाच्या पुढील बाजूस असते. जनन अलिंद एका बाजूस असते. पीतक ग्रंथी पसरट असतात. उदा., फायलोबोथ्रियम, अकॅथोबोथ्रियम.

डायफायलिडिया : या गणातील प्राणी इलॅस्मोब्रँक मत्स्याच्या आंत्रात राहतात. पट्टकृमिशीर्षावर ऊतकास दोन बोथ्रिडीया व अंकुश असतात. शरीरात २० पेक्षा कमी खंड असतात. पीतक ग्रंथी पसरट असतात. उदा., इकिनोबोथ्रियम.

ट्रायपॅनोरिंका : या गणातील प्राणी इलॅस्मोब्रँक मत्स्याच्या आंत्रात राहतात. ते मध्यम आकाराचे प्राणी आहेत. पट्टकृमिशीर्षावर ऊतकास घट्ट चिकटणारे चार बोथ्रिडीया व चार स्पर्शकासारखे अंकुश असतात. पीतक पसरट असून ते स्नायू ऊतकास असते. वृषण पसरट असून ते अंडाशयाच्या खाली आलेले असते. उदा., टेट्रारिंकस, ग्रायलोटीया.

स्युडोफायलिडिया : या गणातील प्राणी टेलोस्ट मत्स्य व सरीसृप प्राणी यांच्या आंत्रात राहतात. शरीर खंडित किंवा अखंडित असते. पट्टकृमि-शीर्षावर २ ते ६ बोथ्रिडीया असतात. बऱ्याच प्राण्यांत चूषक अवयव नसतात. अंडाशय दोन भागांत विभाजित झालेले असते. वृषण असंख्य असून ते खंडाच्या कोशिकांत पसरलेले असतात. पीतक असंख्य असतात. जननछिद्र मध्य-अधर असते. उदा., बोथ्रिकोसेफॅलस, डायबोथ्रिकोसे-फॅलस.

टीनिओडिया किंवा सायक्लोफायलिडिया : या गणातील प्राणी सरीसृप, पक्षी व सस्तन प्राण्यांच्या आंत्रात राहतात. ते आकाराने मोठे असतात. पट्टकृमिशीर्षावर चार मोठे चूषक असून त्याभोवती अंकुश असतात. अंडाशयात दोन किंवा अधिक भाग असतात. गर्भाशयास छिद्र नसते. जननछिद्रे दोन्ही बाजूंस कडांवर असतात. उत्सर्जन तंत्रात चार उभट नलिका असतात. पीतक ग्रंथी एकच असते. उदा., टीनिया, इकिनो-कॉकस, मोनिशिया.

सेस्टोडा प्राणी व मानवी रोग : या प्राण्यांमुळे होणाऱ्या रोगास सेस्टोडायासिस असे म्हणतात. त्याचे दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

(१) टीनिॲसिस रोग : हा रोग टीनिया ( पट्टकृमी) या प्रजातीमुळे होतो. त्यामध्ये टीनिया सेलियम ( पोर्क टेप वर्म) व टीनिया सॅजिनाटा (बीफ टेप वर्म) यांचा समावेश होतो. सिस्टिसर्साय असणारे जनावरांचे कच्चे मांस वा कमी शिजविलेले मांस खाल्ल्यास टीनिॲसिस हा रोग मानवास होतो. मानवी आतड्यामध्ये सिस्टिसर्साय विकसित होऊन त्यापासून पट्टकृमी तयार होतात.

मानवात पट्टकृमीमुळे आतड्याचे रोग होतात. काही रुग्णांमध्ये भुकेची वेदना निर्माण होते. पांडु रोग ( ॲनिमिया) होतो. ॲटेब्रीन किंवा क्विनॅक्रीन हायड्रोक्लोराइड या औषधाचा वापर या रोगावर केला जातो. हा रोग होऊ नये यासाठी व्यवस्थित शिजविलेले प्राण्यांचे मांस खाण्यासाठी वापरावे.

(२) हायडॅटिड रोग : हा रोग हायडॅटिड पट्टकृमीमुळे होतो. त्यामध्ये इकिनोकॉकस ग्रॅन्युलोसस याचा समावेश होतो. हा पट्टकृमी सुरुवातीस कुत्र्याच्या शरीरात राहतो व त्याच्या आतड्यात अंडी घालतो, ती अंडी मलाबरोबर बाहेर टाकली जातात. या अंड्यांपासून आँकोस्फिअर तयार होतात. दूषित अन्न वा पाण्याद्वारे हे आँकोस्फिअर मानवी शरीरात प्रवेश करतात. मानवाच्या शरीरात यकृत, फुप्फुस वा ऊतकामध्ये त्यांचा विकास होतो व पट्टकृमी तयार होतात. यामुळे ऊतकाचा दाह ( शोथ) होतो. मेंदू वा वृक्कामध्ये आँकोस्फिअर पुटीचा (सिस्टचा) प्रवेश झाल्यास तो जीवास धोकादायक असतो. टीनिॲसिस रोगावरील औषधे या रोगाच्या उपचारा-साठी वापरतात.

पहा : पट्टकृमी प्लॅटिहेल्मिंथिस.

संदर्भ : 1. Jorden, E. L. Verma, P. S. Invertebrate Zoology, New Delhi, 2007.

            2. Kotpal, R. L. Helminthes, Meerut, 1991.

इनामदार, ना. भा. पाटील, चंद्रकांत प.