सेल्सस, ऑलस (ऑरिलिसस) कॉर्नीलिअस : (इ. स. पहिले शतक). वैद्यकाविषयीचे लेखन करणारे एक सर्वांत थोर रोमन लेखक. त्यांनी कृषी, युध्दकला, वक्तृत्व कला, तत्त्वज्ञान, विधी व वैद्यक हे विषय असलेला आठ खंडांचा विश्वकोश संकलित केला होता (सु. इ. स. ३०). यांपैकी केवळ वैद्यकाविषयीचे लेखन टिकून राहिलेले आढळते. या वैद्यकीय भागाचे शीर्षक ‘डी मेडिसिना’ असे असून हे वैद्यकाविषयीचे सर्वांत सुंदर असे अभिजात लेखन मानले जाते. मात्र त्यांच्या हयातीत या लेखनाकडे इतर समकालिनांनी दुर्लक्षच केले होते. पोप निकोलस पाचवे (१३९७–१४५५) यांनी हा भाग शोधून काढला. मुद्रणाचा शोध लागल्यानंतर छापून प्रसिध्द झालेला हा पहिला वैद्यकीय ग्रंथ आहे (१४७८).
सेल्सस यांच्या लेखनातील सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे त्या काळातील वैद्यकीय व्यवसायाची असलेली प्रगत अवस्था ही होय. ते स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही होते. शिवाय ते जखमा धुवून स्वच्छ करण्यास सांगत आणि त्यांवर व्हिनेगार किंवा थाइम तेल (थायमस व्हल्गॅरिस या वनस्पतीच्या फुलांतील तेल) लावायला सांगत असत. ही द्रव्ये काहीशी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) गुणधर्माची असल्याचे नंतर माहीत झाले. शरीराच्या दुसऱ्या भागावरील त्वचा वापरून चेहऱ्यावर रोपण शस्त्रक्रिया (प्लॅस्टिक सर्जरी) करण्याविषयीचे वर्णन त्यांनी ग्रंथात दिले आहे. ताप (गरम स्पर्श), वेदना, तांबुसपणा व सूज ही शोथाची (दाहयुक्त सुजेची) चार आधारभूत लक्षणे त्यांनी निश्चित केली होती. विविध विकारांवरील उपचारांच्या गरजेनुसार त्यांनी या माहितीची आहारविषयक औषधी आणि शस्त्रक्रियाविषयक अशी विभागणी केली होती. या विवेचक ग्रंथात हृदयविकार, बुध्दिभ्रष्टता व धमनीतून होणारा रक्तस्राव थांबविण्यासाठी बंधनाचा वापर करणे यांचा उल्लेख प्रथमच आलेला आढळतो. तसेच त्यामध्ये त्यांनी जलचिकित्सा व पित्ताशय वा मूत्राशय यातील अश्मरी (खडे) काढण्यासाठी करण्यात येणारे पार्श्व अश्मरीभंजन यांचे उत्कृष्ट वर्णन दिले आहे. या विश्वकोशाच्या ऐतिहासिक विभागाचे महत्त्व खूप आहे. हेलेनिस्टिक (ग्रीकांश) वैद्यक आणि आलेक्झांड्रियन शारीर व शल्यचिकित्सा यांविषयीची पुष्कळ माहिती मुख्यत्वे किंवा पूर्णपणे या ग्रंथातून आलेली आहे. हलणारे दात तारेने बांधून घट्ट करणे, अस्थिभंगावर योग्य रीतीने उपचार करणे, शस्त्रक्रियेनंतर अवयवाचे कार्य पूर्वपदावर आणण्यासाठी करावयाचे व्यायाम इत्यादींविषयीची तपशीलवार उपयुक्त माहिती यात आहे. यावरून त्या काळात वैद्यकात झालेल्या प्रगतीची कल्पना येते. हा विश्वकोश तयार करण्यासाठी त्यांनी अनेक क्षेत्रांविषयी उपलब्ध ग्रीक भाषेतील माहितीचा लॅटिन भाषेत अनुवाद केला. त्यासाठी त्यांनी प्रथम ग्रीक संज्ञांसाठी रोमन (लॅटिन) प्रतिशब्द तयार केले होते. हे त्यांचे पारिभाषिक शब्द पुढील सु. २,००० वर्षे यूरोपमध्ये वैज्ञानिक भाषेत प्रचलित होते. सेल्सस हे ॲस्क्लेपियन पंथाचे (ॲस्क्लेपिअस या वैद्यकाच्या ग्रीक देवतेवरून पडलेला पंथ) अभिमानी होते. मात्र त्यांनी हिपॉक्राटीझप्रणीत वैद्यकाचेही सखोल अध्ययन केले होते. सेल्सस रोमचे रहिवासी होते, तेथेच त्यांचे निधन झाले.
पाटील, चंद्रकांत प.