सेलेेम – १ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ऑरेगन राज्याची राजधानी आणि मॅरीअन कौंटीचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,३६,९२४ (२०००). विलेमिट नदीकाठी वसलेले हे शहर पोर्टलंडच्या नैर्ऋत्येस ६९ किमी.वर आहे. हे नदीबंदर म्हणूनही प्रसिद्ध आहे. हे विलेमिट नदीखोऱ्यातील व्यापारी व वस्तुनिर्माण केंद्र आहे. जेसन ली या मेथडिस्ट धर्मप्रसारकाने येथे १८४० मध्ये प्रथम वसाहत केली.
१८५१ मध्ये सेलम शहरास ऑरेगन प्रांताच्या राजधानीचा दर्जा देण्यात आला. अगदी अल्पकाळ राजधानीचे ठिकाण कॉर्व्हालस येथे हलविण्यात आले. मात्र पुन्हा १८६४ मध्ये जनमताचा कल लक्षात घेऊन ऑरेगन राज्याची राजधानी म्हणून सेलम शहरास राजधानीचा कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला. नदी बंदराबरोबरच १८७० मध्ये लोहमार्गाची सुविधा उपलब्ध झाल्याने उद्योगधंदे भरभराटीस आले. येथे अन्नप्रक्रिया, कापड, लाकूड, लाकडी वस्तू, कागद. रंग, रबर, टायर्स, विद्युत्साहित्य इत्यादी उद्योग विकसित झालेले आहेत.
येथे विलेमिट विद्यापीठ आहे. येथील मेथडिस्ट चर्च (१८४१), बुश हाऊस (१८७७-७८), स्टेट कॅपिटॉल (१९३७), विल्सन पार्क, पायोनियर संग्रहालय, यागुना उपसागरावरील दीपगृह इत्यादी पर्यटकांची आकर्षणे आहेत.
गाडे, ना. स.