सेलेंगा : मंगोलिया प्रजासत्ताक व आग्नेय रशियातून वाहणारी एक नदी. लांबी १,४४४ किमी. जलवहन क्षेत्र ४,४८,००० चौ. किमी. मंगोलियाच्या वायव्य भागातील खांगाई पर्वतश्रेणीत उगम पावणाऱ्या मूरेन व ईडेर या दोन नद्यांच्या संगमानंतरचा संयुक्त प्रवाह सेलेंगा नावाने ओळखला जातो. सेलेंगा प्रथम पूर्वेस व त्यानंतर ईशान्येस वहात गेल्यानंतर सखे बाटोरजवळ तिला ऑर्कॉन नदी मिळते. सखे बाटोरपासून उत्तरवाहिनी होऊन ती रशियात प्रवेश करते. रशियातील बुर्यात प्रजासत्ताकाची राजधानी असलेल्या ऊलान ऊडेजवळून काही अंतर वहात गेल्यानंतर ती पश्चिमवाहिनी बनून पुढे बैकल सरोवराला मिळते. तिच्या मुखाशी निर्माण झालेल्या त्रिभुज प्रदेशाचा विस्तार काबान्स्कपर्यंत आहे. मंगोलियातील ऑर्कॉन, हॅन्यू व एगीन तर रशियातील चीकॉई, खीलॉक, उडा, जीड व ट्येमनिक या सेलेंगाच्या प्रमुख उपनद्या आहेत.

पीकिंग–ऊलान बाटोर–ऊलान ऊडे ह्या लोहमार्गाचा सखे बाटोर ते ऊलान ऊडे हा मार्ग सेलेंगा नदीला समांतर गेलेला आहे. तसेच ट्रान्स–सायबेरियन लोहमार्गाचा ऊलान ऊडेच्या पुढील काही मार्गही या नदीला समांतर आहे. मे–ऑक्टोबर या कालावधीत सेलेंगाचा प्रवाह हिममुक्त असतो. त्यामुळे त्या काळात मुखापासून ते सखे बाटोरच्या वरपर्यंत तिच्या प्रवाहातून जलवाहतूक होत असते. ऊलान ऊडे हे या नदीकाठावरील महत्त्वाचे नदीबंदर, लोहमार्ग स्थानक व औद्योगिक शहर आहे. प्राचीन मंगोल साम्राज्याची राजधानी काराकोरम ही ऑर्कॉन नदीच्या वरच्या खोऱ्यात वसली होती.

चौधरी, वसंत