सेंट लूइस – २ : आफ्रिकेतील सेनेगल देशाचे प्रमुख शहर, बंदर व देशाची जुनी राजधानी. लोकसंख्या १,७६,००० (२००५ अंदाज). हे देशाच्या वायव्य भागात डाकारच्या ईशान्येस १७७ किमी. अटलांटिक महासागरापासून आत २५ किमी. सेनेगल नदीमुखाशी असलेल्या लहान बेटावर वसलेले आहे. हे मुख्य भूमीशी पुलाद्वारे जोडण्यात आलेले असून १८८५ मध्ये लोहमार्गाने डाकारशी जोडण्यात आले आहे.
फ्रेंच व्यापाऱ्यांनी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर १६३८ मध्ये व्यापारी तळ म्हणून हे वसविले. १६५९ मध्ये येथे किल्ला बांधण्यात आला. फ्रेंच राजा चौदावा लूई याच्या नावावरून याचे सेंट लूइस असे नामकरण करण्यात आले. फ्रेंचांची पश्चिम आफ्रिकेतील पहिली कायमस्वरूपी वसाहत म्हणून यास महत्त्व प्राप्त झाले. गुलामांच्या व्यापारामुळे हे प्रसिद्धीस आले होते. १७५८—७९ व १८०९—१५ हा ब्रिटिशांच्या आधिपत्याचा कालावधी वगळता येथे फ्रेंचांचा अंमल होता. येथे सेनेगलची १७८०—१९५८ व नजीकच्या मॉरिटेनियाची १९२० ते १९५८ पर्यंत राजधानी होती. तसेच फ्रेंच वेस्ट आफ्रिका फेडरेशनची १८८५—१९०२ पर्यंत पहिली राजधानी येथे होती. मासेमारी, मांसप्रक्रिया, कातडी कमावणे हे येथील प्रमुख व्यवसाय असून कातडी आणि शेतमालापैकी भुईमूग यांची येथून निर्यात होते.
राऊत, अमोल