सेंट लूइस – १ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मिसूरी राज्यातील प्रमुख शहर व देशातील महत्त्वाचे नदीबंदर. लोकसंख्या ३,१८,१७२ (२०१२). हे मिसिसिपी व मिसूरी नद्यांच्या संगमाच्या दक्षिणेस १६ किमी.वर मिसिसिपी नदीच्या डाव्या किनाऱ्यावर वसलेले आहे. हे वस्तुनिर्माण, व्यापार, शिक्षण, संस्कृती व दळणवळणाचे केंद्र असून लोहमार्ग, महामार्गांनी राज्यातील व देशातील मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
शहराचा विस्तार १५८ चौ. किमी. आहे. फ्रेंच समन्वेषक झाक मार्केत व ल्वी झॉल्ये हे १६७३ मध्ये मिसिसिपी नदी समन्वेषणाच्यावेळी येथे आले होते. न्यू ऑर्लीअन्सचा फ्रेंच व्यापारी पीअर लक्लीड व ॲग्यूस्ट शूटो यांनी १७६४ मध्ये फरचे व्यापार केंद्र म्हणून हे वसविले. ही जागा स्पॅनिश प्रदेशात होती. फ्रेंच राजा नववा लूई याच्या स्मरणार्थ याचे सेंट लूइस असे नामकरण करण्यात आले. १८०० मध्ये हे फ्रेंचांच्या व १८०३ पासून अमेरिकेच्या आधिपत्याखाली आले. हे १८०५ मध्ये लुइझिॲना प्रदेशाचे प्रशासकीय ठिकाण, तर १८०५ ते १८२१ पर्यंत मिसूरी प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण होते. १८१७ पासून येथे वाफेवर चालणाऱ्या एंजिन बोटींचा वापर सुरू झाला व प्रमुख नदीबंदर म्हणून याची भरभराट झाली. १८५० पासून येथे लोहमार्गाची सुविधा प्राप्त झाली. एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या चार दशकांत फर व्यापाराचे हे प्रमुख केंद्र बनलेले होते. अमेरिकेच्या यादवी युद्धात या शहरात लष्करी कायदा लागू करण्यात आला होता.
लोहमार्ग, रस्ते, आरोग्य सुविधा, संदेशवहन, हवाई वाहतूक, शैक्षणिक सुविधा, वित्त व्यवस्था यांचे या शहराच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. फर व्यापाराचे केंद्र म्हणून उदयास आलेले हे शहर प्रमुख औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे. येथे कातडी वस्तू, बूट, रसायने, मोटार गाड्या, विविध प्रकारची वाहतूक साधने, मद्य व बीर इ. निर्मिती तसेच धातू व अन्न प्रक्रिया इ. उद्योग भरभराटीस आलेले आहेत. मॅक्डोनल डग्लस कॉर्पोरेशन ही येथील औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून हिच्यामार्फत जेट तसेच इतर नागरी वाहतुकीची विमाने, क्षेपणास्त्रे व साहित्य इ. ची निर्मिती करण्यात येते. येथे १९०४ मध्ये विविध वस्तूंच्या खरेदीसाठी लूइस वर्ल्ड फेअर आयोजित केली होती. तसेच याचवर्षी येथे आयोजित केलेल्या ऑलिंपिक क्रीडा सामन्यांमुळे या शहराकडे जगाचे लक्ष वेधले गेले.
येथे अनेक उच्च शिक्षण संस्था असून त्यांमध्ये सेंट लूइस विद्यापीठ (१८१८), वॉशिंग्टन विद्यापीठ (१८५३), सेंट लूइस औषध निर्माण महाविद्यालय, मिसूरी विद्यापीठ, हॅरिस स्टो राज्य महाविद्यालय, मेरिव्हिले महाविद्यालय, वेबस्टर महाविद्यालय प्रमुख आहेत. येथील सेंट लूइस मर्कंटाइल लायब्ररी असोसिएशनचे ग्रंथालय व सेंट लूइस विद्यापीठाचे ग्रंथालय प्रसिद्ध आहे. येथील सेंट लूइस सिंफनी ऑर्केस्ट्रा हा सर्वांत जुना वाद्यवृंद आहे. शहरात अनेक संगीतशाळा व नाट्यसंस्था आहेत.
शहराच्या जेफरसन राष्ट्रीय स्मारकामधील सेंट लूइस याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेली पोलादी कमान प्रसिद्ध आहे. १९२ मी. उंचीच्या या कमानीचा आकृतिबंध एरो सारिनेन या प्रसिद्ध रचनाकाराने केलेला असून या कमानीला ‘गेट वे टू द वेस्ट’ म्हणून ऐतिहासिक महत्त्व आहे. याशिवाय येथील ओल्ड कॅथीड्रल, ओल्ड कोर्ट हाउस (सांप्रत संग्रहालय), फॉरेस्ट पार्कमधील कला संग्रहालय, ऐतिहासिक संग्रहालय, सेंट लूइस प्राणी संग्रहालय, ॲलो प्लाझातील कार्ल मिल्स कारंजे, यूजेन फिल्ड कवीचे बालपणीचे घर (सध्या खेळण्यांचे संग्रहालय), पारंपरिक जपानी पद्धतीचे मिसूरी वनस्पतिउद्यान, मिसूरी स्टेट कॅपिटॉल इत्यादी पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.
राऊत, अमोल
“