सैंध वी घु म ट : मुख्यतः पृष्ठभागाखाली असणारी ही संस्तरभेदी भूवैज्ञानिक संरचना (राशी) आहे. तिच्यात मध्यभागी व समान मिती असलेला स्फटिकरुप सैंधवाचा (हॅलाइट व इतर बाष्पजनित खनिजांचा) उभा व दंडगोलाकार गट्टा (गुडदी) गाभ्याच्या रुपात असतो. सैंधवी घुमटाचा व्याप १ किमी. वा अधिक असून तो खडकांच्या क्षितिजसमांतर किंवा तिरप्या थरांमध्ये घुसलेला असतो. व्यापक किंवा स्थूल अर्थाने या संज्ञेत सैंधवाचा किंवा लवणाचा गाभा, त्याच्या भोवतीचा विरुपित गाळाचा वेष्टण-कोश आणि गाभ्यामुळे घुमटकार रुप प्राप्त झालेले खडकांचे थर यांचा अंतर्भाव होतो. लवण हा मुख्य घटक असलेल्या यासारख्या भूवैज्ञानिक संरचनांमध्ये लवण (सैंधवी) उश्या व लवण भित्ती येतात. लवण उशी ही भ्रूणावस्थेतील सैंधवी घुमट असून ती तिच्या स्रोतस्तरापासून रुंद उंचवट्याच्या रुपात वर येत असते व बरीच खोलवर असते. लवण भित्ती ही सैंधवी घुमटासारखी संरचना असली, तरी तिचा लवणी गाभा रेषीय स्वरुपाचा असतो. या संरचना सैंधवी घुमटांशी व सैंधवी उद्वलींशी (विमुखनतींशी) जननिक रीत्या निगडित असतात. सैंधवी उद्वली म्हणजे वरच्या दिशेत स्थानांतरित होणाऱ्या लवणाने भेदलेले घडीचे खडक असतात. लवणी खोड वा स्कंध ही गट्ट्यासारखी व लवणाची काहीशी परिपूर्ण संस्तरभेदी संरचना असून ती वरच्या खडकांच्या थरांना भेदून वर आलेली असते. बहुतेक लवणी स्कंध १ ते १० किमी. व्यापाचे (रुंद) व उंच असतात. सैंधवी घुमट, स्कंध किंवा जिव्हा यांच्या संमीलनातून तयार झालेल्या लवणी मंडपी (छत्रे) ३०० किमी. पेक्षा रुंद असू शकतात. अशा सर्व भूवैज्ञानिक संरचनांना संस्तरभेदी संरचना म्हणतात. त्यांत आलेले सर्व द्रव्य हे सभोवतालच्या खडकांना भेदून वर आलेले असते. द्रव्याचे वरील दिशेतील हे स्थानांतरण (घुसण्याची क्रिया) गुरुत्वीय प्रेरणा, भूसांरचनिक प्रेरणा किंवा या दोन्ही प्रकाराच्या प्रेरणांमुळे होते, असे मानतात. वजनाला हलक्या खडकांवर सापेक्षतः जड खडकांचा थर असल्यास हलके खडक घनतेतील फरकामुळे दुधावरील मलईप्रमाणे वर येतात. भूसांरचनिक प्रेरणांद्वारे [विशेषतः भूकवचातील विरुपणास कारणीभूत असणाऱ्या प्रेरणांद्वारे → भूपट्ट सांरचनिकी] कमी चलनशील असलेल्या द्रव्यातील पार्श्विक दाबामुळे चलनशील द्रव्य अक्षरशः दाबले जाते व घुसते.

फक्त गुरुत्वीय दाबाने थेट स्तरित सैंधवापासून अभिजात (सर्व-सामान्य) सैंधवी घुमट तयार होतात. सैंधवी उद्वली व सैंधवी भित्ती यांच्यापासूनीही ते विकसित होऊ शकतात. या दुसऱ्या प्रकारच्या निर्मितीमध्ये मुळात भूसांरचनिक दाबाने विकसित झालेल्या सैंधवी राशींवर गुरुत्वीय दाब अध्यारोपित होऊन (वर लावला जाऊन ) सैंधवी घुमट विकसित होतात.

भौतिकीय गुणवैशिष्ट्ये : सैंधवी घुमटात सामान्यपणे त्याचा गाभा व त्याच्या भोवतीच्या खडकांच्या थरांचे बाह्य आवरण असते. काही ठिकाणी गाभ्यात लवणांशिवाय आवरण शिला व आवरण (कोश) असू शकतात.

नमुनेदार सैंधवी घुमटाचे आवरण शिला व आवरण यांच्यासह असलेले आकारमान पुष्कळ वेगवेगळे असते. बहुधा सैंधवी घुमटाचा व्यास १ किमी. असून तो १० किमी. पेक्षा अधिक उंच असू शकतो. नमुनेदार सैंधवी घुमटाची पृष्ठाखालील उंची किमान २ किमी. असते आणि काहींची उंची १० किमी. पेक्षा अधिक असते.

संघटन व स्वरुप : सैंधवी घुमट मुख्यत्वे सैंधवाचे (NaCl) बनलेले असून ॲनहायड्राइट (CaSO4) व जिप्सम (CaSO4.2H2O), अधिक विरळपणे सिल्व्हाइट (KCl) व कार्नेलाइट (KCl.MgCl2.6H2O) आणि पोटॅशियमाची इतर खनिजे, तसेच मॅग्नेशियमाचे सल्फेट व क्लोराइड या बाष्पजनित खनिजांचे पातळ थर असतात. यातील अबाष्पजनित द्रव्यांमध्ये विखुरलेल्या कणांपासून ते संपुंजित, शिलारसात गुरफटलेले खडकांचे तुकडे असलेल्या व ४ किमी. पर्यंत रुंदीच्या राशींपर्यंतची द्रव्ये असतात. सैंधव पाण्यात अति विद्राव्य खनिज असले, तरी इराण, ओमान व पाकिस्तान येथील सैंधवी घुमटांमध्ये ८० कोटी वर्षांपूर्वीचे सैंधव टिकून राहिलेले आढळते.

भूपृष्ठाखाली भूमिजलाने होणाऱ्या विलयनामुळे घट्ट झालेला अवशेष मागे राहतो. त्याला टोपण शिला (आच्छादक शैल) म्हणतात. टोपण शिला सैंधवी घुमटाच्या माथ्यावर व स्कंधांवर पसरते. अवशिष्ट ॲनहायड्राइटामुळे वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक विक्रिया होतात. या विक्रियांमध्ये पाणी, हायड्रोकार्बने व सूक्ष्मजंतू सहभागी असतात. या विक्रियांमधून जिप्सम, कॅल्साइट, गंधक व लोखंडाचे सल्फाइड, जस्त, शिसे व बेरियम ही द्रव्ये तयार होतात.

उत्तर अमेरिकेच्या गल्फ कोस्ट (आखाती किनारा) येथील सैंधवी घुमटांचे गाभे जवळजवळ शुद्घ हॅलाइटाचे (सैंधवाचे) आहेत. त्यांच्यामध्ये ॲनहायड्राइट गौण प्रमाणात व इतर खनिजे लेशमात्र आहेत. पांढऱ्या शुद्घ हॅलाइटाच्या थरांमध्ये काळे हॅलाइट व ॲन-हायड्राइट यांचे थर अंतःस्तरित झालेले आढळतात. जर्मनीमधील सैंधवी घुमटांच्या गाभ्यांत हॅलाइट, सिल्व्हाइट व पोटॅशियमाची इतर खनिजे आहेत. इराणमधील सैंधवी घुमटांमध्ये ॲनहायड्राइट व मार्ल (मृण्मय चुनखडक) तसेच चुनखडक व अग्निज खडक यांच्या मोठ्या ठोकळ्यांचे हॅलाइटाबरोबर मिश्रण झालेले आढळते.


सैंधव-ॲनहायड्राइट आणि सैंधव-पोटॅश थर यांच्या अंतःस्तरित थरांना पडलेल्या घड्यांचे स्वरुप गुंतागुंतीचे आहे. सैंधवाच्या बाहेरच्या कडेपाशी असलेल्या घड्या उदग्र (उभ्या) व अधिक गुंतागुंतीच्या आहेत. जर्मनीतील सैंधवी घुमटांमधील अंतर्गत थरांचे सापेक्ष वय जेव्हा स्पष्ट कळू शकते तेव्हा अधिक जुने द्रव्य सर्वसाधारणपणे सैंधवाच्या राशीच्या मध्यभागी आणि अधिक नवीन द्रव्य तिच्या कडांशी असते. गल्फ कोस्ट येथील काही सैंधवी घुमटांमधील हॅलाइट कणांचा अभ्यास करण्यात आला. त्यावरुन घुमटांत उभ्या व आडव्या या दोन्ही दिशांमध्ये बदलणारा कणांच्या दिक्‌स्थितीचा जटिल आकृतिबंध असल्याचे सूचित होते. कॅस्पियन सैंधवी घुमटांच्या मध्यातील खनिजाचे कण उदग्र (उभे) व कडांलगतचे कण क्षैतिज(आडवे) आहेत.

आवरण शिला ही चुनखडक-ॲनहायड्राइट यांचे आच्छादन असून ती विशेषतः १०० मी. पर्यंत जाड असते परंतु ती ३०० मी. पर्यंत जाड असते. विशेषतः गल्फ कोस्ट येथील अनेक सैंधवी घुमटांच्या बाबतीत आवरण शिलेची कमी-अधिक प्रमाणात क्षैतिज पातळीत असलेल्या तीन पट्टांत विभागणी करता येते. उदा., वरचा कॅल्साइट पट्ट, मधला जिप्सम व गंधक असलेला वैशिष्ट्यपूर्ण संक्रमणी पट्ट आणि खालचा ॲनहायड्राइट पट्ट. हे पट्ट अनियमित असे व एकमेकांत हळूहळू बदलत जाणारे असले, तरी काही ठिकाणी जिप्सम व ॲनहायड्राइट यांच्यातील संपर्क चांगलाच संदिग्ध वा पुसट असा आहे. सैंधवी गाभ्याच्या माथ्यावरील लवणाच्या विद्रावापासून आवरण शिला तयार झाल्याचे सर्वसाधारणपणे मानतात. यामुळे अविद्राव्य (न विरघळणाऱ्या) ॲनहायड्राइटाचा अवशेष मागे राहतो. नंतर त्यात बदल होऊन जिप्सम, कॅल्साइट व गंधक तयार होतात. अभिसरणाच्या (उथळ) पाण्याच्या पट्ट्यात विद्राव तयार होतो, असे अनुमान आहे. आवरण शिला असलेले व खोलवर गाडले गेलेले सैंधवी घुमट भूतकाळात कोणत्या तरी वेळी उथळ असले पाहिजेत आणि नंतर ते गाडले गेले.

गल्फ कोस्ट येथील सैंधवी घुमटांमध्ये आवरण (कोश) सामान्यपणे आढळते. त्याने लवण पूर्णपणे वेढलेले असून शकते किंवा ते लवणाच्या खालील भागापुरते मर्यादित असते. पृष्ठभागालगत माथे असलेल्या अधिक खोल जागी असलेल्या सैंधवी घुमटांच्या भागांवर किंवा खोलवर गाडलेल्या सैंधवी घुमटांवर आवरण शिला सर्वाधिक सामान्यपणे आढळते. शेल खडकातील द्रायूचा (द्रव किंवा वायूचा) दाब हा सभोवतालच्या खडकांमधील दाबापेक्षा पुष्कळच जास्त असतो. त्यामुळे शेल खडकांची स्तरणतले विकृत झालेली आहेत. शेल खडकांमधील जीवाश्म (शिळारुप जीवावशेष) हे सभोवतालच्या अवसादांतील (गाळातील) खडकांपेक्षा जुने आहेत. यावरुन शेल खडक अधिक जुन्या व म्हणून अधिक खोलवर असलेल्या थरांमधून आले असल्याचे सूचित होते.

लवणी गाभ्याभोवतीच्या थरांवर पुढील तीन प्रकारे परिणाम होऊ शकतात. (१) त्यांचे उत्थान होते म्हणजे ते वर उचलले जाऊ शकतात (२) ते खाली जाऊ शकतात अथवा (३) सभोवतालचे थर सापेक्षतः खाली जात असताना त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही किंवा ते जसे आहेत तसेच राहतात.

उत्थित थरांमध्ये घुमट किंवा विमुखनती यांची संरचनात्मक वैशिष्ट्ये आढळतात. ते विशेषकरुन आवरण शिला व आवरण असल्यास त्यांच्यासह गाभ्याच्या वर किंवा सभोवती घुमटाकार होतात आणि सभोवतालच्या संमुखनतींमध्ये खाली जातात. घुमटाकार थर सर्वसाधारणपणे वर्तुळाकार घुमटांवर लवणापासून अरीय दिशेत असणाऱ्या विभंगांनी तुटलेले असतात परंतु लांबट घुमटांवर किंवा विमुखनती संरचनांवर विभंग रेषानुसारी असून त्यांतील एक विभंग किंवा विभंगांचा एक संच महत्त्वाचा असतो.

खाली गेलेल्या थरांतून संमुखनत्या (खळगे) तयार होता आणि वर्तुळाकार गर्तिका (खळगा याला कडा वा पाळ संमुखनती म्हणतात) घुमटाकार उत्थानाला पूर्णतया किंवा जवळजवळ पूर्णपणे वेढणारी असू शकते.

परिणाम न झालेल्या थरांपासून उंचवटे तयार होतात व त्यांच्या भोवती कमी उंच क्षेत्रे असतात. या उंचवट्यांना अवशिष्ट उंचवटे किंवा कासवाच्या पाठीच्या आकाराचे उंचवटे म्हणतात. सैंधवी घुमटात मध्येमध्ये विखुरलेल्या या उंचवट्यांना सैंधवी घुमटाएवढा उठाव नसतो. सैंधवी घुमटांभोवतीच्या थरांची वर्तमान काळातील संरचना ही सैंधवाच्या वर्तमान काळातील स्थितीशी वा स्थानाशी प्रत्येक बाबतीत जुळणारी असतेच असे नाही. सैंधवी घुमटाच्या अलीकडच्या उत्थानामुळे त्याच्या मध्याचे स्थान आधीच्या उत्थानाच्या तुलनेत बदलले आहे, असे या विसंगत नातेसंबंधाने सूचित होते.


वाटणी : सैंधवी घुमट जगभर सर्वत्र म्हणजे प्रत्येक खंडात व महासागरात आढळतात. ज्याचे समन्वेषण कमी प्रमाणात झालेले आहे असा अंटार्क्टिका हा भूप्रदेश त्याला अपवाद आहे. शिवाय पॅसिफिक महासागरातही सैंधवी घुमट विरळा आढळतात. कारण त्यातील थोड्याच लवणयुक्त द्रोण्या भूपट्ट्यांच्या केंद्राभिसरणाद्वारे होणाऱ्या विनाशातून वाचल्या आहेत [→ भूपट्ट सांरचनिकी]. सैंधवाचे शेकडो वा अधिक मीटर जाड थर असलेल्या अनेक अवसादी ( गाळयुक्त ) द्रोण्या आहेत. अशा शंभरांहून अधिक द्रोण्यांमध्ये असलेल्या सैंधवी घुमटांचा शोध खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्यासाठी समन्वेषण करताना लागला आहे. खचदऱ्यांतील सरोवरे, पर्वतरांगांमधील द्रोण्या आणि विशेषतः खंडांच्या केंद्रापसारी (केंद्रापासून फाकणाऱ्या) सीमांना अनुसरुन असलेले प्रदेश यांतील खाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनातून लवण साक्याच्या रुपात अवक्षेपित झाले. या प्रक्रियेमुळे लवणाचे व पर्यायाने सैंधवाचे शेकडो मीटर जाड थर निर्माण झाले.

अवसादनाच्या (गाळ साचत जाण्याच्या) ज्या द्रोण्यांमध्ये जाड लवणी निक्षेपानंतर ते जाड अवसादी थरांनी आच्छादिले जाऊन गाडले गेले आणि भूसांरचनिकीय दृष्टीने विरुपित झाले किंवा जेथे या दोन्ही गोष्टी घडल्या त्या अवसादाच्या प्रत्येक द्रोणीत सैंधवी घुमट वा लवणी संरचना तयार झाल्या. ढाल क्षेत्रांचा अपवाद वगळता लवणी संरचना व्यापकपणे पसरलेल्या आहेत. सैंधवी घुमटांच्या प्रत्यक्ष स्वरुपानुसार केवळ गुरुत्वीय अस्थैर्यातून निर्माण झालेले अभिजात घुमट पुष्कळ प्रमाणात भूसांरचनिक दाबाचा (प्रेरणांचा) परिणाम न झालेल्या क्षेत्रांपुरते मर्यादित राहिले आहेत. तथापि, काही सैंधवी घुमट भूसांरचनिक दाबाचा परिणाम झालेल्या प्रदेशांत निश्चितच आढळतात. एकूणच सर्व लवणी संरचनांची अनेक क्षेत्रे जगभर विखुरलेली आहेत. उत्तर अमेरिकेचा मेक्सिकोच्या आखाताचा प्रदेश, यूरोपमधील उत्तर जर्मनी, उत्तर समुद्र क्षेत्र आणि मध्यपूर्वेतील इराण-इराक-अरबस्तान द्वीपकल्प ही वरील क्षेत्रांची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

अभिज्ञान : ऐतिहासिक काळात सैंधव ही मौल्यवान वस्तू होती व ते मिळविण्यासाठी जमिनीवर उघड्या पडलेल्या सैंधवी घुमटांचा उपयोग करीत. त्यामुळे सैंधवी घुमट हजारो वर्षांपासून माहित आहेत. नंतर सैंधवाप्रमाणेच खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्यासाठीही भूमिगत सैंधवी घुमटांचा शोध घेण्यात येऊ लागला. त्यासाठी वाढत्या प्रमाणात सुविकसित साधने वापरात आली. छिद्रणाद्वारे उंचवटे, खारे व गंधयुक्त झरे आणि हायड्रोकार्बने असलेले स्त्राव यांचा मागोवा घेण्यात आला तसेच कमी घनता असणारे लवण वा सैंधव आणि त्याहून जास्त घनतेची आवरण शिला यांचा शोध लावण्यासाठी त्यांना प्रतिसाद देणाऱ्या गुरुत्वीय व चुंबकीय सर्वेक्षणांचा उपयोग करण्यात आला. कारण सभोवतालच्या अवसादांपेक्षा (गाळांपेक्षा) लवण कमी चुंबकीय असते. शिवाय भूकंपाने निर्माण होणाऱ्या तरंगांचे परावर्तन व प्रणमन सर्वेक्षणांचाही उपयोग करण्यात आला. कारण यामध्ये लवणातील ध्वनीचा उच्च वेग आणि अंतर्गत परावर्तनाचा अभाव या गुणधर्मांचा उपयोग होतो. लवण या गुणधर्मांमुळे ओळखता येते.

उत्पत्ती : खडकांच्या थरांशी निगडित असलेल्या सैंधवाचा संबंध या घड्या पाडणाऱ्या प्रेरणांशी जोडतात. तथापि, घड्या न आढळणाऱ्या क्षेत्रांतील लवणी वा सैंधवाच्या संरचनांनी भूवैज्ञानिकांना कोड्यात टाकले होते. हे कोडे उलगडण्यासाठी निरनिराळ्या परिकल्पना पुढे आल्या गुरुत्वीय प्रेरणा, भूसांरचनिक प्रेरणा आणि या दोन्ही प्रेरणा एकाच वेळी किंवा एकीनंतर दुसरी प्रेरणा अशा लावल्या जाऊन सैंधवी घुमटांसारख्या लवणी संरचना व पर्यायाने संस्तरभेदी संरचना निर्माण झाल्या हे म्हणणे सर्वसाधारणपणे मान्य झाले आहे. अर्थात नेमकी परिस्थिती कोणतीही असली, तरी अशा संस्तरभेदी संरचना विकसित होण्यासाठी प्रवाही खडकाची आवश्यकता असतेच.

तथापि खडकाच्या प्रवाहाची कल्पना नजरेसमोर आणणे अवघड आहे. कारण खडक वाहण्याची त्वरा अगदी मंद असते. मात्र या प्रवाहाचे परिणाम स्वच्छपणे पाहता येतात. मोडलेले, कललेले किंवा खचलेले दगडी बांधकाम, खडकाच्या प्रवाहाद्वारे बंद होणारे बोगद्याचे किंवा खाणीचे तोंड, सैंधवाच्या डोंगरावरुन खाली वाहत येणारे व हिमनदीची सर्व वैशिष्ट्ये दर्शविणारे खडकांचे प्रवाह यांद्वारे हे स्पष्टपणे लक्षात येते. दीर्घ कालावधी आणि जमिनीखाली खोलवर गाडले गेल्याने त्या खोलीवर असलेला उच्च दाब व तापमान यांच्यामुळे सैंधवासारखा सापेक्षतः आकार्य (आकार देता येण्यासारख्या) अशा द्रव्याची पुष्कळ हालचाल होते. उदा., दरवर्षी होणारी १ मिमी. एवढी हालचाल दहा लाख वर्षे होत राहिल्यास एकूण हालचाल १००० मी. एवढी होईल. हॅलाइट (सैंधव), सिल्व्हाइट, जिप्सम व विशिष्ट शेल खडक हे सर्वांत सामान्य असे प्रवाही वा वाहणारे खडक आहेत. या खडकांची घनता वालुकाश्मासारख्या घट्ट वा दृढ झालेल्या खडकांच्या घनतेपेक्षा कमी असते आणि हे घनतेचे खडक अधिक घनतेच्या वालुकाश्मांखाली गाडले गेल्यावर गुरुत्वीय दृष्ट्या अस्थिर होतात. हे सर्व आकार्य खडक अवसादनाच्या (गाळ साचण्याच्या) नेहमीच्या पद्घतीने निक्षेपित झाले (साचले) आणि अवसादी थरांमध्ये ते व्यापक प्रमाणात पसरत गेलेले आढळतात.


नैसर्गिक लवणी संरचना आणि त्यांच्या प्रतिकृती यांच्या अभ्यासातून सैंधवी घुमटाच्या विकासातील किंवा निर्मितीमधील घटनांच्या क्रमांची पुन्हा मांडणी वा फेररचना करण्यात आली आणि ती पुढीलप्रमाणे आहे : प्रथम लवणाचा जाड थर साचतो. नंतर त्यावर अधिक दाट (जास्त घनतेचे) अवसादी थर साचून तो पुरला वा गाडला जातो. लवण व त्याच्यावरील थर गुरुत्वीय दृष्टीने अस्थिर बनतात आणि अविकृत थरांतून लवण श्यान द्रायू (दाट द्रव) या रुपात वाहण्यास (विसर्पणास) सुरुवात होते. कणांचे सूक्ष्म आकारमान, उष्णता व लेशमात्र पाणी यांमुळे लवणाच्या विसर्पणात वाढ होत राहते. लवण हे दुर्बल असे दाबयुक्त भूवैज्ञानिक वंगण म्हणून कार्य करते. त्यामुळे त्याच्या खालील व वरील अधिक बळकट थर स्वतंत्र रीतीने अंशतः विरुपित होऊ शकतात. अशा रीतीने लवणामुळे विरुपण सहज होते. असे लवण भूपट्टसांरचनिक किंवा गुरुत्वीय प्रेरणोने हलते. या प्रक्रियेला लवण सांरचनिकी म्हणतात. लवणाच्या गिरदीसारख्या संरचनेच्या मध्याकडे हा प्रवाह चालू राहतो. त्यामुळे वरच्या थरांना घुमटाचा आकार प्राप्त होतो. त्याच वेळी जेथील लवण वाहून निघून गेलेले असते ते क्षेत्र खाली जाते (म्हणजे त्याचे अधोगमन होते ). यामुळे पाळ अधोवली (संमुखनती) निर्माण होते. लवणावरचे थर अक्षरशः एकमेकांपासून दूर सरकतात. त्यामुळे त्यांच्यावर ताण पडतो व या दुर्बल खडकांत विभंग (तडे) निर्माण होतात. अखेरीस लवण घुमटाकार क्षेत्राच्या मध्याला मोडून व भेदून त्याच्या वर येते, त्यामुळे घुमटाकार, वर वळलेली आणि भेदित थरांच्या मध्यभागी सामान्यपणे दंडगोलाकार गुडदीसारखी लवणाची राशी म्हणजे सैंधवी घुमट निर्माण होतो. जादा थरांच्या निक्षेपणाने लवणाच्या राशीची वरच्या दिशेतील वाढ त्वरेने चालू राहते आणि लवण राशीचे स्थान पृष्ठभागी वा भूपृष्ठालगत टिकून राहते. अशा रीतीने तयार झालेल्या लवण राशीला वा सैंधवी घुमटाला होणारा लवणाचा पुरवठा त्याच्या वाढीदरम्यान संपला, तर ज्या स्थितीला घुमट पोहचलेला असतो तेथे त्याची वाढ थांबते आणि घुमट गाडला जात राहतो.

आर्थिक महत्त्व : खनिज तेल व नैसर्गिक वायू यांसारखी हायड्रोकार्बनी इंधने, विविध खनिजे, यंत्राला किंवा प्रक्रियेसाठी पुरविण्यात येणारा रासायनिक कच्चा माल यासारख्या औद्योगिक वस्तू सैंधवी घुमटांतून मिळवितात. तसेच सैंधवी घुमटात खोदलेल्या बाटलीसारख्या प्रचंड मोठ्या पोकळ्या (कुहर किंवा गर्तिका ) द्रव्ये साठविण्यासाठी वापरतात. जगभर, विशेषतः मध्यपूर्व, उत्तर समुद्र व दक्षिण अटलांटिक प्रदेश येथील खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे अतिशय मोठे साठे अनेक द्रोण्यांमधील सैंधवी घुमटांशी निगडित आहेत. यांपैकी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांलगतचे गल्फ कोस्ट व मेक्सिकोचे आखात येथील द्रोण्यांचे सर्वाधिक बारकाईने समन्वेषण झाले आहे. येथील खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची ८० टक्के क्षेत्रे ही सैंधवी घुमट व इतर लवणी संरचनांशी निगडित असून अमेरिकी संयुक्त संस्थानांचा हा सर्वांत मोठा सर्वेक्षण प्रांत आहे. कमी प्रमाणात समन्वेषण झालेल्या हायड्रोकार्बनांचे (खनिज तेल व नैसर्गिक वायूसहित असलेले) संभाव्य प्रचंड मोठे प्रदेश उजेडात आलेले नाहीत. टेक्सस राज्यातील स्पिंडल-टॉप सैंधवी घुमटातील खनिज तेलाचा स्त्रोत १९०१ मध्ये सापडला. तेव्हा उपयुक्त द्रवरुप जीवाश्म इंधनाच्या (खनिज तेलाच्या) समन्वेषणाची सुरुवात झाली व या इंधनावर जगभरातील लोक अखंडपणे अवलंबून राहण्याचीही ही सुरुवात होती. सैंधवी घुमटाभोवतीच्या खडकांच्या थरांमध्ये कमानीसारख्या संरचना निर्माण होऊन, त्याचे विभंग निर्माण होऊन अथवा घुमटाच्या उत्थानाने अवसादी संलक्षण्यांमध्ये (खडकांच्या प्रकारांत) बदल होऊन आणि मग ही इंधने खुद्द अपार्य असलेल्या लवणांमुळे तयार झालेल्या सापळ्यांत बंदिस्त होऊन खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे सैंधवी घुमटांभोवतीचे साठे तयार झाले. अशा रीतीने सैंधवी घुमटांमुळे हायड्रोकार्बनांसाठीचे हे सर्वोत्कृष्ट साठे तयार झाले. अशा प्रकारे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मेक्सिको, उत्तर समुद्र, जर्मनी, रुमानिया व रशिया येथील असे साठे सैंधवी घुमटांशी निगडित आहेत. टेक्सस व लुइझिॲना या अमेरिकी राज्यांलगतच्या आखाती किनाऱ्यालगतच्या मैदानातील सैंधवी घुमट हे हायड्रोकार्बनांचे असे भावी महत्त्वाचे स्त्रोत ठरु शकतील. कारण लुइझिॲनालगतच्या समुद्रकिनाऱ्यासमोरील क्षेत्रात खनिज तेलाचे मोठे साठे आढळले आहेत. त्यांपैकी काही घुमटांत प्रत्येक ठिकाणी खनिज तेलाचे ५० कोटी पिंपाहून अधिक मोठे साठे असल्याचे मानतात. उत्तर जर्मनीतील सैंधवी घुमटांमधून अनेक वर्षांपासून खनिज तेल मिळत आहे तर उत्तर समुद्रातील सैंधवी घुमटातील खनिज तेलाचे उत्पादन किनाऱ्यापलीकडच्या प्रदेशांत वाढविले जात आहे.

सैंधवी घुमटांवरील आवरण शिला गंधकाचा मुख्य स्त्रोत बनल्या आहेत. हे गंधक फ्राश प्रक्रियेने सहजपणे मिळवितात. या प्रक्रियेत अधितापन केलेले ( उकळबिंदूहून अधिक तापविलेले ) पाणी दाबाखाली गंधकाच्या थरामध्ये जोराने सोडले जाते आणि अशा रीतीने वितळलेले गंधक जोराने पृष्ठभागी येते. अमेरिकेतील गल्फ कोस्ट येथील उथळ सैंधवी घुमटांच्या आवरण शिलेतून जगातील गंधकाचे ६५ टक्के उत्पादन होते. अमेरिकेतील गल्फ कोस्ट व जर्मनी येथील सैंधवी घुमट हे लवण ( मुख्यत्वे सैंधव ) व पोटॅश यांचे प्रमुख स्त्रोत आहेत. यांतून मुख्यतः हॅलाइट व सिल्व्हाइट ही खनिजे मिळवितात. त्यासाठी पाणी जोराने घुमटात सोडून लवण विरघळून मिठवणी तयार करतात व ती परत मिळवून तिच्यातून ही रसायने मिळवितात. अमेरिकेतील सु. ६५ टक्के लवण असे मिळवितात. जर्मनीत अशा रीतीने मिळणारी पोटॅशियमाची लवणे ही खतांमधील पोटॅशचा प्रमुख स्त्रोत आहेत.

कच्चे खनिज तेल, नैसर्गिक वायू (विशेषतः मिथेन), द्रवीभूत खनिज तेल, इंधन वायू, द्रवीभूत प्रोपेन वायू, किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारी) व विषारी अपशिष्टे (टाकाऊ द्रव्ये) साठविण्यासाठीही सैंधवी घुमट वापरतात. त्यासाठी सैंधवी घुमटात छिद्रणाद्वारे विहीर खोदून तिच्यात पाणी जोराने खाली पाठवितात. विहिरीत लवणे विरघळून मिठवणी तयार होते व ती काढून घेतात. अशा रीतीने ६०० मी. खोलीच्या बाटलीच्या आकारांच्या मोठ्या पोकळ्या (कुहर) सैंधवी घुमटांत तयार करता येतात. त्यांचा उपयोग वरील द्रव्ये साठविण्यासाठी होऊ शकतो. उदा., अमेरिकेतील सैंधवी घुमटांमध्ये ११५० कोटी पिपांहून अधिक कच्चे खनिज तेल साठवून ठेवले आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत हा खनिज तेलाचा साठा उपयुक्त ठरेल. त्याला मोक्याचा खनिज तेल साठा हे नाव दिले आहे. या पोकळ्यांच्या अपार्यतेमुळे किरणोत्सर्गी अपशिष्टांची विल्हेवाट लावण्याची ठिकाणे म्हणूनही या पोकळ्यांचा विचार केला जात आहे.

पहा : खनिज तेल नैसर्गिक वायु सैंधवी पर्वतरांगेतील शैलसमूह.

संदर्भ : 1. Halbautu, M. T. Salt Domes : Gulf Region, United States and Mexico, 1979.

2. Holmes, A. Holmes, D. L. Holmes Principles of Physical Geology, 1981.

ठाकूर अ. ना.