कैवल्यधाम : योगविद्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाकरिता स्वामी कुवलयानंद यांनी लोणावळे येथे १९२४ मध्ये सुरू केलेल्या आश्रमास हे नाव देण्यात आले. या संस्थेचा मुख्य उद्देश, योगकार्याला सर्वस्वी वाहून घेतलेल्या सभासदांत आध्यात्मिक बंधुत्व निर्माण करून शिक्षण, संशोधन व सेवाभाव यांच्याद्वारे नव्याजुन्या मार्गांचा अवलंब करून पद्धतशीरपणे योगाचा प्रसार व प्रचार करणे हा होता. हे करीत असता, आध्यात्मिक बाजूवर अधिक भर देण्यात येतो. योगीजनांच्या यौगिक सिद्धांतांचे नव्या शास्त्राच्या साहाय्याने स्पष्टीकरण करून त्यायोगे पौर्वात्य आणि पाश्चात्त्य संस्कृतींची सांगड घालावी, अशी त्यांची प्रारंभीची धारणा होती. साहजिकच यौगिक चिकित्सेकरिता येणाऱ्या रोग्याची, त्यांच्या रोगचिकित्सेची व्यवस्था व्हावी, म्हणून एक रुग्णविज्ञानशाळा उघडण्यात आली. त्या शाळेस नटवरसिंह या एका धनाढ्य गृहस्थाने ३३ हजार रुपयांची देणगी दिल्यामुळे तिचे नाव १९३२ मध्ये श्री नटवरसिंह रुग्णविज्ञानशाला असे ठेवण्यात आले. या संस्थेतून सामाजिक, शारीरिक व आत्मिक शिक्षणाचा प्रसार करावा, हा त्यांचा हेतू होता. याकरिता आवश्यक असणाऱ्या तज्ञांची त्यांनी उणीव पडू दिली नाही. कैवल्यधाममधील अनेक सदस्यांनी आयुर्वेद, पाश्चात्त्य वैद्यक व योगोपचार यांचे ज्ञान संपादन केले होते. म्हणून स्वास्थ्यसंवर्धनाचे कार्यही रोग अपहरणाइतकेच कैवल्याधामने यशस्वी रित्या पार पाडले आहे. कैवल्यधाममध्ये शारीरिक शिक्षणाची रचना आधुनिक शास्त्रदृष्ट्या विवेचून आणि सुसंघटित करून त्याला यौगिक सामर्थ्याने नवीन वळण देण्याचे प्रयत्न चालू झाले. आश्रमाच्या कार्याबरोबरच स्वामीजींनी योगमीमांसा हे इंग्रजी त्रैमासिक सुरू करून त्यात आसने, बंधक्रिया, मुद्रा व प्राणायाम यांविषयींच्या प्रयोगांची संशोधनपर माहिती प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कैवल्यधामची कीर्ती भारत व भारतेतर देशांत फलावली. वैद्यकशास्त्रातील काही पदवीधरांनी स्वामीजींच्या नेतृत्वाखाली योगचिकित्सेचे शिक्षण घेऊन निरनिराळी केंद्रे सुरू केली. त्यांपैकी ईश्वरदास चुनीलाल योगिक हेल्थ सेंटर, मुंबई १९३२) व कैवल्यधाम सौराष्ट्र मंडळ, राजकोट (१९४३) या संस्था योगविषयक सांस्कृतिक कार्य करीत आहेत. यांशिवाय आलिबागजवळ कनकेश्वर येथे संस्थेचे एक अध्यात्मकेंद्र आहे.

आध्यात्मिक मार्गदर्शन, त्यासाठी आध्यात्मिक शिबिरांचे आयोजन, योगमीमांसा त्रैमासिकाचे संपादन व प्रकाशन, नागरिकांसाठी धर्मार्थ औषधालय इ. कामे संस्थेने अंगीकारलेली आहेत. शिवाय कैवल्यधामच्याच श्रीमन्माधवयोग मंदिर समिती या स्वतंत्र घटक यंत्रणेद्वारा वैज्ञानिक, वाङ्‍मयीन व चिकित्साविषयक संशोधन, योगचिकित्सेद्वारा रोगनिवारण, योगमहाविद्यालयाद्वारा योग प्रशिक्षण ही कामे करण्यात येतात. संस्थेच्या कार्यक्षम प्रशासनासाठी एक कार्यकारी मंडळ व एक नियामक मंडळ आहे. या मंडळात संस्थेच्या कार्याला सर्वस्वी वाहून घेतलेले संस्थेचे आजीव सभासद, संस्थेचे देणगीदार व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच केंद्र सरकारचे प्रतिनिधी असतात.

संस्थेचा वार्षिक अर्थसंकल्प सु. दोन लाखांचा आहे. संस्थेची आर्थिक स्थिती फारशी समाधानकारक नाही. संस्थेचा खर्च केंद्रीय व राज्य सरकार यांचे अनुदान, अल्पस्वल्प देणग्या व शेती यांतून भागविण्यात येतो.

कैवल्यधाममध्ये यौगिक प्रशिक्षणाचे जबाबदारी गा. से. योगमहाविद्यालय पार पाडते. त्यात पदवीधर विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन योग एज्युकेशन (डी. वाय्. एड्‌.) व पदवीधर नसलेल्यांसाठी सर्टिफिकेट इन योग एज्युकेशन (सी.वाय्. एड्.) असे नऊ महिन्यांचे दोन अभ्यासक्रम आहेत. त्यांतून योगाचे प्रात्यक्षिक व बौद्धिक शिक्षण देण्यात येते. अभ्यासक्रमात योगसंबंधित विषय शिकविण्यात येतात. उदा., योग आणि गूढविद्या योग व मानसिक स्वास्थ्य शारीररचना व शारीरविज्ञान प्राचीन योगाची पाठ्यपुस्तके, योगातील संशोधनात्मक पद्धती इत्यादी. शिक्षक प्रशिक्षणाकरिता उन्हाळ्यांत एक महिन्याचे वेगळे वर्गही चालविण्यात येतात. योगाचे सर्वांगीण प्रशिक्षण देणारे हे भारतातील एकमेव योगमहाविद्यालय आहे. यात देशातून तसेच परदेशातून विद्यार्थी येतात.

 कैवल्यधामच्या यशस्वी कार्यपद्धतीमुळे इतर विद्यापीठांवरही त्याची छाप पडली आहे. कोलंबिया (अमेरिका) तसेच त्रावणकोर (केरळ राज्य) येथील विद्यापीठांनी यौगिक-व्यायाम-पद्धती व शारीरिक शिक्षण हे विषय अलीकडे सुरू केले आहेत. अध्यात्मावर आधारित असणारे हे यौगिक शिक्षण व्यक्तिनिष्ठ न राहता त्याचा सर्वत्र प्रसार व्हावा म्हणून कैवल्यधाम व त्याच्या इतर शाखा प्रयत्नशील आहेत. 

पहा : कुवलयानंद, स्वामी.                        

घाणेकर, मु, भा.