खुर्रामशहर : जुने मुहाम्मारा. इराणच्या आखातावरील विदेश व्यापाराचे इराणचे प्रमुख बंदर. लोकसंख्या ९०,००० (१९७१ अंदाज). हे नैर्ऋत्य इराणच्या खुझिस्तान प्रांतातील कारून व शट-अल्-अरब यांच्या संगमावर आबादानच्या वायव्येस १६ किमी. आणि बसऱ्याच्या पूर्वेस ४० किमी. वसलेले आहे. ते बसऱ्याशी व्यापाराच्या बाबतीत स्पर्धा करू लागल्याने तुर्की टोळ्यांनी त्याची बरीच नासधूस केली. ब्रिटिशानी व रशियनांनी मध्यस्थी केली व एर्झरूमच्या तहानुसार १८४७ मध्ये मुहाम्मारा, त्याचा बंदराकडील प्रदेश आणि आबादान बेट इराणला देण्यात आले. तथापि मुहाम्मारावर प्रत्यक्षात १९२४ पर्यंत शिया अरबांच्या मुहैसिन टोळीच्या प्रमुख शेखचीच सत्ता होती. १९२४ मध्ये रेझाखानने ते इराणी सरकारच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आणले मग त्याला खुर्रामशहर नाव मिळाले. इराणमध्ये तेलाचा शोध लागल्यावर खुर्रामशहराचे महत्त्व वाढले. दुसऱ्या महायुद्धकाळात बंदराची बरीच सुधारणा करण्यात आली व ते ट्रान्स-इराणी रेल्वेशी, खुर्रामशहर-आवाझ ह्या १२२ किमी. च्या लहानशा रेल्वे फाट्याने जोडण्यात आले. खुर्रामशहर आवाझशी रस्त्यानेही व आबादान तेलखाणींशी फेरीने जोडलेले आहे. येथून खजूर, तांदूळ, गोंद, कापूस व कातडी ह्यांची प्रामुख्याने निर्यात होते. जगामधील अत्यंत उष्ण व दमट ठिकाणांपैकी खुर्रामशहर हे एक आहे.
गद्रे, वि. रा.