खुपरी : (पोथकी सिकतावर्त्म ट्रॅकोमा). पापण्यांच्या आतल्या श्लेष्मकलेला (बुळबुळीत अस्तर त्वचेला) विशिष्ट विषाणूच्या (व्हायरसाच्या) संसर्गामुळे येणाऱ्या चिरकारी (दीर्घकालीन) शोथाला (दाहयुक्त सुजेला) ‘खुपरी’ असे म्हणतात.
जगातील सर्व देशांत हा रोग आढळतो. विशेषतः उष्ण प्रदेशांत याचे प्रमाण अधिक दिसते. अंधत्वाच्या अनेक कारणांपैकी हे एक प्रमुख कारण असून अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाच्या निर्मूलनासाठी खास मोहीम सुरू केली आहे. हा रोग विशेष प्रमाणात असलेल्या देशांत या मोहिमेची अंमलबजावणी जारीने सुरू आहे. रोग्याचे हात व कपडे यांपासून आणि माशा वगैरे कीटकांच्या संपर्कामुळे या रोगाचा प्रसार होतो. हा रोग संसर्गजन्य आहे अशी पूर्वीपासून खात्री असली, तरी अलीकडेच क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटिस या विषाणूच्या संसर्गामुळेच हा रोग होतो असे सिद्ध झाले आहे. दारिद्र्य, दाट वस्ती, गलिच्छपणा वगैरे कारणांमुळे या रोगाचा प्रसार होतो. पुष्कळ वेळा आईपासून लहान मुलाला या रोगाचा संसर्ग होण्याचा संभव असतो.
लक्षणे : पापण्यांच्या अंतःस्तरावर बारीकबारीक कण आल्यासारखे दिसतात. हे कण मोहरीइतके बारीक असून त्यांची रचना अनियमित असते. असे कण वरच्या पापणीच्या अंतःस्तारावर अधिक प्रामुख्याने दिसतात. पापण्या सुजून श्लेष्मकला लाल आणि जाड होते. हे कण पांढरट पिवळट रंगाचे, उकळलेल्या साबुदाण्यासारखे गोलाकार किंवा टोकदार असतात. या कणांच्या घर्षणामुळे स्वच्छमंडलालाही (डोळ्याच्या पुढील भागातील पारदर्शक आवरणालाही) शोथ येतो. तेथे वरच्या बाजूला नव्या रक्तवाहिन्या उगवतात. या रक्तवाहिन्यांचे जाळे स्वच्छमंडलावर पसरते. वारंवार शोथ येऊन हे कण फुटतात व त्यामुळे तेथील श्लेष्मकला आकसते. कणांच्या जागी व्रण उत्पन्न होऊन पापण्या वेड्यावाकड्या होतात. असे झाल्याने पापण्यांचे केस स्वच्छमंडलावर घासू लागतात, त्याला ‘पडकेस’ असे म्हणतात. केस स्वच्छमंडलावर घासल्यामुळे तेथे व्रण होतात हे व्रण भरून आल्यावर तेवढ्या भागाचे स्वच्छमंडल भुरकट होते. व्रण पुनःपुन्हा येत राहिल्यामुळे पुढे सर्व स्वच्छमंडलच भुरकट अपारदर्शक झाल्यामुळे दृष्टिनाश होतो. स्वच्छमंडलावर रक्तवाहिन्यांचे जाळे पसरल्यामुळे तेथे सूक्ष्म रक्तवाहिन्या दिसू लागतात. डोळ्यांना सारखी खूप असते. डोळ्यांमधून फार स्त्राव जात नाही, परंतु थोडे चिकट पाणी येत राहते.
श्लेष्मकलेवर येणाऱ्या या कणांच्या चार अवस्था असून त्यांवरून या रोगाच्याही चार अवस्था कल्पिल्या आहेत. पहिल्या अवस्थेत श्लेष्मकलेवर अतिसूक्ष्म पांढरट कण दिसतात. या अवस्थेत निदान करणे फार कठीण असते या अवस्थेत श्लेष्मकला मखमलीसारखी दिसते. दुसऱ्या अवस्थेत स्वच्छमंडलावर रक्तवाहिन्या उगवू लागलेल्या दिसू लागतात. तिसऱ्या अवस्थेत स्वच्छमंडलावर भुरकट ठिपके दिसतात. चौथ्या अवस्थेत पापण्या आकसून वेड्यावाकड्या झाल्यामुळे पडकेस उत्पन्न होतात.
उपद्रव : (संभाव्य उपविकृती). (१) पापणी आत किंवा बाहेर वळल्यामुळे पडकेस होतात. (२) खालची पापणी जाड झाल्यामुळे डोळ्यांतून पाणी वाहण्याची प्रवृत्ती होते. (३) श्लेष्मकला जाड आणि कोरडी होते. (४) स्वच्छमंडल अपारदर्शक होते. (५) स्वच्छमंडलाचा गोल आकार जाऊन ते शंकूसारखे टोकदार होते.
चिकित्सा : सल्फा आणि प्रतिजैव (अँटिबायॉटिक) प्रकारची औषधे या रोगावर गुणकारी आहेत. रोग चिरकारी असल्यामुळे चिकित्सा कित्येक महिने करावी लागते.
उपचार लवकर आणि सतत करीत राहिल्यास उपद्रवांचे प्रमाण कमी होते, परंतु ते उत्पन्न झाल्यावर त्यांना योग्य असे उपचार करावे लागतात. कणांवर मोरचुदाचा खडा घासून कण फोडणे, तसेच विशिष्ट चिमट्याने कण दाबून फोडणे आणि रोगाच्या फार प्रगतावस्थेत वर्त्मपट्टातील (पापणीला ताठरपणा देणाऱ्या पापणीतील घट्ट तंतुमय पट्टातील) उपास्थी (लवचिक व मजबूत पेशीसमूह, कूर्चा) काढून टाकणे, हे इलाज करतात.
हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे प्रतिबंधक उपाय म्हणजे रोग्याचे कपडे, हातरुमाल, हात वगैरे गोष्टींचा संपर्क टाळणे, हाच होय.
संदर्भ : 1. Gordon, F. B. and others, Biology of the Trachoma, New York, 1962.
2. Lyle, T. K. Cross, A. G. Ed. May and Worth’s Manual of the Diseases of the Eye, London,
1959.
ढमढेरे, वा. रा.