खुतबा : शुक्रवारी संध्याकाळी तसेच इतर विशेष प्रसंगी मुसलमानांनी सामूहिक प्रार्थना (नमाझ) करावयाची असते. या सामूहिक प्रार्थनेपूर्वी खतीब (धर्मोपदेशक) संक्षिप्त प्रवचन करतो, त्याला ‘खुतबा’ (खुत्बह्) असे नाव आहे. या प्रवचनापूर्वी खतीबला विशिष्ट वेष धारण करावा लागतो. खुतब्यापूर्वी समकालीन राज्यकर्त्यांचा उल्लेख करणे, पूर्वी महत्त्वाचे समजले जाई. त्यावरून राज्यकर्त्यांशी निष्ठा व्यक्त होते. अर्थात मुस्लिमेतर राज्यकर्त्यांचा त्यात उल्लेख केला जात नसे. भारतात ब्रिटिश राज्य आल्यानंतर राज्यकर्त्यांचा उल्लेख वगळला जाऊ लागला. परंतु खिलाफत चळवळीच्या अगोदर, तुर्की सुलतानाच्या नावाचा उल्लेख करण्याचा प्रघात अनेक ठिकाणी सुरू झाला. खिलाफत चळवळ बंद होईपर्यंत हा प्रघात चालू होता. खुतबा अरबी भाषेत म्हणण्याची प्रथा, चालू शतकापासून बिगर अरबी देशांतून कमी होत चालली आहे. खुतब्यातून धर्माची माहिती, कुराणातील वचने इ. विषयांचे विवरण केले जाते.

करंदीकर, म. अ.