खामगाव : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वांत मोठे शहर व तहसिलीचे ठिकाण. लोकसंख्या ५३, ६९२ (१९७१). हे वाघ्रा नदीकाठी असून मुंबई–नागपूर रेलफाट्यावरील जलंब प्रस्थानकाशी १३ किमी. लांबीच्या छोट्या रेलफाट्याने जोडलेले आहे. धुळे–नागपूर राजरस्ता खामगाववरून जातो. पूर्वीपासून ही विदर्भातील कापसाची मोठी बाजारपेठ आहे. सरकी काढण्याचे व रुई दाबण्याचे अनेक कारखाने येथे असून तेलघाणे, साबण, फिनील, बिस्किटे तयार करणे इ. उद्योगधंदे तसेच काचेची खेळणी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याची सोय येथे आहे. शिक्षणाचे हे मोठे केंद्र असून येथील राष्ट्रीय विद्यालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. जिल्हा शासनाच्या अनेक कचेऱ्या येथे आहेत.

जोशी, चंद्रहास