कुरुंदवाड संस्थान: दक्षिण महाराष्ट्रात पेशवाईमध्ये प्रसिद्धीस आलेल्या पटवर्धन घराण्याच्या मिरज, सांगली, तासगाव, जमखंडी, मिरजमळा, बुधगाव इ. ज्या शाखा कालक्रमाने उत्पन्न झाल्या त्यांतीलच कुरुंदवाड ही एक शाखा होती. या घराण्याचा मूळ पुरुष हरिभट्ट. यांचा मुलगा त्र्यंबकपंत याने दाखविलेल्या कर्तबगारीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण त्याचे दोन्ही मुलगे नीलकंठराव व कोन्हेरराव यांनी अनुक्रमे घोडनदी (१७६२), मोती तलाव (१७७१) आणि सावशी या लढ्यात मोठा पराक्रम केला व ते दोघेही शेवटच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यानंतरच्या त्यांच्या वंशजांनी मोठा पराक्रम केल्याचे कोठे आढळत नाही. कालक्रमाने (१८५५ मध्ये) या घराण्याच्या थोरली व धाकटी अशा दोन पात्या झाल्या. थोरल्या पातीकडे सु. ४६४ चौ. किमी. व धाकट्या पातीकडे सु. २९४ चौ. किमी. चा प्रदेश होता. थोरल्या पातीत ३७ आणि धाकट्या पातीत ४१ खेडी होती. कुरुंदवाडच्या थोरल्या पातीची लोकसंख्या सु. ५०,००० व उत्पन्न अडीच लाख असून धाकट्या पातीची लोकसंख्या सु. ४२,००० होती आणि उत्पन्न सु. दोन लाख होते. दोन्ही पातींनी आपापल्या पुरत्या प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि दवाखाने चालविले होते. या दोन पात्यांची राजधानीची गावे अनुक्रमे कुरुंदवाड (कोल्हापूर जिल्हा) व माधवपूर-वडगाव (बेळगाव जिल्हा) ही होती. महाराष्ट्रातील इतर संस्थानांच्या विलीनीकरणाबरोबर हे संस्थान त्यावेळच्या मुंबई राज्यात विलीन करण्यात आले.

खरे ग. ह.