सिंधु संस्कृति : भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. सिंधूसंस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्येउजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खननझाले, त्यात सिंधू संस्कृतीचेताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२).यानंतर या दोन्ही स्थळी ⇨सर जॉन मार्शल, इ. जे. एच्. मॅके, ⇨ माधोस्वरुप वत्स, ⇨ सर मॉर्टिमर व्हीलर  इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली. याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात(विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे उजेडातआली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्यानेतिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.

त्यानंतरच्या उत्खनन-संशोधनांत या संस्कृतीच्या व्याप्तीबद्दलच्याकल्पनांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रारंभी पंजाबात ⇨ रुपड  पासून ते पश्चिमेस बलुचिस्तानातील ⇨सुक्तगेनडोर  एवढ्या विभागातया संस्कृतीच्या अवशेषांची लहानमोठी सु. ६० व दक्षिणेस पश्चिमकिनाऱ्यालगत सौराष्ट्रात सु. ४० स्थळे ज्ञात झाली होती मात्र आजमितीला सिंधू संस्कृतीच्या दोन हजारांहून अधिक स्थळांचा शोध लागलाआहे. त्यांपैकी सु. १५०० भारतात आणि सु. ५०० पाकिस्तानात आहेत.विशेष म्हणजे त्यातील बहुसंख्य – सहाशेहून अधिक –हरयाणा –राजस्थानमधील सरस्वतीच्या (सांप्रत घग्गर) खोऱ्यात आहेत. गुजरातेत⇨ लोथल   व त्याच्या दक्षिणेस भगतराव येथेही सिंधू संस्कृतीचे लोकराहत असत, शिवाय राजस्थानात ⇨कालिबंगा, गिलुंड व इतर अनेकठिकाणी तसेच उत्तर प्रदेशात मीरतच्या पश्चिमेस सु. ३१ किमी.वर अलमगीरपूर येथे सिंधू संस्कृतीचे लोक राहत असत, असे आढळूनआले आहे. भगतराव मोहें-जो-दडोपासून आग्नेयीस सु. ८०५ किमी.वरआहे सुक्तगेनडोर कराचीपासून पश्चिमेस सु. ४८३ किमी.वर आहेआणि अलमगीरपूर मोहें-जो-दडोच्या पूर्वेस सु. ९६६ किमी.वर आहे.हरयाणा आणि पंजाबात बनवाली, मिताथल या स्थळांशिवाय सिंधमध्येयारी या ठिकाणी सिंधू संस्कृतिसदृश अवशेष मिळाले. यावरुन सिंधूसंस्कृतीची व्याप्ती किती विस्तृत होती, याची कल्पना येते.

व्याप्तीइतकीच या संस्कृतीची प्राचीनताही लक्षात ठेवण्यासारखीआहे. या संस्कृतीच्या ⇨कोटदिजी, हडप्पा, लोथल इ. स्थळांचाकालखंड कार्बन-१४ पद्घतीनुसार निश्चित करण्यात आलेला आहे.त्यानुसार आणि मोहें-जो-दडो व हडप्पा येथे सापडलेल्या काहीअवशेषांच्या व मध्यपूर्वेतील — विशेषतः मेसोपोटेमियातील-अव-शेषांच्यातुलनात्मक अभ्यासानुसार तसेच आतापर्यंत झालेल्या उत्खननांवरुनसिंधु संस्कृतीचे स्थूलमानाने तीन कालखंड पडतात : (१) आद्य सिंधू (इ. स. पू. ३२०० – २६००), (२) नागरी सिंधू (इ. स. पूर्व २६०० – २०००) आणि (३) उत्तर सिंधू (इ. स. पूर्व २०००–१५००). आद्यसिंधु कालखंडातील स्थळे सिंधपासून सरस्वतीच्या खोऱ्यात अधिकआहेत. नागरी सिंधू काळातील सर्वंकष पुराव्याचा विचार करताया काळात वेगाने सांस्कृतिक बदल घडून आले तर उत्तर सिंधूकाळात सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासास सुरुवात झाली.

या संस्कृतीचा उगम, उत्क्रम व अस्त कसा झाला, यांबाबत विद्वानांतएकमत नाही परंतु इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकामध्ये सिंध-पंजाबचीमैदाने आणि त्यांच्या पश्चिमेकडच्या अफगाणिस्तान, बलुचिस्तान भागांतीलडोंगराळ प्रदेशातही सध्यापेक्षा मानवी वस्तीला जास्त अनुकूल अशीनैसर्गिक परिस्थिती असावी, यात शंका नाही. बलुचिस्तानच्या डोंगराळभागात छोटीछोटी ग्रामवस्तीची केंद्रे होती, हे आता सर्वमान्य झाले आहे.बलुचिस्तान आणि उत्तर पाकिस्तान या विभागात क्वेट्टा, नाल, आमरी,झोब, कुली आणि टोगो इ. प्रादेशिक वैशिष्ट्यांच्या निरनिराळ्या ग्रामसंस्कृती अस्तित्वात होत्या, याबद्दल पुरावा मिळालेला आहे. यासंस्कृतीचे लोक विविध तऱ्हेची रंगविलेली मातीची भांडी वापरीत असत.कालखंडाच्या दृष्टीनेही या संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या आधीच्या होत्या,हे आता निश्चित झाले आहे. या विभागातील उत्तरेकडील संस्कृतीतप्रामुख्याने लाल खापरांचा वापर आढळतो, तर दक्षिण विभागामध्येपिवळसर रंगाची खापरे प्रचलित होती, असे दिसते. मृत्पात्रे, मानवी दफने,मृत्पात्रांवरील रंगीत नक्षीकाम आणि काही स्थळी सूचित केले जाणारेसंभाव्य धान्योत्पादन, यांवरुन सिंधू संस्कृतीच्या नागरी विकासाचा आणिया ग्रामीण संस्कृतींचा घनिष्ठ संबंध असावा, असे तज्ज्ञांचेमत आहे.हडप्पाच्या उत्खननामध्ये यास थोडाफार दुजोरा मिळालेला आहे.हडप्पाच्या कोटविभागाच्या उत्खननात सिंधू संस्कृतीच्या खापरांच्याथरांच्या खाली झोब संस्कृतीची खापरे मिळालेली आहेत. त्याचप्रमाणेपाकिस्तानातील कोटदिजी येथील उत्खननामध्ये हडप्पापूर्व संस्कृतीचेअवशेष सापडले. या हडप्पापूर्व संस्कृतीत तांब्याचा वापर नव्हता आणिभाजलेल्या विटांचाही अभाव होता. या काळातील मृत्पात्रे तांबड्यारंगाची आणि काळ्या रंगात नक्षी केलेली असली, तरी त्यांचे आमरी येथेसापडलेल्या खापरांशी साधर्म्य लक्षात येण्यासारखे आहे. कार्बन-१४ च्याआधारेही कोटदिजीच्या वस्त्यांची प्राचीनता इ. स. पू. २७०० म्हणजेचहडप्पा संस्कृतिपूर्व असलेली दिसून येते. नंतरच्या थरांमध्ये आणि काही समकालीन थरांमध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये सापडणाऱ्या नक्षीसारखी नक्षीअसलेली खापरे आणि बहुधा घराच्या भिंतीवर चिकटविण्याकरितावापरण्यात येणारे भाजलेल्या मातीचे त्रिकोण हडप्पा आणि कोटदिजी यादोन्ही ठिकाणी उपलब्ध झाल्याने या दोन्ही संस्कृतींचा संबंध घनिष्ठअसला पाहिजे, असे दिसून येते. राजस्थानातही कालिबंगा आणि सोथी या ठिकाणी सिंधू संस्कृतिपूर्व वस्त्यांचे अवशेष अलीकडेच मिळालेलेआहेत परंतु विशेष म्हणजे, कालिबंगा येथे सिंधू संस्कृतीचे आणि सोथीसंस्कृतीचे लोक एकत्र राहत होते, यामध्ये काहीही संदेह राहिलेला नाही.


बलुचिस्तान, अफगाणिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, पंजाब, सिंधआणि राजस्थान या ठिकाणी दृष्टीस पडणाऱ्या विविध सिंधुपूर्व संस्कृतींची हडप्पा आणि मोहें-जो-दडो येथील नागर संस्कृतीमध्ये कशीउत्कांती झाली, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. ग्रामीण संस्कृतीतूनपरिपूर्ण नागरी संस्कृतीमध्ये परिवर्तन होणे, ही गोष्ट एकदम होणारी नाही.याकरिता अनेकांनी अनेक कारणे पुढे मांडलेली आहेत परंतु उत्खननांद्वारे या दोन अवस्थांमधील उत्क्रांती अथवा परिवर्तन दाखवणारा कोणताच ठोस पुरावा हाती आलेला नाही. सर मॉर्टिमर व्हीलर यांच्यामते, मोठमोठ्या नद्यांच्या सपाट खोऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना डोंगराळप्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा आपली उन्नती करुन घेण्याची जास्तसंधी मिळते, तसेच त्यांना विविध आपत्तींना तोंडही द्यावे लागते. नद्यांनायेणारे दरवर्षीचे पूर माणसांना धाडसी बनवतात, त्याचप्रमाणे एरवी लोकांना व्यापारवृद्घीसाठी उत्तेजन देतात. त्यांतूनच सांस्कृतिक संपर्क वाढतातआणि संरक्षणाचे प्रश्नही उभे राहतात. म्हणून त्यांच्या मते ‘सिंधू संस्कृतीचाउगम म्हणजे मानवी बुद्घीने निसर्गाने उपलब्ध करुन दिलेल्यासंधीचा कुशलतेने करुन घेतलेला उपयोग होय’. इ. स. पू. तिसऱ्यासहस्रकात अत्यंत प्रगत झालेल्या पश्चिम आशियातील नागरी संस्कृतींशी व्यापारमार्गे येथील लोकांचा संबंध आल्यावर सामाजिक व नागरीसंघटनेविषयीच्या तेथील कल्पना या लोकांनी उचलल्या असतील, असेहीमत व्हीलर व्यक्त करतात. घोष यांच्या मते सिंधू संस्कृतीचे आकस्मिकनागरी परिवर्तन म्हणजे तत्कालीन समाजधुरीणांनी मोठ्या बौद्घिकहिकमतीने शिस्त लावून करुन घेतलेला समाजाचा विकास होय. अर्थात ही मते सर्वमान्य नाहीत कारण सिंधू संस्कृतीत दिसणारे अपूर्व सामाजिकपरिवर्तन कोणत्या एका विशिष्ट कारणाने अथवा आकस्मिक रीत्याउद्‌भूत झाले, हे सर्व समाजशास्त्रज्ञ मानतीलच असे नव्हे. हडप्पा येथेहडप्पापूर्व आणि हडप्पा अशा विभिन्न संस्कृतींचे अवशेष सापडलेलेआहेत पण मोहें-जो-दडो येथे मात्र अद्याप सु. १० मी. च्या खालच्याथरांचे उत्खनन अशक्यच असल्याने फारसे अवशेष सापडलेले नाहीत.त्यामुळे हडप्पाप्रमाणेच मोहें-जो-दडोलाही ग्रामीण व नागरी संस्कृतींचेप्रत्यंतर मिळेल किंवा कसे हे सांगता येत नाही.

सिंधू संस्कृतीच्या उत्क्रांतीचे अथवा परिवर्तनाचे सर्व धागेदोरे गुंफतायेत नसले, तरी तिच्या प्रगत स्वरुपाचे दर्शन होण्यास अडचण येत नाही.मोहें-जो-दडो, हडप्पा, बनावली, चन्हुदारो, लोथल, धोलावीरा, कालिबंगाइ. ठिकाणी जी उत्खनने झालेली आहेत, त्यांवरुन सिंधू संस्कृतीच्याविविध अंगांची कल्पना येते.

हडप्पा आणि मोहें-जो-दडो या दोन्ही स्थलांच्या अवशेषांची व्याप्तीसु. ५ किमी.पेक्षा जास्त एवढ्या विस्तृत परिसरात आढळते. दोन्हीठिकाणी कोटयुक्तनगर आणि इतर नागरी वस्ती असे दोन सर्वसामान्यविभाग पडू शकतात आणि दोन्ही ठिकाणची वस्ती लहान-मोठ्याचौकोनांत विभागल्याचे आढळून येते. विटांच्या चौथऱ्यावर बांधलेलीनिरनिराळी घरे, विस्तृत रस्ते व उपरस्ते, उत्कृष्ट गटारबांधणी व तत्समनागरी स्वास्थ्याच्या रचना या बाबी वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.

हडप्पाला पहिल्या प्रथम उत्खननांत सिंधू संस्कृतीच्या नगररचनेचाप्रत्यय आला. नगररचनेची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे कोट आणि खालीमैदानात नगर. याशिवाय हडप्पाच्या एका टेकाडाच्या उत्खननात हडप्पाचीदफनभूमीही मिळाली. त्याउलट हडप्पा उत्तरकालीन दफनभूमीचापुरावाही सिमेटरी एच्. या स्थळी मिळाला तेव्हा कोट, नगर आणि दफनभूमी हे महत्त्वाचे विभाग मानावयास हरकत नाही.

कोटयुक्त दुर्गाची सु. ४२१ मी. उत्तर-दक्षिण व सु. १९६·५ मी.पूर्व-पश्चिम अशी समांतर द्विभुज चौकोनाकृती आहे. सभोवतालच्याटापूच्या वर याची उंची सु. १३·७५ ते १५·२५ मी. असून या कोटाच्याखालच्या थरांत हडप्पापूर्व संस्कृतीचीमृण्मयपात्रे सापडली आहेत. याहडप्पापूर्व ग्रामीण वस्तीची व्याप्ती किती होती, हे निश्चितपणे सांगता येतनाही. बहुधा रावीच्या पुरामुळे या वस्तीचा नाश झाल्यानंतरच्याकाळात या कोटाच्या बांधणीस सुरुवात झाली, यात शंका नाही. शिवाय पुरापासून रक्षण करण्याकरितासुद्घा या कोटाची बांधणी झाली असावी.पाया मातीच्या कच्च्या विटांचा वापर करुन नंतर चिखल आणि पक्क्याविटांची बांधणी करुन हा कोट चढवीत नेला गेला. याच्या पायाची रुंदीसु. १३·७५ मी. असून तो वर निमुळता होत गेलेला आहे. अधूनमधूनजेव्हा जरुर वाटली, तेव्हा या कोटाला जास्त टेकू दिलेले आढळतात. याकोटाला ठिकठिकाणी चौकोनी बुरुज केलेले होते. मुख्य प्रवेशद्वारबहुधा उत्तरेस असावे पण पश्चिमेस कोटभिंतीला मुद्दाम वाकण दिलेलेआढळले व त्याच्या रक्षणासाठी नजीकच बुरुजाची रचना केलेलीहोती. कमीतकमी तीन वेळा कोटाचीदुरुस्ती केली, तसेच तो जास्तमजबूतही केला. या सर्वांत दुसऱ्या वेळी केलेली दुरुस्ती उत्कृष्ट पक्क्याविटांची व काळजीपूर्वक केलेली होती.

कोटाच्या आत अनेक वास्तू होत्या. कमीतकमी सहा वेळा आतीलवास्तुबांधणी झाली असे यावरुन कळून येते. मात्र या प्रत्येक बांधणीतीलवास्तूंचा आलेख अथवा उपयोग ध्यानात येत नाही म्हणून या वस्तीचेस्वरुप काय असावे हे कळत नाही.

या कोट-टेकाडाच्या उत्तरेस असलेल्या दुसऱ्या एका टेकाडाच्याउत्खननामध्ये विस्तृत वस्त्यांचे अवशेष उजेडात आले. यांपैकी एकवास्तू म्हणजे मजुरांना राहाण्याकरिता बांधलेल्या चाळीच्या स्वरुपाचीआहे. यापासून थोड्या अंतरावर विटांनी बांधलेले पाच गोलाकार चौथरेअसून त्यांच्या पलीकडे चौथऱ्यावर बांधलेली धान्याची गुदामे आहेत.धान्याची कोठारे दुर्गाजवळ असणे, हे संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.कोटयुक्त दुर्गाच्या टेकाडाची उंची या टेकाडापेक्षा सु. ६ ते ७·५ मी.अधिक असल्याने ही धान्यकोठारे दुर्गाच्या माऱ्यात येत होती, हे लक्षातठेवण्यासारखे आहे.

चाळी एकाच ठशाच्या होत्या. यातील प्रत्येक घराला दोन खोल्याअसून, घराची मोजमापे सु. १७ X ७·५ मी. अशी एकसारखी योजलेलीहोती. घरातील जमीन विटांची केलेली असून दोन चाळींमध्ये ०·९ मी.ते १·२१ मी. अंतर येण्याजाण्याकरिता सोडलेले होते. धान्यगुदामातकाम करणाऱ्या मजुरांकरिता हडप्पा शासनाने बांधलेल्या या चाळी असाव्यात, असा अंदाज येतो. काहींच्या मते जवळच विटांनी बांधलेल्यासोळा भट्यांपैकी एकीमध्ये मुशीत वितळलेले ब्राँझ सापडल्याने याचाळीमध्ये धातुकाम करणाऱ्या मजुरांची अथवा कारागिरांची वस्तीअसावी परंतु याबाबतचा पुरावा इतका तुटपुंजा आहे, की निर्णायकमत देणे कठीण आहे.


या चाळींच्या जवळ असलेले विटांचे १८ गोल चौथरे धान्यकांडण्याकरिता वापरात आणीत असावेत असे दिसते. सुमारे ३·३५ मी.व्यास असणारे हे चौथरे उभ्या ठेवलेल्या विटांनी बांधलेले असून,त्यांच्या मध्यभागी उखळे होती. अशा काही उखळांमध्ये गहू आणिजव मिळाल्याने हे चौथरे धान्य कांडण्याकरिता बांधले असावेत, असेअनुमान करता येते. एकसारखे धान्यकांडणीचे अठरा चौथरे बांधून घेणेव तेही गुदामाजवळ बांधून घेणे, यातच नगरशासनाची दूरदृष्टी आणियोजकता दिसून येते.

मजुरांच्या चाळी व धान्य कांडण्याचे चौथरे ह्यांच्याजवळ धान्यसाठवणीची गुदामे बांधलेली होती. प्रत्येक रांगेध्ये सहा ह्याप्रमाणे बारागुदामे, दोहोंमध्ये ७ मी. अंतर सोडून बांधलेली होती. प्रत्येक गुदाम१५·२५ मी. X ६ मी. या मोजमापाचे असून, ते १·२१ मी. जाडीच्यादाबून चोपलेल्या मातीच्या पायावर उभारलेले होते. ह्या गुदामांचे प्रवेशद्वारउत्तरेकडे असून, व्हीलर ह्यांच्या मते ह्या गुदामांतून भरलेले धान्यरावी नदीतून आणले जात असावे.

नागरी वस्तीच्या वास्तूंची वैशिष्ट्ये मोहें-जो-दडोसारखीच असल्याकारणाने ती मोहें-जो-दडोच्या वस्तीच्या वैशिष्ट्यांबरोबर अभ्यासणे इष्टठरेल परंतु आतापर्यंत वर उल्लेखलेली वास्तुवैशिष्ट्ये हडप्पा संस्कृतीच्यादृष्टीने अद्वितीय ठरतात कारण मध्यपूर्वेमध्ये जरी हडप्पा समकालातमोठमोठ्या नागरी संस्कृती अस्तित्वात होत्या, तरी इतक्या उत्कृष्टपणेबांधलेली धान्याची गुदामे अजूनपर्यंत आढळून आलेली नाहीत. इतक्याप्रचंड प्रमाणावर बांधलेल्या गुदामांमध्ये एकछत्र शासनाशिवाय धान्यसाठाहोणे अशक्यप्राय आहे.

हडप्पाप्रमाणेच मोहें-जो-दडो येथे कोटयुक्त दुर्ग, नागरी वस्ती,सार्वजनिक वास्तू , मजुरांच्या चाळी आणि धान्याची गुदामे उत्खननामध्येसापडली आहेत. दुर्गाची रचना सिंधूचे महापूर लक्षात घेऊनच केलेलीअसली पाहिजे परंतु आता सिंधूच्या पाण्याची पातळी इतक्या वर आलीआहे, की हडप्पाप्रमाणे मोहें-जो-दडोला मात्र नगरपूर्व वस्त्यांचा पुरावाअद्याप मिळालेला नाही. याशिवाय या जुन्या दुर्गाच्या अवशेषांवरचऐतिहासिक काळातील बौद्घ स्तूप बांधला गेल्याने यातील कोटाच्याबांधणीची संपूर्ण कल्पना अद्याप आलेली नाही. या दुर्गाची दुरुस्ती आणिफेरबांधणी अनेक वेळा झाल्याचा पुरावा हडप्पाप्रमाणे येथेसुद्घामिळाला आहे. प्राकाराच्या भिंतींना चौकोनी बुरुजही होते. कोटाच्याभिंतीपासून अलग असणारे काही चौकोनी बुरुजही आढळतात. तेपक्क्या विटांचेच बांधलेले आहेत. बुरुजांजवळ पक्क्या मातीचे शेकडोगोफणगुंडेही मिळालेले आहेत.

सार्वजनिक उपयोगाच्या वास्तूंमध्ये स्नानाचा कुंड आणि धान्यगुदामे ही वैशिष्ट्यपूर्ण होत. स्नानकुंड उत्तर-दक्षिण सु. १२ मी., पूर्व-पश्चिम ७ मी. ह्या लांबीचा असून, २·५ मी. खोल आहे. कुंडातउतरण्याकरिता पायऱ्यांची सोय आहे. कुंडाची जमीन उभ्या ठेवलेल्याविटांची असून, ह्या विटा जिप्सममध्ये पक्क्या बसविल्या आहेत.कुंडाच्या बाजूंचा दर्शनी भाग विटांचाच असून, विटांच्या मागे २·५ सेंमी.जाडीचा बिट्युमेनचा थर आहे. पाणी झिरपू नये, यासाठीच विटांची अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि बिट्युमेनचा उपयोग केलेला होता. कुंडाच्याव्हरांड्याच्या एका बाजूस छोट्याछोट्या खोल्या असून, यांमधून वैयक्तिकस्नानाची अथवा कपडे बदलण्याची व्यवस्था असावी. ह्या छोट्याखोल्यांतून वाहणारे पाणी मोठ्या गटारास जोडले असल्याकारणाने ह्याखोल्यांचा उपयोग वैयक्तिक स्नानगृहासारखा असावा. इतर उत्खनक आणि व्हीलर ह्यांच्या मते प्राचीन धर्मकृत्यांमध्ये स्नानाला अत्यंत महत्त्वअसल्याकारणाने इतक्या उत्कृष्ट रीतीने बांधलेला हा स्नानकुंड धार्मिकस्नानाच्या प्रथेशी संलग्न असला पाहिजे. अर्थात ही सर्व मते संभाव्यअनुमाने होत.

हडप्पाप्रमाणेच मोहें-जो-दडो येथेही धान्याकरिता गुदामे बांधण्यातआलेली होती मात्र ही हडप्पापेक्षा थोडीशी वेगळी वाटतात. मोहें-जो-दडोचे धान्यगुदाम मूळचे सु. ४६ मी. लांब व २३ मी. रुंद होते पणनंतरच्या काळात त्यामध्ये फेरफार करुन ते जास्त विस्तृत केल्याचापुरावा मिळाला. या गुदामात एकूण २७ खोल्या असून त्यांची रचनाअशी आहे, की मोकळ्या हवेस त्यात वाव मिळावा. उत्तरेच्या बाजूलाविस्तृत मोकळा चौथरा असून, तेथून साठविलेले धान्य गुदामाच्या खोल्यांत भरले जाई. दक्षिणेच्या बाजूस लाकडी जिन्याची सोयही केलेलीहोती. हडप्पा व मोहें-जो-दडो येथील धान्यगुदामांच्या रचनेत जरीथोडाफार फरक असला, तरी त्यांचे क्षेत्रफळ जवळजवळ सारखेच आहे.स्नानकुंड व धान्यगुदामांखेरीज मोहें-जो-दडोला सु. ७० मी. X २३·७५मी. या मोजमापाची एक भव्य वास्तूही आहे. या वास्तूच्या उपयोगाविषयी सांगता येणे कठीण आहे परंतु हिची विस्तृत रचना, आतीलप्रांगण आणि सोपानपंक्ती यांवरुन ही वास्तू कुणा प्रख्यात पुरोहिताचेनिवासस्थान अथवा शाला असावी, असे अंदाज आहेत. याशिवाय२७·५ मी. चौरस मोजमापाचा एक प्रचंड मंडपही येथे बांधण्यातआलेला आढळला.

याशिवाय खुद्द शहरातील वास्तूंचे स्वरुप वेगळे वाटते. सबंधशहरातील वस्तींचे मुख्य रस्ते व उपरस्ते निरनिराळे विभाग पाडतात.यामुळे सबंध वस्तीची रचना निरनिराळ्या चौकटींत आखल्यासारखीवाटते. मुख्य रस्ते पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण योजलेले असून, यांची रुंदीसु. ९·१४ मी. होती. याला जोडणारे उपरस्ते १·५ मी. ते ३ मी. रुंदीचेअसून, बहुतेक सर्व रस्ते समांतर आणि काटकोनात होते. रस्त्यांच्या ह्यायोजनेमुळे शहराचे जवळजवळ बारा चौकोन झाले होते.

मोहें-जो-दडो शहरात असलेली घरेही वैशिष्ट्यपूर्ण होती. प्रत्येकघराच्या मध्यभागी चौक, स्वयंपाकघर, दिवाणखाना, स्नानगृह, शौचकूप,गटार या सर्व प्राथमिक आणि आवश्यक सोयींचा त्यात समावेश होता.प्रत्येक घर विटांचे बांधलेले असून काही घरांत मोठमोठ्या गोल चुलीहीआढळल्या. सबंध शहराचे सांडपाणी वाहून नेण्याची (जलनिःसारणाची) सोय विटांनी बांधलेल्या बंद गटारांतून होत असे.

स्नानगृहे, मोठे मंडप, दुर्ग व धान्याची गुदामे यांशिवाय हडप्पाप्रमाणेचमोहें-जो-दडो येथेही बहुधा मजुरांकरिता चाळी बांधलेल्या आढळतात.या चाळींमध्ये प्रत्येक घरात एक लहान आणि एक मोठी खोली असून,पुढच्या खोलीतआंघोळीकरिता मोरीची सोय केलेली होती. ह्या चाळीतल्यासर्व खोल्या एकसारख्या, एकाच मोजमापाच्या बांधलेल्या होत्याआणि रहिवाशांच्या पाण्याची सोय जवळच खोदलेल्या विहिरींमुळेहोत असावी.


मोहें-जो-दडोच्या नागरी संस्कृतीचे स्वरुप ही संस्कृती अर्थाधिष्ठित-वर्गमूलक होती, असे सूचित करते. यातील मोठमोठी स्नानगृहे व मंडपसमाजामध्ये वर्चस्व पावलेल्या पुरोहितांकरिता असावीत, असा एक तर्कआहे. खाजगी घरांची एकसारखी बांधणी वास्तुशास्त्रदृष्टया अप्रस्तुत असली, तरी तिच्यातून नगररचनेच्या ज्ञानापेक्षा अशा तऱ्हेचे ज्ञान प्रत्यक्षात नागरिकांकडून वास्तूमध्ये उतरवून घेण्याची एकछत्री शासनपद्घतीदाखवते. नंतरच्या काळातील बांधणीमध्ये योजनेचा थोडासाअभाव किंवा विस्कळीतपणा दिसत असला, तरी सामाजिक आणिशासकीय चौकट अविकृत राहिली असावी कारण हे बदल मूलभूतस्वरुपाचे नाहीत. याशिवाय वास्तूंची बांधणी इतकी साधी व उपयुक्तताधिष्ठित आढळते, की मोहें-जो-दडोच्या रहिवाशांच्या अनेक पिढ्या परंपरागतजीवनपद्घतीत आणि जीवनमूल्यांध्येही जखडून राहिल्या असाव्यात, हेउघड होते कारण मोहें-जो-दडोचे नुकसान कमीतकमी तीन वेळा तरीसिंधूच्या पुराने झाले, तरी वास्तुबांधणीत अथवा मोहें-जो-दडोच्यारहिवाशांच्या जीवनातील इतर क्षेत्रांत फारसे बदल झाले नाहीत. [⟶ मोहें-जो-दडो].

सिंधू संस्कृतीचे तिसरे उत्खनित स्थल म्हणजे चन्हुदारो होय. मोहें-जो-दडोपासून दक्षिणेस सु. १२९ किमी.वर पूर्वी सिंधू नदीच्या काठीअसलेल्या या स्थळी १९३५-३६ दरम्यान विस्तृत उत्खनन करण्यातआले. या उत्खननामध्ये येथे सर्वप्रथम वस्ती हडप्पा संस्कृतीची झाली असेदिसून आले. या हडप्पा संस्कृतीच्या वसाहतींचा नाश कमीतकमी दोनवेळा सिंधूच्या पुरामुळे झाल्याचे उत्खननात दिसून आले परंतु पूरओसरल्यानंतर वस्त्यांची बांधणी पुन्हा झाली. घरांची रचना, रस्त्यांची योजना, गल्ल्या आणि गटारांची आखणी या सर्व गोष्टी हडप्पा, मोहें-जो-दडोप्रमाणेच येथेही आढळल्या. पुरापासून बचाव करण्याकरितानंतरच्या काळात कच्च्या विटांच्या मोठमोठ्या चौथऱ्यांवर घरे बांधावयाचीपद्घत प्रचलित झाली.

चन्हुदारोला तांब्याची आणि ब्राँझची विविध आयुधे आणि त्याचप्रमाणे हरतऱ्हेचे मणी बनवले जात, याचा खात्रीलायक पुरावा मिळालामात्र सिंधू संस्कृतीशी संलग्न असलेली धान्यगुदामे, स्नानगृहे इ. वास्तूंचापुरावा या मर्यादित उत्खननामध्ये फारसा आढळला नाही परंतु जवळ-जवळ २४·३८ मी. लांब आणि सु. १·५ मी. रुंद असलेली विटांची भिंत शहराच्या संरक्षणाकरिता बांधलेली असावी असा कयास आहे.

हडप्पा, मोहें-जो-दडोपेक्षा चन्हुदारोचा पुरावा एका दृष्टीने महत्त्वाचाआहे कारण येथे हडप्पा संस्कृतीनंतर झुकर आणि त्यानंतर झंगरसंस्कृतीचे लोक राहावयास आले असे दिसते. या झुकर संस्कृतीच्यालोकांनी चन्हुदारो येथील हडप्पा संस्कृतीच्या लोकांची पडझड झालेलीघरे बांधून अथवा नव्या विटांच्या तुकड्याची घरे बांधून तेथे वस्तीकेली. या लोकांची मृत्पात्रे सिंधू संस्कृतीच्या मृत्पात्रांपेक्षा निश्चितपणेवेगळी होती. त्यांवरील नक्षी व त्यांचे आकारही वेगळे होते. याशिवायझुकर संस्कृतीची तांब्याची हत्यारे वेगळी होती.

यानंतरच्या झंगर संस्कृतीचे लोक अगदी वेगळ्या तऱ्हेची खापरे वापरत.ही खापरे क्वचितच तांबडी असून, बहुधा राखी रंगाची व ओबडधोबडआकाराची होती. अर्थात झुकर आणि झंगर संस्कृतीचे लोक कोठूनआले व कुठे गेले, हे प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिले आहेत.

सिंधू संस्कृतीचे पश्चिमेकडील ज्ञात ठिकाण सुक्तगेनडोर होय. येथीलप्राथमिक उत्खननामध्ये सपाट दगडी ठोकळ्यांची बांधलेली संरक्षक भिंतआणि बरेचसे विस्कळित झालेले वास्तूंचे अवशेष मिळाले. याशिवायहडप्पा संस्कृतीसारखी खापरे, तांब्याच्या कुऱ्हाडी, मातीच्या बांगड्या इ.अनेक वस्तूंवरुन हे ठिकाण सिंधू संस्कृतीचे पश्चिमेकडील सांस्कृतिक केंद्र असावे, असे व्हीलर व इतर विद्वानांचे म्हणणे आहे.[⟶ सुक्तगेनडोर].

अलीकडील काही वर्षांच्या संशोधनामुळे सिंधू संस्कृतीच्याविस्ताराबद्दलच्या कल्पना बदलून गेल्या आहेत. याचाच परिपाक म्हणजेसौराष्ट्र-गुजरातच्या विभागामध्ये जे संशोधन झाले, त्यात अनेक सिंधूसंस्कृतीच्या वसाहतींचा लागलेला शोध. यांतील लोथल येथे विस्तृतउत्खनन झालेले आहे. यांशिवाय ⇨रंगपूर  येथेही उत्खनने करण्यातआली आहेत परंतु लोथल आणि रंगपूर येथे मिळालेला पुरावा शुद्घसिंधू संस्कृतीचा प्रातिनिधिक मानावा किंवा कसे, याबद्दल एकमत नाही.

लोथल येथे वसाहतीचे सहा कालखंड दृष्टोत्पत्तीस आले. या सहाहीकालखंडांध्ये वसाहतरचनेची वैशिष्ट्ये सिंधू संस्कृतीच्या वास्तुतंत्राशीमिळतीजुळती आहेत. विस्तृत रस्ते, त्याला फोडलेल्या काटकोनी गल्ल्या,कच्च्या मातीच्या विटांचे चौथरे, पक्क्या व कच्च्या विटांच्या वास्तू,उत्कृष्ट गटारयोजना, वस्तीच्या एका बाजूस असलेली दफनभूमी आणि सिंधू संस्कृतीसारख्या मुद्रांचा वापर, तांब्याची व ब्राँझची आयुधे आणिसिंधू संस्कृतीसारखीच गुलाबी रंगाची उत्कृष्टमातीची-पक्क्या भाजणीचीकाळ्या रंगात नक्षी काढलेली भांडी ही सर्व वैशिष्ट्ये सिंधू संस्कृतीचीनिदर्शक आहेत यात शंका नाही परंतु या सर्व सिंधू संस्कृतीच्यावैशिष्ट्यांबरोबरच हडप्पा आणि मोहें-जो-दडो येथे अज्ञात असलेली काळीतांबडी मृत्पात्रे लोथलला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सापडल्यामुळेव्हीलरसारखे तज्ज्ञलोथल संस्कृतीला पूर्णांशाने सिंधू संस्कृतीचे स्वरुपम्हणून मानावयास तयार नाहीत. कार्बन-१४ अन्वये लोथलचा कालखंडइ. स. पू. २४५०–१६०० दरम्यान ठरविण्यात आला आहे.

लोथलची वास्तुवैशिष्ट्ये उल्लेखनीय आहेत. यातील लोथललासापडलेली जहाजांची गोदी साधारणतः समांतर द्विभुज चौकोनाच्याआकाराची असून, हे सिंधू संस्कृतीचे नवीन वैशिष्ट्य मानावयास हरकतनाही. तिची पूर्वेकडील लांबी २०९ मी. व पश्चिमेकडील २१२ मी.आणि दक्षिणेकडील व उत्तरेकडील रुंदी अनुकमे ३४·७ मी. आणि३६·४ मी. होती, समुद्राच्या भरती-ओहोटीचे ज्ञानही तत्कालीनस्थापत्यकारांना त्या काळी पूर्ण होते, हे दर्शविते. भरतीच्या वेळी पाणीआत घेऊन ओहोटीच्या वेळी दरवाजे बंद करण्याची सोयही यात आढळते.याशिवाय गोदीला लागूनच माल उतरविण्याकरिता धक्का बांधलेला आढळूनआला. सध्याच्या लोथलपासून जरी समुद्रकिनारा थोडासाच लांब असला,तरी ताम्रपाषाणयुगात म्हणजेच सु. साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वी तोलोथलच्या जवळ असला पाहिजे, हे यावरुन उघड होते परंतु सिंधू संस्कृतीचे लोक लोथलला समुद्रमार्गे आले, की सौराष्ट्र-राजस्थानमार्गेजमिनीवरुन आले, याबद्दल निश्चित मत देणे कठीण आहे. [ ⟶ लोथल].

लोथलखेरीज सौराष्ट्र-गुजरातमध्येही अनेक ठिकाणी सिंधू संस्कृतीसंलग्न वस्त्यांचे अवशेष मिळालेले आहेत. यांपैकी रंगपूर, ⇨ रोझडी  आणि ⇨सोनाथ  येथील वस्त्या महत्त्वाच्या आहेत. रंगपूरला १९३४सालापासून अधूनमधून अनेक वेळा उत्खनन करण्यात आले आहे. येथेसापडणारा पुरावा हडप्पाकालीन आहे किंवा हडप्पा उत्तरकालीन आहे,याबद्दल मतभेद आहेत. काहींच्या मते रंगपूर म्हणजे सिंधू संस्कृतीचेएक प्रादेशिक रुप अथवा आविष्कार म्हणावयास हरकत नाही. याउलटसौराष्ट्रातील राजकोटपासून दक्षिणेस सु. ५५ किमी.वर असणाऱ्या रोझडीयेथे हडप्पा संस्कृतीशी मिळतीजुळती संस्कृती सापडली आहे परंतुनंतरच्या काळातील जीवन सिंधू संस्कृतीच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनापेक्षावेगळे असावे, असे तेथे वरच्या थरात सापडलेल्या अवशेषांवरुनकळून येते. सोमनाथ येथेही विशुद्घ सिंधू संस्कृतीचा पुरावा मिळालेलानाही परंतु सापडलेल्या अवशेषांचा संबंध सिंधू संस्कृतीशी दुरान्वयेलावता यावा असे वाटते. [ ⟶ रंगपूर].


राजस्थानातील सिंधू संस्कृतीचे स्वरुप कालिबंगा येथील उत्खननातदृष्टोत्पत्तीस आले. येथील उत्खननामध्ये सिंधू संस्कृतिपूर्व वस्त्यांचेअवशेष मिळाल्याचा उल्लेख वर आलेला आहेच परंतु सिंधू संस्कृतीचेजे अवशेष सापडले, त्यावरुन कालिबंगाला सिंधू संस्कृतीच्या लोकांचीहडप्पा, मोहें-जो-दडोप्रमाणेच वसाहत झाली, असे प्रत्ययास आले.येथील मुख्य रस्ते पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण योजण्यात आले होते.या मुख्य रस्त्यांना उपरस्तेही योजनापूर्वक जोडल्याने नगरीची रचनानिरनिराळ्या चौकोनी गटांध्ये पाडण्यात आल्याचे आढळते. घरांचीबांधणी मातीच्या कच्च्या विटांची असून, भिंतींना मातीचा गिलावादिलेला होता. प्रत्येक घरामध्ये चार ते पाच मोठ्या, काही लहान खोल्याआणि प्रांगण अशा तऱ्हेची रचना असावी, असा उत्खनकांचा कयासआहे. घराच्या बाहेर कच्च्या विटांचे ओटे असून, घरातल्या जमिनी मात्रपक्क्या चोपलेल्या चिखलाच्या बनविल्याचे आढळले. जमीन जास्तपक्की करण्याकरिता त्रिकोणी आकाराचे भाजलेल्या मातीचे तुकडे त्यातबसवीत. काहीकाही घरांध्ये जमीन भाजलेल्या विटांचीसुद्घा बनविलेलीअसे. घरांचे छप्पर लाकडी असे आणि त्यावर चिखल आणि बांबूथापला जाई. सांडपाणी वाहून जाण्याकरिता मोठमोठ्या रांजणांचे कूपत्याचप्रमाणे पक्क्या विटांच्या बांधणीची गटारेही आढळली. याशिवायस्टिअटाइटच्या मुद्रा, चर्ट दगडाची पाती, किंमती दगडांचे व फियान्सचेमणी, तांब्याची हत्यारे आणि हडप्पा, मोहें-जो-दडोसारखी मृत्पात्रेयांवरुन कालिबंगा येथे हडप्पा संस्कृतीची विस्तृत वस्ती होती, हेनिर्विवादपणे सिद्घ झाले आहे. याशिवाय कालिबंगाला संरक्षणात्मककोटयुक्त दुर्ग सापडला नसला, तरी काही भागाभोवती विटांचा मोठा तटअसावा, असे दिसून आले आहे. [ ⟶ कालिबंगा].

सिंधू संस्कृतीचे आतापर्यंत ज्ञात पूर्वेकडचे ठिकाण म्हणजे अलमगीरपूरहोय. येथेही १९५८ सालच्या उत्खननामध्ये हडप्पा संस्कृतीची मृत्पात्रे,मणी, भाजलेल्या मातीचे त्रिकोण इ. वस्तू सापडल्या, यावरुन उत्तरप्रदेशातही हडप्पा संस्कृतीचा प्रसार झाला होता, असे दिसते.

सिंधू संस्कृतीच्या आतापर्यंत ज्ञात झालेल्या अवशेषांधून हडप्पा,मोहें-जो-दडो, कालिबंगा व लोथल यांसारख्या मोठमोठ्या नागरी वस्त्याउघडकीस आल्या आहेत. यांतील हडप्पा व मोहें-जो-दडो ही सांस्कृतिकदृष्ट्याएकसारखी आहेत, यावरुन सिंधू संस्कृतीच्या या दोन राजधान्याअसाव्यात, असे मत मांडले जाते. कालिबंगाच्या उत्खनकांच्या मते कालिबंगा हेही सिंधू संस्कृतीचे तिसरे शासकीय केंद्र असावे.

सिंधू संस्कृतीचे रहिवासी कोणत्या वांशिक गटाचे असावेत, याबद्दलसर्वसाधारणपणे काही माहिती मिळते. हडप्पा, मोहें-जो-दडो आणि लोथलयेथे जे मानवी सांगाडे सापडले आहेत, त्यांवरुन काही निष्कर्षमानववंशशास्त्रज्ञांनी काढलेले आहेत. हडप्पा येथे आर-३७ नामकस्मशानभूमीत अनेक सांगाडे सापडले आहेत. त्यांतील ५७ दफनांमध्ये मृत व्यक्तींना उत्तरेकडे डोके व दक्षिणेकडे पाय अशा सरळ स्थितीतपुरलेले आढळले. मृत व्यक्तींच्या शेजारी त्यांचे दागिने, प्रसाधनाचीसाधने आणि काही दफनांत मातीचे दिवेही ठेवलेले आढळले. एकादफनामध्ये पुरण्याकरिता खणलेला खड्डा विटांनी बांधून काढलेला होतातर एकामध्ये लाकडी शवपेटिकाही आढळली. काहींमध्ये विसापेक्षाजास्त भांडी ठेवलेली आढळली. याउलट मोहें-जो-दडोला मात्र दफन-भूमी अथवा दफनभूमी आढळली नाही, तर फक्त काही सांगाडे अस्ताव्यस्त स्थितीत आढळले. लोथलला जी दफने सापडली, त्यांध्येअनेक दफनांध्ये प्रत्येकी दोन सांगाडे आढळले. यांपैकी एकामध्येपुरुषाचे व स्त्रीचे एकत्र दफन होते. यावरुन उत्खनकांच्या मते हे दफनसतीचे असावे परंतु सतीची कल्पना आणि धार्मिक विधी यांपेक्षा वेगळाअसतो हे सर्वज्ञात आहे. इतर सिंधू संस्कृतीच्या स्थलांच्या सांगाड्याबद्दलची माहिती ज्ञात नाही.

हडप्पा येथे सापडलेली सिमेटरी-एच ही दफनभूमी मात्र हडप्पाउत्तरकालीन असावी, हे बहुतेकांना मान्य आहे. यामध्ये जी दफनपद्घतीसापडली, ती सिमेटरी आर-३७ पेक्षा निश्चित वेगळी आहे. यातीलसांगाड्याची डोकी पूर्व अथवा ईशान्य दिशेकडे असून, काहीकाहीसांगाड्याचे गुडघे थोडेसे मुडपलेले आहेत. दफनात ठेवलेली मृत्पात्रेहीसिंधू संस्कृतीच्या खापरांपेक्षा वेगळी आहेत. या दफनांच्या वरच्याथरातील सांगाडे अगदी वेगळ्या पद्घतीने ठेवल्याचे दिसून आले. या सांगाड्यातील सर्व हाडे एकत्र मिळत नाहीत. फक्त कवट्या आणि काहीलांब हाडे मोठ्या मृत्कुंभांमध्ये ठेवण्याची पद्घत होती. यांतील काहीमृत्कुंभांवर विविध तऱ्हेचे आशय चित्रित केलेले आहेत.

सिमेटरी आर-३७ आणि सिमेटरी-एच यांतील सांगाड्याचा एकमेकांशीकाल दृष्ट्यां संबंध काय, हे मात्र निश्चितपणे अद्यापि सांगता येत नाही.

हडप्पा, मोहें-जो-दडो आणि लोथल येथील सर्व सांगाड्याचामानवशास्त्र दृष्ट्यां सखोल अभ्यास अद्याप झालेला नाही. त्यामुळे सिंधूसंस्कृतीच्या रहिवाशांध्ये वांशिक भेद कोणकोणते हे पूर्णांशाने सांगणे शक्य नाही परंतु आतापर्यंत झालेल्या अभ्यासावरुन मोहें-जो-दडोलाप्रोटो-ऑस्ट्रेलॉइड, मेडिटरेनियन, मंगोलॉइड आणि अल्पाईन या चारवंशांचे लोक ओळखता आले. सर्वांत जास्त मेडिटरेनियन वंशाच्यालोकांचे सांगाडे सापडले. यांची उंची सु. साडेपाच फुट आढळली.यावरुन सिंधू संस्कृतीचा समाज वांशिक दृष्ट्यां एकसंध नव्हता हे स्पष्टहोते परंतु असे असूनदेखील भौतिक संस्कृतीत दिसणाऱ्या एकजिनसीपणाचेआश्चर्य वाटते.

सिंधू संस्कृतीची तांब्याची आणि ब्राँझची हत्यारे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.भाले, कट्यारी, बाणाची टोके, कुऱ्हाडी, चाकू आणि सुऱ्या या सर्ववस्तू सिंधू संस्कृतीच्या लोकांचे तांत्रिक सामर्थ्य दर्शवितात. पानाच्याआकाराचे चाकू, सपाट चौकोनी कुऱ्हाडी, वाकड्या टोकाचे भाले यासर्व गोष्टी सिंधू संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणून मानल्या जातात.

यांतील बहुतेक पाती दांड्याची असून ती लाकडी मुठीमध्येबसविली जात असत. आतापर्यंत फक्त दांडा घालण्याकरिता भोकपाडलेली एकच कुऱ्हाड सापडल्याने सिंधू संस्कृतीची बहुतेक हत्यारेलाकडी दांड्यामध्ये घुसविण्याच्या तंत्राची बनविलेली होती असे दिसते.काहींच्या मते ही दांड्याकरिता भोके असलेली कुऱ्हाड सिंधू संस्कृतीचीनसावी. दांडा घालण्याकरिता मध्ये भोक पाडलेल्या दगडी गदाहीवैशिष्ट्यपूर्ण आहेत. याशिवाय दररोजच्या वापरामध्ये तांब्याचे गळ, वस्तरे,छन्न्या, करवती आणि तांब्याची विविध तऱ्हेची भांडी प्रचलित होती.


सिंधू संस्कृतीची मृत्पात्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत यात शंका नाही. उत्कृष्ट व शुद्घ चिखलांची बनवलेली तांबूस, पक्की भाजलेली आणि वजनालाजड असणारी ही मृत्पात्रे विविध आकारांत सापडतात. ते आकारहीवैशिष्ट्यपूर्ण आहेत. स्टँडवरील थाळ्या, मोठमोठाले रांजण, मोठी भांडीठेवण्याकरिता बनविलेल्या गोल बैठका, उंच, सरळ बाजू असलेलीभोकाभोकाची भांडी, थाळ्या, पणत्या व पेले आणि इतर अनेक प्रकारवापरात होते. विविध आकारांबरोबरच त्यांवर काळ्या रंगातरंगविलेलीनक्षीही वैशिष्ट्यपूर्ण आढळते. पिवळसर अथवा गुलाबी, काळ्या अथवालाल रंगामध्ये ही नक्षी काढलेली आहे. ही नक्षी प्रामुख्याने चित्रचौकटीच्यास्वरुपात काढली जाई. जाळ्या, सोंगट्याच्या पटातल्यासारख्या चौकटी,फुले, ताडाची आणि पिंपळाची पाने, खवले, मोर, मासे इ. विविध प्रकारया नक्षीत आढळतात. मानवी आकृतींची चित्रे फार थोडी आहेत.मृत्पात्रांची घडण आणि त्यांवरील चित्रांची सुबकता सिंधू संस्कृतीच्याआधीच्या काळामध्ये जितकी नजरेत भरते, तितकी नंतरच्या काळामध्येआढळत नाही. हीच गोष्ट सौराष्ट्र -गुजरात आणि इतरत्र सापडलेल्या सिंधूसंस्कृतीच्या उत्तर काळातील वस्त्यांच्या पुराव्यावरुन दिसून येते.

मृत्पात्राइतकेच सिंधू संस्कृतीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मुद्राहोत. त्या सर्व प्रमुख स्थळी शेकड्यानी सापडलेल्या आहेत. खुद्दमोहें-जो-दडोलाच जवळजवळ १,२०० मुद्रा सापडल्या. या मुद्रास्टिअटाइटच्या आहेत. त्या दोन सेंमी. ते तीन सेंमी. चौरस आकाराच्याअसून, त्यांच्या पृष्ठभागावर हातात पकडण्यासाठी एक उंचवटा केलेलाआढळतो. उत्खनकांच्या मते अशा मुद्रा स्टिअटाइटच्या दगडातून चौरसकापून त्या चाकूने अथवा घासून साफ केल्या जात असाव्यात. नंतर ह्यावरछोट्या छन्नीने निरनिराळी रुपके काढली जात. नंतर यावर अल्कलीलावून ही मुद्रा भाजून काढीत. यामुळे सबंध मुद्रेवर एक प्रकारचीतकाकी येत असे. मुद्रांवर काढलेली रुपके विविध प्रकारचीआढळतात. स्वस्तिक, एकात एक काढलेले चौकोन, बैल, एकशिंगीअद्‌भुत प्राणी, मत्स्य, रेडे, वाघ, हत्ती, काळवीट इ. अनेकरुपकांचेचित्रण या मुद्रांवर सापडते. यांतील डौलदार वशिंडाचा आणि पुष्ट अंगाचाबैल अद्वितीय होय. यांशिवाय सुसर आणि घारही काही मुद्रांवर चित्रितकेलेली आढळते. अलीकडील येथील उत्खननात (२०११) एक दुर्मिळकलात्मक चौकोनी मुद्रा ‘वाट्टूवाला’ (देरवार किल्ल्याजवळ) प्राचीनहकरा नदीच्या पात्रात पाकिस्तानी पुरातत्त्वज्ञांना मिळाली. तिच्यावररानटी बैलाची प्रतिमा कोरली असून त्याचे खूर, पिळदार स्नायू, जननेंद्रियव शेपूट यांचे शिल्पां-कन विलक्षण कलात्मक आहे. हे सर्व प्राणी माहीतअसल्याशिवाय कोणीही त्यांचे चित्रीकरण करु शकणार नाही. याचाचअर्थ असा की, आज सिंध-पंजाबमध्ये जे प्राणी पाहावयास मिळत नाहीत,ते सिंधू संस्कृतीच्या काळी तेथे अस्तित्वात होते. यावरुन तेथील हवामानही सध्यापेक्षा वेगळे असावे, असा कयास करता येतो. काही रुपके महत्त्वपूर्ण आहेत. उदा., एका मुद्रेवर एक व्यक्ती बसलेल्या अवस्थेत दर्शविलेली आहे. या व्यक्तीला तीन मुखे असून शिरोभूषणशृंगाकृती आहे. व्यक्तीच्या एका बाजूला हत्ती आणि वाघ, दुसऱ्याबाजूला गेंडा आणि महिष आणि समोर काळवीट अथवा बकरी दाखविलेलीआहे. मार्शल यांच्या मते हे चित्रण पशुपती शिवाचे असावे. काहीमुद्रांवर उभी मानवी आकृती दोन वाघांना धरत आहे. काहींमध्ये पिंपळाच्याझाडाखाली शिवासारखी आकृती उभी आहे, तर काहींमध्ये बैलावर मानवी आकृती कसरत करताना दाखविली आहे. एकावर तर दंतयुक्तभाल्याच्या योगाने एक देवता महिषावर हल्ला करताना दाखविली आहे.

मुद्रांवरील रुपके आणि त्यामागील संभाव्य धार्मिक भावना यादृष्टीनेह्या मुद्रा वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. स्टिअटाइट दगडाला अल्कली लावूनचकाकी आणण्याचे तंत्र मध्यपूर्वेमध्ये इ. स. पू. ३००० च्या काळातहीवापरलेले आढळते. उडणाऱ्या घारीच्या आकृती सुसा आणि इतरठिकाणीही ज्ञात आहेत, तर बैलावर कसरत करणाऱ्या मानवी आकृतीमिनोअन कसरतींची आठवण करुन देतात. परकीय तंत्रमंत्राचा परिचयदाखविणाऱ्या या काही ठळक गोष्टी होत.

याशिवाय या मुद्रांवर एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रलिपी सापडली. ही चित्रलिपी वाचण्याचे अनेक प्रयत्न झालेले आहेत त्यांत युरी नोरोझोव्हयांच्या मार्गदर्शनाखाली रशियन तज्ज्ञांनी आणि आस्को पार्पोला यांच्यामार्गदर्शनाखाली स्कॅन्डिनेव्हियन तज्ज्ञांनी ती उलगडून दाखविण्याचेअथक प्रयत्न केले, तसेच पॅसिफिकमधील ईस्टर बेटावरील (रापा नुईबेटे) लाकडी ठोकळ्यांवरील लिपीशी तिचे साधर्म्य असल्याचे हंगेरियनअभ्यासक (एम्. जी. दे हेव्हेसी इ.) मानतात परंतु तिचासमाधानकारक उलगडा आतापर्यंत झालेला नाही. यांवर सु. ५०० वेगवेगळीचिन्हे असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. ही सर्व चिन्हे उजवीकडूनडावीकडे सुरुवात करुन लिहिलेली आहेत परंतु दुसऱ्या ओळीत मात्रडावीकडून उजवीकडे लिहिलेली आढळतात. या लिपीचे साधर्म्य दुसऱ्याकोणत्याही लिपीशी असल्याचे ज्ञात नाही. अलीकडे काही तज्ज्ञांनी सिंधू संस्कृतीची चित्रलिपी, ही ब्राह्मी लिपीचे मूळ आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, तर ⇨फादर हेरास  यांनी या लिपीचा उगमद्राविडांशी लावून ही लिपी आर्येतर आहे, असे प्रतिपादिले आहे.आधुनिक भाषाशास्त्रज्ञ सिंधू लिपीतील कोरीव लेखांत शब्दावयव(लोगोसिलॅबिक) लेखनपद्घतीचा वापर केला असावा, या मताचे आहेत.यात दोन किंवा अधिक चिन्हे एकच शब्द किंवा अनेक शब्दांचे वाक्यदर्शवित असावीत. भिन्न भाषिक संदर्भांत आणि संयोजनात वापरात असलेली लेखनचिन्हे ही सिंधू लिपीतील शब्दावयव आणिकल्पनाचित्रे (आयडिओग्राफिक) अशा दोन्ही पद्घतींचे संयुक्त रुपहोय, असे ते म्हणतात.

या मुद्रांवरुन सिंधू संस्कृतीच्या रहिवाशांच्या धार्मिक समजुतींचीकाहीशी कल्पना येऊ शकते. सिंधू संस्कृतीच्या वास्तूंची चर्चा करतानायांतील काही स्नानगृहे अथवा मंडपादी वास्तू धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येत असाव्यात, असे सूचित केले होते. पुरोहित वर्गाच्या स्नानासाठीअथवा काही वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगी स्नान करण्यासाठी अथवा प्रार्थनेलाजमण्यासाठी अशा वास्तूंचा उपयोग होत असावा हे संभाव्य ठरते.

याशिवाय सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळी सापडणाऱ्या मातीच्याबनविलेल्या नग्न देवतांच्या मूर्ती एक प्रकारचा मातृदेवतापूजक पंथ त्याकाळी प्रचलित असावा, असे दर्शवितात. त्याचप्रमाणे पशुपती शिवाचीपूजाही प्रचलित असावी. शिवसदृश अशा तीन व्यक्ती मुद्रांतून आढळतात.त्यांपैकी एका मुद्रेवरील उर्ध्वलिंग (उर्ध्वशिश्न) पशुपती हा त्रिमुख शिव आहे. नग्नता व उर्ध्वशिश्न ही शिवाची लक्षणे त्यात असून त्याने पद्मासन घातले आहे व नासिकाग्रावर दृष्टी स्थिर केली आहे. शिवदेवतेचे हे योगीश्वर रुप सूचित होते. या देवतेचे शिरस्त्राण दोन शिंगेआणि त्यांच्यामधून वर बहिःसृत होणारे पंख्यासारखे दाखविले आहे.मुद्रांवर वारंवार चित्रित केलेली बैलाची आकृती आणि सापडणारे लिंगाकृती व योनिसदृश दगड यांवरुनही या संस्कृतीच्या देवदेवतांची आणिपूजाप्रकारांची कल्पना करता येते. यांशिवाय काही मुद्रांवर आणि मृत्पात्रांवर वारंवार दर्शविले जाणारे वृक्ष एक प्रकारच्या वृक्षपूजेचीप्रथा प्रचलित असल्याचे सूचित करतात. तद्‌वतच प्राणिपूजा प्रचलितअसल्याचे नमुनेही आढळतात.


उत्कृष्ट नागरी रचना, मुद्रांचा वापर, लिपीचे ज्ञान, धातुतंत्राची प्रगतअवस्था ह्या सर्वांवरुन सिंधू संस्कृती ‘एक प्रगत संस्कृती’ ठरली आहेआणि ही प्रगत अवस्था मृत्पात्रे, धातूची हत्यारे आणि मुद्रा ह्यांप्रमाणेचइतर बाबींतही दिसून येते. ही प्रगत अवस्था टिकविण्याकरिता श्रमविभागआणि तत्प्रावीण्य ह्यांचा मेळ घालणे आवश्यक होते. विपुल अन्नोत्पादनाशिवाय विविध कला प्रगत होणे शक्य नसते. यानुसार पाहता सिंधूसंस्कृतीमध्ये अतिरिक्त धान्योत्पादन होत असावे, हे उघड आहे. मोहें-जो-दडो आणि हडप्पा येथील पुराव्यांवरुन सिंधू संस्कृतीचे लोक गहू,जव, वाटाणा, तीळ इ. अनेक धान्ये व कडधान्ये पिकवीत असत, हेउघड आहे. ही धान्ये मोठ्या प्रमाणावर काढली जात. ह्याचा पुरावाधान्यगुदामाजवळच्या उखळासहित सापडलेल्या गोल चौथऱ्यावरुनयेतोच. याशिवाय अनेक घरांमध्ये जे खोलगट आकाराचे पाटे सापडलेआहेत, त्यांवरुन घरामध्येही निरनिराळ्या प्रकारचे धान्य वाटले जाईअसे दिसते. खापरांवर काढलेल्या चित्रांनुसार काही चित्रे डाळिंबाच्याझाडांची आणि केळीची असावीत, असे काहींचे मत आहे.

सिंधू संस्कृतीचे लोक मत्स्याहारी आणिमांसाहारीही असावेत असेदिसते. ते गाई-म्हशी पाळत, यांवरुन त्यांच्या खाण्यात दूधदुभत्याचे पदार्थयेत असावेत.

वस्त्रप्रावरणाकरिता सुती कापडाचा वापर होत असावा असे दिसते.काही तांब्याच्या आणि चांदीच्या वस्तूंच्या पृष्ठभागावर कापडाच्यातुकड्याचा ठसा उमटलेला आढळतो आणि काही मूर्तींवर शालपांघरावयाची प्रथा दर्शविलेली आहे, तीवरुन सिंधू संस्कृतीचे लोककापडाचे उत्पादन करीत असले पाहिजेत, असे निश्चितपणे म्हणता येते.

या सुसंपन्न भौतिक सुबत्तेमुळे व्यापारउदीम, कला आणि कलावस्तूप्रगत व्हाव्यात हे साहजिकच आहे. याचे प्रत्यंतर मोहें-जो-दडो, हडप्पा,चन्हुदारो, लोथल इ. ठिकाणी सापडलेले सोन्याचे अलंकार, मणी इत्यादींतमिळते. मण्यांमध्ये सोने, चांदी, तांबे हे धातू फियान्स, स्टिअटाइटव हर तऱ्हेचे रंगीबेरंगी दगड इत्यादींचा वापर करण्यात आला आहे.सोन्याचे मणी अनेक सापडले. ह्यांतील छोट्या टिकलीच्या आकाराचेमणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अशाच तऱ्हेचे मणी ट्रॉय आणि सुमेरियातसापडलेले आहेत.याउलट चांदीचे मणी गोल अथवा छोट्या पिपाच्याआकाराचे असून, तांब्याचे मणीही साधेच आहेत. दगडी मणी चन्हुदारो येथेच बनवत असे दिसते कारण येथे एका मणिकाराचे जे एक घरसापडले, त्यामध्ये आढळून आले की, कार्नेलियन आणि अकीक दगडाचेलांब तुकडे करवतीच्या साहाय्याने आधी कापले जात. त्यानंतर त्यांचेछिलके काढून त्यांना लांबटगोल आकार दिला जाई, नंतर पॉलिश करुनत्याला ब्राँझ अथवा चर्ट दगडाच्या गिरमिटाने भोक पाडण्यात येई. याउलटअगदी छोटेछोटे स्टिअटाइटचे मणी ब्राँझच्या नळीतून स्टिअटाइटचालगदा जोरात सारुन बनविण्यात येत असत. काहीसे मृदंगाच्या आकाराचेफियान्सचे मणी हेही सिंधू संस्कृतीचे वैशिष्ट्य मानले जाते. अशाचतऱ्हेचे मणी ईजिप्त, क्रीट आणि सिरियामध्ये सापडले आहेत. काहीस्टिअटाइटच्या मण्यांवर त्रिदलात्मक नक्षी काढलेली असून, त्यामध्येलाल रंग भरण्याची प्रथा होती परंतु या सर्वांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण मणी म्हणजेकार्नेलियन व ॲगेट दगडावर काळ्या व पांढऱ्या रंगात पक्की नक्षीकाढलेले होत. हे मणी सिंधू संस्कृतीचे प्रातिनिधिक समजले जातात.अशा तऱ्हेची नक्षी अल्कलीच्या साहाय्याने काढून तो मणी एका विशिष्टतऱ्हेने भाजल्यास अल्कलीच्या योगाने नक्षी कायम राहते. काही मण्यांवरपहिल्या प्रथम अल्कलीचा थर देऊन त्यावर कॉपर नायट्रेटच्या साहाय्यानेकाळी नक्षी काढून तो मणी भाजल्यास कायम स्वरुपाची काळ्यारंगातली नक्षी उमटते. अशा तऱ्हेचे मणी मेसोपोटेमियातही मिळालेलेआहेत. मण्यांशिवाय फियान्सच्या बांगड्या, अंगठ्या इ. वस्तूही दररोजच्या वापरात होत्या. मण्यांच्या बनावटीतील ही वेगवेगळी तंत्रे दोन किंवा तीन ठिकाणी स्वतंत्रपणे उत्पन्न झाली अथवा प्रसारात आली असेसमजणे संयुक्तिक ठरणार नाही म्हणून हे साम्य कल्पनांची वा प्रत्यक्षमालाची देवघेव यांचे निदर्शक मानावे लागते.

सिंधू संस्कृतीची मूर्तिकला विविध स्वरुपाची आहे. यामध्ये स्टिअटाइट, चुनखडक (लाइमस्टोन), ॲलॅबॅस्टर, ब्राँझ आणि मृत्तिकेचा वापरकरण्यात आला आहे. यांतील बऱ्याचशा मूर्ती मानवी शरीराची पिळदारठेवण व भावपूर्णता या दृष्टीने अद्वितीय ठरतात. काही दगडी मूर्तींचे हात वशीर्ष वेगळे जोडले जात असावेत. यात स्टिअटाइटमधील सु. १८ सेंमी. उंचीची शाल पांघरलेली श्मश्रूयुक्त पुरुषाची आकृती विशेष उल्लेखनीयआहे. या व्यक्तीच्या चेहऱ्याची ठेवणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. लांब नाक, जाडअधर, अरुंद कपाळ, लांब पण पिचपिचीत डोळे आणि मुंडित शिर हीजशी चटकन लक्षात येतात, त्याचप्रमाणे ही व्यक्ती आर्यवंशाची नसावी,हेही चटकन जाणवते. या व्यक्तीच्या कपाळावर बिंदीयुक्त शिरपट्ट आहे,तर उजव्या दंडावर गोल दागिना बांधलेला आहे. शाल डावीकडून उजवीकडेयज्ञोपविताप्रमाणे पांघरलेली आहे आणितिच्यावर त्रिदल पद्घतीची नक्षीउठावात कोरलेली आहे. या त्रिदलामध्ये लाल रंग भरलेला होता. डोळ्याच्याजागी शिंपले बसविले होते. या व्यक्तीने मिशा काढून टाकलेल्या होत्या.ही व्यक्ती कोण असावी, याबद्दल एकमत नाही पण कोणातरी पुरोहितांचेहे रुप असावे, असा कयास करावयास हरकत नाही. काहींच्या मतेही एखाद्या पुरुषदेवतेची रुपरेखा असावी परंतु पहिला अंदाज जास्तसंभवनीय वाटतो. अशाच तऱ्हेची ॲलॅबॅस्टर दगडाची शीर्षविरहित मूर्तीउल्लेखनीय आहे.

ब्राँझच्या मूर्तीमध्ये नर्तिकेची समजली जाणारी मूर्ती इतरांपेक्षा विशेषउल्लेखनीय आहे. जवळजवळ १३ सेंमी. उंचीची ही मूर्ती उभे राहण्याच्याढंगदार पद्घतीमुळे आणि चेहऱ्यावरील गर्विष्ठ भावामुळे चटकन लक्षातराहते. उजवा हात नितंबावर ठेवलेला, डावा खांद्यापासून कोपरापर्यंतकंकणांनी भरलेला आणि डाव्या मांडीवर ठेवलेला, मुख गर्विष्ठतेने उचलून कलते केलेले असा उभे राहण्याचा साजिरा ढंग असला, तरी नकटे नाकआणि जबड्याचा खालचा भाग बाहेर आलेला यांवरुन ही सुंदरीआदिवासी जमातीतील असावी असे वाटते.

मातीच्या मूर्ती विविध आहेत. ह्यांतल्या बऱ्याचशा स्त्रीमूर्ती असूनएका विशिष्ट तऱ्हेने बनविलेल्या आहेत. नाक चिखल ओला असतानाचिमटीत धरुन ओढलेल्या अलंकार, स्तन आणि डोळे लावलेल्याटिकल्यांनी सूचित केलेल्या आणि डोक्यावर पंख्याच्या आकाराचीकेशरचना अथवा भूषणे असलेल्या या जननदेवता असाव्यात, असे मतव्यक्त केले जाते. यांतील काही मूर्ती गरोदर दाखविल्या असून काहीसापत्य दाखविल्या आहेत. यांवरुन ह्या जननदेवताच असाव्यात, या मतास दुजोरा मिळतो.

मानवी अथवा देवतांच्या मूर्तींव्यतिरिक्त निरनिराळ्या जनावरांच्यामृत्तिका, फियान्स व स्टिअटाइटच्या मूर्तीही सिंधू संस्कृतीचे कलाकारबनवीत असत. बैल, रेडा, कुत्रा, हत्ती, माकड, डुक्कर, कासव इ. अनेकप्राण्यांच्या प्रतिकृती सापडल्या आहेत. सिंधू संस्कृतीच्या लोकांचीव्यापारी देवाणघेवाण निरनिराळ्या वाहनांच्या साहाय्याने वाढत असे, याचाहीपुरावा मिळालेला आहे. हडप्पा, मोहें-जो-दडो आणि लोथल येथे दोन चाकीबैलगाड्याच्या प्रतिकृती मिळाल्या आहेत. या बैलगाड्या सध्या सिंधमध्येवापरात असलेल्या गाड्यासारख्याच आहेत. दगड वाहून नेणाऱ्यावाहनांच्या छोट्याछोट्या ब्राँझच्या प्रतिकृती किंवा खेळणी हडप्पा वचन्हुदारो येथे आढळतात, त्यांवरुन वाहनांची सार्थ कल्पना येते. वडार लोक ज्यातऱ्हेची ठेंगणी, भरीव चाकांची गाडी वापरीत तशाचतऱ्हेच्या या गाड्या आहेत. याशिवाय लोथलला एक लहान नावेचीप्रतिकृतीही सापडली आहे.


सिंधू संस्कृतीच्या विविध स्थळी सापडलेले निरनिराळे धातू सिंधूसंस्कृतीच्या लोकांचा संबंध अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराण,मध्यआशिया, मेसोपोटेमिया, राजपुताना इ. प्रदेशांशी आला असे दाखवतात.व्यापारउदीमांशी संबंधित अशा इतरही गोष्टी सिंधू संस्कृतीच्या लोकांनाज्ञात होत्या असे दिसते. सिंधू संस्कृतीमध्ये विशिष्ट तऱ्हेची वजनाची पद्घत प्रचलित होती. हडप्पावासियांनी वजनमापांची शिस्तबद्घ व्यवस्थाप्रचारात आणली होती. सुविनीत दगडीघनकल्पीय वजनांच्या प्रारंभीच्याविश्लेषणावरुन असे सूचित होते की, नीचतर वजन परिमाणासाठीद्विमान अंकपद्घती असे. २, ४, ८, १६, ३२ याप्रमाणे ते वापरीतअसावेत आणि अधिक मोठ्या वजनासाठी १६०, २००, ३२०, ६४०, १,६००, ३,२०० अशी दशमान पद्घती ते वापरीत असावेत.सिंधू संस्कृतीच्या बहुतेक सर्व स्थळी चर्ट दगडाची चौकोनी ठोकळ्यांच्याआकाराची वजने सापडलेली आहेत. याशिवाय चुनखडक, स्टिअटाइट,स्लेट, चाल्सिडोनी आणि एका प्रकारच्या काळ्या दगडाची वजने पुष्कळठिकाणी सापडलेली आहेत. याशिवाय तराजूचे दांडेही लोथल व इतरठिकाणी मिळालेले आहेत.

लांबी मोजण्याच्या पद्घतीत दशमान पद्घतीचा उपयोग असावा असेदिसते. अशा तऱ्हेचे मोजमाप मोहें-जो-दडोला एका शिंपल्यावर आणिलोथलला एका हस्तिदंती पट्टीवर कोरलेले आढळले. मान व उपमानहीत्यावर कोरलेले असावेत. प्रत्येक उपमान ०·२६४ इंच (सु. एक सेंमी.)एवढ्या प्रमाणाशी मिळतेजुळते आहे. याचाच अर्थ व्हीलर सांगतात त्याप्रमाणेसिंधू संस्कृतीचे परिमाण १३पुर्णांक दोन दशांश (सु. ३२·७५ सेंमी.) इंचाचे असावे.बाराव्या राजवंशाच्या काळी ईजिप्तमध्ये असेच मोजमाप प्रचलित होते, असेव्हीलर सांगतात. या   मोजमापाव्यतिरिक्त हडप्पा येथे एका ब्राँझच्या पट्टीवर०·३६७ इंच अशा प्रमाणात विभाग नोंदलेले आढळले. सर मॉर्टिर व्हीलरयांच्या मते सिंधू संस्कृतीचा एक फूट १३ ते १३ पुर्णांक दोन दशांश तर १ हस्त २० पुर्णांक तीन दशांश ते २० पुर्णांक आठ दशांश इंच एवढ्यामध्ये बसतो.

सिंधू संस्कृतीमध्ये मुलांकरिता हरतऱ्हेची खेळणी प्रचलित होती.मोठ्याकरिता हस्तिदंती फासे, मुलांकरिता खुळखुळे, पक्ष्यांच्या आकाराच्याशिट्या होत्या आणि पक्षी ठेवण्याकरिता मृत्तिकापंजरही वापरत होते.लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये विविधता आणि योजकता दिसते. दोऱ्याच्यायोगाने मान हलवणारे प्राणी, खेळगाडीला जोडण्यात येणाऱ्या जनावरांची मान हलवण्याची योजकता, ही वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येतील.

सिंधू संस्कृतीच्या या समृद्घ नगरीचा अंत कसा झाला, याबद्दल अनेकांनीअनेक मते मांडलेली आहेत. सर मॉर्टिमर व्हीलर यांच्या मते सिंधूसंस्कृतीचा नाश तिच्या हडप्पा, मोहें-जो-दडोसारख्या शहरांचाविध्वंस इंद्राच्या आधिपत्याखाली आर्यांनी केल्याने झाला, ही घटनाइ. स. पू. १५०० च्या सुमारास झाली. त्यांच्या मते ऋग्वेदा मध्येअनार्यांची पुरे उत्कृष्टप्राकारयुक्त होती असे वर्णन येते. ही वर्णने सिंधूसंस्कृतीच्या शहरांना लागू पडतात. तसेच हरियुपिया हे ऋग्वेदातील नगरनाम हडप्पाचेच प्राचीन नाव असावे असेही ते सुचवितात. पुरंदर-इंद्राने दिवोदासाच्या मदतीकरता ९० दुर्गांचा विध्वंस केला. ऋग्वेदामध्येएका ठिकाणी इंद्राने अनार्यांचा पुढारी शंबर याचे ९९ किल्ले उद्ध्वस्तकेल्याचाही उल्लेख येतो. व्हीलर यांच्या मते मोहें-जो-दडो, हडप्पा,सुक्तगेनडोर इ. सिंधू संस्कृतीच्या विविध स्थळी तटयुक्त नगरीचे अवशेषमिळालेले आहेत. यावरुन भारतात येणाऱ्या आर्यांनी विध्वंस केलेलेदुर्ग म्हणजेच सिंधू नगरे होत. आर्यांच्या या जबरदस्त हल्ल्यामुळे मोहें-जो-दडोच्या रहिवाशांची ससेहोलपट झाली, याचे प्रत्यंतर मोहें-जो-दडोच्या उत्खननामध्ये सापडलेल्या विविध अवस्थेत पडलेल्या मानवीसांगाड्यात दिसून येते. काही ठिकाणी मानवी सांगाड्याची गर्दी आढळते.काहींच्या डोक्यावर शस्त्रांनी केलेल्या जखमांच्या खुणाही आहेत, तर काहीजिन्यातच घराबाहेर पडण्याच्या धडपडीत मरुन पडल्याचे आढळले. आर्यांच्याअनपेक्षित हल्ल्यामुळे मोहें-जो-दडोच्या रहिवाशांची जीव वाचविण्याचीकेविलवाणी धडपड अशा तऱ्हेच्या पुराव्यावरुन स्पष्ट होते, असे व्हीलरमानतात परंतु हे सांगाडे खूपच नंतरच्या स्तरांतील असून त्यांचा व सिंधू नगरीच्या विनाशाचा साक्षात संबंध नाही, असे जॉर्ज एफ्. डेल्स यांनीदाखवून दिले आहे.

दुसरे मत असे की, सिंधू संस्कृतीच्या नगरींचा नाश मोठमोठ्या पुरांमुळे झाला. सध्या जरी रावी आणि सिंधूची पात्रे हडप्पा आणिचन्हुदारोपासून दूर वाटत असली, तरी साडेतीन-चार हजार वर्षांपूर्वी यानगरी विध्वंसक पुराच्या तडाख्यात येत असल्या पाहिजेत. तटांची वारंवारबांधणी, एकापेक्षा एक उंच चौथऱ्यावर झालेल्या वस्त्या आणि पुराच्या मातीचे केलेले पृथक्करण यांवरुन पुरामुळेच या नगरीचा नाश झाला,असे काहींचे मत आहे. अलीकडे अमेरिकन संशोधकांनी संशोधनकरुन या मतास पुष्टी दिलेली आहे.

तिसरे एक मत असे की, सिंधू संस्कृतीचा नाश सुबत्तेतून निर्माणझालेल्या गतिमानतेच्या अभावामुळे झाला. आर्थिक नियतीचे नियमअसे असतात की, समृद्घीच्या सुकाळातच अधोगतीची बीजे उद्‌भवतात.सिंधू संस्कृतीची बहुतेक संपन्नता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आल्यावरती प्रगतीच्या दृष्टीने खुंटून गेली आणि या प्रगती खुंटण्यामुळेच सिंधूसंस्कृतीचा ऱ्हास सुरु झाला. सिंधू संस्कृतीच्या आधीच्या थरातीलवास्तू आणि नगररचना ही नंतरच्या काळातील वास्तू आणि नगररचनेपेक्षाखूपच चांगली होती.

काहींच्या मते सामाजिक, आर्थिक आणि शासकीय एकतंत्रीपणाजोपर्यंत होता, तोपर्यंत या संस्कृतीची वाढ निर्वेधपणे आणि शिस्तीनेझाली परंतु अशा तऱ्हेची चौकट शेकडो वर्षे त्याच दमाने काम करुशकेल असेही नाही. सुरुवातीच्या काळात ही चौकट जास्त प्रभावीआणि सर्वंकष असावी परंतु नंतरच्या काळात ती दुबळी झाल्याने हीसंस्कृती विस्कळीत झाली. यातूनच नवनव्या प्रदेशांमध्ये ती विस्तारतगेल्याने तिच्यामध्ये झपाट्याने सांस्कृतिक विस्कळीतपणा आला. याचे प्रत्यंतर गुजरात, सौराष्ट्र व इतर ठिकाणी येते. हजार वर्षे टिकलेल्या वएका विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या संस्कृतीचा उगम आणि नाश दोन्हीअचानकपणे झाला व त्यांची कारणे अनाकलनीय होती, असे मानण्याकडेच पुरातत्त्वज्ञांचा कल असे परंतु मानवी जीवनात एवढ्या घटनाआकस्मितपणे घडत नाहीत, त्यांची कारणेही पूर्णपणे अतर्क्य नसतात. वर उल्लेखलेली कोणतीही एकच घटना सिंधू संस्कृतीच्या नाशासकारणीभूत नसून त्या सर्वांचा मिळून झालेला तो परिपाक होय. संघटनेचाअभाव व दारिद्र्य यांमुळे पूर्वीची प्रगल्भ नागरीसंस्कृती दिसेनाशी झाली, तरीमृत्पात्रे, हत्यारे यांसारख्या आवश्यक जीवनवैशिष्ट्यांत पुढचे ताम्रपाषाणयुगीन समाज सिंधू संस्कृतीचा वारसा सांगतात. विशेषतः सौराष्ट्र,राजस्थान येथे ही प्रकिया प्रकर्षाने जाणवते.


गॅड यांनी अर, किश, टेल्-अस्मार, टेपे-गावरा इ. मध्यपूर्वेतीलमेसोपोटेमियातील नगरींमध्ये सापडलेल्या सिंधू संस्कृतीसदृश मुद्रांवरुनसिंधू संस्कृतीचा काल १९३२ मध्ये निश्चित केला. मध्यपूर्वेतील यास्थलांचा इतिहास इतर पुराव्यांवरुन बराचसा निश्चित असल्याने त्यांनीत्याच्या आधारावर सिंधू संस्कृतीच्या मुद्रांचा काल इ. स. पू. २५००– १५०० असा ठरविला. याशिवाय सिंधू संस्कृतीचे नक्षीदार कार्नेलिअनव ॲगेट दगडाचे मणी व सोन्याचे टिकल्यांसारखे मणी यांचाही कालमेसोपोटेमियन पुराव्यांनुसार याच प्रकारे निश्चित करता आला. तांब्याचेबनविलेले वाकड्या टोकाचे चाकूही इराणमधील प्राचीन शहरी सापडलेहोते. त्याचप्रमाणे वेटोळेदार ब्राँझच्या पिनाही मध्यपूर्वेत आणि सिंधूसंस्कृतीच्या स्थळी सापडलेल्या होत्या. तीच गोष्ट मोहें-जो-दडोलासापडलेल्या दांड्याकरिता भोक ठेवलेल्या ब्राँझच्या कुऱ्हाडीची आहे.अशा तऱ्हेच्या कुऱ्हाडी इराणमध्ये इ. स. पू. १००० पर्यंत प्रचलितहोत्या आणि अशा तऱ्हेची कुऱ्हाड मोहें-जो-दडोला वरच्या म्हणजेनंतरच्या थरांत मिळाल्याने मोहें-जो-दडोच्या नंतरच्या वस्त्यांचा काळइ. स. पू. ६०० अथवा त्याआधी असे अनुमान काढता येते.

अशा तऱ्हेच्या बारीकसारीक अवशेषांच्या तौलनिक अभ्यासावरुनइ. स. पू. २५००—१५०० असा जो कालखंड सिंधू संस्कृतीचाम्हणून निश्चित करण्यात आला आहे, त्यास कार्बन-१४ पद्घतीनुसारआलेल्या तारखा दुजोरा देतात. पाकिस्तानात कोटदिजीच्या सिंधूसंस्कृतिपूर्व वस्त्यांचा काल इ. स. पू. २६०० असा आलेला आहे. हाकाल वर उल्लेखिलेल्या सिंधू संस्कृतीच्या प्रगत अवस्थेच्या सुरुवातीच्याकालखंडाच्या संदर्भात योग्यच वाटतो. याउलट लोथलच्या दुसऱ्या म्हणजे,मिश्र सिंधू संस्कृतीचा कालखंड कार्बन-१४ नुसार इ. स. पू. सु.२०००– १८००  असा ठरलेला आहे, तर कालिबंगा येथील हडप्पासंस्कृतीच्या वरच्या थराचा काल इ. स. पू. सु. २००० असा ठरलाआहे. तेव्हा सिंधू संस्कृतिपूर्व इ. स. पू. २६०० च्या कोटदिजी वकालिबंगा– लोथलसारखी उत्तर हडप्पा वस्ती या दरम्यानच्या म्हणजेचइ. स. पू. सु. २५००—१५०० या कालात सिंधू संस्कृतीचा कालनिश्चित करणे संयुक्तिक ठरते.

सिंधू संस्कृतीचा उद्गम कोणत्याही कारणामुळे झालेला असोपरंतु तिच्या प्रगत अवस्थेध्ये आणि नंतरच्या काळामध्ये ती जेव्हाप्रादेशिक रीत्या विस्तारली, तेव्हा या संस्कृतीच्या पाइकांना नवनव्याप्रदेशांत प्रादेशिक स्वरुपाच्या परंतु तंत्रसंस्कृतीच्या दृष्टीने समानभासणाऱ्या विविध संस्कृती आढळून आल्या असल्या पाहिजेत.राजस्थानात व बनासच्या खोऱ्यामध्ये काळी -तांबडी खापरे वापरणाऱ्यांची ताम्रयुगीन संस्कृती इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकात प्रचलित होती.त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातही इ. स. पू. १७००—१२०० ह्या सिंधूसंस्कृतीच्या उतरत्या काळात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या लोकांची विस्तृतवस्ती होती, तीच गोष्ट गुजरात, सौराष्ट्राची. या सर्वांचा एकमेकांशी संबंधकाय, त्या एकमेकांना ज्ञात होत्या अथवा कसे आणि सिंधूस्कृतीच्या  सांस्कृतिक विलीनीकरणात ह्यांचा काही भाग होता किंवा काय, हे सर्वप्रश्न अद्याप तरी अनिर्णितच आहेत. 

पहा : ताम्रपाषाणयुग मोहें-जो-दडो हडप्पा. 

संदर्भ :1. Agrawal, D. P. The Indus Civilization : An Interdisciplinary Perspective, New Delhi, 2007

    2. Chakrabarthi, Dilip K. The External Trade of Indus Civilization, 1990.

    3. Dhavalikar, M. K. Indian Protohistory, New Delhi, 1997.

    4. Gupta, S. P. The Indus-Saraswati Civilisation, Origins, Problems and Issues, New                    Delhi, 1996.

    5. Kenoyer, Jonathan Mark, Ancient Cities of the Indus Valley Civilization, Oxford, 1998.

    6. Mackay, E. J. H. Further Excavations at Mohenjodaro, 2 Vols., New Delhi, 1938.

    7. Majumdar, R. C. Ed. The Vedic Age, Mumbai, 1998.

    8. Marshall Sir. John, Mohenjodaro and The Indus Civilization, London, 1931.

    9. Parpola, Asko, Deciphering the Indus Script, Cambridge, 1994.

   10. Possehl, Gregory L. The Indus Civilization : Contemperary Prespective, New York,                    2002.

   11. Shinde, Vasant Osada, T. etc. Harappan Necropolis at Farmana in the Ghaggar Basin,          New Delhi, 2010.

   12. Wheeler, Sir. Mortimer, The Indus Civilization, Cambridge, 1960.

  १३. ढवळीकर, म. के. कोणे एकेकाळी सिंधु संस्कृती, पुणे, २००९.

देव, शां. भा.