कुमारमंगलम्, परमशिव प्रभाकर : (१ जुलै १९१३ —). भारतीय भूसेनेचे भूतपूर्व सरसेनापती. १९३३ मध्ये भारतीय भूसेनेच्या तोफखाना दलात कमिशन. १९३३-३४ या काळात इंग्लंडमधील लार्कहिल येथील अभ्यासक्रम पूर्ण केला. दुसऱ्या महायुद्धात पश्चिम आशियाई मोहिमेत दोन वेळा कैद. १९४२ मध्ये इटलीत पुन्हा युद्धकैदी. तेथून पलायन परंतु पुन्हा जर्मनीत अटक. तेथून सुटका व १९४५ मध्ये भारतात आगमन. १९४५ ते ४७ या काळात ते प्रथम नववे स्वतंत्र भारी विमानरोधी दल व नंतर बारावे हवाई छत्री क्षेत्रदल यांचे प्रमुख होते. १९४७ मध्ये ओक्लाहोमा येथील क्षेत्रीय तोफखाना-केंद्रामध्ये उच्च प्रशिक्षणासाठी निवड. १९४७ ते ४८ या काळात देवळाली येथील प्रशिक्षण केंद्राचे ब्रिगेडियर, ऑगस्ट १९५० मध्ये तोफखाना केंद्र पश्चिम विभाग यावरील प्रमुख अधिकारी सप्टेंबर १९५६ मध्ये मेजर जनरल पदावर नियुक्ती व पायदळ डिव्हिजनचे आधिपत्य. १९५९ मध्ये वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजच्या संचालकपदी नेमणूक. १५ जानेवारी १९६५मध्ये भारतीय भूसेनेचे दुय्यम प्रमुख आणि ८ जून १९६६ ते मे १९६९पर्यंत भारतीय भूसेनेचे सरसेनापती.
जनरल कुमारमंगलम् हे उत्कृष्अ पोलो खेळाडू व क्रिकेटपटू आहेत. ते मेरिलोबोन क्रिकेट क्लबचे सभासद व रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीचे अधिछात्र आहेत. दुसऱ्या महायुद्धातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना विशेष सेवा पुरस्कार (डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस ऑर्डर) देण्यात आला होता.
टिपणीस, व. रा.
“