कुबेर – १ : अष्टदिक्पालांपैकी उत्तर दिशेचा अधिपती. त्याचा पिता विश्रवस्, पितामह पुलस्त्य व प्रपितामह ब्रह्मदेव. भरद्वाजाची मुलगी देववर्णिनी ही त्याची माता. इडविडा आणि पुलस्त्य अशीही त्याच्या मातापित्यांची नावे आढळतात. त्याचे पुत्र नलकूबर व मणिग्रीव. पत्नी ॠद्वी, यक्षराज, वैश्रवण, पौलस्त्य, ऐडविड, धनद, निधिपती इ. नावांनीही त्याचे उल्लेख आहेत.
तो रावणाचा सावत्र भाऊ. कुबेराच्या तपश्चर्येमुळे संतुष्ट होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, लोकपालत्व, धनेशत्व, रुद्राचे मित्रत्व आणि पुष्पक विमान दिले. मेरू पर्वतावरील लंकानगरीत रहात असता, रावणाने लंकानगरी त्याच्यापासून हिरावून घेतली. त्यामुळे त्याने कैलास पर्वतावर विश्वककर्म्याकडून अलकानगरी वसविली. अलकानगरीचे कालिदासादी कवींच्या काव्यांत सुंदर वर्णन आढळते. त्याच्या उपवनाचे नाव ‘चैत्ररथ’. कुबेर मुळात फारच सुंदर होता तथापि पार्वतीकडे साभिलाष दृष्टीने पाहिल्यामुळे त्याचा डावा डोळा गेला, उजवा पिंगट झाला व त्याला कुरूपता आली. नर अथवा मेष हे त्याचे वाहन तथापि हत्ती, घोडा सिंह, रथादींचाही त्याचे वाहन म्हणून उल्लेख आढळतो.
ऐश्वर्य आणि विलास यांची प्रातिनिधिक देवता म्हणून त्याचे अनेक उल्लेख साहित्यातून येतात. यक्षांचा अधिपती म्हणून तसेच शक्ती, समृद्धी आणि कल्याण प्रदान करणाऱ्या लोकदेवतेच्या स्वरूपातही त्याची उपासना उत्तर भारतात विशेष प्रचलित होती. नगररचनेत इतर प्रमुख देवतांसोबतच कुबेराच्या मंदिराचाही समावेश असे.
त्याच्या अनेक मूर्ती सापडल्या असून, भारहूत येथे सापडलेली त्याची अर्धमूर्ती सर्वांत प्राचीन (इ.स. पू.सु.१००) मानली जाते. मथुरा, पद्मावती, पाटलिपुत्र, विदिशा इ. प्राचीन नगरे त्याच्या उपासनेची महत्त्वाची केंद्रे होती. ह्या ठिकाणी हातात मदिरापात्र असलेल्या तुंदिलतनू कुबेराच्या विविध मूर्ती सापडल्या आहेत. त्याच्या कुशाण व गुप्तकालीन काही मूर्तींत एका हातात मदिरापात्र व दुसऱ्या हातात द्रव्याची थैली धारण केलेल्या मूर्ती आहेत तर इतर काही मूर्तींत तो पर्वतावर अथवा धनराशीवर विराजमान झालेला आढळतो. काही मूर्तींत तो, त्याची भार्या हारीती, तर काहींत लक्ष्मी, तर काहींत हारीती व लक्ष्मी यांच्या समवेत बसलेला आढळतो. श्री किंवा लक्ष्मी ह्या त्याच्या भार्या असल्याचे उल्लेख साहित्यातही आहेत. दिक्पालाच्या स्वरूपातील त्याच्या मध्ययुगीन मूर्तीत तो उत्तराभिमुख दाखविला आहे. [→ अष्टदिक्पाल].
बौद्ध धर्मात आणि कलेत ‘जंभाल’ म्हणून त्याचा उल्लेख व मूर्ती आढळतात. महायान पंथात त्याची भार्या ‘वसुधारा’, तर वज्रयान पंथात ‘मारीची’ असा उल्लेख आहे. जैन धर्मात त्याला मल्लिनाथ तीर्थंकराचा यक्ष म्हटले असून, त्याच्या त्या रूपातील मूर्तीही आहेत.
संदर्भ : Coomaraswami, A. K. Yakshas, 2 Vols., Washington, 1928, 1931.
सुर्वे, भा. ग.
“