कुन्नूर : तमिळनाडू राज्याच्या निलगिरी जिल्ह्यातील गिरिविहारस्थान. लोकसंख्या ३८,००७ (१९७१). कुन्नूर, वेलिंग्टन आदी सहा नगरसमूहांची लोकसंख्या ७०,८१३ (१९७१). समुद्रसपाटीपासून १,७०८ मी. उंचीवर, निलगिरी पर्वतावरील एका निसर्गरम्य ठिकाणी हे ऊटकमंडच्या आग्नेयीस १९ किमी. आहे. म्हैसूर व कोईमतूरहून येथे मोटारमार्ग असून मेट्टुपालयम् स्थानकापासून मीटरमापी रेल्वे कुन्नूरमार्गे ऊटीपर्यंत गेली आहे. ऊटीपेक्षा येथील हवा सौम्य असल्याने प्रवाशांचे हे आवडते ठिकाण आहे. येथून ५ किमी. वायव्येस वेलिंग्टन हे लष्करी ठाणे असून, ३ किमी. आग्नेयीस हुलिकलद्रुग अथवा टायगररॉक हा टिपू सुलतानाचा अतिशय अवघड चढणीचा किल्ला आहे. कुन्नूरमधील पाश्चर संस्था भारतातील जुन्यापैकी एक असून, सिम्स उद्यानातील विविध वनस्पतींचा संग्रह अमूल्य समजला जातो. शहरात रेसकोर्स, थिएटर, गोल्फ व इतर खेळांची मैदाने, अद्ययावत शिक्षणसंस्था व हॉटेले असून, शहराभोवती अनेक धबधबे व स्थाने प्रेक्षणीय आहेत. कुन्नूरचा आसमंत चहा, कॉफी व निलगिरी यांनी समृद्ध असल्याने, कुन्नूर ही त्या मालाची उद्योग व बाजारपेठ बनली आहे.
शाह, र. रू.