खवले किडे : (देवी कीड). ह्यांचा स‌मावेश हेमिप्टेरा गणाच्या डायाप्सिडिडी कुलात करतात. हे किडे फार बारीक व एका खवल्याखाली झाकलेले असतात किंवा बहुधा वरच्या चिवट व खालच्या बऱ्याच पातळ खवल्यांनी आच्छादिलेले असतात. खवले पहिल्या निर्मोकाच्या (बाह्यत्वचेच्या वरच्या काढून टाकलेल्या थरांच्या,

स‌फरचंदावरील स‌ॅन ओझे खवले किडे : (अ) प्रौढ मादीचा खवला, (आ) नराचा खवला, (इ) प्रथमरूप पिलू, (ई) तेच मोठे करून दाखविलेले, (उ) फळावरील कीड, (ऊ) मादीचे शरीर, (ए) प्रौढ नर.

कातीच्या) टोकाला किंवा पहिल्या आणि दुसऱ्या निर्मोकांच्या भोवती गुंडाळलेले असतात. अवसानकाजवळ (शेवटच्या उदरखंडाच्या वरच्या भागाजवळ) पृष्ठीय (वरील) व अधर (खालील) रंध्राने उघडणाऱ्या विशिष्ट ग्रंथीतून स्रवणाऱ्या मेणापासून खवले तयार झालेले असतात. खवल्यांचे आकार विविध असून ते वर्तुळाकृती ते वर्तुळाखंडीय, लांबट, रेखीय, सूत्रवत किंवा ऑयस्टराच्या कवचाच्या आकाराचे असतात. ह्यांचे पृष्ठभाग पसरट, बहिर्गोल किंवा शंक्वाकार गुळगुळीत किंवा कंगोरेदार पातळ व नाजूक किंवा कठीण आणि चिवट पांढरे करडे, पिवळे व तपकिरीच्या विविध छटा, मंद लाल, काळे अशा विविध रंगांचे असतात. नराचे खवले बरेच लहान आणि सामान्यतः अधिक लांबट व कधीकधी फिकट रंगाचे असतात.

प्रौढ मादीचे शरीर फारच लहान, बिंबाकृती किंवा लांबट असून शरीराचे खंडीभवन (समान भागांत झालेले विभाजन) अस्पष्ट असते. २ ते ८ ही उदरखंडे एकत्र मिळून अवसानक तयार झालेला असतो. अवसानकाचे स्रवण, कवचाचे निर्मोचन (कात टाकण्यासारखी क्रिया) आणि प्रजोत्पादन यांसाठी अतिविशेषीकरण झालेले असते. शृंगिका (सांधे असलेली लांब स्पर्शेंद्रिये) नसतात किंवा अवशेषरूप असतात. डोळे व पाय नसतात. तुंड (मुस्कट) आखूड व साधे असते. वक्षीय श्वासरंध्रांच्या दोन जोड्या असतात. गुद पृष्ठीय असते. नर अगदी बारीक, पक्षहीन किंवा स‌पक्ष असून शृंगिका उत्तम विकसित अक्षिकेच्या (साध्या डोळ्याच्या) तीन जोड्या, दोन गुदतंतू असून सूचिका लांब व बारीक असते. वरवर पाहता ते अन्न खात नाहीत असे वाटते.

अंडी जवळजवळ सूक्ष्मदर्शी असून त्यांचे पांढरा ते पिवळा, लाल किंवा जांभळा असे विविध रंग असतात. अंड्यांतून नुकतीच बाहेर पडलेली पिले नुसत्या डोळ्यांनी मोठ्या कष्टाने दिसतात. ती गोलाकार असून त्यांच्या शरीराचे खंडीभवन स्पष्ट असते. ती क्रियाशील व सरपटणारी असून योग्य अशा खाण्याच्या जागा सापडेपर्यंत किंवा शक्तिपात होऊन व थकवा येऊन मृत्यू येईपर्यंत स‌रपटत राहतात. ती पुष्कळ दिवस जगू शकतात. ती बरेच अंतर चालतात परंतु वारा, पक्षी, इतर कीटक, शेतीची अवजारे आणि माणसांची वस्त्रे यांच्याद्वारे त्यांचा प्रसार होऊ शकतो. त्यांच्यातील काही वारंवार मादीभोवती जमतात आणि ऱ्हास पावणाऱ्या खवल्यांवरही राहतात. अशा तऱ्हेने आश्रयी (ज्यांवर परजीवी उपजीविका करतो त्या) वनस्पतींवर एकसंध वसाहत तयार होते व त्या वनस्पतींवर खवल्यांचे कवच तयार होते.

या किडीच्या विशिष्ट जाती आश्रयी वनस्पतीमध्ये विषारी पदार्थांचे अंत:क्षेपण करतात (आत सोडतात) आणि त्यामुळे वनस्पतीच्या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या स‌मूहांच्या) वाढीत अनियमितपणा, वर्णहीनता उत्पन्न होऊन ते भाग किंवा संपूर्ण वनस्पती मरून जाते. ते मुख्यत: बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) झुडपे व वृक्ष यांवर आपली उपजीविका करतात. जगात जेथे जेथे खाण्यास योग्य वनस्पती आहेत तेथे तेथे त्यांचा प्रसार झालेला आहे.

या किडीचा उपद्रव ऊस, आले, स‌फरचंद, द्राक्षे, लिंबू-वंशीय फळे, अंजिर इ. पिकांना होतो. स‌ॅन ओझे खवला (क्वॉड्रॅस्पिडिओटस पर्निसिओझस ) स‌फरचंदावर फार गंभीर स्वरूपाचा परिणाम करतो. भारतात तो प्रथम काश्मीरमध्ये आढळला. पौर्वात्य पिवळी खवले कीड (ॲओनिडिएल्ला ओरिएंटॅलिस ) अंजिरावर आढळते. उसाचे, मीलॅनॅप्सिस ग्लोमेरॅटा आणि केरोप्लॉस्टेस ॲक्टिनीफॉर्मिस या खवले किडींमुळे ३० टक्के उत्पन्न घटते, असे आढळून आले आहे [→ ऊस]. ॲओनिडिएल्ला औरँटाय ही जाती लिंबू-वंशीय फळांची लागवड होणाऱ्या प्रदेशांत जगभर आढळते व ती ८६ मूल्यवान वनस्पतींवर आढळते. पार्‌लॅटोरिया ओलिई ही जाती ऑलिव्ह, कलिंगड आणि लिंबू-वंशीय फळांवर अमेरिका व भूमध्य सामुद्रिक प्रदेशांत आढळते. या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएटाची फवारणी करतात.

जमदाडे, ज. वि.