कुनलुन : आशिया खंडातील सर्वांत लांब ४,००० किमी. पर्यंत संहती. ही पामीर पठारापासून पूर्वेस चीनच्या नानशान पर्वतापर्यंत गेलेली आहे. तिबेट पठाराच्या उत्तर सीमेवर व तारीम खोऱ्याच्या दक्षिणेस ही ३४० उ. व ४०० उ. आणि ७४० पू. व १०३० पू. यांच्या दरम्यान पसरली आहे. हिचा आस्तिन ता हा फाटा त्साइदाम दलदलीच्या खोलगट प्रदेशाच्या उत्तरेकडून व आरका ता हा फाटा दक्षिणेकडून जातो. पश्चिम भागात तीव्र वलीकरण झालेले दिसते. सरासरी उंची ६,००० मी. असून उलूमुझ्ता किंवा ‘ई ६१’ हे सर्वोच्च शिखर व ७,७२४ मी. व कुंगूर आणि मुझताघ आता ही शिखरे अनुक्रमे ७,७१९ मी. ७,५४६ मी. उंच आहेत. पायथ्याशी खोतान, केर्या व चेरचान हे मरुप्रदेश आहेत. चिनी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे पूर्व भागापर्यंत पोहोचतात.
या पर्वतात यार्कंद व खोतान यांच्या दरम्यान तांबे व मीठ, खोतानच्या पूर्वेस सोने व जवळपास जस्त सापडते. काही भागांत कोळसा आहे. अगदी पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात, विशेषत: उत्तर उतारांवर कुरणे व सूचिपर्णी वृक्ष आढळतात. शेळ्यामेंढ्यांचे कळप बाळगणाऱ्या व थोडीशी शेती करणाऱ्या उइगुर या भटक्या जमातीची तुरळक वस्ती या पर्वतप्रदेशात आहे. हा पर्वत अत्यंत दुर्गम असून, खिंडी खूप उंचावर आहेत. गवत आणि झुडुपे असलेल्या भागांतून काही लमाण मार्ग जातात. प्राचीन चिनी रेशीममार्गाच्या अनुरोधाने कॅश्गार–लानजो हा मोटाररस्ता ताल्कामाकान मरुप्रदेश व कुनलुनच्या उत्तरपायथ्याच्या टेकड्या यांच्या बाजूने जातो. स्व्हेन हेडीन व रामसिंग, लालसिंग आणि आफ्रजगुलखान या भारतीयांसमवेत सर ऑरेल स्टाइन यांनी समन्वेषण करून कुनलुनची बरीच माहिती जमविली. हल्ली युरोपीयांना या भागात बंदी आहे.
खातु, कृ. का. कुमठेकर ज. ब.