कुडझू: (को-हेंप, कुडझू हेंप इं. कुडझू व्हाइन लॅ. प्युरॅरिया लोबॅटा कुल-लेग्युमिनोजी उपकुल-पॅपिलिऑनेटी). ही कणखर व जलद वाढणारी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), काहीशी केसाळ, ओषधीय [→ ओषधि] वेल मूळची चीन व जपान येथील असून हल्ली तेथे भरपूर लागवडीत आहे. अलीकडे भारतात आणि इतर उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील प्रदेशांत हिची लागवड केली जाते.ही जमिनीसरपट वाढते,तसेच आधारामुळे उंचीवरही पसरते. हिची मोठी संयुक्त व त्रिदली पाने आणि कोवळ्या फांद्या खाद्य असून लांब (१२ सेंमी.), ग्रंथिल मुळापासून भरपूर पिष्टमय खाद्यपदार्थ मिळतो. हिची सामान्य शारीरिकलक्षणे ⇨ लेग्युमिनोजी(उपकुल-पॅपिलिऑनेटी) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात  [→ अगस्ता]. पानांच्या बगलेत एप्रिल–जूनमध्ये येणाऱ्या २०–५० सेंमी. लांब मंजरीवर सुगंधी, अंजिरी किंवा निळसर फुले असतात. शिंबा (शेंग) सपाट, आयत, अरुंद, ५–१० सेंमी. लांब व केसाळ असून तिच्यात ८–२० बिया असतात.

ही वेल प्रथम १९२६ मध्ये भारतात आणली गेली व तिची लागवड बिहारमध्ये यशस्वी रीत्या केली गेली तिचा उपयोग चारा, हिरवळीचे खत व जमिनीत ओलावा राखून धुपण्यापासून तिचे संरक्षण यांकरिता होतो असे अनुभवास आले. परंतु म्हैसूर,कूर्ग, द. कारवार व पुणे इ. ठिकाणी त्याउलट अनुभव आला. मलाया व विषुववृत्तीय आफ्रिका येथेही तोच अनुभव आला. उत्तर प्रदेशात व दिल्लीत त्यामानाने लागवड बरी झाली. साधारण ओलसर, उपोष्ण व उबदार समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात या कुडझूची लागवड भूसंरक्षण व हिरवळीचे खत यांकरिता चांगली होते. हिची अभिवृद्धी (लागवड) बिया व मुळे फुटलेले खोडाचे तुकडे यांनी करतात भारतात फुले येऊन बिया मिळणे दुरापास्त असते, त्यामुळे कलमे लावूनच जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान लागवड करतात. बहुतेक गवत व इतर शिंबावंत पिके चांगली वाढत नाहीत अशा जमिनीत व हवामानात कुडझू चांगली वाढत असल्याने, तसेच खोल जाणाऱ्या मुळांनी जमीन बांधविली जात असल्याने तिची लागवड चांगली ठरते शिवाय पालापाचोळा जमिनीत गाडल्याने तिची सुपीकता वाढते. पुसा (बिहार) येथील जमिनीत मुळांवरच्या सूक्ष्मजंतूयुक्त गाठींची वाढही चांगली होते, त्यामुळे जमिनीत नायट्रेटाचे प्रमाण वाढते असे आढळून आले आहे. कोंबड्या व पाळीव जनावरांना कुडझूचा चारा उत्तम ठरला आहे. अनुकूल परिस्थितीत वाढविलेल्या पिकांची ग्रंथिल (गाठाळ)मुळे शिजवून भाजीकरिता वापरतात. सुक्या मुळांपासून काढलेल्या पिठात ४०टक्के स्टार्च असून तो कसावाच्या [→टॅपिओका] स्टार्चप्रमाणे अन्नात व औषधात वापरता येतो. चीन व जपान येथे को-फेन  नावाचे पीठ बनवितात ते गोड व गंधहीन असून त्याची कांजी करतात. कुडझूच्या मुळांचा काढा जपानात सर्दी, ज्वर व आमांश ह्यांवर देतात. कोवळ्या फांद्या दुग्धवर्धक असतात. फांद्यांपासून मिळणाऱ्या धाग्यांचे दोर व साधे जाडेभरडे कापड बनवितात.

ट्रॉपिकल कुडझू : (लॅ. प्यु. फॅसिओलॉइडिस). ही कुडझूची दुसरी जाती, एक काष्ठमय वेल (महालता) असून कुमाऊँ ते आसाम व पुढे ब्रह्मदेश, मलाया व चीन येथे तिचा प्रसार आहे. उष्णकटिबंधातील हवामानात हिची वाढ वरच्या जातीपेक्षा अधिक चांगली होते त्यामुळे तेथे तिची लागवड अधिक फायदेशीर होते. रबर, लिंबे व नारळ यांच्या मळ्यांतील अर्धवट सावलीतील जमिनीतही ह्या कुडझूचे पीक येते. चारा, हिरवळीचे खत व भूसंरक्षण या दृष्टीने हिची यशस्वी लागवड भारतात (कर्नाटक, कूर्ग, वायनाड, अन्नमलई व उत्तर प्रदेश येथे) करण्यात आलेली आहे. कमी पावसाच्या प्रदेशात उन्हाळ्यात फुले, फळे व बिया येतात. आग्नेय आशियातील काही भागांत मुळे चांगली येतात व ती तेथे भरपूर खाल्ली जातात. खोडांपासून काढलेल्या धाग्यांपासून चांगला दोरा व दोऱ्या बनवितात. गळवे व व्रण यांवर कुडझूचा उपयोग करतात.

घोडवेल : (दारी इं. इंडियन कुडझू लॅ. प्यु. ट्युरोजा) ही कुडझूची तिसरी जाती भारतातील काही ठिकाणी लागवडीत आहे . [→ घोडवेल]. 

परांडेकर, शं. आ.