खचदरी : (रिफ्ट व्हॅली). खंदकासारखा आकार असणारी दरी. खचदरीच्या भिंतीचा उतार तीव्र असतो समोरासमोरील भिंती एकमेकींस जवळजवळ समांतर असतात. पृथ्वीच्या कवचात एकमेकांस समांतर असे सामान्य विभंग (तडे) उत्पन्न होऊन व त्या विभंगांमधील जमीन खचून खचदऱ्या उत्पन्न झालेल्या असतात, अशी रूढ कल्पना आहे.
खचदऱ्यांची विख्यात उदाहरणे म्हणजे पूर्व आफ्रिकेतील खचदऱ्या होत. झँबीझी नदीच्या मुखाजवळच्या प्रदेशापासून तो उत्तरेस तांबड्या समुद्रापर्यंतच्या २,९०० किमी. लांबीच्या प्रदेशात त्या पसरलेल्या आहेत. या दऱ्या स्थूलमानाने उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलेल्या आहेत, पण त्या सरळ रांगेत नसून त्यांना फाटेही फुटलेले आहेत. व्हिक्टोरिया सरोवराच्या पश्चिमेकडील भागात ज्या खचदऱ्या आहेत त्यांच्यात ॲल्बर्ट, एडवर्ड, किवू, टांगानिका इ. सरोवरे आहेत. व्हिक्टोरिया सरोवराच्या पूर्वेकडील खचदऱ्यांत रूडॉल्फ, बारिंगो, मागदी, नेट्रॉन इ. सरोवरे आहेत. त्यांच्या दक्षिणेकडील नीआस सरोवर हेही एका खचदरीतच आहे. या दऱ्यांची लांबी बरीच असली, तरी रुंदी मात्र ३० ते ७० किमी. इतकीच आहे.
कित्येक खचदऱ्या शेकडो मीटर खोल आहेत. त्यांपैकी काहींचे तळ समुद्रसपाटीच्याही खाली आहेत व त्यांच्यात असणाऱ्या सरोवरांतील पाणी समुद्रसपाटीखाली ३०० मी. पासून १,४०० मी.पर्यंत खोल आहे. उदा., बैकल सरोवर समुद्रसपाटीच्या वर १,००० मी.वर सुरू होते व ते समुद्रसपाटीखाली १,४०० मी. पर्यत जाते. टांगानिका सरोवर समुद्रसपाटीवर २,००० मी. तर समुद्रसपाटीखाली ७०० मी. आहे. व्हिक्टोरिया सरोवराच्या पूर्वेस खचदऱ्या असलेल्या प्रदेशात सापेक्षत: अलीकडील काळात ज्वालामुखी क्रिया घडली होती. त्या भागातील ज्वालामुखी आता नामशेष होत आलेले आहेत. खचदरीच्या लगत पूर्वेस किलिमांजारो हा ज्वालामुखी पर्वत आहे. पूर्व आफ्रिकेतील खचदऱ्या असलेल्या प्रदेशाच्या उत्तरेस आणि तांबड्या समुद्राच्या पलीकडे पॅलेस्टाइन, मृतसमुद्र व जॉर्डन ही असलेल्या क्षेत्रातही १५ ते २० किमी. रुंदीच्या खचदऱ्या आहेत.
खचदऱ्यांची निर्मिती ही कवचाच्या घडामोडींतील लहानसहान गोष्ट नसते, हे त्यांनी व्यापिलेल्या क्षेत्राच्या लांबीवरून दिसून येते. त्या असलेल्या क्षेत्रात ज्वालामुखी क्रिया घडून आल्याचा पुरावाही उपलब्ध आहे. पृथ्वीच्या कवचाखाली काही तीव्र खळबळ होण्याने त्या निर्माण झाल्या असल्या पाहिजेत, यात शंका नाही. अटलांटिक महासागराच्या मध्यभागी असलेल्या कटकात (मिड् अटलांटिक रिजमध्ये) त्या कटकाच्या माथ्याशी असलेली एक खचदरी, १९५३ साली आढळली. तिच्यात व आफ्रिकेतील टांगानिकाच्या खचदरीत पुष्कळच साम्य आहे.
दुसरी सुप्रसिद्ध खचदरी म्हणजे ऱ्हाईन नदीची खचदरी होय. तृतीय कल्पात (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) पृथ्वीच्या कवचास घड्या पडून आल्प्स पर्वताच्या रांगा निर्माण होत असताना दाब पडून झालेल्या विक्षोभामुळे व्होज व ब्लॅक फॉरेस्ट यांच्यामध्ये असलेला प्रदेश खचून ऱ्हाईन नदीची खचदरी तयार झालेली आहे.
प्रथम पूर्व आफ्रिकेतील खचदरीला जे. डब्ल्यू. ग्रेगोरी यांनी द ग्रेट रिफ्ट व्हॅली (महा खचदरी) असे नाव दिले. त्यांचे मत असे की, कवचाच्या हालचालीत कवचावर ताण पडल्यामुळे त्याच्यात सामान्य विभंग उद्भवले व दोन विभंगांमधील खडकाचा ठोकळा खचून खाली सरकल्यामुळे खचदऱ्या तयार झाल्या. जमीन खचण्याची अशी क्रिया ही एखाद्या कमानीचा कळीचा दगड गळून खाली जातो त्यासारखी आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
संपीडनाने (दाबले जाऊन) कवचात व्युत्क्रमी विभंग उत्पन्न होऊन दोन विभंगांच्या मधे असलेला कवचाचा ठोकळा खाली दडपला गेल्यामुळे खचदऱ्या निर्माण होतात, असेही सुचविण्यात आले होते. पण हे मत आता मागे पडले आहे.
केळकर, क. वा.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..