कुटकी : (कटकी, कोल्हाल हिं. गादरतंबाखू गु. कलहार सं. कुलाहल, भुतकेशी लॅ. सेल्शिया कॉरोमांडेलियाना कुल-स्क्रोफ्यूलॅरिएसी). ही सरळ वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ षधी भारतात सर्वत्र तणासारखी उगवलेली आढळते शिवाय ही श्रीलंका, अफगाणिस्तान,चीन इ. देशांतही आढळते. खोड साधारण अर्धा ते एक मी. पर्यंत व केसाळ असून मूलज (मुळापासून निघालेली आहेत असे वाटणारी) व स्कंधेय (खोडापासून निघालेली पण जमिनीलगत न येणारी) अशी दोन प्रकारची केसाळ पाने त्यावर येतात. मूलज पाने लांब देठाची, मध्यम आकाराची, वीणाकृती, पिसासारखी, थोडीफार विभागलेली आणि दातेरी असतात पानांचे खंड कमी जास्त आकाराचे असून लहान खंड तळाजवळ पण टोकास एक मोठा खंड असतो. स्कंधेय पाने एकाआड एक, तशीच पण टोकाकडे लहान व देठ कमी होत जाऊन शेवटी फुलोऱ्यात हिरवी लहान छदे (फुले व फुलोरा ज्यांच्या बगलेत येतात अशी पाने) दिसतात. फुले लहान, पिवळी, चक्राकृती असून लांब दांड्यावर साध्या वा फांद्या असलेल्या मंजरीवर जानेवारीमध्ये येतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ स्क्रोफ्यूलॅरिएसी कुलातील वर्णनाप्रमाणे असतात. केसरतंतूवर जांभळे केस (फूल) बोंड गोलसर व लहान बिया अनेक व त्यांवर पुटकुळ्या असतात.

पाने अतिसार व आमांश यांवर स्तंभक (आकुंचन करणारी) व शामक. वनस्पतीचा रस कातडीच्या रोगावर पिण्यास देतात व तेलातून बाहेरून चोळतात त्यामुळे हातापायाची आग कमी होते. ज्वरात तहान कमी होण्यासाठी मूळ चावण्यास देतात. पानांचा रस साखर व पाणी घालून रक्ती मूळव्याधीवर देतात.

काळी

काळी कुटकी : (बाळकडू हिं. कुरू गु. कडू सं. कटुकी लॅ. पिक्रोऱ्हायझा कुरोआ कुल स्क्रोफ्यूलॅरिएसी). हिमालयाच्या काश्मीर ते सिक्कीम प्रदेशात सु. २,७००-४,५०० मी. उंचीपर्यंत आढळणारी एक लहान केसाळ व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ षधी. मूलक्षोड (जमिनीत असणारे खोड) काष्ठमय व सु. १५-२५ सेंमी. लांब पाने साधारणत: ५-१० सेंमी. लांब, दातेरी व चमच्यासारखी फुले पांढरी किंवा फिकट निळी, लहान व पर्णहीन दांड्यावरच्या कणिशात असून लांब व आखूड केसरतंतू असलेली अशी दोन प्रकारची असतात. फळ (बोंड) लहान, १.३ सेंमी. इतर सामान्य लक्षणे ðस्क्रोफ्यूलॅरिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

मुळे व सुके खोड (मूलक्षोड) कडू, पौष्टिक, पित्तस्राव व जठररस वाढविणारी, ज्वरनाशक, क्षुधावर्धक असून रेचक आणि दीपक (भूक वाढविणाऱ्या) औषधांत घालतात. त्यांत प्रतिजैव (सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंधक किंवा त्यांचा नाश करण्याचे) गुणधर्म असतात.

‘कुटकी’ असे हिंदी नाव (इं. इंडियन जेन्शियन लॅ. जेन्शियाना कुरोआ) असलेली निळसर फुलाची औषधी हिमालयात आढळते, तिचे व परदेशाहून आयात होणाऱ्या पिवळ्या जेन्शियन (लॅ. जेन्शियाना ल्यूटिया) जातीचे औषधी गुणधर्म वर वर्णन केलेल्या कुटकीप्रमाणे असल्याने ह्या सर्व जाती परस्परांऐवजी वापरणे शक्य आहे त्या उचकी, कावीळ आणि पानथरी या विकारांवरही गुणकारी आहेत. कुटकीची अभिवृद्धी (लागवड) बीजे व मूलक्षोडे यांच्या साहाय्याने करतात. (चित्रपत्र ५२).

परांडेकर, शं. आ.

कुटकी (जेन्शियाना कुरोआ)